Sunday, October 24, 2010

परिपूर्णता, आदर्श, वास्तवता आणि इतर काही



बाकी आपण मराठी मध्यमवर्गीयांचे एक मात्र बरे असते. आपण आपल्या मुलांना परिपूर्ण जगात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. तु चांगले वाग की तुझे भले होईल. चोर, गुंड लोक वेगळे आणि आपण चांगले. बाळ अशा उपदेशात पहिली ३-४ वर्षे घालवते आणि बालवाडीत / NURSERY मध्ये प्रवेश करते. मग त्याचा जगातील अपरिपूर्ण गोष्टींशी संपर्क येण्यास सुरुवात होऊ लागतो.

७८ - ८८ या वर्षांत वसईत बालपण घालवलेली आमची पिढी, आम्हाला आदर्शांची कमतरता नव्हती. इतिहासातील राम, कृष्ण, शिवाजींपासून ते थेट वसईतील म्हापणकरसर, परुळेकरसर, नाचणकरसर, फडकेसर, म्हात्रे गुरुजी यांच्यासारख्या अनेक शिक्षकांचे आदर्श आमच्या डोळ्यासमोर होते. त्या आदर्शांचे बाळकडू आज कधीतरी उफाळून बाहेर येते आणि मग ब्लॉग लिहिला जातो. परंतु आज वाढणार्या पिढीचे काय? त्यांचा राम, कृष्ण POGO वरून त्यांच्या समोर येतो. त्यांचे वडील वसईशी बांधिलकी ठेवण्याचा प्रयत्न करीत त्यांना बोरिवलीत शिकवितात.

दुनियेत परिपूर्ण असे काहीच नाही, दुनिया कधी परिपूर्ण नव्हती आणि बनणारसुद्धा नाही पण परिपूर्ण जग निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे ते आदर्श. जगात असे कोणीतरी आहे ही भावना मध्यमवर्गीयांना सत्मार्गाने जगण्यास प्रेरणा देते. पण जर का असे आदर्शच मुलांच्यासमोर नसतील तर मात्र परिस्थिती बिकट आहे. Your thoughts?

Saturday, October 23, 2010

कर्मठ बना



वाचकहो मराठी मध्यमवर्गीय संस्कृती शेवटच्या घटका मोजू लागली आहे. दिवाळीत घरी बनवला जाणारा फराळ, अंगणात काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या, एरव्ही संध्याकाळी म्हटली जाणारी शुभंकरोति सर्व काही नाहीसे होत चालले आहे. कर्मधारय समास, संधी, अनुप्रास अलंकार माहित असलेली आपण मानव जातीच्या इतिहासातील शेवटची मराठी पिढी आहोत.
म्हणूनच मी म्हणतो आहे, मराठी संस्कृतीचे तारणहार बना, मराठी संस्कृती जाणून घ्या, तिला आपल्या घरात रुजवा. प्रगल्भ, सम्यक, मूल्याधारित अशा शब्दांचा घरी वाक्यात प्रयोग करायला शिका. स्वामी, ययाती, छावा, तुंबाडचे खोत ह्या कादंबर्या वाचून काढा. मनाचे श्लोक पुन्हा एकदा वाचून काढा, त्यांचे मनन करा. 'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर' म्हणजे नक्की काय याचा विचार करा. पुलं, सावरकरांची छायाचित्रे घरी भिंतीवर लावा.
नवीन युगातील प्रगतीची शिखरे काबीज करता करता आपल्या मुळांना घट्ट पकडून ठेवा आणि त्यांना बळकट बनवा.