Friday, April 20, 2012

Level1, Level2...

 


गेल्या महिन्याभरातील या काही घटना! म्हणायला गेलं तर असंबंधित पण अचानक त्यात काहीतरी समान सूत्र असल्याची जाणीव झाली.
  1. महाबळेश्वरला जाताना वाईपर्यंतचा सपाट भूभागावरील प्रवास आणि मग माथ्यावर घेवून जाणारा चढणीचा, वळणावळणाचा रस्ता.
  2. कंपनीने एका शैक्षणिक सत्राला पाठविले. विषय होता नेतृत्वमार्गातील विविध टप्पे आणि त्यातील वळणे
  3. गेल्या आठवड्यात काहीश्या चिंतीत स्वरात पत्नी म्हणाली, हल्ली सोहम कसा बदललाय, शाळेतून आल्याआल्या न सांगता अभ्यासाला बसला आणि रात्री शेवटी त्याला सांगावे लागले की बस झाले आता, राहिला असेल तर उद्या पूर्ण कर. सोहमचा अल्लडपणा संपण्याची प्रक्रिया सुरु झाली की काय हे तिच्या चिंतेचे मुख्य कारण होते.
अजून थोडा मागे गेलो. सोहमला संगणकीय खेळांनी झपाटून टाकले होते. Level1, Level2 ची संकल्पना त्याला भारी आवडली, संगणकावरून जबरदस्तीने उठवल्यावर गडी खेळण्यातील गाड्या घेवून शर्यतीचा रस्ता बनवे आणि मग त्यात अडथळ्याचे प्रमाण वाढवीत नेत त्याचे level1 , level2 चे पुराण पुन्हा चालू होई.
आयुष्याचा प्रवासही काहीसा असाच. कधी सपाट भूप्रदेशावरील प्रवासासारखा, एका दिशेतील, न चढणीचा, एका वेगाचा, तर कधी शिखरमाथ्यावर घेवून जाणार्या चढणीच्या रस्त्याप्रमाणे वळणावळणाचा! ह्या प्रवासात येतात ते मैलाचे दगड. शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, अभियांत्रिकी शाखेची निवड, नोकरीसाठी योग्य अशा क्षेत्राची निवड, व्यावसायिक जीवनातील विविध टप्पे, जीवनसाथीची निवड ही काही महत्वाच्या टप्प्यांची उदाहरणे. आता ह्या प्रत्येक milestone बरोबर आपली जीवनातील भूमिका आणि तिच्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदार्या बदलत जातात. Level बदलते.
आता त्या शैक्षणिक सत्रातील महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तिथे नेतृत्वामार्गातील विविध स्थितींची ओळख करून देण्यात आली होती. एका स्थितीतून दुसर्या स्थितीत होणारे संक्रमण हे एक वळण घेवून येत. ह्या वळणानंतर जबाबदार्यांची क्लिष्टता वाढते, त्यांचे स्वरूप बदलते. आता मुख्य आव्हान हे असते की, ह्या बदललेल्या जबाबदार्या नक्की काय हे बर्याच वेळा लिखित स्वरूपात उपलब्ध नसते. प्रत्येकजण आपापल्या अकलेनुसार ह्या जबाबदार्या आणि त्याबरोबर येणाऱ्या अपेक्षा पुर्या करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळी आपल्यात भिनलेल्या आधीच्या भूमिकेच्या मनोवृत्तीला झटकून टाकायचा प्रयत्न करतो. काही जण यशस्वी होतात तर काही जणांना हे जमत नाही. जितक्या उंच जावून तुम्ही कोसळाल तितक्या गंभीर स्वरूपाचे परिणाम भोगावे लागतात.
यातला एक मुद्दा माझ्या मनाला भिडला. आपल्यात भिनलेली आधीच्या भूमिकेतील मनोवृत्ती! हा मुद्दा किती योग्य आहे. ह्या मनोवृत्तीचा आवश्यक नसलेला भाग तुम्ही किती लवकर आणि केवढ्या प्रमाणात झटकून टाकू शकता ह्यावर तुमचे पुढील भूमिकेतील यश अवलंबून असते. आपल्या मुलाला तुम्ही शिशुवर्गात असताना जसं शिकविता त्या पद्धतीत आणि तो तिसरीत गेल्यावर शिकविण्याच्या पद्धतीत बदल व्हायला हवा. विशीमध्ये असताना न पटलेल्या गोष्टीविषयीची तुमची प्रतिक्रिया देण्याची पद्धत आणि तीशीमधील पद्धत आपसूक बदलते, कारण level बदलली असते. आपल्या पूर्वजांनी किती सोप्या पद्धतीने चार आश्रमांची व्याख्या ठरवल्या होत्या. एका प्रकारच्या level च होय. आज मात्र आपण किती level ठरवायच्या आणि त्यातल्या किती आणि कधी पार करायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न!

