Saturday, November 26, 2011

निरागसतेचा लोप



भूतलावर जन्माला येणारे प्रत्येक बालक बर्यापैकी निरागस असावे असा माझा समज आहे. ही बालके पूर्णपणे निरागस असावी असा पूर्वी समज होता पण काही कारणास्तव तो थोड्याफार प्रमाणात बदलला. असो, आपल्या आयुष्यातील विविध अनुभवामुळे ह्या बालकांची निरागसता हळूहळू लोप पावू लागते. आणि कालांतराने त्यांचे निगरगट्ट अशा प्रौढात रुपांतर होते.

निरागसतेचा लोप पावण्याची प्रक्रिया प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळ्या वेगाने होते. युद्धस्थिती, नैसर्गिक / कौटुंबिक आपत्ती, गरिबी ह्या प्रतिकूल घटकांचा ज्यांना बालपणी सामना करावा लागतो, अशा बालकांना वास्तवाचे भीषण चटके फार लवकर बसतात. आणि त्यांची निरागसता लोप पावते. मध्यमवर्गीय बालके बर्याचश्या प्रमाणात आपली निरागसता शालेय जीवनात टिकवून ठेवतात किंवा ठेवायची. आपल्याला हवी ती गोष्ट रडल्याशिवाय मिळत नाही हे ज्यावेळी नवजात शिशूला कळते त्यावेळी त्याच्या १०० % निरागसतेला थोडा तडा जातो. आणि मग जीवनाच्या एका टप्प्यावर आर्थिक कमाई करण्याचे दायित्व ज्यावेळी ह्या मध्यमवर्गीय तरुणावर येऊन पडते आणि आपल्या असलेल्या मर्यादांची त्याला जाणीव होते त्यावेळी हा युवक निरागसता विसरतो. गर्भश्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या बालकास ज्यावेळी स्वतःला वारसाहक्काने मिळालेल्या सामर्थ्याची जाणीव होते त्यावेळी त्याची निरागसता मग्रुरीत परिवर्तीत होण्याची शक्यता असते. पालकांचे योग्य संस्कार ह्या गोष्टीस परावृत्त करू शकतात.

आजी आजोबा नातवंडांची निरागसता जास्त काळ टिकवून ठेवण्याचे काम करतात पण त्यासाठी त्यांना नातवंडासमवेत वेळ मिळावयास हवा. निरागसतेच्या बाबतीत माझी काही निरीक्षणे आहेत. एकदा का निरागसता गेली की ती त्या जन्मात बहुदा परत मिळविता येत नाही. मागच्या ब्लॉगमध्ये मी आपल्या मागील विश्वातील स्वतःचा शोध घेण्याच्या अयशस्वी प्रयत्नाविषयी लिहिले होते. बहुधा हा शोध आपल्या हरविलेल्या निरागसतेचा असतो आणि त्यामुळेच तो असफल होतो. ह्याला अपवाद काही जणांचा, जे आपली निरागसता आयुष्याच्या संध्याकाळी परत मिळवितात. निरागसतेच्या विरुद्ध धूर्तता. ही का एकदा एखाद्या व्यक्तीत शिरली की त्याच्या पुढच्या पिढीमध्ये ही कायम वास्तव्य करून राहते आणि त्यामुळे पुढील पिढ्या पुन्हा कधीच पूर्णपणे निरागस होवू शकत नाहीत.

समाजाची निरागसता ही एक पुढील पायरी. सध्या आपण समाजाच्या पातळीवरील निरागसता झपाट्याने गमावत चाललो आहोत. आतापर्यंत सामाजिक निरागसतेचे दायित्व ज्यांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलले ती ज्येष्ठ नागरिकांची पिढी तंत्रज्ञानांच्या आलेल्या सुनामीने आपला आत्मविश्वास गमावून बसली आहे.

बर्याच वेळा मला असे वाटत असते की ही पृथ्वी आणि त्यावरील आपली मनुष्यजमात हा एक कोणी तरी मांडलेला खेळ आहे. आपल्या मनातील विचार, आपली धडपड यावर जरी आपणास आपले स्वतःचे नियंत्रण वाटत असले तरी तसे नाहीय. ह्या मनुष्यजातीचा आणि त्या जातीच्या निरागसतेच्या लोपाचा मार्ग आधीच कोणी आखून ठेवला आहे आणि त्या आखलेल्या मार्गावर आपली वाटचाल चालू आहे.


Saturday, November 12, 2011

आपले विश्व



स्वतःला केंद्रबिंदू ठेवून आपण प्रत्येकजण आपले विश्व स्थापन करीत असतो. ह्या विश्वात समाविष्ट असतात आपले नातेवाईक, शेजारी, मित्र, कार्यालयातील सहकारी आणि जीवनरहाटीच्यानिमित्ताने संपर्कात येणारी लोकं! ह्यातील प्रत्येकाशी आपले लौकिकार्थाने लिखित / अलिखित असे नाते असते. आता ह्या नात्याकडे बघण्याचा दोन्ही बाजूंचा दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो. प्रत्येक दिवसागणिक ही नाती बदलत जातात, दररोज बदलणाऱ्या चंद्रकलेप्रमाणे!

काळ पुढे सरकतो, माणूस शिक्षणानिम्मित, नोकरी व्यवसायानिम्मित स्थलांतर करतो, नवीन विश्व निर्माण करतो. त्यात गुंगून जातो. आधीचे विश्व काहीश्या प्रमाणात विसरतो. व्यक्तीने आयुष्यभर अनुभवलेली ही अनंत विश्वे त्याच्या मनाच्या कोपर्यात कोठेतरी अडगळीत पडलेली असतात. कधीतरी कोणत्यातरी क्षुल्लक निम्मिताने ह्या अनंत विश्वातील एखादे विश्व उफाळून बाहेर येते. मनाला अस्वस्थ करून सोडते. ह्या विश्वाला आपण परत आणून शकत नाही ही जाणीव आपल्याला बोचत राहते, मग आपण शोधतो त्या विश्वातील आपल्याला, तो तरी आपणास नक्की सापडेल असा आपणास विश्वास असतो. पण हा शोध घेता घेता आपणास जाणवते की त्या विश्वातील स्वतःला आपण हरवून बसलो आहोत!

Tuesday, October 18, 2011

शिस्त, गुणवत्ता, कल आणि क्षेत्र



शीर्षकामध्ये नमूद केलेल्या चार गोष्टी एकमेकांशी तश्या म्हटल्या तर निगडीत आहेत. परंतु त्यामधील परस्पर संबंध म्हणावा तसा सरळ नाही.
अ> गुणवत्ता आणि कल

प्रत्येक व्यक्ती गुणवत्ता आणि कल यांचा बराच भाग जन्मतानाच घेवून येते. परंतु या दोन्ही बाबींचा काही भाग मात्र प्रयत्नपूर्वक जोपासला जावू शकतो.

ब> गुणवत्ता आणि क्षेत्र

प्रत्येक व्यक्तीची गुणवत्ता क्षेत्रानुसार बदलते. एखादी बुद्धिमान व्यक्ती अभ्यासक्षेत्रातील विविध विषयात वेगवेगळ्या प्रमाणात पारंगत असते.

क> गुणवत्ता आणि शिस्त

एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात किती प्रमाणात यशस्वी होईल हे त्या व्यक्तीच्या त्या क्षेत्रातील गुणवत्तेवर अवलंबून असते. परंतु गुणवत्तेतील कमतरता काही प्रमाणात शिस्तीच्या आधारे भरून काढता येते. ज्या क्षेत्रात बर्याच संधी उपलब्ध असतात त्या क्षेत्रात शिस्तीच्या आधारे बरेचजण टिकून राहू शकतात. शिस्तीच्या जास्तीच आहारी गेल्यास त्या व्यक्तीची उरलीसुरली सर्जनशीलता संपुष्टात येण्याचा धोका संभवतो.

शिस्त म्हणजे काय? शिस्त म्हणजे आपल्या उद्दिष्टाची व्याख्या बनवून आपल्या समजुतीनुसार ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे वेळापत्रक बनवून न कंटाळता ते वेळापत्रक पाळणे. ह्या मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी, की प्रत्येक क्षेत्रातील शिस्तीची व्याख्या काळानुसार बदलत राहते. आणि शिस्तीवर विसंबून राहणाऱ्या व्यक्तीला शिस्तीची व्याख्या कालबाह्य होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

सारांश
  1. प्रत्येक व्यक्तीची गुणवत्ता क्षेत्रानुसार बदलते. आपला कल लक्षात घेवून आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी ज्या भाग्यवान लोकांना मिळते त्यांची गुणवत्ता आपसूकच जोपासली जाते आणि असे लोक शिस्तीत राहण्याची शक्यता जास्त असते.
  2. मुद्दा १ च्या व्याख्येत बसणारे भाग्यवान लोक ह्या दुनियेत फार कमी आहेत.
  3. वरच्या समीकरणात पैसा हा दुष्ट घटक समाविष्ट केल्यास वरील लेखाचा बराच भाग निरर्थक ठरतो!


Saturday, October 8, 2011

सुपूर्दता



माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतांना अशा अनेक गोष्टी अनुभवायला मिळतात ज्या आपण प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणू शकतो. उदाहरणे द्यायची झाली ती अनेक, मला आवडलेले उदाहरण म्हणजे अडचण / धोका व्यवस्थापन (Risk Management). ऑफिसात अशा प्रकारच्या व्यवस्थापनासाठी आपत्कालीन योजना तयार ठेवली जाते आणि ती बर्याच वेळा तपासून सुद्धा पाहिली जाते. आपल्या जीवनात सुद्धा याची अंमलबजावणी करणे उपयुक्त ठरते. घरकामवाल्या बाईने न सांगता सोमवारी सुट्टी मारणे, मुलाची शाळेची बस न येणे ह्या छोट्या छोट्या आपत्कालीन प्रसंगासाठी आपल्या सर्वांकडे Plan B तयार असणे आवश्यक असते. तसा तो आपल्याकडे तयार असतो पण तो चर्चिला / तपासाला गेलेला नसतो.

असो आज मला अशाच एका विषयावर लिहायचे आहे आणि तो म्हणजे Knowledge Transition अर्थात माहिती, संस्कृती यांची एका व्यक्तीकडून दुसर्याकडे यशस्वीरीत्या सुपूर्दता ! मागच्या पिढीपर्यंत एकत्र कुटुंबात ही सुपूर्दता नकळत होत असे, कारण देणारा आणि घेणारा दोघेही एका घरात राहत, एकाच प्रकारच्या व्यवसायात मग्न असत. परंतु आजच्या शहरात राहणाऱ्या पिढीमध्ये मात्र हे वहन बर्याच बाबतीत अपूर्णच राहिले. प्रत्येक ज्ञातीचे संस्कार, चालीरिती ह्या बर्याच प्रमाणात मागच्या पिढीकडून आजच्या पिढीकडे सुपूर्द झाल्याच नाहीत. आता ह्या बाबतीत सुपुर्दतेची गरज आहे किंवा नाही यावर मतभेद होवू शकतात. ठीक आहे परंतु किमानपक्षी ह्या गोष्टी लिखित स्वरुपात तरी उपलब्ध करून ठेवावायला हव्यात असे माझे म्हणणे. म्हणजे आज नाही पण पुढे कधीतरी कोणास हे संस्कार, चालीरिती माहित करून घ्यावेसे वाटले तर माहितीचा स्तोत्रच नाही अशी परिस्थिती नको! असो बहुधा ह्या स्थितीचे गांभीर्य मोठ्या शहरात जास्त असावे, छोट्या शहरात, गावांत मात्र ही सुपूर्दता यशस्वीरीत्या होत असावी असा भाबडा विश्वास बाळगूया!

