Friday, August 16, 2019

आजच्या युवकवर्गासमोरील आव्हानं !


वसई येथील सोमवंशीय क्षत्रिय समाज महामंडळ गेले कित्येक वर्षे स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधुन बालक पालक मेळावा आयोजित करत असतं. ह्या वर्षीच्या बालक पालक मेळाव्यात त्यांनी मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. त्यावेळच्या माझ्या भाषणातील महत्वाचे मुद्दे !

आज इथं मी सद्यकालीन नोकऱ्यांची अशाश्वतता या विषयावर बोलणार आहे.  आज नोकरी करणारा तरुण वर्ग आपल्या नोकरीच्या शाश्वततेविषयी जी काही गृहितके बाळगून आहे त्याविषयी त्यांच्या वैधतेविषयी आपण चर्चा करुयात. काही काळापूर्वी नोकऱ्यांमध्ये वयाच्या ५८- ६० वर्षांपर्यंत शाश्वती असायची, त्यानंतर निवृत्तीवेतन मिळायचं! एकंदरीत नोकरवर्गाचं जीवन शाश्वत असायचं! आज परिस्थिती बऱ्याच प्रमाणात बदलली आहे.  नोकरीमध्ये तुम्ही ज्या पदावर असता त्या पदासाठी आवश्यक कौशल्यं सतत बदलती असतात. महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या तरुणवर्गाचे उदाहरण  आपण विचारात घेऊयात. त्यांनी समजा माहिती तंत्रज्ञान किंवा व्यवस्थापन  क्षेत्रात नोकरी घेतली असेल तर प्रत्येक वर्षी त्यांचा पगार वाढत जातो. आपण त्यांना मिळणारा पगार आणि कंपनीच्या दृष्टीने त्यांच्याकडे असणारी आवश्यक कौशल्ये यांचा आलेख काढला असता त्यांच्या कारकिर्दीमध्ये असा एक क्षण येतो की त्यांना त्या पदावर ठेवणे कंपनीच्या दृष्टीने फायद्याचे ठरत नाही. प्रत्येकाच्या बाबतीत हा  क्षण येतोच असे नाही. काहीजण काळाची पावले ओळखून आपली कौशल्ये सतत विकसित करत राहतात. त्यामुळे ते यशाच्या पायऱ्या चढत जातात.  आपली कौशल्ये कशी  विकसित करत जावी हा एका  वेगळ्या संवादाचा विषय आहे. 

परत एकदा मूळ मुद्द्याकडे वळुयात! काळानुसार आपण आपली कौशल्यं विकसित न केल्यास आपलं करिअर हे साधारणतः ४० ते ४५ वयाच्या आसपास अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकू शकते याची जाण तरुण वर्गाने ठेवावी. या अनुषंगाने येणारा पुढील मुद्दा म्हणजे आपल्या आर्थिक जबाबदाऱ्यांचे नियोजन! हल्ली चांगल्या कंपन्यात नोकरीला लागलेल्या तरुणवर्गाच्या मागे कर्ज देणाऱ्या कंपन्या हात धुऊन पाठी लागलेल्या असतात. त्यांनी जाहिरात केलेल्या मालमत्तेचे अथवा कारचे वर्णन आपल्याला भुरळ पाडू शकते.  मग त्याचा परिणाम म्हणून आपण मोठाली कर्जे घेऊन बसतो. काही काळानंतर वाढलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरीमधील उच्च पदावरील तणाव आणि मासिक हप्ते वेळेवर भरण्याचा तणाव अशा विविध तणावांच्या गर्तेत तरुण वर्ग अडकतो. थोडक्यात सांगायचे झाले तर अंथरुण पाहून पाय पसरावेत या म्हणीची आठवण तरुण वर्गाने ठेवावी. आलिशान जीवनपद्धतीचा मोह नको असं मला म्हणायचं नाही परंतु व्यावसायिक जीवनात आपण नक्की कुठं आहोत ह्याचं भान ठेऊन मगच आर्थिक निर्णय घ्या! आपल्या Financial Liabilities आणि आपल्या व्यावसायिक जीवनावरील आपली पकड ह्याची व्यवस्थित सांगड बसवा !