Saturday, April 14, 2012

अवती भोवती


मध्यंतरी १४- १५ वर्षांच्या वयोगटातील मुलांच्या दोन बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या. एक आत्महत्येविषयी आणि दुसरी या वयोगटातील मुलांनी अपहरण करून हत्या केलेल्या एका मुलाविषयी. संवेदनशील समाजाला अस्वस्थ करणाऱ्या ह्या बातम्या. त्या हल्ली आपणास अस्वस्थ करीत नाहीत त्याची कारणे वेगळी. माणूस / समाज जसजसा प्रगत होत जातो तसतसे आपल्याभोवती सुरक्षित कुंपणे घालून घेतो. ह्या कुंपणांची सीमा आर्थिक प्रगतीच्या प्रमाणाशी समप्रमाणात धावते. स्वतःच्या सदनिकेत अतिसुंदर सजावट करण्यापासून सुरुवात करून, स्वतःचा बंगला, बाग, कुंपण त्यानंतर अशा देखण्या बंगल्याचे संकुल असे टप्पे गाठत ही वृत्ती कधी कधी एखाद्या देशाच्या मनोवृत्तीत उतरते. जगात काहीही होवो पण माझ्या सुरक्षित कुंपणात जो पर्यंत काही होत नाही तो पर्यंत मला देणेघेणे नाही अशी ही वृत्ती. आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या पायऱ्या ओलांडणारे आपण कधी ह्या मनोवृत्तीचे बळी बनतो हे आपणास कळत नाही.

विषयांतर बाजूला ठेवून मूळ मुद्द्याकडे आता वळतो. १४ - १५ वर्षांची मुले म्हणजे वैचारिक परिपक्वतेच्या मार्गावर अर्धा-अधिक प्रवास केलेली मनुषावस्था! वैचारिक परिपक्वता किती गाठली आहे हे मुलाच्या मुळच्या क्षमतेवर आणि त्याचावर झालेल्या संस्कारावर अवलंबून असते. आपल्या अपत्याच्या मनात असणार सर्वात प्रभावी विचार ओळखण्याची इच्छा आणि क्षमता किती पालकांमध्ये असते हा महत्त्वाचा मुद्दा. समजा इच्छा आणि क्षमता दोन्ही असतील तर हा जो विचार आपल्या अपत्याच्या मनात घोळत आहे तो योग्य आहे का आणि नसल्यास त्याला योग्य वळण देण्याची जाणीव पालकांनी दाखवली पाहिजे. आता ही इच्छा असण्यानसण्याची कारणे पालकांचे स्वतःचे बालपण कसे गेले, पालकांना त्यांच्या जीवनसंघर्षाने कितपत व्यापून टाकले आहे आणि पालकांचे परस्परांमधील संबंध कसे आहेत यावर अवलंबून असू शकतात. क्षमतेमध्ये मुख्य मुद्दा येतो तो पालकांनी गाठलेल्या प्रगल्भतेचा! काही व्यक्तींमध्ये आपण आता पालक बनलो; आता आपल्या वागण्यात थोडाफार बदल करायला हवा हे समजण्याची प्रगल्भता कधीच येत नाही. ह्या वरील कारणांमुळे पालक आणि अपत्य ह्यांच्यातील संवाद कधी प्रगतावस्था गाठतच नाही. बदलेल्या काळामुळे एक गोष्ट झाली आहे. जर तुम्ही मुलांशी मित्रत्वाच्या नात्याने संवाद साधला नाही तर ती केव्हाच तुमच्याशी मोकळेपणाने बोलणार नाहीत. हाच अनुभव कार्यालयात येतो, व्यवस्थापक आणि कर्मचारी ह्यांच्यातील नाते हे सुद्धा बदलत्या काळानुसार मित्रत्वाचे झाले तरच यशस्वी होवू शकते. पालक आणि अपत्य हा जर संवाद खुरटला तर मुले बाहेरील व्यक्तीशी आपले मन मोकळे करतात आणि ह्या बाहेरील व्यक्ती मग त्यांची मते प्रभावीत करू शकतात.