Thursday, September 15, 2011

धोनी, इंग्लंडचा दौरा आणि बिकट स्थिती


भारतीय संघाची इंग्लंड दौर्यातली कामगिरी एकदम सुमार झाली. ज्या ज्या गोष्टी चुकीच्या होऊ शकतात त्या सर्व चुकीच्या झाल्या. मिडास स्पर्श लाभलेला धोनी सुद्धा अगदी हतबल झाल्यासारखा वाटला. मालिकेच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट झाले की हा भारतीय संघ ह्या दौर्यात तरी इंग्लिश संघाची बरोबरी करू शकणार नाही. परंतु पूर्ण मालिका खेळणे मात्र क्रमप्राप्त होते. सामना संपल्यावर (हरल्यानंतर) पत्रकार परिषदेला शांतपणे तोंड देणे याची तुलना लाल रेषेवाल्या प्रगतीपुस्तकाची आईवडिलांकडून तपासणी किंवा महाकाय चूक केल्यानंतर साहेबाकडून होणारी कानउघाडणी ह्याच्याशी काही प्रमाणात होवू शकते. काही प्रमाणात अशासाठी म्हटले कारण पत्रकार परिषदेतील क्रिकेट खेळाडूंची अवस्था सर्व दुनियेसमोर मांडली जाते.
आता भारतीय खेळाडूंनी जिगर दाखविली असती तर मालिकेचा निकाल वेगळा (म्हणजे थोडा तरी कमी लाजीरवाणा) लागला असता. पण मी त्या विषयाकडे वळत नाहीये. भारतीय संघाची जी अवस्था इंग्लंड दौर्यात झाली ती म्हणजे एखाद्या अशा बिकट स्थितीत सापडणे की ज्यात केवळ थांबणे ह्याच तोडगा असू शकतो. भयंकर वाहतूक कोंडीत सापडणे, चुकीच्या साहेबाशी एखाद्या प्रोजेक्टमध्ये गाठ पडणे, जेवताना ताटात कारल्याची भाजी येणे हे सर्व तात्पुरत्या बिकट परिस्थितीची उदाहरणे आहेत. काही वेळा ही बिकट परिस्थिती दीर्घकालीन असू शकते; गंभीर आजार, सुधारण्यापलीकडे गेलेली जवळची नाती यात वाट पहायची म्हंटली तर आयुष्यभराचा कालावधी घालवावा लागतो. यातील काही उदाहरणात एखादा मोठा निर्णय घेवून त्या परिस्थितीतून बाहेर पडावे लागते. परिस्थिती सुधारण्याचे आटोकाट प्रयत्न करायचे, ह्या प्रयत्नांना प्रमाणांची आणि वेळेची मर्यादा घालून द्यायची आणि ती मर्यादा ओलांडल्यावर मात्र तो कठोर निर्णय घ्यायचा. ह्या प्रकारात प्रत्येकाची बिकट परिस्थितीची व्याख्या करण्याची पद्धत, त्या परिस्थितीचा मुकाबला करण्याची क्षमता, सहनशीलतेचा परमोच्च बिंदू हे सर्व बदलणारे घटक येतात.
बघूया धोनी काय करतोय ते!


Saturday, August 27, 2011

अण्णा हजारे आंदोलनांनिम्मित




अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनाबाबत माझी मते मांडण्याचा हा प्रयत्न.

कधीकाळी वाचलेली एक गोष्ट! एका अपराध्याला दगडाने ठेचून मारण्यासाठी एकत्र आलेला जमाव. शिक्षेचा हा अघोरी प्रकार सुरु होणार तितक्यात तिथे एक महात्मा येतो आणि म्हणतो ज्या माणसाने आयुष्यात एकही गुन्हा केला नाही त्यानेच फक्त दगड उचलावेत. आपसूकच सर्वांचे हात मागे येतात. भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनात हा प्रकार तसा लागू होत नाहीय. भ्रष्टाचार करणारे आणि भ्रष्टाचाराला तोंड द्यावे लागणारे असे दोन प्रकार मानले तर अण्णांचे आंदोलन हे दुसर्या प्रकारच्या लोकांनी पहिल्या प्रकारच्या लोकांविरुद्ध चालू केलेले. गोष्टीतील महात्म्याचे तत्व लावायचे झाले तर बहुदा आपल्या सर्वांना ह्या आंदोलनात भाग घेण्याचा हक्क नाही.

सामान्य माणसाला भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याची इच्छा असूनही ही तो असे का करू शकत नाही हे शोधण्याचा इथे मी प्रयत्न करतोय.
  1. आजूबाजूच्या परिस्थितीने भांबावून गेलेल्या मध्यमवर्गीय माणसाची आपले जीवन सुरक्षित करण्यासाठी आणि जे आधीच गर्भश्रीमंत आहेत त्यांची आपले सांपत्तिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठी अधिकाधिक संपत्ती गोळा करण्यासाठी चाललेली धडपड. ह्या धडपडीमुळे मर्यादित संपत्तीवर पडलेला ताण. जास्त मागणी आणि कमी पुरवठा यामुळे कोणत्याही मार्गाने आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळविण्याची वृत्ती.
  2. जीवनातील मुलभूत गोष्टी जसे की सार्वजनिक वाहतूक, आरोग्यव्यवस्था यांचा अभाव. यामुळे सामान्य माणसाकडे असलेला वेळेचा अभाव.
  3. छुप्या स्वरुपात अस्तित्वात असलेली गुंडगिरी. सर्वांना माहित असलेल्या समांतर व्यवस्थेला एका विशिष्ट मर्यादेपलीकडे विरोध केल्यास जीवाला धोका होवू शकतो ह्याची प्रत्येकाच्या मनात असणारी भीती.
  4. मध्यमवर्गीयातील एकीचा अभाव आणि जोपर्यंत अन्यायाची झळ स्वतःला लागत नाही तोपर्यंत गप्प बसण्याची वृत्ती.
  5. बौद्धिकदृष्ट्या संपन्न अशा वर्गाची विविध कारणांमुळे शासकीय सेवांपासून झालेली फारकत आणि त्यामुळे शासकीय धोरणांमध्ये कल्पकतेचा अभाव.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की या गृहस्थाला म्हणायचे आहे तरी काय? जन लोकपाल विधेयक उद्या संसदेत येईल आणि संमत सुद्धा होईल. काही भ्रष्ट जनप्रतिनिधी ह्या विधेयकाच्या अंमलाखाली अटकही होतील. पण त्यांच्या जागी स्वच्छ लोकप्रतिनिधी येण्याची शक्यता निर्माण होणार कशी? वरील दिलेले प्रश्न जन लोकपाल विधेयक सोडवणार काय?

केव्हातरी ही सर्व चर्चा आपण लोकशाहीस लायक आहोत का? की पर्यायी शासनव्यवस्थेचा आपण विचार करावा या दिशेने जाईल. माझे तरी म्हणणे असे की अशा एखाद्या लायक माणसाचा शोध घेवून त्याला हुकुमशहा बनवावा! बरेच काही कठोर निर्णय बराच काळ घेतल्याशिवाय परिस्थती सुधारणे शक्य नाही.


Saturday, July 23, 2011

चिकिस्तक


हल्ली प्रत्येकजण चिकिस्तक बनला आहे. मुलभूत गरजा पूर्ण झाल्यावर करणार तरी काय म्हणा? चिकीस्ता कोणत्या गोष्टीची, किती प्रमाणात करावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. चिकीस्तेचे फायदे / तोटे नानाविध. फायदे म्हणायचे झाले तर आपल्या ज्ञानात भर पडते, एखाद्या गोष्टीची, व्यक्तीची आपल्याला सर्वांगाने माहिती होते. ह्या माहितीचा वापर आपण भविष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी करू शकतो. तोटे कोणते? चिकीस्तेच्या मार्गाच्या सुरुवातीलाच एक पाटी लावलेली असते 'ENTER AT YOUR OWN RISK'. काही गोष्टींच्या बाबतीत असे म्हणावे लागेल की अज्ञानातच सुख असते. साधे उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या आहाराविषयीच्या सवयी. ज्या क्षणी तुम्हाला कॅलरी ह्या प्रकाराची माहिती होते त्यावेळी तुमच्या आयुष्यातील जिव्हा सुखाला तुम्ही मुकण्याचा धोका संभवतो. कोणत्याही नातेसंबंधांची जास्त चिकीस्ता करू नये. जीवनातील काही सुंदर गोष्टी दुरूनच सुंदर भासतात त्यांना तसेच राहू द्यावे!

सुनियोजित सखोल विश्लेषणानंतर फार कमी गोष्टींची / व्यक्तींची महती कायम राहू शकते. हे आपल्या पूर्वजांना पक्के ठाऊक होते. आपण ही गोष्ट थोडीतरी ध्यानात ठेवावयास हवी !


Friday, July 22, 2011

शहरनिर्मिती

मुंबई शहरात राहताना बर्याच वेळा जाणवते की ह्या शहराचा संतृप्ततेचा बिंदू केव्हाचा ओलांडला गेला आहे. शहरात एखादी गोष्ट थोडीदेखील साधारणतेच्या व्याखेच्या पलीकडे गेली की गोंधळ चालू होतो. आता ही बाब एकदम क्षुल्लक असू शकते जशी की एका वर्दळीच्या रस्त्यावर मध्येच गाडी बंद पडली, १० मिनिटे पाऊस पडला! लगेच वाहतूक खोळंबते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडतो. मुंबईत राहणाऱ्या / नोकरीनिम्मित शहरात येणाऱ्या प्रत्येकाने अशा परिस्थितीसाठी मनाची तयारी ठेवलेलीच असते. मुंबईतला प्रत्येक नागरिक हा सहनशीलतेचा तसा पुतळा असतो. सहनशीलता म्हटले तर चांगला गुण आणि म्हटले तर परिस्थिती न बदलता येण्याचा कमकुवतपणा!
प्रत्येक शहर हे वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असते. माणसाच्या इतिहासामध्ये शहरनिर्मितीचा टप्पा बर्याच आधी येवून गेला. भारतामध्ये देखील तो सतराव्या - अठराव्या शतकात आला आणि शहरे उदयास आली असावी. मी या विषयातील अज्ञानी, त्यामुळे चूकभूल द्यावी घ्यावी! बाल्यावस्थेतील ही शहरे बरीच काही वर्षे (हा कालावधी दशकात / शतकात मोजावा) सुसंकृतावस्थेत होती. परंतु गेल्या काही दशकात ह्या शहरांच्या वाढीने अवाढव्य रूप धारण केले.
शहरांच्या वाढीची अंतिम अवस्था ही मृतावस्था होय. शहरातील नागरीकरणाची संयंत्रणा एका बिंदूवर कोलमोडून पडते. उद्योगधंद्यासाठी वातावरण प्रतिकूल होते. आणि मग उद्योगधंदे, नागरिक, शैक्षणिक संस्था यांचे शहराबाहेर स्थलांतर होते. ही एकदम टोकाची स्थिती मी वर्णिली. परंतु ह्या स्थितीचे भान आपल्या सर्वांना असणे आवश्यक आहे.
ज्याप्रमाणात आपल्या लोकसंख्येची वाढ होत आहे ते पाहता आपणास नवीन शहरांची निर्मिती करणे आवश्यक आहे. आता ही शहरे महानगरे नसावीत तर छोटी नगरे असावीत. मध्येच दोन लेख वाचनात आले, एक होता आपल्या अभिनेता अतुल कुलकर्णीचा. त्याने आपल्या मित्र- नातेवाईकांसोबत मिळून गावाबाजुला ओसाड जमीन विकत घेतली आणि बर्याच प्रयत्नानंतर तिथे घनदाट जंगलसदृश्य झाडी निर्माण केली. दुसरा लेख होता अण्णा हजारे यांच्याविषयी, त्यांनी राळेगण सिद्धी या गावात सिंचनाची सुनियोजित व्यवस्था निर्माण केली आणि त्याद्वारे तिथे विविध धान्य / फळे याचे उत्पादन करून ते गाव स्वयंपूर्ण केले. ह्या दोन लेखांनी मला एकदम भारावून टाकले आणि माझ्या एका जुन्या स्वप्नाने पुन्हा भरारी घेतली.
समविचारी सुशिक्षित अश्या नागरिकांचा समूह एकत्र येवून गावरान भागात एकत्र ओसाड जमीन खरेदी करणार. तिथे साधी पण सर्व मुलभूत सुविधांनी परिपूर्ण अशी घरे उभारणार. पाण्याची सोय भागविण्यासाठी एका मोठ्या जलाशयाची निर्मिती करणार. आणि ह्या जलाशयातील पाण्याच्या आधारे ह्या ओसाड भागाचे एका हिरव्यागार प्रदेशात रुपांतर करणार! हळूहळू मग ह्या भागात छोट्या शिक्षण संस्थाची निर्मिती करून आजूबाजूच्या गावातील मुलांची शिक्षणाची सोय करणार. पुढचा टप्पा म्हणजे इथे शिकलेल्या मुलांसाठी रोजगाराची सोय करण्यासाठी छोटे मोठे उद्योगधंदे उभारणार! हे वाचताना एक गोष्ट लक्षात आलीच असेल की हा नागरिकांचा समूह आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी हवा आणि आयुष्याच्या अशा टप्प्यावर असावा की त्यांना फारशे काही पाश नसावेत. आयुष्यातील १०-१५ वर्षे ह्या असल्या उद्योगासाठी घालविण्याची तयारी असावी. साधारणतः वयाच्या ५०-५५ वर्षी ह्या समूहाने असला उद्योग करण्यास करण्यास सुरवात करावी!
कसे वाटले हे स्वप्न? विचार जरूर कळवा! आणि हो २०२५ सालच्या आसपास सगळा गाशा गुंडाळून विदर्भातील एकाद्या भागात स्थलांतरित होण्याचे माझ्याकडून निमंत्रण आल्यास त्याला हो म्हणण्याची तयारी ठेवा!


Saturday, June 25, 2011

अभ्यास पद्धती भाग २





अभियांत्रिकी अभ्यासक्रम एकंदरीत वेगळ्या पद्धतीने हाताळावा लागतो. प्रत्येक सत्रात SUBMISSION नावाचा बागुलबुवा आपली पाठ पुरवीत असतो. प्रत्येक विषयाच्या मुलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक असते. आणि ह्या संकल्पना समजून घेण्यासाठी अध्यापकांच्या सर्व वर्गांना उपस्थित राहणे, विषयाचे नियमित वाचन करणे हे जरूर असते. ह्या पुस्तकांचे एक वैशिष्ट असते आणि ते म्हणजे reading between the lines. पुस्तकातील ओळींमध्ये गर्भितार्थ भरलेला असू शकतो आणि त्याचा आपापल्या मतीनुसार अर्थ लावण्याची आपणास मुभा असते! सबमिशन आटोपल्यानंतर मिळणाऱ्या अभ्यास सुट्टीवर आपण भिस्त ठेवल्यास हा गर्भितार्थ उमजून घेण्याची आपणास कमी संधी मिळते.

