Sunday, August 31, 2014

अंक १, २, ३…


अंक १
शालेय जीवनात चंद्राचे निरीक्षण करण्याचा माझा छंद होता. वसईच्या घरी रात्री शहरातील दिव्यांचा किमान हस्तक्षेप असल्याने आकाशनिरीक्षणासाठी अतिशय अनुकूल वातावरण असे आणि अजूनही असतं. आकाशातून जाणारा एखादा मिणमिणता ठिबका दिसला की हा मानवनिर्मित उपग्रह असल्याची मी समजूत करून घेत असे. त्याचप्रमाणे आकाशात एका विशिष्ट ठिकाणी एकमेकाला लागून असणारे ग्रह म्हणजे जोडग्रह असा ग्रह मी करून घेतला होता. त्यावेळी एक आकाशदर्शनावरील एक पुस्तक सुद्धा मी विकत घेतलं होतं. बहुदा जयंत साळगावकरांच असावं. त्यात प्रत्येक महिन्यात आकाशात पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि ऊर्ध्व दिशेचा नकाशा दिलेला होता आणि त्यात एका विशिष्ट वेळी दिसणाऱ्या तारे, ग्रह ह्यांची नावे दिली होती. त्यानुसार मी अभ्यास करण्यास सुरुवात सुद्धा केली होती. परंतु त्यानंतर काही कारणांनी हा अभ्यास थांबला. फक्त आकाशात सप्तर्षी आणि त्यातील सहाव्या ताऱ्याजवळील अरुंधती मी हमखास ओळखू शकत होतो आणि अजूनही शकतो. ह्या सप्तर्षींची हल्ली दिसणारी विशिष्ट संरचना ही दहा लाख वर्षापूर्वी वेगळी होती आणि अजून दहा लाख वर्षानंतर वेगळी असणार असेही वाचल्याचे लक्षात आहे. आता ही दोन्ही विधाने पडताळून पाहण्याचं कोणताच मार्ग माझ्याकडे किंवा आपणा कोणाकडे नाही. बाकी बऱ्याच ताऱ्यापासून निघालेला प्रकाश आपणापर्यंत पोहोचायला काही दशलक्ष वर्षे लागतात हे वाचून अचंबा वाटे.
असो आकाशातील माझे मुख्य आकर्षण चंद्र असे. शुक्ल पक्षात चंद्र दिवसा लवकर उगवत असतो परंतु सूर्याच्या प्रकाशामुळे आपणास तो सहजासहजी दिसत नाही. तर अशा ह्या चंद्राला आकाशात दिवसा शोधून काढणे हा माझा आवडता छंद होता. दिवाळीच्या पहिल्या अभ्यंगस्नानाच्या दिवशी म्हणजे नरकचतुर्दशीला चंद्र सकाळी पाच सव्वा पाचच्या दिशेला उगवतो. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे हा चंद्र आपल्याकडे आग्नेय दिशेलाच बऱ्याच वेळा उगवतो. तर नरकचतुर्दशीला हा चंद्र अगदी छोट्या कोरीच्या रुपात असतो त्यामुळे सुर्योदयाआधी त्याचे दर्शन घेण्याची माझी धडपड असे. आग्नेय दिशेला असणाऱ्या चिंचेच्या झाडामुळे ह्या प्रयत्नांत थोडा अडथळा येत असे. ह्या चंद्रकोरीच्या विविध रूपांचे निरीक्षण करताना माझी बरीच वर्षे अशी समजूत असे की आकाशात एकदा उगवलेला चंद्र त्या दिवसापुरता आकाराने कायम असतो आणि मग दुसऱ्या दिवशी / रात्री उगवताना त्याच्या आकारात वाढ / घट होते. पण एका कृष्ण द्वितीयेच्या रात्री झोपताना चंद्र पाहून झोपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाग आल्यावर चंद्रदर्शनासाठी पुन्हा गच्चीवर गेलो तेव्हा त्याचा आकार कमी झाल्याचं जाणवलं. थोडा विचार केल्यावर डोक्यात प्रकाश पडला. चंद्रकला म्हणजे शेवटी काय तर चंद्राचा प्रकाशित भाग कमी जास्त प्रमाणात दिसण्याची प्रक्रिया. एकदा का चंद्र आकाशात उगवला म्हणून काय त्या दिवसापुरता ही प्रक्रिया थोडीच थांबून राहणार आहे?
अंक २ 
आपल्या आयुष्याचं पण असंच आहे नाही का? क्षणाक्षणाला, दिवसामागे आपल्यात, आपल्या स्वभावात सुक्ष्म का होईना पण बदल होत राहतो पण आपणा स्वतःला किंवा आपल्या अगदी जवळच्या लोकांना तो कधी जाणवत नाही. पण एखादा दूरगावी / परदेशी गेलेला मित्र अचानक काही वर्षांनी आपल्याला भेटतो आणि मग आपल्या बदललेल्या स्वरूपाविषयी (माझ्या बाबतीत अगदी दुर्मिळ झालेल्या केसांविषयी!) आश्चर्य व्यक्त करतो . आणि मग तासभर गप्पा मारून झाल्यावर "आता तू बराच बोलका झालास हं!" अशी टिपण्णी सुद्धा करतो!
काही का असेना आयुष्यातील सरती वर्षे हा प्रकार कोणालाच मनापासून आवडत नसणार! ज्या लोकांचं आयुष्य बऱ्यापैकी सुखासमाधानात चाललं आहे अशांना तर मुळीच नाही. पण नाईलाज असतो. भोवतालची परिस्थिती बदलण्याची क्षमता जरी देवाने मनुष्याला बहाल केली असली तरी कितीही सुखद बनविलेल्या ह्या सुखद परिस्थितीचा अनंत काळापर्यंत उपभोग घेण्याची मनुष्याला देणगी देण्याची चूक मात्र देवाने केली नाही.
 अंक ३
अशाच अनंत अवकाशातून देहविरहीत "क्ष" विहार करीत चालला होता. पृथ्वीवरील त्याचं आयुष्यकाल संपून किती वर्षे होऊन गेली ह्याची त्याला जाणीव नव्हती. पृथ्वीच्या सापेक्ष त्याची सध्याचं ठिकाण कोठे आहे हे ही त्याला कळत नव्हतं. फक्त मनःपटलावर एका कोपऱ्यात मिणमिणणारा ठिबका म्हणजे पृथ्वी असे मानायला त्याला फार आवडत होत. आपल्या मनाला खूप काही सामर्थ्य लाभलं आहे ह्याची त्याला जाणीव झाली होती. भूतलावरील आपल्या आयुष्यातील कोणताही क्षण, त्या क्षणाला मनात आलेल्या भावना सर्व काही पुन्हा निर्माण करण्याची क्षमता त्याला लाभली होती. लहानपणाचा अल्लडपणा, खेळण्याची उत्स्फुर्त वृत्ती जशी त्याच्या मनात अचानक डोकावे तशीच शालेय जीवनातील परीक्षेचं भय, परीक्षा जवळ आली असूनसुद्धा पुस्तक न उघडल्याची भावनासुद्धा त्याला भेट देत असे. तारुण्यातील अंगातील विश्वाला जिंकून घेण्याची खुमखुमी मध्येच त्याला आतुर बनवी तरी वृद्धापकाळातील असहायपणा अस्वस्थकरून जाई. अशा ह्या शरीरविरहीत अवस्थेत विहार करून अगणित काल लोटला तरी ह्या अवस्थेचे त्याच भय मात्र दूर झालं नव्हतं. हो मधल्या काळात असंच काही अंतरावरून आपल्यासारख एक असंच मन गेल्यासारखा त्याला भास होऊन गेला.
हा प्रकार किती काल चालणार हेच त्याला कळत नव्हत! ह्या अंतराळातील तीव्र हिवाळा मात्र शरीर नसलं तरी त्याला बोचत मात्र राहणार होता!