इथे अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो. पालकत्वाची पूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा आणि क्षमता असलेल्या पालकांकडे मुलांच्या सुखी भविष्यासाठी दोन पर्याय असतात.

१> मुलांसाठी गडगंज संपत्ती निर्माण करून ठेवणे.

२> मुलाला एक सुजाण नागरिक बनविणे.

मागील मध्यमवर्गीय पिढीने दुसरा मार्ग स्वीकारला. आजच्या काही पालकांमध्ये पहिला मार्ग स्वीकारण्याची इच्छा दिसून येते. ते जसे चुकीचे तसेच केवळ दुसरा मार्ग स्वीकारणे हे पुरेसे नाही याचे भान असणेही महत्वाचे!

आत्महत्या

ह्या प्रकारचे दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल.

१> प्रसार माध्यमातील एखाद्या बातमीचे / दृश्याचे त्याच्या परिणामाची जाणीव नसल्याने केलेले अंधानुकरण. ह्या मध्ये स्वतःची उपेक्षा झाल्याने लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न असू शकतो.

२> जीवनरुपी ग्रंथातील अगाध अनुभवाची जाणीव नसल्याने त्यातील केवळ एक दोन क्लेशदायक पाने समोर आल्याने निराश होवून आत्महत्या. ह्या प्रकारात एकदम सुखवस्तू घरातील मुलेसुद्धा येवू शकतात, ज्यांना जीवनात कधी नकार, अपयश यांचा सामना करावाच लागला नसतो.

खंडणीसाठी अपहरण / हत्या

हा मनुष्यजातीतील निरागसतेचा अंत किती लवकर होवू लागला आहे त्याचे उदाहरण होय. समाजात, मित्रांच्या समूहात प्रतिष्ठा, मान्यता हवी असेल तर कमीत कमी मोबाईल, गाडी असणे आवश्यक आहे असा समज तरुण पिढीने करून घेतला आहे आणि ती काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे. योग्य मार्गाने ही तथाकथित प्रतिष्ठेची साधने मिळविण्याची सर्वांची क्षमता नसल्याने अस्वस्थतता निर्माण होवू शकते आणि त्याच्या जोडीला निरागसतेचा अंत आणि पालकांची संवादाचा अभाव असे घटक असल्यास खंडणीसाठी अपहरण/ हत्या अश्या टोकाच्या भूमिका घेतल्या जावू शकतात.

वरील दोन्ही प्रकारात प्रसारमाध्यमांच्या सुजाणतेचा अभाव हा मुद्दा प्रकर्षाने जाणवतो. इंग्रजीतील सध्याचे अग्रगण्य स्थान मिळवलेल्या आणि वैभवशाली इतिहास असलेल्या वृत्तपत्राचे सध्याचे स्वरूप, त्यातील बातम्या ह्या फिल्मी, गुन्हेगारी विश्वाला जास्त लक्ष प्राप्त करून देणाऱ्या अशा आहेत. पूर्वी सुजाण, सुशिक्षित लोकांनी प्रसारमाध्यमाद्वारे जनमतावर प्रभाव टाकला. आता काळ बदलला, मते मांडण्याचा अधिकार सर्वांना मिळाला, काहींनी तो आपल्या आर्थिक बळावर मिळविला. पण ह्या अयोग्य लोकांनी आपल्याभोवती अशुद्ध विचाराचा कलकलाट केला. प्रसार माध्यमात काम करताना सामाजिक बांधिलकीची जाणीव असणे आवश्यक असते हे समजण्यापलीकडे असणाऱ्या किंवा त्याची पर्वा नसणाऱ्या लोकांच्या हातात आज प्रसारमाध्यमे आहेत ही सत्यस्थिती आहे. आजच्या कलियुगात ह्या अशुद्ध विचारांचा प्रतिकार करू शकणारे समर्थ, परिपक्व विचारांचे चक्र आपल्या आणि समाजातील मुलांभोवती निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपल्या सुरक्षित कुंपणापलीकडे पडण्याची आपली तयारी हवी.