यात एक महत्त्वाची बाब म्हणजे आपणास योग्य अशा अभ्यासनोंदी (नोटस) मिळणे आवश्यक असते. ह्या नोटस मिळविण्यासाठी योग्य कंपूत आपण असणे आवश्यक असते. हा कंपू आपणास विषयाच्या चर्चेसाठी उपयोगी पडतो. त्याच प्रमाणे गेल्या काही वर्षांतील प्रश्नपत्रीकेंचे योग्य विश्लेषण करण्यासाठी ह्या अभ्यासकंपूचा आपणास उपयोग होतो.

अभियांत्रिकीच्या परीक्षा हा एक अजून सखोल विषय. चार तासांचे पेपर आणि त्या वेळात आपणास अवगत असणारे बरेचसे ज्ञान आपणास उत्तरपत्रिकेत योग्य प्रमाणात उतरावे लागते. ह्या वेळात आपल्याला काही निर्णय पटापट घ्यावे लागतात. प्रश्नपत्रिका हाती आली की पहिल्या पाच मिनिटात तिचे विश्लेषण करून आपण सोडवणार असलेले प्रश्न आणि त्यांचा क्रम ठरवावे लागतात. एखाद्या प्रश्नाच्या जास्त प्रेमात पडून सुद्धा चालत नाही. २० गुणाचा एक प्रश्न परीक्षकास तो विद्यार्थी असल्याच्या आविर्भावात स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी २० गुणांचे २ प्रश्न योग्य प्रकारे सोडविणे आवश्यक असते. ह्या चार तासात आपला आत्मविश्वास टिकविणे आवश्यक असते. त्यासाठी खात्रीचे प्रश्न प्रथम सोडविणे आवश्यक असते. एखाद्या विषयात बरीच सूत्र असल्यास उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर आणि प्रश्नपत्रिका मिळण्याआधी ही सूत्रे मागच्या पानावर पेन्सिलीने लिहून ठेवण्यात काहीच गैर नाही. प्रत्येक विषयाचे काही भाग आपणास पूर्ण उमजलेले असतात आणि त्यांची आपण योग्य तयारी सुद्धा केलेली असते. अशा भागाशी संबंधित प्रश्न प्रथम सोडवावेत. ज्या भागांची आपली तयारी कमी झालेली असते आणि त्या भागाशी संबंधित ज्ञान आपल्या मेंदूच्या कप्प्यातून खेचून घेण्यास (retrieve करण्यास कष्ट करावे लागणार असतात, असे प्रश्न शेवटी ठेवावेत. ह्या भागातील आपली कामगिरी त्यावेळच्या आपल्या मनःस्थितीवर अवलंबून असते. अशा वेळी मध्येच छताकडे एक मिनिट पाहत आपल्या विविध उल्लेखनीय कामगिऱ्या (आपल्या म्हणण्यानुसार!) आठवून स्वतःला प्रफुल्लित करावे.

व्यावसायिक अभ्यासक्रमाची ही वर्षे तशी हा हा म्हणता संपून जातात. महाविद्यालयातील सांस्कृतिक दिवस, वेगवेगळे 'Days' साजरे करता करता अंतिम वर्ष समोर येवून ठेपते. पुढे पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे (ते ही देशात की परदेशात), की प्रथम थोडा नोकरीचा अनुभव घ्यायचा हा निर्णय घ्यावा लागतो. अंतिम वर्षातील प्रोजेक्ट निमित्त आपली बाहेरील व्यावसायिक जगाशी तोंडओळख होते. व्यावसायिक जगात प्रवेश करता करता आपल्या वैयक्तिक जीवनातही बदल होत राहतात आणि अधिकाधिक जबाबदाऱ्या आपल्यावर येऊन पडतात. इथे मात्र कोणतेही पुस्तक आपल्यासोबत नसते. सोबत असतात नातेवाईक, मित्र, आपला स्वभाव आणि आयुष्य कशा पद्धतीने घालावावयाचे आहे याविषयीचे आपले विचार! यातील शेवटच्या दोन गोष्टी वयपरत्वे काही प्रमाणात बदलत जातात. आवश्यक असते ते आयुष्यातील विविध टप्प्यांवर घेतलेल्या निर्णयांशी प्रामाणिक राहणे!

Friday, June 10, 2011

माझा आवडता देश न्यूझीलंड






न्यूझीलंडचा आणि माझा संबंध फक्त क्रिकेट सामन्यापुरता! न्यूझीलंडमध्ये कोणताही सामना असो मी तो हमखास TV वर पाहतो. कारणे दोन, पहिले म्हणजे न्यूझीलंडची हिरवीगार मैदाने आणि दुसरे म्हणजे तिथले प्रेक्षक. न्यूझीलंडच्या संघाची सध्याची कामगिरी पाहता बर्याच वेळा पाहुणा संघ त्यांची धूळधाण उडवत असतो. परंतु मैदानावरील कामगिरीचा तेथील प्रेक्षक स्वतःवर फारसा परिणाम होऊन देत नाहीत. बर्याच ठिकाणी प्रेक्षक सुद्धा हिरव्या कुरणावरच बसलेले असतात. लहान मुलांचा आपला एक स्वतंत्र सामना ह्या कुरणावर चालू असतो. मोठी माणसे बियरचे घुटके घेत घेत वेळ मिळाल्यास मैदानावरील घडामोडींकडे नजर टाकत असतात. मैदानावरील न्यूझीलंडच्या खेळाडूंचीही वृत्ती काही फारशी वेगळी नसते. दोन तीन चांगले फटके मारून ते परत तंबूच्या सुखकारक वातावरणात परततात. मालीकांमागून मालिका हरून सुद्धा तेथील कर्णधाराची हकालपट्टी होत नाही.

ह्या एकंदरीत परिस्थितीची कारणीमिमांसा करायची झाली तर न्यूझीलंडची विरळ लोकसंख्या आणि तेथील लोकांना जीवनासाठी करावा लागणारा कमीतकमी संघर्ष हे होय. आपल्या जीवनात संतुष्ट असणारे हे लोक क्रिकेटकडे एक खेळ आणि केवळ विरंगुळ्याचे साधन म्हणून पाहतात. क्रिकेटची गोष्ट सोडा एकंदरीत जीवनातही हे लोक समाधानाने जगत असतात. सतत प्रगती करायला हवी, निव्वळ नफ्यात वाढ हवी अशा ध्येयाने तेथील बहुतांशी जनतेस पछाडलेले नसते. अमेरिकेत असताना एका सहलीदरम्यान दादरहून न्यूझीलंडला स्थायिक झालेल्या मराठी माणसाची भेट झाली. त्याचे एक वाक्य माझ्या अजून लक्षात आहे, तो म्हणाला की न्यूझीलंडचा एखादा तरुण मुलगा अमेरिकत शिक्षण अथवा नोकरीनिमित्त चालला की त्याचे आईवडील काळजीत पडतात की पोरग आता बिघडणार! एकंदरीत काय तर अमेरिकेच्या स्वच्छंदी वातावरणाची भीती जगभर पसरलेली.

अमेरिकेचे स्वच्छंदी वातावरण केवळ आपण ऐकून असतो, चित्रपटातून पाहत असतो आणि मुंबईसारख्या भारतातील शहरांतून जगत असतो. परंतु तसे बघायला गेले तर बहुतांशी अमेरिकन लोक सुद्धा कुटुंबवत्सल असतात आणि भारतात सुद्धा ७०-८० टक्के लोक अजूनही परंपरागत जीवन जगणे पसंत करतात. प्रश्न आहे तो प्रसारमाध्यमांचा! प्रसारमाध्यमांना हाती घेवून भारतीय जनतेला चंगळवादी बनविण्याचा पद्धतशीर प्रयत्न गेले काही वर्ष चालू आहे. न्यूझीलंडला असे काही होत नाही आणि म्हणूनच माझा आवडता देश न्यूझीलंड! देव करो आणि न्यूझीलंडची उद्योग धंद्यात फारशी प्रगती न हो! नाही तर न्यूझीलंडला गर्दीचे ठिकाण बनवायला आपण भारतीय तयारच आहोत!

Wednesday, June 8, 2011

पुढे काय ?





मनुष्यजातीच्या उत्क्रांतींच्या प्राथमिक अवस्थेत अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजांसाठी मनुष्याने संघर्ष केला. हा संघर्ष दैनंदिन पातळीवरचा होता.
उत्क्रांतीच्या प्रगतावस्थेत हा संघर्ष दैनंदिन पातळीवर राहिला नाही. साठवणूक करून ह्या गरजा भागविण्यासाठी दीर्घकाळासाठी तरतूद करून ठेवण्याचे शहाणपण माणसाला सुचले. ही प्रगती सर्व मनुष्याजातीची न झाल्यामुळे काही समूहांचा प्राथमिक गरजांसाठी संघर्ष अजूनही कायम आहे. आज आपण बोलूया उत्क्रांतीच्या प्रगतावस्थेतील पुढील टप्प्यावरील समूहाविषयी!

मनुष्यजातीचे एक वैशिष्ट्य म्हणजे आपणास जास्त काळ शांत बसता येत नाही. प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यावर आपण नवीन गरजा निर्माण केल्या. क्रीडा, करमणुकीची साधने निर्माण केली. तंत्रज्ञानाने प्रगती करताच मात्र ह्या गरजांनी आपल्यावर ताबा मिळविण्यास सुरवात केली. गाडी हवी, वातांकुलीत घरे हवीत, बिले भरण्यासाठी इंटरनेट हवे, बोलण्यासाठी भ्रमणध्वनी हवा इथून सुरुवात झाली. त्यानंतर भ्रमणध्वनीवरून बिले भरता येण्याची सोय झाली.

माणसाचे तंत्रज्ञानांच्या बाबतीत अंतिम ध्येय काय असू शकते? माझ्या घरी एक संगणक सदृश्य उपकरण असणार, माझ्या मनातील विचार ते ओळखू शकणार आणि दूरदर्शन संच, संगणक, दृश दूरध्वनी यापैकी कोणत्याही एका MODE मध्ये सुरु होवू शकणार. त्यापुढील प्रत्येक पर्याय मी केवळ माझ्या मनातील विचारावर नियंत्रित करणार. Teleportation ने मी एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाणार. अन्नासाठी मी सलाईन लावणार...आणि असेच पुढे काही.. आज ही थोडी अतिशोयक्ती वाटत आहे पण मनुष्याच्या स्वस्थ न बसता येण्याच्या गुणधर्मावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि एक दिवशी आपण ही अवस्था गाठणार याची मला खात्री आहे. आणि मग ह्या अवस्थेच्या शेवटी आपण एक तर यंत्र बनून जगणार किंवा तंत्रज्ञान आपल्यावर ताबा मिळवणार!

Tuesday, May 10, 2011

अभ्यास पद्धती






लौकिकार्थाने अभ्यास आणि आपले नाते जरी महाविद्यालयीन जीवनासोबत संपत असले तरी मागे वळून बघून आपली अभ्यास करण्याच्या तंत्रांचा उहापोह करणे हा एक चांगला फलदायी उपक्रम आहे असे माझे मत आहे. प्रत्येकाच्या अभ्यास करण्याच्या तंत्रावरून त्या व्यक्तीच्या स्वभावाचा देखील काही प्रमाणात उलगडा होतो.

मराठी माध्यमातून शिकताना साधारणतः सातवीपर्यंत अभ्यास आवाक्यात असायचा. नियमितपणे गृहपाठ केल्यास परीक्षेच्या वेळी काही खास अभ्यास करावा लागत नसे. आठवीपासून हे चित्र काही प्रमाणात बदलत गेले. परीक्षेच्या आधीचे १-२ आठवडे सतत वाचन करावे लागत असे. N.C.Raut सर काही मुलांची नावे घेवून ती एकपाठी असल्याचे म्हणत असत. मला मात्र ते कधी जमले नाही. पहिले वाचन एकंदरीत विषयाचा आढावा घेण्यासाठी आणि मग नंतरची वाचने तो विषय आणि मसुदा डोक्यात पक्का करण्यासाठी. परीक्षेच्या जाण्याआधी पूर्ण पुस्तक वाचून झाल्याशिवाय मला चैन पडत नसे. थोड्याश्या घाबरट स्वभावाची ही लक्षणे होत. नववीत असताना फडके क्लासला जावू लागल्यानंतर मात्र माझ्या अभ्यास करण्याच्या शैलीत थोडा फरक झाला. पठण आणि लिखाणावर भर देण्याची ह्या कालावधीत मला सवय लागली. परंतु पूर्ण पुस्तक वाचून झाल्याचे आणि त्यातला कोणताही भाग आपल्या मर्जीनुसार आठवण्याचे मला आवश्यक वाटणारे समाधान मला मिळेनासे झाले. नववीनंतरच्या मे महिन्याच्या सुट्टीत फडके सरांनी माझा भरपूर अभ्यास करून घेतला. साधारणतः दहावीचा ५५ - ६० टक्के अभ्यास ह्या वेळात पूर्ण झाला होता. परंतु शाळा सुरु झाल्यावर मात्र मी थोडा त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेलो. आणि मला देखील शाळेत शिकवला जाणारा भाग आधीच माहीत असल्याची स्थिती नवीन होती. आणि त्यामुळे मी काही प्रमाणात बेफिकीर राहिलो. जानेवारी नंतर पेपर सोडविण्यावर फडके सरांचा भर होता आणि मी मात्र पूर्ण पुस्तक आपल्या डोक्यात बसविण्याच्या मागे होतो.