 

Monday, August 25, 2014

Etiquette ची ऐशी की तैशी

 
परवा शनिवारी वीणा पाटील ह्यांचा  एक सुरेख लेख वाचला. आपल्या प्रवासादरम्यान आपण एकंदरीत हॉटेल , विमान किंवा विमानतळ इथे स्वच्छतागृह योग्य प्रकारे वापरतो किंवा नाही ह्याचा त्यांनी उहापोह केला होता. हा लेख मनापासून भावला. आपण  परदेशी, इतर राज्यात पर्यटनानिमित्त जातो तेव्हा आपण आपल्या देशाचे, प्रांताचे प्रतिनिधित्व करत असतो. आपल्या वागणुकीवरून इतर लोक आपल्या प्रांतातील , देशातील नागरिकांच्या वागणुकीविषयी अटकळ बांधत असतात. त्यामुळे आपण काही प्राथमिक स्वरूपाचं भान राखलं पाहिजे असं वीणाताईनी म्हटलं होतं. 
हॉटेलमधील आपली रूम आपण ज्यावेळी सोडतो त्यावेळी ती रूम आपण ज्यावेळी तिथे प्रथम प्रवेश केला त्यावेळी ज्या स्वरुपात होती त्याच स्वरुपात सोडण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी म्हटलं आहे. रूम सर्विस करणारी माणसं बघून घेतील हा दृष्टीकोन चुकीचा आहे. काही झालं तरी ती सुद्धा माणसंच आहेत. इतक्या विविध प्रांतातून, देशातून आलेल्या विविध पर्यटकांच्या वेगवेगळ्या सवयी आणि त्यानुसार त्यांनी वापरलेल्या रूम्स परत त्यांच्या मूळ स्वरुपात आणताना त्यांचे काय हाल होत असतील ह्याचा विचार करणं आवश्यक आहे. आता रूमच्या वापरामध्ये मध्ये टॉयलेटचा वापर आलाच की हो! बाकी सार्वजनिक ठिकाणी काहीजण सर्वांसमोर ब्रश करतात हे ही किती चुकीचं आहे हे ही त्या जाणवून देतात. 
लेख वाचून पुरवणी बाजूला ठेवली तरी डोक्यात भुंगा चालूच राहिला. टॉयलेट, बाथरूमच्या हॉटेलमधील वापराची त्यांनी सांगितलेली मार्गदर्शक तत्वे घरीसुद्धा लागू होतात की नाही? बऱ्याच वेळा प्रत्येक घरी फक्त काही ठराविक माणसांनीच ह्यांच्या स्वच्छतेचा वसा घेतला आहे काय अशी परिस्थिती असते. पण हा घरचा मामला असल्याने ही माणसे बोलत नाहीत! 
Etiquette चा शब्दकोषातील अर्थ म्हणजे एखाद्या प्रांतातील, एखाद्या सामाजिक स्तरातील एका विशिष्ट वर्गाच्या सामाजिक जीवनातील चालीरिती. आता मला आलेले ह्या संदर्भातील अनुभव किंवा मी ऐकलेल्या काही Etiquette च्या गाथा 
१) परदेशी ऑफिसात काम करताना एखाद्या माणसाच्या डेस्क, केबिनमध्ये कामानिमित्त गेल्यावर अगदी लोकलमध्ये प्रवास करत असल्याप्रमाणे त्याच्या जवळ जाऊ नये. एक विशिष्ट अंतर राखून  त्याच्याशी बोलावं .  आणि हो प्रवेश करताना हळुवार टकटक करून त्याची आधी परवानगी घेणे इष्ट!
२) परदेशी ऑफिसात आपल्या स्थानिक भाषेत अगदी चेव आणून जोरात गडबड करू नये. 
३) तीव्र वासाचे पदार्थ दुपारच्या जेवणासाठी आणून ते ऑफिसातील ओवन मध्ये गरम करणे टाळावे. त्यांचा घमघमाट आपल्या परदेशी सहकाऱ्यांना सहन होईलच असे नाही !
४) पुढे ब्रायटन मालिकेत ह्याचा उल्लेख येईलच पण इंग्लंडच्या पब मध्ये पार्टी देताना यजमानाने फक्त पहिल्या पेगचे पैसे भरण्याची प्रथा आहे. त्यापुढील हवे तितके पेगचे पैसे प्रत्येकाने आपल्या खिशातून भरावे. 
५) स्थानिक रस्त्यावर वाहन चालवताना एखादा पादचारी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत आहे असा थोडादेखील संशय आल्यास तात्काळ वाहन थांबवावं आणि स्मितहास्य करून हात बाहेर काढून त्याला रस्ता ओलांडण्यास प्रोत्साहित करावं. ह्यात काही वेळा मी पादचाऱ्याच्या भूमिकेत असताना इच्छा नसताना त्या चालकाच्या विनंतीचा मान राखून रस्ता ओलांडण्याची उदाहरणे आहेत.  
६) परदेशातील भाड्याच्या सदनिकेत राहताना काही जगावेगळे नियम पाळावे लागतात. रात्री दहानंतर आंघोळ करू नये असाच एक नियम. कारण काय तर - रात्रीच्या शांत वेळी वाहत्या पाण्याच्या आवाजाने  लोकांची झोपमोड व्हायला नको! बाकी इंग्लंडात राहत असताना भाड्याने बंगल्यात राहणाऱ्या सहकाऱ्यांना बाजूच्या हिरवळीची निगा राखली नाही म्हणून दंड झाला आणि मग वैतागून त्यांनी तो बंगला सोडून दिला. शेवटी काय म्हणतात ना "रोममध्ये असताना एखाद्या इटालियन माणसाप्रमाणे रहा!" आता इथे इटलीचा बाकी कोणता संदर्भ घेऊ नकात ही विनंती!
आता मात्र परदेशी वास्तव्य करून मायदेशी परतलेल्या लोकांनी ह्यातील काही रीतीभाती सोयीस्करपणे भारतात आणल्या आहेत. लहान मुलांच्या वाढदिवशीची रिटर्न गिफ्ट आणि तत्सम अनेक प्रकार! 
जेव्हा आपण एखाद्या ऑफिसातील पार्टीला वगैरे जातो तिथे सुद्धा बरेच अलिखित नियम असतात. असो ही यादी लांबतच जाईल. जपानी लोकांबरोबरच्या मिटिंग मध्ये बरेच वेगळे नियम आहेत असे ऐकून आहे, मला मात्र केवळ काही जपानी लोकांशी ई - मेल व्यवहार करण्याचे भाग्य लाभलं . त्यावेळी सन ही उपाधी लावून त्यांना संबोधित करण्याची प्रथा आवर्जून लक्षात ठेवण्याचा इशारा माझ्या अमेरिकन सहकाऱ्याने मला दिला होता. 
बाकी व्यावसायिक जगात ई मेल पाठवताना सुद्धा अनेक रितीभाती आहेत. कोणाला To बॉक्स मध्ये ठेवावे, कोणाला Cc मध्ये ठेवावे आणि केव्हा Bcc वापरावा ह्याचे प्रत्येक ठिकाणी अलिखित नियम असतात. हे आपले आपण समजून घ्यायचे असतात. 
हल्ली एक नवीन अनुभव यायला आहे. भारतीय लोकांचा संगणकीय क्षेत्रातील आत्मविश्वास वाढीस लागला आहे आणि त्यामुळे आम्ही वागू तशा रितीभाती असे म्हणण्याची वृत्ती वाढीस लागली आहे. आपल्या वाढत्या संख्येमुळे काही प्रमाणात हे खपवलं सुद्धा घेतलं जाऊ लागलं आहे. चूक काय बरोबर काय ठरवणार कोण?
लेखाच्या शेवटी एक मजेशीर आठवण! अभियांत्रिकी शिक्षण घेताना माझ्यासोबत एक खास मित्र होता. मी चिंतातूर जंतू तसाच तोही!  त्यावेळी मैत्रिणी वगैरे प्रकार बऱ्यापैकी रुळला असला तरी आमच्यासारख्या लोकांच्या नशिबात असला काही प्रकार नव्हता! तरी सुद्धा स्वप्न बघायला जाते काय अशी आमची स्थिती होती. त्यामुळे जेव्हा केव्हा आपलं लग्न जमेल आणि वाग्दत्त वधूला घेऊन प्रथम अल्पोपहारासाठी हॉटेलात जाऊ त्यावेळी काय  होईल ह्याची एकदा चर्चा चालू होती.
मित्र -  "उसने अगर मसाला डोसा मंगाया तो?"
मी - "तो क्या हुआ? मैं भी मंगाउँगा!"
मित्र - "मैं भी मंगाउँगा! :) साले कांटे चमचेसे मसाला डोसा ठीक से खाने को आता हैं क्या!"
 मसाला डोश्याचा हा संभाव्य धोका मला त्या मित्राने जाणवून दिला म्हणून ठीक! पुढे एंगेजमेंट ते लग्न ह्या काळात मसाला डोसा न मागवण्याची दक्षता मी घेतली! पुढे लग्नानंतर काय - तर सरळ दोन हाताने मसाला डोश्याचा आनंद लुटला! म्हणूनच शीर्षक Etiquette ची ऐशी की तैशी !!