आता या विषयाशी काहीसा संबंधित परंतु वेगळा विचार! तरुण वर्ग आज या स्पर्धेमध्ये का उतरतो? एक समाज म्हणून आपण या तरुणवर्गावर किती दबाव अप्रत्यक्षपणे टाकत आहोत याचीदेखील जाणीव आपणास असणे आवश्यक आहे.  आजही भोवताली कमी तणावाच्या नोकऱ्या अस्तित्वात आहेत, त्या नोकऱ्यासुद्धा तुम्हांला तुमच्या उपजीविकेसाठी योग्य असतात. परंतु आपण समाजात अशा वलयांकित नसलेल्या नोकऱ्या करणाऱ्या तरुण वर्गाला काहीसे दुय्यम स्थान अप्रत्यक्षपणे देत असतो.  साधी नोकरी करणाऱ्या किंवा शेतीवाडी करणाऱ्या तरुणाला मुलगी देण्यासाठी समाज तात्काळ तयार होत नाही हासुद्धा एक कळीचा मुद्दा आहे.  प्रशस्त घर, मोठाल्या गाड्या ही प्रतिष्ठेची प्रतिमा आपण निर्माण करत चाललो आहोत;  त्यामध्ये आपण सर्वजण अडकत आहोत. परंतु ह्या या प्रतिष्ठेच्या प्रतिमेमागे असणारी मेहनतीची पार्श्वभूमी आणि अनिश्चिततेचे सावट लक्षात असुद्यात. त्यामुळे भविष्याचे नियोजन करताना काहीशी सावधानतेची पावलं उचला अशीच माझी विनंती राहील!

(P.S. पोस्टच्या सुरुवातीचा फोटो आणि पोस्टचा विषय ह्याचा दुरान्वये संबंध नाही!)

Friday, August 2, 2019

संसार से भागे फिरते हो !





एका निवांत अशा शनिवार सकाळी आज फुरसतीने जाग आली. कोणालाही शाळा ऑफिसात जायचे नसल्यामुळे जाग येऊन सुद्धा घड्याळाकडे पाहण्याची तसदी घेतली नव्हती. परंतु ज्यावेळी उठून घड्याळाकडे पाहिलं, त्यावेळी सव्वासात वाजलेले पाहून काहीसं आश्चर्यच वाटलं. पावसाळी ढगांनी अंधार केला असल्यामुळे इतके वाजून गेले तरी कळलंच नाही. 

प्रत्येक शनिवारी सकाळी मनात काहीशी संभ्रमाची परिस्थिती असते.  पुढील दोन दिवस नक्की काय करावं म्हणजे मनाला समाधान वाटेल हा विचार शनिवार सकाळी चहा पिताना प्रकर्षानं वावरत असतो. ह्या क्षणी आपल्यासमोर काही पर्याय असतात. वसईला एखादी फेरी मारावी, सर्व कुटुंबियांना भेटुन यावे, मुंबईतील नातेवाईकांना भेटावं  हा पहिला विचार डोक्यात घोळत असतो. 

कार्यालयीन कामांमध्ये विचार करुन धोरणात्मक निर्णय घेण्यासारख्या काही बाबी असतात. पाचही दिवस यावर सखोल विचार करण्यासाठी आपल्याला वेळ मिळालेला नसतो.  साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी यासाठी काही वेगळा वेळ काढून मनातील विचार सुसंगतपणे मांडावेत, ते योग्य लोकांपुढे ई-मेल द्वारे पोहोचवावे हा विचार प्रामुख्यानं मनात येतो. 

घरातील पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत क्वालिटी टाइम व्यतित करावा हाही विचार मनात असतोच! परंतु आपण ज्यावेळी क्वालिटी टाइम व्यतित करण्याच्या, त्यांच्यासोबत गप्पा मारण्याच्या मूडमध्ये असतो त्यावेळी त्यांनीसुद्धा त्याच मूडमध्ये असणे आवश्यक नसते. अशाप्रकारे चहा संपेपर्यंत मनामध्ये ह्या सर्व आदर्शवादी विचारांची यादी अस्ताव्यस्त स्वरुपात का होईना पण तयार झालेली असते!