अकरावीत बर्याच गोष्टी बदलल्या. माध्यम बदलले, शाळेऐवजी कॉलेज आले. पहिल्या घटक चाचणी आणि सहामाही परीक्षेआधी, पुस्तक डोक्यात बसविण्याचे सोडा, एकदा पूर्णपणे वाचून होणे सुद्धा जमले नाही मला. त्यामुळे परीक्षेचा लढा सुरु होण्यापूर्वीच मी थोडासा हतबल झालो होतो. अकरावी असेच गेले. अकरावीची वार्षिक परीक्षा सुरु असतानाच बारावीचा अग्रवाल क्लास सुरु झाला. सकाळी अकरावीचा पेपर आणि दुपारी १ - ७ बारावीचा क्लास असा एक आठवडा काढला. बारावीत रुपारेल होस्टेलवर गेल्यावर मात्र बराच फरक पडला. २४ तास अभ्यासमय असं ते वातावरण होते. अग्रवालच्या नियमित परीक्षा होत आणि होस्टेलवर राहणाऱ्या कॉलेजच्या शिक्षकांकडे पेपरचा क्लास लावला. पेपर सोडवता सोडवता माझा पुस्तक डोक्यात बसविण्याचा माझा प्रयत्न चालूच होता. अग्रवालने सुद्धा फडके सरांची पद्धत अनुसरत जानेवारीपासून पूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा सुरु केल्या. प्रत्येक परीक्षेच्या वेळी माझा त्या त्या विषयाचे पुस्तक डोक्यात बसविण्याचा प्रयत्न थोडा थोडा पुढे सरकत होता. रुपारेलच्या जानेवारी अखेरीच्या सराव परीक्षेत एकदाची गुणांची नव्वदी गाठल्यावर मनाला थोडे समाधान आणि आत्मविश्वास लाभला. फेब्रुवारी महिना मात्र पूर्णपणे स्वयंअभ्यासासाठी लाभला आणि मग मात्र काही पुस्तके डोक्यात बसल्यावर मी धन्य झालो. परंतु Zoology साठी मात्र माझ्याकडे वेळ नव्हता. PCM करत असलो तरी काय झाले, रुपारेल होस्टेलवर Zoology चा काही भाग option ला टाकणारा मी एकमेव विद्यार्थी होतो.

एकपाठी नसणे, पूर्ण पुस्तक वाचून झाल्यशिवाय आत्मविश्वास न वाटणे, शेवटच्या क्षणी नवीन काही वाचून ते पेपरात उतरविण्याची क्षमता नसणे आणि रात्री दहानंतर मेंदूचा स्वीच बंद होणे अशा उणीवा बरोबर घेवून मी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश केला. दररोजचा ट्रेनचा प्रवास, सबमिशन, क्रिकेटचे वेड ह्या सर्व गोष्टींमुळे परीक्षेच्या आधीच्या study leave वर सर्व भिस्त असायची. अभियांत्रिकी जीवनात एका पुस्तकावर अवलंबून असणे ही योग्य गोष्ट नव्हे परंतु मला माहित असलेल्या माझ्या मर्यादांमुळे मी तो मार्ग पत्करला.

असो वेळेच्या बंधनामुळे आता इथेच आटोपते घेत आहे. जमल्यास बाकीचा भाग पुन्हा कधी तरी लिहीन. लेख लिहिण्याचा एकच उद्देश स्वतःची आणि आपल्या मुलाची अभ्यास पद्धती काय आहे ते ओळखून घ्या. आपली अभ्यास पद्धती आपल्या स्वभावाचे द्योतक आहे, ती माहित असल्यास आपल्यास आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात फायदा होईल. आपल्या मुलाची अभ्यास पद्धती ओळखता आल्यास त्यात थोडेफार योग्य बदल करण्याचा प्रयत्न करता येईल आणि असलेल्या मर्यादांमध्ये योग्य यश मिळविता येईल

Saturday, April 23, 2011

अण्णा हजारे आंदोलनानिमित्त





असे कुठे तरी वाचले होते की भारतातील न्यायप्रणालीचे एक मुलभूत तत्त्व आहे की हजारो अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये. त्यामुळे एखाद्या अपराध्याला शिक्षा ठोठावण्याआधी पूर्ण खात्री केली जाते आणि तसेच एखादा कायदा करण्याआधी बराच उहापोह केला जातो. सखोल अभ्यास करण्याला ह्या कायद्यातील पळवाटा काढणे शक्य असते आणि नेमका त्याचाच फायदा राजकारणी आणि भ्रष्ट प्रशासनीय अधिकारी घेतात. ही युती बुद्धिमान आहे पण दुर्दैवाने त्यांच्या बुद्धीचा वापर त्यांच्या स्वार्थासाठी करून घेण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. ह्या युतीने भारतातील लोकांचे विविध प्रकारात वर्गीकरण केले असणार. कायदेशीररित्या ह्या युतीशी लढा देवू शकणारा वर्ग आपल्या देशात आहे पण एक तर तो वर्ग स्वतःच्या प्रगतीची शिखरे गाठण्यात मग्न आहे किंवा इच्छा असुनही काही कारणास्तव गप्प आहे. प्रसारमाध्यमांचे मला नक्की कळत नाही, एखादे प्रकरण ज्या वेगाने प्रकाशात येते तितकेच ते विसरलेही जाते.

ही ऐवढी प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे ज्या दिशेने लोकपाल विधेयकाचा प्रवास चालू आहे त्यावरून माझी खात्री आहे की सध्या मुळ मुद्द्यापासून लोकांचे लक्ष विचलीत करण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे. असे म्हटले जाते की रेल्वेच्या डब्यात जेव्हा एखादा पाकीटमार पकडला जातो तेव्हा त्याच्या आजूबाजूला वावरणारे त्याचेच साथीदार त्याला मारण्याचे नाटक करून खऱ्या मारापासून त्याला वाचवितात. असलाच काहीसा प्रकार सध्या चालू आहे. माझी खात्री आहे की थोड्याच दिवसात लोकांचे लक्ष वेधण्यासाठी एखादे दुसरे प्रकरण बाहेर काढले जाईल. आणि आपण सर्व काही विसरले जाऊ. नाही म्हणायला IPL तर आहेच की.

जो पर्यंत सुशिक्षित वर्गाचा सहभाग फक्त चर्चेपुरता अथवा ब्लॉग लिह्ण्यापुरता मर्यादित आहे तोपर्यंत आपण म्हणूयात की जय लोकशाही!

Wednesday, April 20, 2011

मिती







आयुष्यात विविध घटनांवर विविध घटक परिणाम करीत असतात. जसजसे ह्या घटकांची संख्या वाढत जाते तसतसे घटना, ती बाब क्लिष्ट होत जाते.

आपण क्रिकेटपासून सुरुवात करूयात. फलंदाजाची गुणवत्ता आणि खेळपट्टी हे दोन घटक धावसंख्येवर परिणाम करतात. शक्यता चार
१> चांगला फलंदाज आणि अनुकूल खेळपट्टी
२> चांगला फलंदाज आणि प्रतिकूल खेळपट्टी
३> बेताचा फलंदाज आणि अनुकूल खेळपट्टी
४> बेताचा फलंदाज आणि प्रतिकूल खेळपट्टी
यात आपण पंचाला सुद्धा समाविष्ट करण्याचे ठरविले तर शक्यतांची संख्या आठ होते.

कार्यालयात सुद्धा एखाद्या प्रोजेक्टवर काम करताना व्यवस्थापक, टीम आणि प्रोजेक्टची क्लिष्टता असे तीन घटक येतात. सर्वात अनुकूल परिस्थिती म्हणजे कुशल व्यवस्थापक, उत्तम टीम आणि सोपे प्रोजेक्ट. सर्वात प्रतिकूल परिस्थिती म्हणजे ....!

संसारात सुद्धा नवराबायकोचे स्वभाव हे दोन घटक घेता येतील!
१> शांत नवरा, शांत बायको
२> शांत नवरा, तापट बायको
३> तापट नवरा, शांत बायको
४> तापट नवरा, तापट बायको
यात दोन्ही बाजूच्या सासुंचे स्वभाव हे घटक समाविष्ट करून बघा, किती धमाल येईल!

कधी वेळ मिळाला तर आपल्या आयुष्यातील महत्वाच्या बाबींचे असे विश्लेषण करून बघा! ह्या बाबींवर परिणाम करणारे घटक शोधा आणि त्यांचे वर्गीकरण करा. थोडी गंमत वाटेल आणि बरेच काही शिकता येईल!

Friday, April 15, 2011

असेच काही





राहून राहून मी एकत्र कुटुंब पद्धतीकडे वळतो. एका जवळच्या मित्राच्या टिप्पणीनुसार, एकत्र कुटुंब पद्धतीचा माझ्यावर मोठा पगडा आहे. एकत्र कुटुंब पद्धती आपल्या डोळ्यासमोर बघता बघता नाहीशी झाली. थोडा विचार करता असे जाणवते की एकत्र कुटुंब संस्थेत काळानुसार थोडेच पण योग्य बदल केले असते ती टिकली सुद्धा असती. ह्या संस्थेतील काही व्यक्तींचा त्याग (स्वखुशीने अथवा परिस्थितीमुळे) हा एकत्र कुटुंबसंस्थेचा पाया होता. जसजसे शिक्षणाचे प्रमाण वाढले तसतसे स्वःत्वाची भावना वाढीस लागली आणि त्यागभावना लोपास गेली. एकत्र कुटुंबसंस्थेचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे त्या कुटुंबात वाढणार्या मुलांचे जोपासणारे भावनिक संतुलन. आजी आजोबा, काका, काकी, मोठी भावंडे यांच्या सहवासात वाढताना आपण एका मोठ्या संस्थेचा भाग असल्याची एक सुखद भावना जोपासली जाते. आणि मग स्वतःची एक ओळख (identity) निर्माण होते. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गोष्टी वाटून घेण्याची सवय लागते. विभक्त कुटुंबात वाढलेल्या मुलांना मात्र स्वःताची एक Space लागते. आणि त्यामुळेच लग्नानंतर विवाहसंस्थेत स्थिरावताना ह्या मुलांना थोडा जास्त वेळ लागतो. एकत्र कुटुंबसंस्थेचे पुनर्जीवन करणे शक्य आहे का? ज्या रुपात ती अस्तित्वात होती त्या स्वरुपात तर नाही पण काळानुसार थोडेफार बदल करून ती अजूनही अमलात आणता येईल असे मला वाटते. उदाहरण द्यायचे झाले तर बाजूबाजूला सदनिका घेवून राहणे हा एक उपाय असू शकतो. अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो आणि तो म्हणजे लहान मुलांचे होणारे शाब्दिक कौतुक! आजी, आजोबांच्या नजरेतून नातवंडे सदैव बालकेच असतात. त्यामुळे नोकरीला जाणार्या आपल्या नातवंडाचे एका बालकाप्रमाणे कौतुक करणे केवळ आजी, आजोबाच जाणो! बाहेरून कितीही आपण त्याला विरोध केला तरीही मनातून आपण सुखावत असतो. स्वःताचे कौतुक करून घेण्याची सुप्त इच्छा प्रत्येक प्रौढ माणसाच्या मनात असते. विभक्त कुटुंबात ही इच्छा बर्याच प्रमाणात अतृप्त राहते. आजच्या जीवन प्रत्येकजण विविध पातळ्यांवर विविध प्रमाणात संघर्ष करीत असतो. आजचा हा ब्लॉग विनाकौतुक जीवनसंघर्षाला सामोरे जाणार्या आपण सगळ्या सर्वसामान्य लोकांसाठी!