Wednesday, August 20, 2014

ब्रायटन वास्तव्य - भाग ८

 


बघता बघता ब्रायटन आठवणींची ही शृंखला आठव्या भागापर्यंत पोहोचली. "आला भाग आठवा! अजुनी आठवणी आठवा!!" असे गंमतीने म्हणावसं वाटतं. सुरुवातीच्या भागात सर्व आठवणी महिन्याच्या क्रमाने देण्याचा प्रयत्न केला, पण आता मात्र सर्व सरमिसळ होत आहे.
मधल्या काळात आम्ही लंडन आणि स्कॉटलंड अशा दोन भेटी दिल्या. पैकी लंडन भेट एका दिवसाची तर स्कॉटलंड भेट तीन दिवसाची होती. लंडन हे रेल्वेने एक - सव्वा तासाच्या अंतरावर होते. जून महिन्याच्या एका शनिवारी सिंटेलचा सहा सात जणांचा गट लंडनला जाण्यासाठी निघाला. कुपनरूपातील तिकीट चुंबकीय पट्टीतून फिरविल्यावर उघडणारा दांडा पाहून आम्हांला काहीसं अप्रूप वाटलं होतं हे आता कबूल करायला हरकत नसावी. शांत ब्रायटन मध्ये वास्तव्याची सवय झाल्याने लंडन आम्हांला बरेच गजबजलेले वाटत होते. सर्वप्रथम आमची पावले मादाम तुसा ह्या प्रसिद्ध संग्रहालयाकडे वळाली. ह्या संग्रहालयात जगप्रसिद्ध व्यक्तींच्या मेणाच्या प्रतिमा बनवून ठेवल्या आहेत. ह्या इतक्या हुबेहूब असतात कि प्रत्यक्ष व्यक्ती सुद्धा ह्या मेणाच्या प्रतिमेजवळ तशाच वेषात उभी राहिली, तर प्रत्यक्ष व्यक्ती कोणती आणि प्रतिमा कोणती असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. ह्या संग्रहालयाचे तिकीट दहा बारा पौंडाच्या आसपास होते. ह्याचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे आमच्या गटातील एकाने हे तिकीट काढून आत येण्याऐवजी बाहेर थांबणं पसंत केलं. आमच्यातील काही जणांनी त्याची अरसिक, कंजूष  म्हणून टर उडवली पण त्याची सुद्धा स्वतःची बाजू होती असे मला वाटून गेलं. आधी म्हटल्याप्रमाणे परदेशवारीमागे प्रत्येकाचे विविध उद्देश असतात. पै पै वाचविण्याचा काहींचा हेतू असेल तर त्याने असा निर्णय घेण्यात काही चूक नाही असे माझं मत पडलं. पुढे तोच मला नंतर एकदा म्हणाला, "आपण ही सर्व ठिकाणं आयुष्यात बघू असे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं, वाईट एकाच गोष्टीचं की ज्यांच्यामुळे आज आपण इथवर आहोत, त्या आईवडिलांना मी हे काही दाखवू शकत नाही!" मादाम तुसामध्ये न येण्याच्या त्याच्या निर्णयाचा अजून एक पैलू मला जाणवला.
बाकी मग लंडन ब्रिज, टॉवर ब्रिज हे सुद्धा पाहिले. लंडन ब्रिज फारसा मोठा नसून टॉवर ब्रिज हा मोठा आहे अशी सामान्य ज्ञानात भर पडली. ह्या ब्रिजच्या विविध कप्प्यात जाऊन आम्ही तिथल्या मार्गदर्शक लोकांनी दिलेली माहिती ऐकली. थेम्स नदीतून जाणाऱ्या मोठाल्या बोटींना वाट करून देण्यासाठी हा ब्रिज मधून उघडला जातो हे ऐकून आम्ही अचंबा व्यक्त केला.
बाकी थेम्सचं पाणी जवळून पाहिल्यावर ते बरेचसं गढूळ असल्याचं जाणवलं. मग पावलं लंडनच्या दुसऱ्या भागांकडे वळली. बिग बेन ह्या प्रसिद्ध घड्याळाच दर्शन घडलं. लंडन आयची तिकीट ऐन वेळी सुद्धा मिळतील हा आमचा आत्मविश्वास किती चुकीचा होता हे आम्हांला तिथे जाऊन कळलं. त्या नंतर १० डाउनिंग स्ट्रीट ह्या ब्रिटीश पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाच्या बाहेरून एक फेरी मारली. मग ब्रिटीश सम्राट आणि सम्राज्ञीचे अधिकृत निवासस्थान असलेल्या बकिंगहम राजवाड्याला भेट दिली. तिथला प्रसिद्ध 'चेंज ऑफ गार्डस' हा पहारेकऱ्याच्या अदलाबदलीचा कार्यक्रम पाहिला. ह्या सर्व कार्यक्रमात हे पहारेकरी हालचालींची इतकी काटेकोरता दाखवितात की ह्यांच्या जागी यंत्रमानव आणले तरी ते ह्याहून अधिक अचूकता आणू शकणार नाहीत असे वाटून गेलं.
बाकी ह्या प्रासादाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खूप हिरवळ होती आणि प्रेमी युगुलांचे प्रेम ऊतू चाललं होतं. सार्वजनिक ठिकाणच्या प्रेमप्रदर्शनाच्या बाबतीत मग त्या मानाने अमेरिका परवडली असे नंतर अमेरिका भेटीत मला वाटून गेलं. रात्री उशिरा ब्रायटन मध्ये परतल्यावर आपल्या गावी परतल्याचा आनंद झाला. एक भारतीय धाटणीच उपहारगृह पाहून आम्ही त्यात शिरलो. ऑर्डर वगैरे दिल्यावर मालक पाकिस्तानी असल्याचं कळून चुकलं. पण फारसं काही वाटून न घेता आम्ही जेवणावर आडवा हात मारला.
नंतर एकदा दुसऱ्या एका पाकिस्तानी उपहारगृहात एक आव्हानपूर्ण जेवण असल्याची बातमी आमच्या गटापर्यंत येउन पोहोचली. जेवण अगदी मसालेदार असणार होतं. जे कोणी सात पौंड किंमत असणार हे जेवण पूर्ण संपवू शकणार होतं त्याला ते फुकटात मिळणार होतं. आमच्यातील प्रफुल्ल आणि बहुदा श्रीकांत ह्यांनी हे आव्हान स्वीकारण्याच ठरविलं. त्यांचा हा पराक्रम बघण्यासाठी आम्ही सर्व मंडळी त्यांच्या सोबत एका रात्री ह्या हॉटेलात गेलो. जिभेवर कमीत कमी वेळ घास ठेवत तो थेट पोटात ढकलल्यास फारसा त्रास होणार नाही असे प्रफुल्लचे धोरण होते. बऱ्याच नाट्यमय प्रसंगानंतर आणि ह्या दोघांच्या अनेक बाथरूम भेटीनंतर हे आव्हान यशस्वीरित्या ह्या दोघांनी संपवलं! त्यानंतर मात्र दोन दिवस हे दोघं पोटदुखीने बेजार होते हे सांगायला नकोच!
आता पाकिस्तानचा विषय निघाला आहे तर एक अजून एक आठवण! सिंटेलच्या टीममध्ये परत शिरल्यानंतर आम्ही लॅंचेस्टर हाउस मध्ये होते. ह्याच्या दुसऱ्या मजल्याच्या एका बाजूला आम्ही सर्व आज्ञावली लिहिणारी मंडळी आणि दुसऱ्या बाजूला अमेक्सचं कॉल सेंटर होतं. आमच्या सिंटेलच्या टीममध्ये टोनी रॉबर्ट्स हा इंग्लिश नागरिक सुद्धा होता. कॉल सेंटर मधील सुंदर ब्रिटीश तरुणी ह्या टोनीच्या मैत्रिणी असल्याने आम्ही टोनीचा काही प्रमाणात हेवा करत असू! ह्या कॉल सेंटरला जगभरातून अमेक्सच्या क्रेडिट कार्डधारकांचे फोन येत असत. त्यातील काहीना इंग्लिशमध्ये बोलता येत नसल्याने बहुदा ह्या लोकांकडे दुभाषी असे. असेच एकदा हा दुभाषी नव्हता, त्यामुळे एका सुंदर ब्रिटीश युवतीला पाकिस्तानातून एका ग्राहकाचा फोन आल्यावर तिची तारांबळ उडाली. ती धावतच टोनीकडे मदतीला आली. टोनीने तिचे बोलणे ऐकून घेतलं आणि आमच्याकडे नजर वळविली. ती युवती टोनीच्या डेस्कवर आल्याने आमच्या नजरा लपूनलपून त्याच दिशेने होत्या हे सांगणे न लगे! टोनीने क्षणभर आम्हां सर्वांकडे पाहिलं आणि मग तो आमच्या दिशेने येऊ लागला. तो ज्यावेळी त्या युवतीसोबत येउन माझ्या डेस्कवर थांबला त्यावेळी बाकीच्या सर्वांचा हिरमोड झाला. मग मी आणि ती युवती तिच्या डेस्कवर गेलो. आम्ही त्या पाकिस्तानी ग्राहकाला फोन लावला, त्याचं उर्दू बोलणं समजून घेत त्याची बिल भरण्याविषयीची तक्रार मी ऐकून घेतली. आणि दुभाष्याच काम करीत पुढील मार्ग आखला. अशा प्रकारे एका ब्रिटीश युवतीबरोबर ५० -६० पावलं चालणं आणि कराचीतल्या (बहुदा) एका ग्राहकाशी फोनवरून बोलणं असा आंतरराष्ट्रीय नागरिकत्वाचा अनुभव मी घेतला! बाकी नंतर टोनी मला धन्यवाद द्यायला आल्यावर, "Aditya should thank you" असे सांगायला आमची मित्रमंडळी विसरली नाहीत.

