प्रत्येक व्यक्ती गुणवत्ता आणि कल यांचा बराच भाग जन्मतानाच घेवून येते. परंतु या दोन्ही बाबींचा काही भाग मात्र प्रयत्नपूर्वक जोपासला जावू शकतो.
प्रत्येक व्यक्तीची गुणवत्ता क्षेत्रानुसार बदलते. एखादी बुद्धिमान व्यक्ती अभ्यासक्षेत्रातील विविध विषयात वेगवेगळ्या प्रमाणात पारंगत असते.
एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात किती प्रमाणात यशस्वी होईल हे त्या व्यक्तीच्या त्या क्षेत्रातील गुणवत्तेवर अवलंबून असते. परंतु गुणवत्तेतील कमतरता काही प्रमाणात शिस्तीच्या आधारे भरून काढता येते. ज्या क्षेत्रात बर्याच संधी उपलब्ध असतात त्या क्षेत्रात शिस्तीच्या आधारे बरेचजण टिकून राहू शकतात. शिस्तीच्या जास्तीच आहारी गेल्यास त्या व्यक्तीची उरलीसुरली सर्जनशीलता संपुष्टात येण्याचा धोका संभवतो.
शिस्त म्हणजे काय? शिस्त म्हणजे आपल्या उद्दिष्टाची व्याख्या बनवून आपल्या समजुतीनुसार ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे वेळापत्रक बनवून न कंटाळता ते वेळापत्रक पाळणे. ह्या मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी, की प्रत्येक क्षेत्रातील शिस्तीची व्याख्या काळानुसार बदलत राहते. आणि शिस्तीवर विसंबून राहणाऱ्या व्यक्तीला शिस्तीची व्याख्या कालबाह्य होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
- प्रत्येक व्यक्तीची गुणवत्ता क्षेत्रानुसार बदलते. आपला कल लक्षात घेवून आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी ज्या भाग्यवान लोकांना मिळते त्यांची गुणवत्ता आपसूकच जोपासली जाते आणि असे लोक शिस्तीत राहण्याची शक्यता जास्त असते.
- मुद्दा १ च्या व्याख्येत बसणारे भाग्यवान लोक ह्या दुनियेत फार कमी आहेत.
- वरच्या समीकरणात पैसा हा दुष्ट घटक समाविष्ट केल्यास वरील लेखाचा बराच भाग निरर्थक ठरतो!