Friday, April 8, 2011

केरळ भेट भाग २





ठेकडी येथील हॉटेलचा परिसर पाहून आम्ही बेहद्द खुश झालो. तेथून पेरियार येथील तलाव आणि त्या सभोवतालचे वन्य जीवन पाहण्यासाठी आम्ही निघालो. पेरियार जलाशयातील बोट दुपारी ३:३० वाजता निघणार होती. योग्य माहितीच्या अभावी आम्ही तेथे २ वाजताच जावून पोहचलो. तिकीटे घेतल्यावर आम्ही बोटींच्या धक्क्यावर जावून पोहोचलो. तेथे आजूबाजूंच्या झाडांवर माकडांनी वास्तव्य केले होते. जसजशी लोकांची गर्दी वाढू लागली तसतसे माकडांनी झाडांवरून खाली उतरण्यास प्रारंभ केला. लोकांजवळील खाद्यपदार्थ हिसकावण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे काही वेळ तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. थोड्या वेळाने काळ्या माकडांच्या दुसर्या एका टोळीने ह्या आधीच्या समूहावर हल्ला करून त्यांना हिसकावून लावले. शेवटी एकदा तिथे बोटींचे आगमन झाले. जलतरींगिनी (चुकलो जलथरींगिनी) ह्या बोटीत आम्ही बराचश्या विदेशी पर्यटकांबरोबर बसलो. ह्या बोटीबरोबर अजून तीन बोटी होत्या. आम्हाला जबरदस्तीने संरक्षक jacket घालावी लागली. ही jacket म्हणा किंवा विमानातील प्राणवायूचे मास्क म्हणा, हे आपल्या किंवा त्या कंपनीच्या समजुतीसाठी! पुढील दोन तास आम्ही एका अवर्णनीय अनुभवाचे साक्षीदार होतो. जलाशयाभोवती घनदाट जंगल आणि ठिकठीकाणी जलाशयाच्या काठावरील विस्तीर्ण कुरणांमध्ये चरणारे, शहरीकरणाचा स्पर्श न झालेले वन्य प्राणी! हरणे, कोल्हे आणि हत्ती ह्या प्राण्यांचे आम्हाला दर्शन झाले. वाघाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या आम्हां सर्वांची मात्र थोडी निराशाच झाली. जंगलाचे वातावरण मात्र मला बरेच गूढ वाटले आणि मला त्याने मोहवून टाकले. शतकोशतके न बदललेली ही भूमी आणि त्यात फक्त अन्न ही मुलभूत गरज भागविण्यासाठी जीवन मरणाचा खेळ दररोज खेळणारे वन्यजीव आपल्याला आपल्या दररोजच्या संघर्षाच्या निरर्थकतेची जाणीव करून देतात. ह्या जलाशयात बरेच वठलेले वृक्ष आणि त्यावर वास्तव्य करणारे पक्षी आढळतात. हे पक्षी आपल्याला मासे पकडण्याची कसरत सुद्धा करून दाखवतात. बाकी मध्येच एका हत्तींचा समूह जवळून बघण्याच्या नादात आमच्या बोटीला बाकीच्या बोटींनी मागे टाकले. त्यामुळे सोहमची बैचैनी वाढली. आपण बाकीच्या बोटींना कधी एकदा मागे टाकतो असे त्याला झाले. त्या जलाशयाच्या दुसर्या टोकाला पोहचून आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. आता बोटीचे सारथ्य दुसर्या माणसाने हाती घेतले, आता हा तरी दुसर्या बोटींना मागे टाकेल ही सोहमची अपेक्षा मात्र काही सार्थ झाली नाही. शेवटी मात्र फक्त आमच्याच बोटीला एका हत्तीणीने आणि तिच्या पिल्लाने जवळून दर्शन दिले आणि फोटोसाठी पोझही दिली. मसाल्याची थोडीफार खरेदी करण्याच्या नादात थोडा वेळ झाला आणि रात्र उजाडली. परतीचा प्रवास २० किलोमीटर होता. अंधारातील निर्मनुष्य रस्ते पाहून सोहमने रात्रीचा प्रवास करणे कसे चुकीचे आहे हे आम्हाला समजावले आणि खरेदी वेळीच आटोपणे आवश्यक आहे असा सल्लाही दिला. बर्याच वेळा आपले गुण मुलामध्ये उतरलेले दिसतात आणि त्यावेळी मन कुठेतरी सुखावते. वयानुसार आपण भावना मनातच ठेवून द्यायला सरावतो परंतु लहान मुलांचे मात्र तसे नसते. मनातील विचार ते बिनधास्त बोलून दाखवितात. बर्याच दिवसांनी विमानात बसल्यावर ज्यावेळी उड्डाणाची वेळ आली तेव्हा मनात थोडी धाकधूक असताना 'बाबा आपले विमान पडणार तर नाही ना? असा प्रश्न ऐकल्यावर मन धन्य होते. आमचा ड्रायव्हर दररात्री कारमध्येच झोपायचा. ही गोष्ट आपल्याला जशी खुपते तशी सोहमला ती पटली नाही. काही गोष्टी आपल्याला पटत नसतात, पण त्या बदलणे शक्य असूनही आपण त्या बदलत नाही. प्रवासाचा पाचवा दिवस उजाडला. आजचे आकर्षण अल्लेपी येथील नावेतील प्रवास आणि रात्रीचे वास्तव्य हे होते. आतापर्यंत अतिशय शांतपणे कार चालविणारा आमचा ड्रायव्हर आज मात्र सुसाट सुटला होता. मल्याळम भाषेतील शेलके शब्द ऐकायची संधीही आम्हाला या निमित्ताने मिळाली. संधी मिळताच त्याला मी विचारले, काय रे बाबा आज काय झाले? तो तोडक्या मोडक्या हिंदीत उत्तरला की आज तो त्याच्या अल्लेपी येथील घरी जाणार होता आणि पाच दिवसाने बाबा येणार म्हणून त्याच्या मुलाने शाळेला सुट्टी घेतली होती! बर्याच जणांकडून ऐकलेल्या केरळच्या backwater चा प्रवास सुरु झाला. नावेत सारथ्याने, त्याच्या मदतनीसाने आणि आचार्याने शहाळ्याचे पाणी देवून आमचे स्वागत केले. ही हाउसबोट तशी भव्य पण मस्त्यगंधाने सुगंधीत! दिवसाचा प्रवास तसा मजेचा! सर्वत्र जलाशय आणि काठावर झाडांमध्ये वसलेली केरळची गावे हे पाहण्यास मजा आली. संध्याकाळी साडेपाचनंतर ह्या बोटींना जलसंचार करण्यास कायद्याने बंदी आहे. त्यामुळे एका गावाच्या काठी ही बोट वास्तव्याला आली. गावात एक फेरफटका मारण्याचा आमचा उत्साह थोड्याच वेळात मावळला! जलाशयाच्या काठी दात घासणारे, भांडी धुवणारे गावकरी पाहण्यास आम्ही सरावत होतो तितक्यात आमच्या समोरच आमच्या आचार्याने त्याच पाण्यात डुबकी मारून त्यांचे संध्याकाळचे स्नान आटोपले. ते पाहून आम्ही याची देही डोळा धन्य झालो! बाजूला अशा अनेक बोटी वास्तव्याला आल्या होत्या! त्यातील कुटुंबेही फेरफटका मारण्यासाठी निघत आणि मग थोडा वेळ आमच्याशी गप्पा मारून जात. ही रात्र आता अशा ठिकाणी काढायची अशा विचाराने कंटाळलो असताना 'बाबा येथे रात्री डाकू तर येणार नाहीत, या सोहमच्या प्रश्नाने आमची करमणूक झाली. नावाड्याने विचारले हा काय विचारतो आहे? डाकू हा शब्द त्याला हिंदीत समजावू न शकल्याने मी शेवटी त्याला फुलनदेवी हा शब्द सांगितल्यावर त्याची हसताहसता पुरेवाट झाली. बाकी ह्या हाउसबोटीवर जेवण मात्र अगदी रुचकर होते. रात्री डासांचा मुकाबला करावा लागला. शेवटी एकदा बेडरूम मधला AC सुरु केल्यावर आम्ही सुखावलो. शेवटच्या दिवशी कोचीनच्या दिशेने आम्ही प्रस्थान केले. तिथे थोडीफार खरेदी करून भारताचा विश्वचषक स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना बघण्यासाठी आम्ही विमानतळावर येवून दाखल झालो. रात्री बोरीवलीला परतल्यावर भारताने सामना जिंकला आणि एका छान सुट्टीची सांगता झाली.

Monday, April 4, 2011

केरळ दर्शन - भाग १





मार्च महिन्यात एक सहकुटुंब केरळ सहल करण्याची संधी मिळाली. मुन्नार, ठेकडी आणि अल्लेपी अश्या तीन ठिकाणांना आम्ही भेट दिली. १९ मार्च रोजी सकाळी विमानाने आम्ही कोचीन विमानतळावर पोहोचलो. तेथून प्रथम आम्ही मुन्नार येथे प्रयाण केले. मुन्नारच्या वाटेवरील नागमोडी रस्ते, एका बाजूला दिसणाऱ्या दर्या आणि दुसर्या बाजूला हिरवाईने नटलेले विस्तीर्ण डोंगर असे अप्रतिम निसर्गसौदर्य डोळ्यात साठवत आम्ही जवळपास पाच तासांचा रस्ता कसा पार केला हे आम्हाला कळले सुद्धा नाही. ह्या रस्त्यावरील शांतता कानात साठवण्याचा आम्ही प्रयत्न करीत होतो. आमचे हॉटेल सिएंना विलेज, हे मुन्नारच्या पलीकडे अधिक उंचीवर होते. तेथे पोहोचताच त्या हॉटेलच्या रमणीय परिसराने आम्ही भारावून गेलो. प्रत्येक व्यक्तीची पर्यटनाची एक विशिष्ट पद्धत असते. आपण कधीकाळी फिरत असल्यास ही शैली ओळखण्यास आपणास संधी मिळत नाही. परंतु आम्हाला मात्र फारसे न फिरता ही पद्धत अचानक गवसली. मोजक्या दिवसात अधिकाधिक स्थळे पाहणे आम्हाला कधीच जमत नाही. मोजकी स्थळे आपल्या कलाने पाहणे आम्हाला जास्त रुचते. मुन्नारच्या रस्त्यावरील एखादी मनुष्यस्पर्शापासून मुक्त अशी जागा अनुभवण्यासाठी गाडी थांबविणे आम्हाला आवडते. मुन्नारच्या आसपास दोन तीन धरणे, Tea Factory अशी ठिकाणे आम्ही आटोपली. बाकी हॉटेलचा नास्ता मात्र भरपेट आणि अमर्यादित. थंड हवा आणि रुचकर अन्न याचा परिणाम शरीरावर दिसू लागला नाही तरच नवल. तिसर्या दिवशी अजून वर जावून तेथील टी factory पाहण्याचे आम्ही ठरवले. हा रस्ता अधिक बिकट, साधी इंडिका तेथे तग धरणार नाही म्हणून खास जीप भाड्याने केलेली. थोड्याच वेळात रस्त्याची अवस्था पाहून आम्ही जीप एका कडेला थांबवली. बाजूलाच एक छोटी ठेकडी आणि त्यावर चहाची पाने खुडणाऱ्या कामगार. अचानक आम्ही त्या टेकडीवर कूच करण्याचा निर्णय घेतला. चहाची रोपे लांबून कितीही नाजूक दिसत असली तरीही असतात तशी खमकी. त्यांचा आधार घेत आणि प्रसंगी त्यांचे बोचकारे खात आम्ही त्या कामगारांपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. आमच्या चालकाच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधण्याचा थोडासा आमचा प्रयत्न. तेथील एका वयस्क स्त्रीने सोहमला एका नातवाच्या मायेने जवळ ओढून घेतले. कधी नव्हे ते सोहमने सुद्धा ते लाड आनंदाने स्वीकारले. अजून पुढचा रस्ता आम्ही स्वखुशीने टाळला आणि परतीच्या वाटेवर आलो. चार तासाची ही फेरी २ तासात आटपून सुद्धा जीपवाला मात्र नेहमीच्या भाड्यावर अडून बसला. व्यावसायिकता माणुसकीला टाळे लावते अशी आमची समजूत काढत आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. प्रवासात आपण निसर्गरम्य ठिकाणे पाहतो, चांगल्या हॉटेलात राहतो, व्यवस्थित खातो पितो. पण याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलाचे समृद्ध होणारे भावविश्व. नेहमीपेक्षा येणारे वेगळे असे अनुभव तो आपल्या पालकांबरोबर राहून अनुभवत असतो. प्रवास करणारे कुटुंब एक संघ म्हणून सर्व गोष्टींचे नियोजन करीत असते, मजा अनुभवत असते आणि कठीण परिस्थितींचा सामना देत असते. दैनंदिन जीवनात सुद्धा ह्या गोष्टी होत असतात परंतु त्यातील सांघिकपणाची भावना मुलास जाणविण्याइतपत नसते. एका सहलीत हे एका कुटुंबाचे बंध बळकट होत असतात. एरव्ही थंड पाणी पिऊ न देणारे बाबा प्रत्येक जेवणात आईसक्रीम खावून देतात हे कळल्यानंतरचा त्याचा आनंद शब्दात पकडण्यापलीकडचा असतो. तो त्याला धडा देवून जातो की जीवनात प्रत्येक गोष्टीला तर्काची कसोटी लावायचा प्रयत्न करू नये. आयुष्यात काही गोष्टी तर्कापलीकडे घडतात आणि त्या आपणास आनंदही देवू शकतात. पुढचा भाग पुन्हा कधी तरी!