पुढे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात एका सोमवारी सुट्टी होती. त्यावेळी मंडळींनी स्कॉटलंड भेटीचा कार्यक्रम आखला. वेळेचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी म्हणून आम्ही शुक्रवारी सायंकाळीच ब्रायटनवरून निघालो. आमच्या रूम पार्टनरनी दूरदृष्टीने थोडी खिचडी करून ठेवली. ती खाऊन आम्ही लंडनला निघणाऱ्या ट्रेनमध्ये बसलो. स्कॉटलंडला जाणारी बस लंडनच्या बस डेपोमधून सुटणार होती. आम्ही काहीसे आधीच पोहोचलो. बाकीच्या लोकांनी जेवण न केल्याने ती मंडळी आमच्यावर बॅगा सांभाळण्याची जबाबदारी सोपवून उदरभरण्याच्या कार्यक्रमासाठी निघून गेली. इतक्या साऱ्या बॅगा आणि आम्ही दोघे तिघे जणच असल्याने आम्ही काहीसे धास्तावलो होतो. अचानक एका कोपऱ्यात आम्हांला गडबड ऐकू आली. एका भुरट्या चोराने एका महिलेची बॅग उचलून तो पळू लागला होता. त्या महिलेसोबत अजून एक महिलाच होती. त्यामुळे आपला कोणी पाठलाग करणार नाही अशी त्याची समजूत होती. पण त्याची ही समजूत चुकीची होती. त्या महिलेने अगदी पी. टी. उषाच्या वेगाने त्या चोराचा पाठलाग केला. एका क्षणी ती आपल्याला पकडणार अशी जाणीव झाल्यावर त्या चोराने बॅग टाकून देऊन तो पळून गेला. हे एक मिनिटभर चाललेलं थरारनाट्य पाहून आम्ही चकित झालो. त्या चोराने आमच्यातील एखादी बॅग पळविली असती तर आम्ही त्याचा इतक्या वेगाने नक्कीच पाठलाग करू शकलो नसतो!

(क्रमशः)
 

Monday, August 18, 2014

संयमी प्रतिक्रिया!

 


मराठी भाषेत म्हटले आहे, "तलवारीच्या वाराने झालेली जखम एक वेळ भरून निघेल, पण शब्दाच्या वाराने झालेली जखम भरून निघणार नाही!". एखाद्या व्यक्तीच्या प्रगल्भतेची पातळी मोजण्याचे विविध मापदंड आहेत. त्यापैकी ती व्यक्ती एखाद्या सुखाची, दुःखाची अथवा संतापाची परिसीमा गाठू शकेल अशा प्रसंगास कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया देते हा एक मापदंड असू शकतो.
हल्लीच्या  व्यावसायिक जगात एखाद्या उच्चपदीय व्यक्तीस आपल्या भावनांवर बरेच नियंत्रण ठेवावं लागतं. दीर्घकालीन ध्येये साध्य करायची असतात. छोट्या मोठ्या प्रत्येक प्रसंगात विजयीवीर होणे आवश्यक नसतं! आपली मती, ऊर्जा खरोखर महत्त्वाच्या कामासाठी राखून ठेवायची असते. त्यामुळे दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या प्रसंगात संयत प्रतिक्रिया देणे आवश्यक असते. नाहीतर एखाद्या गावातील "त्याला मी असा कापला (म्हणजे शब्दांनी!)" अशी प्रतिक्रिया देणाऱ्या एखाद्या बढाईखोरात आणि ह्या व्यावसायिकात काही फरक उरणार नाही!
आता ही संयत प्रतिक्रिया देण्याची प्रक्रिया कशी असते? प्रत्येक घटनेनंतर प्रत्येकाच्या मनात तात्काळ आनंद, दुःख किंवा संताप अशी प्रतिक्रिया उमटते. पण अशा वेळी आपल्या मनात एक गाळणी असावी लागते. अशी गाळणी जी मनातील खऱ्या प्रतिक्रियेतील समोरच्या व्यक्तीच्या, प्रसंगाच्या दृष्टीने असणारा अनावश्यक भाग बाजूला काढून उरलेला उचित भाग आपली प्रतिक्रिया म्हणून व्यक्त करते. ह्यात एक फायदा होतो आणि तो म्हणजे पुढील काही काळ ह्या प्रसंगाच्या ज्या त्रासदायक स्मृती आपल्या भोवती रेंगाळू शकतात त्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. आता एक मात्र खरे की १०० टक्के वेळा संयत प्रतिक्रिया देणे गरजेचे नाही. समोरचा माणूस अगदीच नाठाळ असेल तर क्वचितच रौद्र रूप धारण करणे सुद्धा आवश्यक असते. सतत संयमी प्रतिक्रिया द्यायला लागलात तर तुमचा नरसिंह राव किंवा सध्याचा धोनी होण्यास फारसा वेळ लागणार नाही!!
सारांश काय? संयत प्रतिक्रिया देणारा व्यावसायिक जगातील माणूस बऱ्याच वेळा त्या विभागाच्या, कंपनीच्या सुरुळीत कामगिरीचं उत्तरदायित्व आपल्या डोक्यावर घेऊन वावरत असतो. आपलं वैयक्तिक जीवन सुद्धा असंच आहे! "एक घाव दोन तुकडे" अशा वृत्तीने दररोज जगण्यापेक्षा सुखी संसाराच्या जबाबदारीचं उत्तरदायित्व घेत संयमी प्रतिक्रिया देणे केव्हाही चांगलंच!
एक प्रश्न - संयमी आणि संयत ह्यातला फरक काय? की मी संयत ह्या शब्दाचा चुकीचा वापर केला?
बाकी शेवटी जाता जाता मला कीर्तनकार म्हणणाऱ्या माझ्या मित्राची आठवण झाली. मागच्या काही ब्लॉग पोस्ट्स खरोखर एखाद्या कीर्तनकाराच्या प्रवचनासारख्या झाल्या आहेत!

Saturday, August 16, 2014

चकचकीत ते रखरखीत!!