Sunday, April 1, 2012

क्षण ओळखावा क्षण अनुभवावा

क्षण अनुभवावा

क्षण आणि युग यांचे नाते तसे अतूट! एका क्षणाच्या सुखासाठी युगांची तपस्या लागते आणि एका क्षणाच्या चुकीची सजा युगोंयुगे भोगावी लागू शकते. मर्त्य मानवांच्या भाग्यात युगे पाहण्याचे लिहिले नाही तेव्हा त्यांनी क्षणांचे महात्म्य ओळखणे केव्हाही उचित!

आयुष्यात अविस्मरणीय असे क्षण वारंवार येत नाहीत. ज्यांच्या आयुष्यात असे क्षण कमी वेळा येतात तो दुर्दैवी परंतु त्याहून दुर्देवी तो ज्याला आयुष्यात आलेले असे अविस्मरणीय क्षण ओळखता / अनुभवता येत नाहीत. असे हे क्षण कोणते? ही प्रत्येकाची वेगवेगळी संकल्पना. 'दिल ही छोटासा, छोटीसी आशा' अशी परिस्थिती असल्यास, अविस्मरणीय क्षण वेगळे आणि 'ये दिल मांगे मोर' अशी परिस्थिती असल्यास असे क्षण वेगळे.

अगदी लहानपणापासून सुरुवात करायची झाली, तर मे महिन्यातील एकत्र कुटुंबात / मामाकडे घालविलेल्या सुट्ट्या, सकाळी उठून गोळा केलेले आंबे, शाळेतील स्पर्धेत पहिल्यांदा मिळालेले पारितोषक, सायकलवर तोल सांभाळता आलेला पहिला क्षण असे काही क्षण सांगता येतील. महाविद्यालयीन जीवनात ह्या क्षणांची परिसीमा अधिक व्यापक होते. आपल्या व्यावसायिक जीवनावर पकड मिळविणे हे प्राथमिक ध्येय बनते. त्यामुळे ११ -१२ मध्ये भौतिक, रसायन आणि गणित ह्या विषयात मिळविलेले उत्तम गुण हे अशा क्षणांचा भाग बनू शकतात. अशातच केव्हा एखादी आवडलेली मुलगी ज्यावेळी स्मितहास्य देते किंवा बोलते त्यावेळी तो ही एक महाअविस्मरणीय क्षण बनून जातो. पुढे पहिली नोकरी मिळते, त्यावेळी स्वअस्तित्वाला मिळालेली मान्यता त्या क्षणाला संस्मरणीय बनवितो. पुढे परदेश प्रवास, लग्न, नोकरीत बढती, अपत्याचे आगमन असे क्षण येत राहतात. पण मधल्या काळात जीवनसंघर्ष आपल्या ह्या क्षणांना उत्कटतेने अनुभवण्याच्या क्षमतेला काहीसे कमजोर बनवितो. आपण चिंतातूर जंतू बनून सदैव चिंताग्रस्त होवून राहतो आणि हे क्षण अनुभवण्याचे सुख गमावून बसतो.

कलाकार लोकांचे एक बरे असते. बर्याच वेळा त्यांना ब्रह्मानंदी टाळी लागते (आता हा शब्दप्रयोग मी योग्य अर्थाने वापरतो आहे की नाही याची मला खात्री नाही). त्यांच्यासाठी असे क्षण नक्कीच अविस्मरणीय असतात. एखाद्या खेळत देशाचे प्रतिनिधित्व ज्यांना करायला मिळते त्यांच्यासारखे भाग्यवान तेच. आणि आयुष्यात पहिल्यांदा देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा क्षण अविस्मरणीयच!

ह्याचा एक वेगळा पैलू देखील आहे. बेशिस्तीत वाढलेली गर्भश्रीमंत लोकांची मुले, आयुष्यात लहानपणीच यशाची परमोच्च शिखरे गाठलेले कलाकार, खेळाडू यांची मनःस्थिती काहीशी नाजूक बनते. यातील काही जण ह्या अविस्मरणीय क्षणाच्या, अलौकिक अनुभवांच्या वेगवेगळ्या चवींच्या शोधात नको त्या मार्गाला लागू शकतात.

जर आपण फार पुढचा विचार केला तर आयुष्याच्या सायंकाळी मागे वळून बघता आपल्याला हे क्षण नक्कीच आठवतील. त्यावेळी ही खंत वाटायला नको की मी हा क्षण गमावला.

म्हणूनच मी म्हणतो क्षण ओळखावा, क्षण अनुभवावा!