Sunday, March 27, 2011

न्यू इंग्लिश स्कूल १९८८ विरुद्ध न्यू इंग्लिश स्कूल १९८५ - सामनावृत्तांत





न्यू इंग्लिश स्कूल १९८८ विरुद्ध न्यू इंग्लिश स्कूल १९८५ - मर्यादित षटकाचा क्रिकेट सामना दिनांक ३० जानेवारी २०११ वेळ - सकाळी ७ - ८:३० तापमान - १६ डिग्री सेल्सिअस पंच - विवेक काणे आणि संजिव पाटील धावसंख्या न्यू इंग्लिश स्कूल १९८५ - ८ षटकात ६ बाद ६० न्यू इंग्लिश स्कूल १९८८ - ७.३ षटकात ४ बाद ६१ विजयी संघ - न्यू इंग्लिश स्कूल १९८८ पहिला डाव सामना निर्धारित वेळेच्या थोडाच वेळ नंतर म्हणजे सव्वासात वाजता सुरु झाला. संजय राऊत यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सचिन पाटणकर आणि गट्टू यांनी डावाची सुरुवात केली. १९८८ batch तर्फे सचिन याने गोलंदाजीची सुरुवात केली. पहिलाच चेंडू ८८ चे कसलेले यष्टीरक्षक सुजित देवकर यांना चुकवून सीमारेषेबाहेर गेला. पुढील चेंडूदेखील मागे जाऊन २ धावा मिळाल्या. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सचिन यांनी एक सुंदर चौकार ठोकून संघाची धावसंख्या ११ वर नेली. दुसर्या षटकात अरुण गोईलकर यांनी गोलंदाजीची धुरा सांभाळली. या षटकात समीर कंक यांनी सचिन यांना जीवदान दिले. या षटकात देखील सचिन यांनी लॉंगऑन दिशेने एका चौकाराची नोंद केली. कर्णधार सुजित यांनी गोलंदाजीत बदल करीत राकेश यांना गोलंदाजीस पाचारण केले. राकेश यांनी चेंडूच्या टप्प्यावर योग्य नियंत्रण ठेवीत या षटकात मात्र केवळ चार धावा देत धावसंख्येचा वेग एका आकड्यावर (प्रती षटकामागे ९) असा आणला. त्यानंतर आदित्याकडे गोलंदाजी सोपवण्यात आली. त्यांच्या पहिल्याच चेंडूवर गट्टू हे दुसरी धाव पळून काढण्याच प्रयत्नात धावबाद झाले. लेग अम्पायर संजिव पाटील यांनी क्षणभर विचार करून त्यांना बाद घोषित केले. दुसर्या चेंडूवर विवेक काणे यांनी आदित्याचा चेंडू साईड नो म्हणून पुकारला. सचिन पाटणकर यांनी संयमी फलंदाजी करीत दोन दोन धावा पळून काढण्याचे सत्र सुरु ठेवले. आदित्याचे हे षटक एकूण ९ चेंडू चालले. नवीन आलेले फलंदाज संजय यांनी आपला जम बसविण्यास थोडा वेळ घेतला. चार षटकानंतर ८५ ची धावसंख्या १ बाद ३८ इतकी झाली. त्या नंतर मात्र ८८ च्या गोलंदाजांनी आपल्या कुशल गोलंदाजीचे पाश आवळण्यास सुरुवात केली. राकेश यांनी संजय राऊत यांना आपल्या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीने जखडून ठेवले. ५ व्या षटकात केवळ ५ धावा आल्या. ५ षटकानंतर ८५ - १ बाद ४३. सहाव्या षटकाच्या सुरुवातीस चेतन चव्हाण यांनी सचिन पाटणकर यांना त्रिफळाचीत करून ८५ च्या संघास मोठा धक्का दिला. त्यांच्या या षटकात केवळ ७ धावा आल्या. ६ षटकानंतर ८५ - १ बाद ५०. या कालावधीत सुजित देवकर यांनी यष्टीमागे धावा देण्याचा सपाटा चालूच ठेवला. समीर ठाकूर यांनी फलंदाजीची धुरा सांभाळण्याचा थोडाफार प्रयत्न केला. परंतु सचिन संख्ये आणि चेतन चव्हाण यांनी शेवटच्या दोन षटकात केवळ १० धावा दिल्या. ८५ ची batch ८ षटकानंतर ६० धावा जमवू शकली. डावाच्या मध्यावर ३८ धावा असतांना ही एकूण धावसंख्या काहीशी निराशाजनक अशी होती. ८८ च्या तंबूत मध्यंतराच्या वेळी चिंतेचे वातावरण होते.. दुसरा डाव ८८ तर्फे सचिन संख्ये आणि राकेश राऊत हे फलंदाजीस उतरले. सचिन पाटणकर यांनी अचूक टप्प्यावरून चेंडू उसळवीत ह्या दोघांना जखडवून ठेवले. ८८ च्या एका प्रेक्षकाने सचिन पाटणकर यांना डेरील स्टेन यांची उपमा दिली. पहिल्या षटकात केवळ तीन धावा जमविल्या गेल्या. संजय पाटील यांनी दुसर्या षटकात देखील अचूक गोलंदाजीचा क्रम चालू ठेवीत धावसंख्येवर अकुंश ठेवला. ह्या मुळे दडपणाखाली येत चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात राकेश राऊत हे धावचीत झाले. त्यानंतर सुजीत देवकर हे फलंदाजीस उतरले. त्यांनी मैदानातील क्षेत्ररक्षकांची संख्या मोजली असता एकूण १२ जण क्षेत्ररक्षण करीत असल्याचे आढळले. त्यामुळे अतिरिक्त क्षेत्ररक्षक परांजपे यांना विशाल पाटील यांच्या सोबत गुणलेखनाच्या जबाबदारीसाठी पाठविण्यात आले. सामन्याचा हा कलाटणीचा क्षण ठरला. सुजित देवकरने एका उत्तुंग षटकाराची नोंद केली. या वेळी पंच विवेक यांचा षटकार घोषित करण्याचा आविर्भाव लाजबाब होता. चार षटकानंतर ८८ batch २४ धावांवर होती. सचिन पाटणकर यांची दोन षटके संपली.आणि मग त्यानंतर मात्र ८८ च्या फलंदाजांनी मुक्त खेळ करण्यास सुरुवात केली. ८५ batch ने आपल्या वयोमानानुसार ढिसाळ क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. याला अपवाद यष्टीरक्षक जयदीप वाकणकर आणि लॉंगऑनला क्षेत्ररक्षण करीत असलेले हेमंत डोंगरे यांचा (सामन्याच्या वर्णनाच्या ह्या वाक्याचे प्रायोजक आहेत हेमंत डोंगरे ). ८८ batch ने एका वेळी तर ५ धावा धावून काढल्या. समीर ठाकूर यांच्या पहिल्या षटकात १२ धावा चोपल्या गेल्या. हेमंत डोंगरे यांनी सुजित देवकर यांचा एक कठीण झेल दुसर्या प्रयत्नात टिपला. परंतु त्यानंतर आलेले फलंदाज अतुल शिंदे यांनी जोरदार फटके मारले. सचिन संख्ये बाद झाल्यावर अरुण गोईलकर हे मैदानात आले. त्यांनी आणि अतुलने व्यावसायिकरित्या फलंदाजी करीत उत्तमरीत्या धावा पळून काढल्या. हेमंत डोंगरे यांनी अतुलचा झेल दुसर्या प्रयत्नात सोडला. शेवटच्या दोन षटकात ८८ batch ला १० धावांची गरज होती.अतुल यांचा पाय दुखावला गेल्यामुळे सुजित हे रनर म्हणून उतरले. परंतु अतुल थोड्याच वेळात बाद झाले. आदित्य १ धावा काढून समीर ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्या नंतर दीपक कदम यांनी विजयी धावा काढल्या. आणि मग ८८ batch ने आपल्या विजयोत्सवाने मैदान दणाणून सोडले.



Quotes of the Day! विवेक काणे - आज रात्री ८५ चा गुणलेखक ८८ च्या संघाबरोबर पार्टी करतानाचे sting operation फेसबुकवर झळकणार! ८८ चा न निवडला गेलेला खेळाडू - ८८ च्या संघनिवडीत पापडीच्या खेळाडूंना झुकते माप दिले गेले. ८८ चा गोलंदाजी न मिळालेला खेळाडू - ८८ च्या गोलंदाजीत पापडीच्या खेळाडूंना झुकते माप दिले गेले. हेमंत डोंगरे - इतिहासात मराठे युद्धात जिंकले आणि तहात हरले! ८५ ची batch मैदानात जिंकली पण गुणतक्त्यावर हरली!

Friday, March 18, 2011

चंद्र


चंद्र भूतलावरच किंवा आकाशातला, तसा प्रत्येकाच्या मनात वास्तव्य करून असतो. तसे मलासुद्धा चंद्राचे आकर्षण! लहानपणी चंद्रग्रहण होणार अशी बातमी ऐकून मी गोंधळून गेलो. पण त्यात काय, फक्त पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार अशी समजूत काढताच, आपल्या मुंबईला राहणाऱ्या आपल्या मामाची सुद्धा सावली मला चंद्रावर दिसणार असा विचार माझ्या डोक्यात आला.

गणपतीच्या दिवशी चंद्र बघायचा नाही, पाण्यातील किंवा दुधातील त्याचे प्रतिबिंब तर अजूनही वर्ज्य अशी शिकवण लहानपणापासून मला मिळालेली! पण बर्याच वेळा हा नियम माझ्याकडून मोडलेला. बारावीला असताना गणपतीच्या दिवशी संध्याकाळी रुपारेलच्या होस्टेलला जाताना वांद्र्याला गाडी बदलून माटुंग्याला उतरण्यासाठी पश्चिमेला तोंड उभ्या करून असलेल्या मला चंद्राने हसून दर्शन दिले. बाकी ढगाळ वातावरण असताना, अचानक चंद्रास्त व्हायच्या वेळी एकदा चान्दोबाबा माझ्यासमोर प्रकट झाले. अगदी गेल्या वर्षी हेमंतकडून गणपती पाहून येत असताना, शनीदेवळानंतर डावीकडे वळण घेताच चंद्र दिसला.

बाकी पृथ्वीला एकच चंद्र असल्याचे मला सदैव दुःख होते. आतापर्यंत मला कित्येक वेळा पृथ्वीला दोन चंद्र असल्याचे स्वप्न पडले. प्रत्येक स्वप्नात खूप खुश झाल्यावर जाग आल्यानंतरचे दुःख मात्र अतोनात! हेच स्वप्न पुढे खेचून, पृथ्वीला ३० चंद्र असावेत आणि त्या प्रत्येकाची वेगवेगळी तिथी असावी अशी इच्छा मी मनात बाळगली. म्हणजे काय तर, कोणत्याही दिवशी आकाशात प्रत्येक तिथीचा एक चंद्र असणार! संकष्टी पाळणारे एकदम धर्मसंकटात!

ह्या चंद्राची काही रूपे एकदम लक्षात राहिलेली. न्यू जर्सीच्या पहिल्या बर्फवृष्टीनंतर ह्या बर्फावर चकाकणारा आकाशातील चांदोबा, पहिल्या परदेशवारीनंतर परत येताना दुबईवरून विमानाने उड्डाण केल्यावर ढगातून डोकावणारा चांदोबा लक्षात राहिलेत! बाकी वसईच्या शुद्ध वातावरणातल्या चंद्राचे सौंदर्य काही औरच!

चंद्र दररोज आधीच्या दिवसापेक्षा ५२- ५३ मिनटे उशीरा उगवतो. आता ही ५२- ५३ मिनटे भारतात खरी, ती बहुदा अक्षांशानुसार आणि रेखांशानुसार बदलत असावी असा माझा समज आहे. ते नक्की गणित एकदा समजून घ्यायचे आहे. पूर्णिमेला सूर्य मावळल्यानंतर उगवणारा चंद्र कृष्ण अष्टमीच्या वेळी मध्यरात्री उगवतो. आणि असे करीत करीत अमावास्येला सूर्याबरोबर उगवतो. चन्द्रोदयावेळी आणि चंद्रास्तावेळी ओहोटी असते आणि ज्यावेळी चंद्र बरोबर डोक्यावर किंवा पायाखाली असतो त्यावेळी भरती असते. हे तत्व बोर्डीच्या आजोबांनी लहानपणी सांगितले तेव्हा खूप आनंद झाला. हे आता रविवारी सकाळी क्रिकेट खेळायला जायच्या वेळी लक्ष्यात ठेवायचे!

असा हा चंद्र उद्या पृथ्वीच्या अगदी जवळ येतोय! लक्षात ठेवा एक नजर टाकायला त्याच्यावर!

Sunday, March 13, 2011

आत्मकेंद्रित


आताच एक फेसबुकवर स्टेटस वाचले
प्रत्येकजण आत्मकेंद्रित असतो
फक्त वर्तुळाच्या त्रिज्या मात्र बदलत असतात!