ब्लॉग लिहिताना आपण आपल्या समाजात सर्वांना जगण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे असा विचार मनात ठेवून हे लिखाण करीत असतो असा माझा गोड समज होता. होता म्हणायचं कारण म्हणजे गेल्या दोन दिवसाच्या सुट्टीत ह्या संदर्भात बरेच विचार मनात घोटाळत राहिले आणि हा समज मला वाटतो तितका योग्य नाही ह्याची जाणीव मला झाली.
बऱ्याच ब्लॉग मध्ये मी सर्वांनी साधेपणाने राहावे, आपल्या वैभवशाली संस्कृतीचा आदर करावा, निसर्गाचे रक्षण करावे, बाहेरचे तिखट, तेलकट पदार्थ खाऊ नयेत असा उपदेश करीत असतो. ह्याने सर्वांचे भलं होईल असे मी उघडपणे म्हणत नसलो तरी तसा आव मी आणत असतो. पण हे खरोखर शक्य आहे काय? माझं लिखाण, मी सुचवलेली जीवनपद्धती केवळ ज्यांच नोकरीधंद्यात व्यवस्थित चाललंय, ज्यांना नातेवाईकांचा आधार आहे, ज्यांना तब्येतीच्या मोठ्या तक्रारी नाहीत अशा लोकांनाच लागू होते. ज्याचं नोकरीधंद्यात व्यवस्थित चाललं नाहीये, ज्यांना दररोजचा लोकलचा प्रवास झेपत नाही असे लोक माझा ब्लॉग वाचण्याची शक्यता आधीच कमी आणि वाचल्यास त्यांच्या मनात हा कागदी घोडे नाचवणारा कोण अशी भावना निर्माण होण्याची शक्यता जास्त!
आता अशा संघर्ष करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात आशा निर्माण करण्याची जबाबदारी माझी नाही म्हणून मी माझे हात झटकून घेईन. प्रश्न असा येतो की आपल्या देशात ही जबाबदारी घेतेय कोण? स्पष्ट सांगायचं झालं तर कोणीच नाही!
आपल्याकडे अप्रिय गोष्टी परखडपणे बोलण्याची पद्धत नाही. पहिली अप्रिय गोष्ट म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढली आहे. पूर्वी युद्ध होतं, साथीच्या रोगांवर उपाय नव्हते त्यामुळे लोकसंख्या अचानक कमी होत असे. आज ह्या सर्व बाह्यघटकावर आपण बऱ्याच प्रमाणावर नियंत्रण मिळविले आहे. पण ह्या सर्व लोकसंख्येला उदरनिर्वाहासाठी उद्योग, किमान पातळीवरील राहणीमान देण्याची नजीकच्या भविष्यकाळात आपल्याकडे उपाययोजनाच नाही. आता ह्यासाठी केवळ सरकारला जबाबदार ठरविणे योग्य नाही.  आणि आपली तरुण लोकसंख्या ही आपली ताकद आहे असे उच्चरवात आपण कितीही सांगत असलो तरी ह्या लोकसंख्येला नोकरीसाठी योग्य बनविण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे.
आता आपण दोन उदाहरणे पाहूयात!
१> समजा मी कमी पाऊस पडणाऱ्या भागातील मोजकी जमीन असणारा शेतकरी आहे. तर माझे जीवन सुधारण्यासाठी मी काय करू शकतो? माझ्या अकलेनुसार प्रत्येक गावात छोटी छोटी तळी निर्माण करणे आवश्यक आहे. मी माझ्यासारख्या अनेक छोट्या शेतकऱ्यांना एकत्र आणून छोटी तळी खोदीन आणि त्याच्या भोवताली सागासारखे छोटे वृक्ष लावीन. प्रश्न असा आहे की साग मला उत्पन्न देईपर्यंतच्या मधल्या काळात मला रोजीरोटी देणार कोण? ह्या प्रश्नांचे माझ्याकडे उत्तर नाही!
२> समजा मी मुंबईच्या एका खोलीत माझ्या पालकांसोबत राहणारा वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. माझी बुद्धी काही विशेष नाही. मी एका साध्या कंपनीत १५ - २० हजाराची नोकरी करतो. मी मुंबईत मोठे घर घेऊ शकत नाही आणि कल्याण, विरारला भाड्याचं घर घेतलं तरी तिथून प्रवास करण्याइतपत माझी तब्येत ठीक नाही. माझ्या पालकांच्या छोट्या मोठ्या तब्येतीच्या तक्रारी सुरु आहेत. आणि तिशीला पोहोचलो तरी माझं लग्न जमण्याची शक्यता नाही. कारण माझ्याच सारख्या परिस्थितीत वाढलेल्या मुलींची ह्या परिस्थितीत आयुष्य घालविण्याची इच्छा नाही. आता माझं भवितव्य काय आणि माझं भवितव्य उज्ज्वल बनविण्यास कोण मदत करू शकेल असे कोणी मला दृष्टीक्षेपात दिसत नाही!
ही झाली केवळ दोन प्रातिनिधिक उदाहरणे! अशी अगणित उदाहरणे आपल्या भोवती समाजात असणार! पण त्यांच्याविषयी बोलण्याची, लिहिण्याची आजच्या समाजाची आणि माझी मानसिकता नाही. आम्हांला आमच्या समाजाचं एक सुरेख चित्र रंगवायचं आहे! आमची मनःस्थिती प्रसन्न राहील अशाच गोष्टी ऐकायच्या, वाचायच्या आणि माझ्या बाबतीत लिहायच्या आहेत. कधीकाळी ज्यांच्या पहिल्या पानावर सामाजिक समस्यांच्या उत्तरांची चर्चा व्हायची त्याच वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या निसर्गाच्या कुशीत दडलेल्या अलिशान सदनिकेच्या मालकीची स्वप्ने रंगवायची आहेत!
थोडक्यात सांगायचं झालं तर ढोंगीपणाची उदाहरणं शोधायची झाली तर बाहेर इतरत्र कोठे शोध घेण्याचीच गरज नाही!  

Friday, August 15, 2014

सत्यनारायणाच्या पूजेचे आधुनिक व्रत!

 



पावसाळा आणि विशेषतः श्रावण महिना  सुरु झाला की मराठी कुटुंबात सत्यनारायणाच्या पूजेच्या हालचाली सुरु होतात. सत्यनारायण पूजेच्या सर्वांच्या मनात रम्य आठवणी असतात. आमच्या वसईच्या घरात सत्तरीच्या दशकापासून दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा घातली जाते.  पावसात अगदी टवटवीत झालेल्या तुळशींपत्रांची हिरवीगार टोपली, लाल पिवळ्या फुलांची परडी आणि ताज्यातवान्या केळींनी बनवलेली सत्यनारायणाच्या पुजेची मखर! ह्या पूजेत एका ठिकाणी ऋतूकालानुसार मिळणारी फुले पाने असाही उल्लेख आहे.
पुजेची तयारी तर अगदी जोरात सुरु असते. ह्या पुजेची जी दोन तीन महत्वाची वैशिष्ट्य आहेत त्यात साजूक तुपात बनविलेला शिरा, तीर्थ, विष्णूसहस्त्रनाम आणि त्यानंतर तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येणारी जवळची नातलग मंडळी ह्यांचा समावेश असतो.
लहानपणी अनु भटजी ही पूजा सांगण्यासाठी घरी यायचे. ते फार कडक होते. पूजेतील सर्व विधी अगदी नियमानुसार पार पडले पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष असे. त्यावेळी बऱ्याच वेळा मी पूजेवर बसे आणि मग माझ्या  हातून काही चूक झाल्यास (जी नेहमीच होई!!) माझ्या आजीकडे तक्रारीच्या नजरेत पाहत, "तुम्ही ह्याला पूजा काहीच कशी शिकवली नाही" असे म्हणत. ते स्वर्गवासी झाल्यावर त्यांच्या वारसांनी मात्र इतका कडकपणा दाखवला नाही.  बाकी मग सर्वत्र थोडक्यात पूजा सांगण्यामागे कल दिसू लागला. ह्यालाही काही सन्माननिय अपवाद आहेत. बोरिवलीला प्राजक्ताच्या कुटुंबात पूजा सांगण्यासाठी येणारे योगेश भटजी हे मात्र अगदी शास्त्रोक्त पूजा सांगतात.
ह्या पूजेत अनेक चांगल्या गोष्टी आहेत.
१) ही पूजा साधेपणाचे महत्त्व अधोरेखित करते. ह्यातील कथेत सांगितल्याप्रमाणे अगदी बिकट परिस्थितीत असतानासुद्धा एखादा माणूस ही पूजा घालू शकतो.
२) त्याचप्रमाणे एखादे व्रत घेतले असता ते न चुकता कसे पाळावे हे ही ही पूजा सांगते.
३) आपले जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी ह्या निमित्ताने आपणास भेटतात. पावसाळ्याच्या काळात लग्नसमारंभाचे प्रमाण वगैरे कमी असल्याने ही जवळची मंडळी बराच काळ न भेटू शकण्याची जी शक्यता असते ती ह्या पूजेच्या निमित्ताने कमी होते.
ब्लॉगचा हेतू हाच ! ह्या पूजेच्या निमित्ताने जुनीच व्रते आधुनिक स्वरुपात अंगीकारा!
१) ह्या पूजेच्या निमित्ताने आयुष्यात साधेपणाने जगायला शिका!
२) आपल्या व्यावसायिक व्रतांचे, जबाबदाऱ्याचे कसोशीने पालन करा. ह्यात खंड पडल्यास कसे दुष्परिणाम होऊ शकतात ह्याचा कथेतील धडा लक्षात घ्या.
३) नातेवाईक, मित्रमंडळी ह्यांना घरी भेटा! घरच्या घरी घरगुती पदार्थ सेवन करा! त्यांच्या भेटण्याचं निमित्त करून बाहेर हॉटेलात जाऊन अरबट चरबट खाऊ नकात! 
इति आदित्य कथेचा नवीन अध्याय संपूर्णम!