शनिवार हळूहळू पुढे सरकत जातो. दैनंदिन व्यवहारातील गोष्टी बऱ्याच वेळा प्राधान्यक्रमात आदर्शवादी विचारांच्या वरती जात राहतात. या सर्व प्रकारात अजून एक गोष्ट होत राहते. शनिवारचे इतके तास गेले तरीही आपण ठरवलेल्या गोष्टींपैकी एकही गोष्ट सुरु केली नाही ह्याविषयी काहीशी अस्वस्थता मनात निर्माण झालेली असते. इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे आधी जे काही घडून गेलं ते विसरून जाऊन उपलब्ध असलेल्या साप्ताहिक सुट्टीचा उर्वरित प्रत्येक मिनिट आणि तास ह्यांचा आपण मुळ उत्साहाने आदर्शवादी गोष्टींवर काम करण्यासाठी वापर करू शकतो. 

या आठवड्यात एका रात्री परत येताना मीनाकुमारीची बरीचशी गाणी कारमध्ये ऐकण्याचा योग आला. त्यामध्ये आधी ऐकलेलं, पुन्हा आवडून गेलेलं "संसारसे भागे फिरते हो भगवान को क्या पाओगे " हे गाणं पुन्हा ऐकलं.  दुसऱ्या दिवशी सकाळी ते युट्युबवर पाहिलं, व्हाट्सअप स्टेटसवर टाकून दिलं! व्हाट्सअँप स्टेटस किती दिवसांनी, मिनिटांनी बदलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न नाही का? शेवटी भगवंत हा काही केवळ मंदिरात, तीर्थक्षेत्रातच वास्तव्य करत नाही. आपली जी काही कर्तव्यं आहेत ती कर्तव्यं व्यवस्थितपणे पार पाडत असताना, पार पाडल्यावर जी काही कर्तव्यपूर्तीची भावना वा समाधान मनात निर्माण होते ते सुद्धा भगवंताचे एक रूप होय! त्यामुळे आपल्या कर्तव्यपूर्तीच्या भावनेकडे प्रत्येकाने योग्य लक्ष देणे हे आवश्यक आहे. 

आता परत वळुयात ते शनिवार सकाळच्या चहाच्या वेळी बनवलेल्या आदर्शवादी दृष्टिकोनातून बनवलेल्या आपल्या टुडू लिस्ट मधील गोष्टींकडे! शनिवार पुढे सरकत जातो, शनिवारी रात्री थोडं उशिरा झोपुन विकेंडला अजून जास्त लांबवल्याचं समाधान मानता येतं! 
ह्या सर्वात कधी एकदाचा रविवार उजाडतो ते समजत नाही! एकदा का रविवार उजाडला की रविवारचे सर्व व्याप आटपून सायंकाळ कधी उजाडते हेही समजत नाही! मग मनात उतरते ती एक असमाधानाची भावना!! शनिवारी सकाळी बनवलेल्या आदर्शवादी यादीतील फार कमी कामे पूर्ण झालेली असतात, एका अत्यंत व्यग्र अशा सप्ताहाची चाहूल तुमच्या मनात अस्वस्थता निर्माण करीत राहते!

परंतु याच गोष्टीकडं तुम्हांला दुसऱ्या प्रकारे पाहता येईल. तुमच्यापुढं व्यग्र राहण्यासाठी बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत,  तुमच्याभोवती तुमच्याकडून अपेक्षा असणारी बरेच माणसे आहेत! हे सर्व घटक तुम्ही दुनियेतील काही सुदैवी माणसांपैकी एक असल्याचे प्रतिक आहे.  त्यामुळे रविवार संध्याकाळी केवळ एकच गाणे ऐकावे संसार से क्या भागे फिरते हो !

जाता जाता आज सकाळी पडणाऱ्या धुंद पावसाचं एक छायाचित्र ह्या पोस्टच्या सुरुवातीला ! पावसामुळं काही कामं टाकुन घरात बसणाऱ्या मला माझे ऑफिसात गेलेले मित्र कदाचित "बारिश से क्या डरके बैठे हो !" म्हणत असावेत !!