अप्रतिम, लाजबाब
आपण आपल्या कळत नकळत आपल्याभोवती एक आपल्या सुखकारक वातावरणाचे वर्तुळ आखून घेतो. त्या आरामदायीपणाच्या व्याख्येत बसणाऱ्या व्यक्ती, समारंभ, स्थळ यांनाच ह्या वर्तुळात प्रवेश असतो. जसजसा माणुस आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत जातो तसतसा तो ह्या वर्तुळाच्या निवडीविषयी एकदम चोखंदळ होत जातो. काही माणसे मात्र आपली त्रिज्या फार मोठी आखतात, वसुधैव कुटुम्बकम् अशीच त्यांची धारणा असते. आजकाल अशी निस्वार्थी माणसे मिळणे जरा दुर्मिळच झाले आहे.

हीच कल्पना पुढे नेत असा विचार करूया की दैनंदिन जीवन प्रत्येकजण आपले हे वर्तुळ घेवून फिरत असतो. ज्या ज्या वेळी व्यक्तीच्या ह्या वर्तुळात एखाद्या आगन्तुकाचे आगमन होते त्यावेळी संघर्ष निर्माण होतो! बाकी फेसबुकाचे मात्र बरे आहे, आपले वर्तुळही आपणच आखायचे आणि या वर्तुळातील कोणी मनाजोगता वागला नाही तर त्याला unfriend करून टाकायचे!

Saturday, March 12, 2011

क्रिकेट आणि निराशा


कालचा सामना आपण हरला. काही वर्षापूर्वी मला ह्याचा खूप त्रास बराच वेळ व्हायचा. जावेद मियांदादचा शारजाह मधील शेवटच्या चेंडूवरचा षटकार, तेंडूलकरने पाकिस्तान विरुद्ध १३६ धावांची खेळी केल्यावर विजयासाठी १६ धावा हव्या असताना तो बाद झाला आणि मग बाकीचे चार गडी १० धावात बाद झाले. ह्या दोन प्रसंगांनी माझ्या निराशेची परिसीमा गाठली होती.

हल्ली खूप त्रास होतो पण त्या मनःस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो. त्यासाठी मी वापरत असलेले उपाय थोडेसे टोकाचे असतात, पण ते मला उपयोगी पडतात. पहिला मार्ग म्हणजे देवाने आपल्याला आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी दिल्या आहेत त्या गोष्टींचे स्मरण करणे आणि ह्या पराभवानंतर सुद्धा त्या गोष्टी आपल्यापासून कोणी हिरावून घेणार नाही याची स्वतःला आठवण करून देणे. दुसरा मार्ग म्हणजे किशोरकुमारची ७० च्या सुमारातील गाणी लावून ऐकणे. तिसरा मार्ग म्हणजे कार्यालयातील किचकट कामाची स्वतःला आठवण करून देणे. अशा गोष्टींचा विचार करता करता पराभवाची तीव्रता थोडी कमी होते. मग मी साखळीचा गुण तक्ता घेवून बसतो आणि अजून सुद्धा भारत कसा उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरू शकतो ह्याचे गणित मांडू लागतो.

अशा पराभवानंतर मी दोन गोष्टी टाळतो आणि त्या म्हणजे थिल्लर हिंदी बातमी वाहिन्या आणि दुसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रातील क्रीडा सदर. हल्ली प्रत्येकजण समीक्षक बनला आहे. मी सुद्धा समीक्षा करतो परंतु मी मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंची क्षमता, कप्तानाला निर्णय घेण्याचे असलेले स्वातंत्र्य याचा आदर करतो. ८५ च्या batch बरोबर झालेल्या ८ षटकाच्या सामन्यानंतर प्रत्यक्ष सामना खेळणे आणि बाहेरून टीका करणे यातील जमीन आसमानाचा फरक मला जाणवला.

असो ह्या निराशेच्या परीसीमेवरून आठवले की आपण निराश झालो हे स्वतःशी किंवा जवळच्या कोणाशी तरी मान्य करणे ही निराशेतून बाहेर पडण्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. हल्लीच्या जगात बरेचजण आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले पण यातील एक तरी पूर्णपणे सुखी झाला का? बहुतांशी सर्वांना कोणत्या तरी चिंतेने, निराशेने ग्रासलेले आहे. आपण जर दुसर्या एखाद्याच्या परिस्थितीशी स्वतःशी तुलना करून जर निराश होत असाल तर नीट लक्षात ठेवा, त्या व्यक्तीच्या निराशा तुम्हाला माहीत नाहीयेत. योग्य मार्गाने निराशेवर मात करा आणि आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे उघड्या डोळ्यांनी बघा, चांगल्या गोष्टींचे महत्व त्या आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावर कळल्या अशी वेळ येवून देवू नका!

Sunday, March 6, 2011

Switching techniques आणि बहुरूपी



कार्यालयात काम करताना एखादी उच्चपदस्थ व्यक्ती वेगवेगळ्या भूमिका बजावत असते. ह्या प्रत्येक भूमिकेच्या गरजा वेगवेगळ्या असतात. कधी कधी मला असे वाटते की अशा एकच व्यक्तीच्या आत त्याच माणसाची अनेक रूपे दडलेली असतात आणि भूमिकेनुसार ती व्यक्ती आपले योग्य रूप बाहेर काढत असते.
आता रूप म्हणजे काय?
प्रत्येक भूमिकेनुसार त्या व्यक्तीला आपल्या मेंदूतील आवश्यक माहितीचा साठा access करावा लागतो.
त्या भूमिकेत ज्या व्यक्तींशी संपर्क साधावा लागतो त्या व्यक्तीविषयीची माहिती ताजी करावी लागते
आणि त्या त्या प्रसंगानुसार योग्य धोरण स्वीकारावे लागते.
जसे जसे जबाबदारीच्या शिडीवर वर जात जावे, तसतसे व्यक्तीला वठवाव्या लागणाऱ्या रूपांची संख्या आणि वारंवारता वाढत जाते. त्यामुळे एका रूपांतून दुसर्या रुपात शिरण्यासाठी मिळणारा वेळ जवळजवळ शून्यावर येतो. ह्या प्रत्येक स्थित्यंतरात ह्या बहुरूप्याची शक्ती त्याच्या नकळत कामी येत असते.
दिवसाअखेरी हा बहुरूपी एका वेगळ्या प्रकारच्या रूपांच्या पोतडीला सामोरा जाणारा असतो, ती असतात आदर्श पालकाची, सह्चार्याची! बहुरूप्याची ह्या वेगवेगळ्या रूपांमधील तारेवरची कसरत त्याच्या मनाच्या एका कोपर्यात बसून शांतपणे पाहत असतो बालपणाचा बहुरूपी! बहुरुप्याला माझे एकच सांगणे, ह्या बाल बहुरुप्याला जिवंत ठेव रे बाबा!

प्रगल्भता


आता पर्यंतचे ब्लॉग आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचता वाचता एक अस्पष्टशी शंका मनात डोकावून गेली. माझी मते एका विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधित्व करतात काय? आधींच्या पिढ्यांनी शेतीचा व्यवसाय केला. शिक्षणाचा आमच्या कुटुंबातील म्हणण्याजोगा प्रवेश वडीलांच्या पिढीपासूनचा! शिक्षण क्षेत्रातील माझी ही दुसरी पिढी. व्यावसायिक क्षेत्रातील मुरब्बीपणा अजून अंगात न भिनलेला. प्रत्येक माणसाला काही स्वभाववैशिष्ट्य अनुवांशिकरित्या मिळतात, माझी ही अनुवांशिकरित्या मिळालेली स्वभाववैशिष्ट्य ज्ञानाच्या ह्या सामर्थ्याने भारावून गेली. मला आलेले हे ज्ञानाच्या सामर्थ्यांचे हे अनुभव कुणाबरोबर तरी वाटून घ्यावेत असे मला वाटले आणि मी ब्लॉग लिहण्यास सुरुवात केली. ह्यातील कित्येक अनुभव साधे साधे, पण माझ्या ज्ञानक्षेत्रातील प्रगल्भतेच्या प्राथमिक पातळीमुळे मला त्यावर सुद्धा लिहावयास वाटले.
दुसरा एखाद्या ज्ञानक्षेत्रातील प्रगल्भ झालेल्या एखाद्या व्यक्तीचे उदाहरण घेतले तर तो ह्या विषयांवर लिहिणार सुद्धा नाही कारण ते विषय त्याच्या दृष्टीने एकदम प्राथमिक पातळीवरचे असतील. ती व्यक्ती आपली उर्जा, शक्ती एखाद्या अधिक प्रगत विचारांवर खर्च करेल.
हा साक्षात्कार झाल्यावर मला जरा बरे वाटले. एकंदरीत मोठ्या चित्रात आपला ब्लॉग कोठे बसतो हे समजल्याचे समाधान लाभले!

Saturday, February 26, 2011

भावना आणि व्यवहार



मनुष्यजातीचा भावना आणि व्यवहार यातील संघर्ष पुरातन कालापासून चालू असावा अशी माझी समजूत आहे. हल्लीच्या काळात मात्र हा संघर्ष थोडा तीव्र झाला इतकेच. प्रत्येकजण आपापल्या परीने ह्या दोघांत समन्वय साधायचा प्रयत्न करतो. मनुष्याच्या भावना त्याचे जन्मस्थळ, जवळचे नातेवाईक, मित्र यांच्याशी निगडीत तर व्यवहार हा पैसा, नोकरी आणि जीवनाच्या संघर्षाशी संबंधित! काही उदाहरणे तात्कालिक पातळीवरची तर काही उदाहरणे आयुष्यातील मोठमोठे निर्णय घेतानाची!

उदाहरणे द्यायची तर कित्येक, आपल्या मातापित्यांना सोडून नोकरीनिमित्त परदेशी निघालेलं अपत्य, वार्षिक APPRAISAL च्या वेळी होणारी संवेदनशील व्यवस्थापकाची स्थिती. काही भोळीभाबडी माणसे हा संघर्ष सुप्रसिद्ध लोकांपर्यंत नेवून ठेवतात. पहिल्या IPL च्या वेळी मुंबई इंडिअन संघात सचिनने विनोद कांबळीला संघात घेण्यासाठी वजन टाकावे, बोरिस बेकार आणि स्टेफी ग्राफ यांचा विवाह व्हावा ही मराठी माणसाची भावनात्मक होऊन पाहिलेली स्वप्ने.

ह्या संघर्षाला सामोरे जाण्याची तंत्रेसुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी. व्यवहाराच्या बाजूने निर्णय घेताना परिस्थितीला दोष देणे हे एक नेहमीचे तंत्र. या जागी मी नसतो आणि दुसरा कोणी जरी असता तरी त्याला सुद्धा हाच निर्णय घ्यावा लागला असता असे स्पष्टीकरण देणे हा सर्वात सोपा उपाय. काही माणसांना मात्र आयुष्यात कधी व्यवहार जमत नाही आणि व्यवहार न जमल्याची त्यांना खंतही नसते. 'दिल का राजा' असलेली अशी लोकं आपल्या मर्जीने आयुष्य जगात असतात. 3 Idiot मधला आमीर खान हे त्याचे उदाहरण. काही उच्च पदावरील माणसांचा एक गुण मात्र वाखाणण्याजोगा आणि तो म्हणजे 'switching technique'. एक काम झाल्यावर त्यातील आपल्या भावना, विचार तत्काळ बंद करून लगेच नवीन कामाच्या भावना, विचार मनात आणायचे हे ते तंत्र. त्या विषयी पुढे कधी तरी!

Friday, February 25, 2011

वटवृक्ष



वसईत आणि एकंदरीत आमच्या समाजात वावरताना अनेक एकत्र कुटुंबांना जवळून पाहण्याचा योग आला. एकत्र कुटुंबाचा चेहरा म्हणजे त्या कुटुंबातील कर्ता पुरुष! ह्या कर्त्या पुरुषावर कुटुंबांची वाटचाल अवलंबून असायची. असायची म्हणायचे कारण म्हणजे आता एकत्र कुटुंब ही संस्था जवळपास नामशेष झाली आहे. हा कर्ता माणूस कुटुंबातील बर्याच गोष्टींवर आपले नियंत्रण ठेवू शकत असे.

ह्यात दोन प्रकारची कुटुंबे पाहण्यात आली. पहिल्या प्रकारात हा कर्ता माणूस समाजात प्रतिष्ठा प्राप्त केलेला असे. समाजातील बर्याच लोकांची ह्या घरी उठबस असे. एकंदरीत हे कुटुंब आणि घर ह्या कर्त्या माणसाच्या कर्तुत्वाने भारावून गेले असे. टोकाची भूमिका घेत मी ह्या माणसांना स्वतःच्या प्रेमात पडलेली माणसे असे म्हणतो. ह्याचा एक परिणाम कुटुंबातील बाकीच्या सदस्यांवर होत असे. ह्या कुटुंब प्रमुखाची मुले, भाऊ ह्यांच्या व्यक्तीमत्वाची वाढ काहीशी खुरटली जात असे.