Saturday, August 9, 2014

मनाचा तो हळवा कप्पा!!


मध्यंतरी कंपनीतर्फे  एका मोठ्या तारांकित हॉटेलात प्रशिक्षणाला हजर राहिलो त्यावेळची गोष्ट! प्रशिक्षण होते भावनिक बुद्ध्यांक आणि तत्सम बाबींविषयी! ही सर्व प्रशिक्षणे एकांगी नसावीत ह्यासाठी प्रशिक्षार्थी लोकांचा ह्यात सहभाग असावा म्हणून प्रशिक्षक प्रयत्नशील असतात. एखादं पुस्तकी तत्त्व सांगून मग त्या तत्त्वाला अनुसरून आपल्या प्रत्यक्षातील आयुष्यातील उदाहरणं सांगण्यास प्रशिक्षार्थींना प्रोत्साहित केलं जातं. इथे मग एक महत्वाचा बिंदू येतो. आपल्या आयुष्यातील उदाहरण सांगताना आपला खाजगीपणा तर सांभाळावाच त्याहून अधिक म्हणजे आपल्या सहकार्यांचा आणि कुटुंबियाचा खाजगीपणा जतन करणे अपेक्षित असतं.
अशा प्रशिक्षणात बर्याच वेळा मोजकी लोक खूप बोलतात आणि काहीजण गरजेपुरता मोजकं बोलून थांबतात.
आपल्या भावनांना मोकळं कधी आणि किती करावं हे प्रत्येकावर अवलंबून असतं. हल्ली व्यावसायिक जीवनातील लोकांची दडपण वाढली आणि त्याचबरोबर वैयक्तिक जीवनही दडपणाचे बनलं. हे दडपण सहन करण्याची प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी! त्यामुळे होत काय की ह्या साचलेल्या दडपणाने प्रत्येकजण तणावाखाली येतो. आणि काहीजण हळवीसुद्धा बनतात. आता ही दडपणे मोकळी करायला अनेकांना हवी असते एक संधी, एक व्यासपीठ, एक श्रोता!
काही लोक शुक्रवारी समछंदी लोकांना एकत्र करून बारमध्ये बसतात! तिथलं वातावरण, भाषा जरी अगदी बाळबोध नसली तरी हळवा कप्पा मात्र अगदी पूर्णपणे मोकळा होत असतो. काहीजण साप्ताहिक सुट्टीत निसर्गाची साथ धरतात! "केवळ मला ह्या जगात जन्माला यावं लागलं म्हणून मी नाईलाज म्हणून ह्या व्यावसायिक जगात वावरतोय, बाकी योग्य वेळ येताच मी तुझ्याकडे परत येईन, मी केवळ तुझाच आहे" अशी त्यांची निसर्गाला साद असते. काही जण संगीताच्या मैफिलीचा आधार घेतात! काही जण सोशल मिडिया वर ज्ञात, अज्ञात मित्रांशी छोट्या छोट्या वाक्यात हा हळवा कप्पा मोकळा करत असतात.
प्रश्न असा आहे ही हा हळवा कप्पा जीवन साथीदाराबरोबर मोकळा होण्याचं प्रमाण अगदी कमी का असतं? एकतर शांतपणे दोघांना वेळ कमी मिळतो, त्यात त्या दोघांच्या मोबाईलवर सतत काही संदेश येत राहतात आणि नवरा बायको समोर दिसली की घरगुती कामाचा विचार डोक्यात येणं ही बर्याच जणांची समस्या आहे. आणि नवरा बायकोत ज्या छोट्या मोठ्या कुरबुरी होत असतात त्याही प्राधान्यक्रमाने अशा वेळी चर्चेस येतात.
खरतरं तुम्हांला सर्वात चांगल्या प्रकारे ओळखणारा समवयस्क माणूस म्हणजे जीवनसाथी! त्याच्याकडे हा हळवा कप्पा मोकळा केल्यास तुम्हांला समजून घेतलं जाण्याची शक्यता सर्वात जास्त! पण हवा असतो त्यासाठी पूर्ण मोकळा वेळ! म्हणूनच तंत्रज्ञानाला एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जीवनात स्थान देऊ नकात!
दर सहा महिन्याने ह्या तंत्रज्ञानाने तुमच्या जीवनात काय सकारात्मक बदल घडवून आणला आहे ह्याच प्रामाणिक विश्लेषण करा! माझ्या मते सर्वात मोठा खलनायक म्हणजे भ्रमणध्वनीवरील इंटरनेट आणि त्यावरील "कसकाय" हा प्रोग्रॅम! मित्रांचे कार्यक्रम, भेटीगाठी, नित्यनेमाचे अपडेट हे सर्व "कसकाय" नव्हतं तेव्हा सुद्धा व्यवस्थित चालायचंच!


शेवटी थोडं विषयांतर झालं! पण तुम्हांला हळवा कप्पा आहे की नाही ह्याची तपासणी जरूर करून पहा आणि जमल्यास तो अधूनमधून मोकळाही करत रहा!

Tuesday, August 5, 2014

मराठी पाऊल पडते…

 
मुंबई मराठी माणसाची राहिली नाही ही खंत अगदी हल्ली हल्ली पर्यंत काही मराठी माणसं बोलून दाखवायची. आता ते ही बोलून दाखवत नाहीत. गेल्या काही वर्षांत जे काही झालं ते आपण सर्व जाणून आहोत. एखादे शहर जेव्हा अचानक अफाट वेगाने वाढू लागतं तेव्हा विविध पातळींवर संधी निर्माण होतात. जसे की मोठ्या बँकेत, बहुदेशीय कंपनीत किंवा मोठ्या भारतीय कंपनीत नोकरी करणे अशा पांढरपेशा क्षेत्रातील संधी जशा उपलब्ध असतात तसेच अगदी किराणा मालाची दुकान टाकणे, रिक्षा चालविणे , इस्त्रीची दुकान काढणे, भाजीची दुकान उघडणे ह्याही संधी उपलब्ध असतात.
मागील काही वर्षात सरसकट बहुतांशी मराठी माणसाने पांढरपेशा क्षेत्रातील संधींवर लक्ष केंद्रित केले. ह्या क्षेत्रात जसे जन्मजात हुशारीला महत्त्व आहे तसेच चिकाटीला सुद्धा! बरीच मराठी बुद्धिमान माणसे आपल्या बुद्धीच्या जोरावर अगदी सर्वोच्च पदांवर जाऊन पोहोचली. परंतु सर्वसाधारण मराठी माणसांची बऱ्याच वेळा कोंडी होताना दिसते. आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे चिकाटीचा अभाव आणि सतत डोके वर काढणारा स्वाभिमान! प्रत्येक कंपनीने स्वीकारलेलं एक धोरण, एक संस्कृती असते. एकदा का त्या कंपनीत राहायचा निर्णय घेतला की त्या धोरणाशी, त्या संस्कृतीशी सुसंगत असं वागणं, अशी विचारसरणी अंगिकारण अपेक्षित असतं. राहायचं त्या कंपनीत परंतु मनातून, बोलण्यातून त्या कंपनीच्या धोरणाविषयी नाराजी व्यक्त करायची हे योग्य नव्हे. ही वृत्ती कंपनीत पुढे जाण्यास हानिकारक ठरू शकते.  आजच लोकसत्तेत "स्वाभिम्यान" ह्या मथळ्याखाली सध्या गाजणारी बातमी वाचली. कंपनीत टिकून राहायचं असलं तर बऱ्याच वेळा स्वाभिम्यान करावा लागतो. आपला स्वाभिमान नक्कीच दाखवावा पण तो योग्य वेळ आल्यावर!
तसंच चिकाटीबाबत! जग कितीही बदलो, गरजेच्या वेळी जो माणूस हमखास उपलब्ध असतो, त्या माणसाची कदर मालक, कंपनी सदैव करणारच! ही चिकाटी, कामांच्या वेळच्या बाबतची शिस्त अंगीकारणं आवश्यक आहे.
आता दुसऱ्या प्रकारच्या संधींविषयी! वसईच्या होळीबाजारात घाऊक बाजारात भाजी विकत घेऊन त्याची किरकोळ बाजारात विक्री करणाऱ्या भैय्याने एका चांगल्या बिल्डींगमध्ये सदनिका घेतली, त्याची मुले इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकतात हे काही वर्षांपूर्वी मी ऐकलं होतं त्यावेळी मला आश्चर्य वाटलं होतं पण आज अजिबात वाटत नाही. आजूबाजूला नेहमी संधी उपलब्ध होत असतात, उघड्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहणे आवश्यक आहे. मध्येच एकदा असाच मी शनिवारी साडेसहाच्या सुमारास एकटाच वसईला जात होतो, म्हणजे बाकी सर्व आधीच शुक्रवारी गेले होते. तर वाटेत एका पोलिस अधिकाऱ्याने लिफ्ट मागितली. मी दहिसर चेकनाक्याच्याच दिशेने जात असल्याने लिफ्ट दिली. त्या पाच मिनिटात मी त्यांची आणि त्यांनी माझी चौकशी केली. त्यात त्यांनी जमिनी विकून गळ्यात सोनसाखळी मिरवणाऱ्या आणि वीस पंचवीस लाखाच्या गाड्या फिरवणाऱ्या काही समुदायाच्या मानसिकतेविषयी टीका केली. हे किती काळ टिकणार हा त्यांचा प्रश्न होता. गाडीतून उतरता उतरता "काळानुसार बदलता न येणे ही बऱ्याच मराठी माणसांची समस्या आहे" असे गंभीर विधान त्यांनी केलं.पुढे वसईपर्यंत पोहोचेपर्यंत मी बराच वेळ त्यांच्या विधानावर विचार करत होतो.
मराठी माणूस कष्टाधारित व्यवसायाकडे अजूनही कमी प्रमाणात का वळतो? तर समाजात असलेल्या तथाकथित प्रतिष्ठेला तडा जाऊ नये म्हणून असेच उत्तर बऱ्याच वेळा आपणास आढळते. भुकेने मरायची वेळ आली तरी चालेल पण ही प्रतिष्ठा महत्त्वाची अशी परिस्थिती असते. ह्यात एकंदरीत समाज सुद्धा जबाबदार आहे. अकरावीची आठवण! रुपारेल सारख्या हुशार मुलांच्या कॉलेजात शिकत असताना एके दिवशी सततच्या अभ्यासाला वैतागून मी म्हणालो, "राहून दे हा अभ्यास! मी पुढे शेती वाडी करीन!" बाजूलाच शिवाजी पार्कात राहणारा देशमुख नावाचा मित्र होता. पार्कात राहत असल्याने जीवनाविषयीच्या त्याच्या संकल्पना स्पष्ट होत्या. तो म्हणाला, "तुझी वाडी किती मोठी आहे ते मला माहित नाही! पण कितीही मोठी असली तरी तुला शिकून जितकी चांगली बायको मिळेल तितकी वाडी करून मिळणार नाही!" त्यावेळी मला त्याचे हे विधान पटलं नाही पण आज बऱ्याच वेळा मी परिस्थिती पाहून मला त्याची आठवण येते.
अजून एक बाब, आपल्या लग्नसमारंभात आपण विविध लोकांशी भेटतो. ह्यात समाज विविध क्षेत्रातील लोकांना कशी वागणूक देतो हे ही आपण पाहतो. लबाडीने पैसा कमावून श्रीमंत झालेला माणूस जोवर अशा समारंभात कष्टाने रोजीरोटी कमावणाऱ्या माणसापेक्षा जास्त भाव खात राहील तोवर आपल्या समाजात कष्टाधारित उद्योगांना कधीच प्रतिष्ठा मिळणार नाही!
असो आजच्या स्थितीत मराठी माणसापुढे काय संधी आहेत ह्याचा थोडा विचार करूयात! वाईट न वाटून घेता हे तर मानायला हवे की मुंबई शहराच्या बाबतीत - We have missed the Boat! पूर्वी देशांतर करून प्रगती साधायची संधी जशी पूर्ण पणे साधली नाही तशीच! पण जगात नेहमीच संधी असणार! अजूनही भारतात विकसित होणारी छोटी शहरे आहेत. तिथे समूहाने स्थलांतरित होण्याचा पर्याय अजूनही उपलब्ध आहे! कोटीचे घर मुंबईत कसे घेणार असा विचार करीत मुंबईत दुःखाने आयुष्य काढण्यापेक्षा असलेल्या पुंजीच्या आधारे आपल्यासारख्या मित्रांना एकत्र करून एखाद्या गावात जाऊन मोठी जमीन विकत घेऊन तिथे शेती वा अन्य उद्योग करणे अजूनही शक्य आहे. धोपटमार्गाने जाण्यात स्पर्धा खूप असते कारण सर्वजण त्यात उतरतात. पण वेगळ्या मार्गाने जाण्यात मात्र कमी स्पर्धेचे एक सुख असतं.
बाकी  आजच्या "स्वाभिम्यान" शीर्षकामागे थोडी चेष्टेची सर होती असे मला वाटून गेलं. पण बाकी काही असो मला मात्र हा उपलब्ध सर्व पर्यायांचा अभ्यास करून शांत डोक्याने घेतलेला निर्णय वाटला. "युद्धात जिंकले पण तहात हरले" ही म्हण बदलायची वेळ आली आहे!
शेवटी जाता जाता, मराठी माणसाचं शाब्दिक कोटी करायचं वेड मात्र जगाच्या अंतापर्यंत कायम राहणार बुवा! शाब्दिक कोटी असली की आपलं लक्ष कसं पटकन वेधलं जात! ह्या ब्लॉगपोस्टला "स्वाभिम्यान आणि मराठी पाऊल पडते… " असे शीर्षक देण्याचा मोह मी फार कसोशीने टाळला बरं का मंडळी!