दुसर्या प्रकारात कर्ता माणूस हा सामान्य वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा असे. ह्या माणसाने आपले आयुष्य एका धोपटमार्गाने जगलेले असते. पापभीरू असा हा माणूस पहिल्या प्रकारातील व्यक्तींच्या कामगिरीने भारावून गेलेला असे. आपल्याला न गाठता आलेली यशाची शिखरे आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या रूपाने गाठण्यासाठी जीवनात वाटेल तितका त्याग करण्याची त्याची तयारी असे.

अर्थात ह्या दोन टोकाच्या उदाहरणामध्ये मधल्या बर्याच छटा आहेत. आज एकत्र कुटुंब नाहीत. छोट्या कुटुंबात नवरा बायकोला विविध भूमिका निभावाव्या लागतात. ह्यातून एकाच मुद्दा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे आयुष्यात कोणत्या क्षणी तुमची PRIORITY ही तुमच्या स्वतःच्या कार्य क्षेत्राकडून निघून तुमच्या मुलांच्या शिक्षणावर, त्यांच्या सर्वागीण विकासावर येवून स्थिरावते. हा क्षण ओळखणे आणि तो पकडणे फार महत्वाचे असते. परंतु ह्या क्षण ठरविण्याचे प्रत्येकाचे मापदंड वेगवेगळे हे मात्र लक्षात येते!

Friday, February 18, 2011

आयुष्य



जगाच्या पाठीवर अनेक बहुरंगी बहुढंगी घटना घडत असतात. त्यातील काही आपल्या वाट्याला येतात. आपापल्या स्वभावानुसार आपण या घटनांचे विश्लेषण करतो आणि या अनुभवानुसार पुढे असे झाले तर काय करावे म्हणून उपाययोजना करतो.

आपल्या आयुष्याचे ढोबळमानाने दोन भाग मानता येतील. एक भाग जो आपण नियंत्रित करू शकतो असा आणि दुसरा म्हणजे ज्या भागावर आपले काही नियंत्रण नसते तसा. ह्या भागांची टक्केवारी वगैरे करण्याच्या फंदात पडण्याचा काही उपयोग नाही. नियंत्रण नसणाऱ्या भागांची उदाहरणे म्हणजे आजार, अपघात आणि आजच्या युगात काही प्रमाणात नाती. हाच भाग अगदी टोकाला खेचायचा झाला तर आपल्या घरावर विमान कोसळू शकते, पृथ्वीवर एक मोठी शीला कोसळून पृथ्वी नाश पावू शकते किंवा सर्व पृथ्वी कृष्णविवरात खेचली जाऊ शकते.

आयुष्याच्या बर्याच कालावधीत आपण नियंत्रित करू शकणार्या भागाशी सामना करत असतो. दुसरा भाग प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात अनुभवावा लागतो. परंतु ह्या भागाची क्षमता मात्र पहिल्या भागाचे आपले विश्व पूर्ण व्यापून टाकण्याची असते.

दैनंदिन जीवनातील आपला संघर्ष पहिल्या भागासाठीचा असतो. अधिकाधिक मेहनत करून बर्या वाईट मार्गाने ह्या भागावर आपण नियंत्रण आणू पाहतो. थोडक्यात म्हणायचे झाले तर आपणाजवळील संपत्ती ह्या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपणास मदत करते. समजा अंबानी बंधूचे उदाहरण घेतले तर त्यांचा ह्या भागावर पूर्ण ताबा असतो.

काही जणांना बर्याच वेळा असे वाटते की आपण पहिल्या भागाच्या जोरावर दुसर्या भागावर सुद्धा नियंत्रण करू शकतो. लहानपणी वाचलेली एका राजाची गोष्ट, त्याला ज्योतिष्याने सांगितले की पाच दिवसाच्या आत तुला सर्पदंशाने मृत्यू येणार. तो बिचारा स्वतःला राजवाड्यात कडेकोट बंदोबस्तात ठेवतो. शेवटच्या दिवशी मात्र फळातून एक कीड निघून तिचे सापात रुपांतर होऊन तो राजाला दंश करतो आणि राजा मरतो. आता समजा हीच गोष्ट दररोज शेतात काम करून भाकरी मिळवणाऱ्या शेतकर्याची असती तर? तो बिचारा पाच दिवस स्वतःला बंद करून तर घेवू शकत नाही?

दुसर्या भागाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. काहीजण आस्तिक बनून दैवी शक्तीचा ह्या भागातील हस्तक्षेप अपेक्षितात. काही जण मात्र ह्या भागावर काही केल्या नियंत्रण करता येत नसल्याने आला क्षण मजेत जगावा अशा वृत्तीचे असतात.

लिहिता लिहिता असे जाणवले की काही गोष्टी मात्र ह्या दोन्ही भागांना समाविष्ट करतात. आपली मुलं पुढे काय करणार, कसे नागरिक बनणार? ही बाब म्हटली तर काही प्रमाणात आपल्या हातातली तर काही प्रमाणात आपल्या हाताबाहेरील. अशी अजून काही उदाहरणे असतील

दीपकने ह्या ब्लॉगची स्थापना करून १७ फेब्रुवारीला एक वर्ष झाले. एका वर्षात ७८ ब्लॉग! Not Bad at all!

Tuesday, February 15, 2011

चौथी पास


गेल्या महिन्यात आम्ही सर्व नातेवाईक अलिबाग जवळील आक्शी येथे एका वीकएंडला गेलो होतो. नातेवाईक म्हणजे माझ्या सर्व चुलत, आत्ये भाऊ आणि बहिणी, आणि त्यांची कुटुंबे! माझा मोठा भाऊ आणि आत्येभाऊ कार्यबाहुल्यामुळे येवू न शकल्याने मी एकटा भाऊ आणि बाकी सर्व बहिणी आणि त्यांचे यजमान अशी परिस्थिती उदभवली. धाकटी चुलत बहिण पंचविशीतील तर मोठीने नुकतीच पन्नाशी गाठलेली.

रविवारी सकाळी नास्ता करताना कशावरून तरी आजच्या बिकट कौटुंबिक परिस्थितीचा विषय निघाला. चर्चेला मजेशीर वळण देण्यासाठी मी विधान केले की यावर उपाय म्हणून मी एका नवीन संस्थेची स्थापना करीत आहे. चौथी पास झालेल्या मुलींना यात प्रवेश दिला जाईल. त्यांना पुढील १०- ११ वर्षे भारतीय संस्कृती, संस्कृत भाषा, पारंपारिक पद्धतीचे जेवण याबरोबर आधुनिक जगाचेही शिक्षण दिले जाईल. मोठ्यांशी कसे वागावे हे ही त्यांना शिकवले जाईल. २१- २२ व्या वर्षी या संस्थेतून बाहेर पडलेल्या मुली एक आदर्श पत्नी म्हणून संसार करण्यासाठी सज्ज असतील आणि उच्च विद्याविभूषित मुलांचे आई वडील त्यांना सून बनविण्यासाठी संस्थेच्या दारापुढे रांग लावतील. मी हे विधान करताच माझ्या लहान चुलत बहिणींनी माझ्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला, कर्मठ, बुरसटलेल्या विचाराचा म्हणून माझी बोळवण केली.

ह्या हल्ल्यामुळे हतबल होऊन मी माझ्या संस्थेची घोषणा माघारी घेणार इतक्यात माझ्या दोन ज्येष्ठ भगिनी माझ्या मदतीला धावून आल्या. त्यांची मुले आता २३- २४ वर्षांची आहेत. त्या म्हणाल्या की आम्ही मात्र आदुच्या संस्थेपुढे रांग लावू. त्या दोघींच्या यजमानांनी त्यांना पाठींबा दर्शविला. त्यानंतर मात्र माझ्या धाकट्या बहिणींनी माझ्या मुलावर लक्ष केंद्रित करीत तुला तुझे बाबा चौथी पास बायको करून देतील असा नारा चालू केला.

वर वर मजेत चालू झालेल्या ह्या विषयावर काही वेळानंतर माझ्या दोन ज्येष्ठ भगिनी गंभीर चर्चा करताना मला दिसल्या!

(Disclaimer - या लेखातील विचार हे केवळ एक विचार म्हणून पाहावेत. त्यावरून लेखकाच्या मनोवृत्तीचा निष्कर्ष काढण्याचे प्रयत्न करू नयेत ही विनंती! )

Friday, February 4, 2011

संघर्ष


हल्ली बरेचजण भ्रष्ट्राचाराविरुद्ध बोलत असतात, राजकारणी लोक कसे देशाचे नुकसान करीत आहेत याविषयी तळमळीने बोलत असतात. अर्थात याला मीही अपवाद नाही. प्रश्न अशा आहे की हा संघर्ष लढायचा तर आपला शत्रू कोण आहे हे प्रथम ओळखणे आवश्यक आहे. नाहीतर मूळ कारण सोडून आपण फक्त त्या कारणाच्या परिणामांशी (outputs) लढत बसू आणि मूळ कारण मात्र तसेच राहील.

राजकारणी लोक किंवा भ्रष्ट लोक आले कोठून? ते तर आले आपल्यातून. ते आपले प्रतिनिधी. भ्रष्ट वृत्ती ही आपल्यातील प्रातिनिधिक लोकांची वृत्ती. मग अर्थात ती आपल्यात सुद्धा असणार. या भ्रष्ट वृत्तीचे कारण काय? तर समाजात मानाचे स्थान मिळविण्याचा अट्टाहास. येन केन प्रकारे मी समाजात प्रतिष्ठित बनणार ही प्रत्येकाच्या मनातील इच्छा! आता यासाठी मी प्रत्येक व्यक्तीला सुद्धा दोष देणार नाही. समाजात दोन प्रकारचे लोक. एक आधीच प्रतिष्ठित घरातून आलेले आणि दुसर्यांच्या घराणे आता पर्यंत प्रतिष्ठा न पाहिलेली. प्रतिष्ठित घरातून आलेल्या माणसांच्या गुणसूत्रात आपली प्रतिष्ठा टिकविण्याची सुप्त इच्छा तर अप्रतिष्ठित घरातून आलेल्या व्यक्ती मध्ये आतापर्यंत राहून गेलेला मान मिळविण्याची तीव्र धडपड! हा संघर्ष तर पूर्वीपासून असणार. परंतु पूर्वी सामान्य लोकांच्यात प्रारब्ध स्वीकारण्याची प्रवृत्ती होती, आज त्यांनी प्रारब्धाला झुगारून दिले आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे प्रयत्नवादी बनणे ही, परंतु त्यात आपला मार्ग कोणता याचे सारासार भान असणे आवश्यक आहे.

थोडक्यात भान ठेवा की भ्रष्ट्राचाराचा लढा आहे तो आपल्यातील वृत्तीशी, कोण्या एका व्यक्तीशी नव्हे! आणि म्हणूनच हा संघर्ष मोठा कठीण आहे. बाह्य शत्रूपेक्षा अंतर्गत शत्रूशी संघर्ष केव्हाही कठीणच असतो!

Sunday, January 9, 2011

To Do List

२०११ सालच्या सर्वांना शुभेच्छा!

कार्यालयीन काम करताना एक सवय लागून गेली, ती म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्यासमोर असलेल्या कामाची यादी बनविणे. दररोज काम सुरु करण्याआधी या यादीकडे लक्ष द्यायचे. त्यातील कामांना प्राधान्य प्रदान करून त्यानुसार ही कामे पार पडण्याचा प्रयत्न करायचा. कामकाजाची वेळ संपली की या यादीतील अपूर्ण कामांकडे नजर फिरवायची आणि मग ती कामे दुसर्या दिवशी पुढे ढकलता येतील की नाही याचा निर्णय घ्यायचा, काही न ढकलता येण्याजोगी कामे असल्यास कार्यालयात थांबायचे किंवा घरी काम घेवून यायचे. कार्यालय आणि घरगुती आयुष्य यात समन्वय साधायचा प्रयत्न करायचा. यात कौशल्याच्या दोन गोष्टी, १> समोरील बर्याच कामांना योग्य प्राधान्य प्रदान करणे २> दिवस अखेरीस कोठे थांबायचे याचा निर्णय घेणे.

हीच बाब काही प्रमाणात मग घरी लागू होते. बाजारात जाताना भाज्यांची यादी बनविणे आणि बरेच काही..असेच आयुष्य पुढे जात राहते, दिवस, महिने, वर्ष भराभर निघून जातात.

कधीतरी या जीवनातून फुरसतीचा क्षण मिळतो. मग डोळ्यासमोर येते ती आयुष्यातील 'TO DO LIST' . ही बहुदा मनातच असते. यात असतात आपली काही स्वप्ने, एका निर्मनुष्य जागी जावून निसर्गाच्या सानिध्यात राहायचे वेड, कोणाला सांगायच्या राहून गेलेल्या काही गोष्टी आणि बरेच काही. परंतु इथे मात्र ही कामे पार पाडण्यासाठी दुसरा दिवस येणार नसतो, ही 'TO DO LIST' carry forward करण्यासाठी नसते. पण इथेही वरती नमूद केलेल्या कौशल्याच्या दोन गोष्टी लागू होतात. १> आयुष्यातील कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे आणि २> दैनंदिन 'To Do List' मध्ये कोठे थांबून केव्हा ह्या मनातील 'To Do List' च्या हाकेला साद द्यायची!

आहे का अशी तुमची 'To Do List'?