स्वाभिम्यान 

Sunday, August 3, 2014

ब्रायटन वास्तव्य - भाग ७

 
मी आता अमेक्सच्या Development Center च्या लोकांची टीम सोडून आता सिंटेलच्या टीममध्ये आलो होतो. मधल्या काळात श्रीकांतच्या भारतातील घरी एक दुःखद घटना घडली. त्याचा एक वर्षाचा आसपासचा पुतण्या स्वर्गवासी झाला. श्रीकांत आधीच भावूक; ह्या घटनेने तो अगदी हादरून गेला. लगेचच तो भारतात परतला. एका आठवड्याने परतलेल्या श्रीकांतकडे पाहून हाच का तो पूर्वीचा आनंदी श्रीकांत असा प्रश्न आम्हांला पडला. पुढे थोड्याच दिवसात श्रीकांत आपल्या मूळ ठिकाणी म्हणजे सिंटेल अमेरिकेला परतला. त्याला निरोप देताना मला अगदी दुःख झाले. कामाच्या ठिकाणी एकत्र एका प्रोजेक्टवर काम करताना त्या प्रोजेक्टमधले सुःखदुःखाचे क्षण आपल्याला एकत्र आणतात. आणि परदेशात तर ही एका टीमची भावना अधिकच सुखदायी असते.  व्यावसायिक ठिकाणी काही लोकांशी फक्त कामापुरती नाळ जुळते तर काहींशी जीवाभावाचे नाते जुळते! असाच जीवाभावाचा श्रीकांत!!
मधल्या काळात हवामानात सुद्धा काही बदल होत होते. ऑगस्ट उजाडला होता आणि थंडी गायब झाली होती. आता मी जॅकेटशिवाय ऑफिसात जायचं धाडस करू शकत होतो. आता ऑफिसात हळूहळू तणावाचे वातावरण बनत चाललं होतं. खेळकर स्वभावाच्या अमेक्स सहकाऱ्यांबरोबर मस्त उन्हाळ्याच्या ३ महिन्यात २ महत्त्वाचे दोन प्रोग्रॅम लिहिणे वेगळं आणि त्यानंतर सिंटेलच्या वातावरणात प्रत्येक अप्लिकेशन मधील शेकडो प्रोग्रॅममध्ये ह्या दोन हिरो प्रोग्रॅमना बोलावून ती आज्ञावली बदलून मग तिचे व्यवस्थित परीक्षण करणे वेगळं ह्याचा मला अनुभव येत होता. सर्वसाधारणपणे भारतीय कंपन्या अशी कामे अत्यंत आक्रमक मुदतीत पूर्ण करून देण्याची हमी देऊन ही प्रोजेक्ट घेतात. ह्या मध्ये काही गृहीतक अवास्तव असतात आणि प्रत्यक्ष काम पूर्ण करणाऱ्या टीमच्या नाकी नऊ येतात. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काही काळ राहिल्यानंतर मग हळू हळू सर्वांना त्याची सवय होत जाते. ह्यात अजून एक फरक होता आणि तो म्हणजे आमची भारतातील टीम आता मुंबईच्या ऑफिसातून स्थलांतरित होऊन चेन्नई ऑफिसात नेण्यात आली होती. सुरुवातीला मला एका वर्कग्रुपचा चॅम्पियन बनविण्यात आलं. अमेक्सतर्फे बॉब लान्सर हे ह्या क्षेत्रात वीस वर्षाहून अधिक काळ काम केलेले तज्ञ ह्या वर्कग्रुपवर काम करीत होते. तात्त्विकदृष्ट्या त्यांना आमचं वर्कग्रुप चॅम्पियन बनणं पटलं नसलं तरी ह्यात वैयक्तिकदृष्ट्या माझा काही हात नसल्याने ते कामाच्या बाबतीत मला पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन देत होते. एकंदरीत माझे नशीबसुद्धा जोरावर होते आणि एकंदरीत प्रगती चांगली चालली होती. चेन्नईमधून काम करणारे हरी आणि त्याची टीम ह्यांची आणि माझी तार व्यवस्थित जुळली होती. परंतु काही वर्कग्रुप मध्ये मात्र अडचणी हाताबाहेर चालल्या होत्या. एकतर ते वर्कग्रुप होतेच क्लिष्ट आणि विविध घटकांतील संवाद मात्र ठीक होत नव्हता. आधीच उशिरा आलेल्या रमेशचा वर्कग्रुप मधील अडचणी अशाच  हाताबाहेर चालल्या होत्या. आमचे सिंटेलचे दोन व्यवस्थापक होते.  वल्लभाजोशुला आणि मूर्ती असे ते दोन व्यवस्थापक होते. मूर्ती हे ज्येष्ठ व्यवस्थापक असून ते प्रोग्रॅम मॅनेजरची भूमिका बजावत असत. युरो हा एक प्रोग्रॅम होता आणि त्यावर सिंटेलबरोबर इंफोसिसची टीम सुद्धा काम करीत होती. तर मूर्तींना इन्फोसिसची लोक सुद्धा आपल्या कामाच्या प्रगतीचा रिपोर्ट देत असत. त्यामुळे मूर्तींचा एकंदरीत दरारा चांगलाच होता.  तर ही जोडगोळी बऱ्याच वेळा एकत्रच फिरत असे आणि मीटिंगमध्ये आमची हजेरीसुद्धा एकत्रच घेई त्यामुळे जमेल तितके त्यांना टाळण्याकडे आमचा कल असे.
तर विविध वर्कग्रुपमधील अडचणीमुळे अमेक्सने काहीशी तक्रार ह्या दोघांकडे केली होती. त्यामुळे एका शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता आम्हा सर्व तथाकथित चॅम्पियनलोकांना छोट्याने एका बैठकीच्या खोलीत कोंबले. आणि सर्वांना आलेल्या अडचणीवर खोलवर चर्चा करण्यास सुरुवात केली. हे तंत्र योग्य असले तरी तरी शुक्रवारी संध्याकाळी मीटिंग बोलावणे हे मानवी अधिकारावर गदा आणण्यासारखंच होतं. ज्यांचे वर्कग्रूप अडचणीत होते त्यांना ही चर्चा अगदी त्रासदायक होत होती. त्यांनी उपलब्ध माहिती व्यवस्थितपणे वापरली की नाही ह्याची शहानिशा इथे होत होती. अशा चर्चेच्या सुरुवातीला "Nothing Personal About it" असे म्हणण्याची पद्धत असते. म्हणजे चुका झाल्या तर त्याची चर्चा सभेत करायची जेणेकरून बाकीच्या लोकांना त्याचा फायदा होऊन ते अशा चुका करणार नाहीत. परंतु ज्यावेळी आपण केलेल्या चुका चारचौघात चर्चिल्या जातात त्यावेळी बरेचजण शरमेने चुर होतात. आणि एखाद्या वाक्याचा विपर्यास होऊन मग सगळं काही वैयक्तिक होऊन जातं. असेच ह्या मीटिंगमध्ये झालं. आणि आधीच तणावात असलेल्या एकाच्या डोळ्यात चक्क पाणी तरळलं. मग एकंदरीत परिस्थिती पाहून मीटिंग आटोपती घेण्यात आली तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. जेवण वगैरे बनविण्याची इच्छा नसल्याने आम्ही बाहेर हॉटेलचा जेवणासाठी आधार घेतला.
मूर्तींना अमेक्सच्या वरिष्ठ व्यवस्थापक मंडळींना प्रगतीचा आढावा द्यावा लागत असे.  माझी सुरुवातीला प्रगती चांगली झाली असली तरी शेवट करण्यात मात्र थोड्या तांत्रिक अडचणी येत होत्या. ह्या वर्कग्रुप मधील काही प्रोग्रॅमचे बरीच वर्षे टेस्टिंग केले गेलं नसल्याने योग्य डेटा मिळविण्यास अडचणी येत होत्या. असेच एकदा मूर्तींना दुपारी तीनची अगदी महत्वाची मीटिंग होती. त्या आधी ह्या प्रोग्रॅमचे टेस्टिंगपूर्ण झालं असतं तर एक महत्त्वाचा मैलाचा दगड (milestone) पूर्ण झाला असता. त्यामुळे सकाळी येतानाच माझ्या डेस्कजवळून जाताजाता, "आदित्य, हे सर्व प्रोग्रॅम दुपारी दोन वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता किती टक्के आहे?" असा गहन प्रश्न मला केला. बहुदा त्यांना शंभर किंवा एकशेदहा टक्के असे उत्तर अपेक्षित होते. पण ह्या अडचणींनी मी ही वैतागलेलो होतो. क्षणभर विचार करून त्यांना मी "७४ टक्के" असे उत्तर दिले. ह्या अनपेक्षित उत्तराने ते काहीसे दचकले. परंतु जो माणूस असे अतरंगी उत्तर देऊ शकतो तो त्याहून खतरनाक असे त्या ७४ टक्केच का ह्या प्रश्नाचे उत्तरही देऊ शकतो अशी मनोमन खात्री पटल्याने त्यांनी काहीसा विचित्र चेहरा केला आणि ते तेथून निघून गेले.
 नंतर मला DD ह्या अजून एका वर्कग्रुपचा चॅम्पियनबनविण्यात आलं. "घरचं झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं" अशी एकंदरीत माझी परिस्थिती झाली. मग मला हळू हळू सकाळी लवकर सात वाजता ऑफिसात जाणे, शनिवारी सुद्धा ऑफिसला जाणे अशा प्रकारांना सुरुवात करावी लागली!

माझ्या आवडत्या Development Center च्या टीम बरोबरचं हे छायाचित्र!


(क्रमशः)