भूतलावर जन्माला येणारे प्रत्येक बालक बर्यापैकी निरागस असावे असा माझा समज आहे. ही बालके पूर्णपणे निरागस असावी असा पूर्वी समज होता पण काही कारणास्तव तो थोड्याफार प्रमाणात बदलला. असो, आपल्या आयुष्यातील विविध अनुभवामुळे ह्या बालकांची निरागसता हळूहळू लोप पावू लागते. आणि कालांतराने त्यांचे निगरगट्ट अशा प्रौढात रुपांतर होते.
निरागसतेचा लोप पावण्याची प्रक्रिया प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळ्या वेगाने होते. युद्धस्थिती, नैसर्गिक / कौटुंबिक आपत्ती, गरिबी ह्या प्रतिकूल घटकांचा ज्यांना बालपणी सामना करावा लागतो, अशा बालकांना वास्तवाचे भीषण चटके फार लवकर बसतात. आणि त्यांची निरागसता लोप पावते. मध्यमवर्गीय बालके बर्याचश्या प्रमाणात आपली निरागसता शालेय जीवनात टिकवून ठेवतात किंवा ठेवायची. आपल्याला हवी ती गोष्ट रडल्याशिवाय मिळत नाही हे ज्यावेळी नवजात शिशूला कळते त्यावेळी त्याच्या १०० % निरागसतेला थोडा तडा जातो. आणि मग जीवनाच्या एका टप्प्यावर आर्थिक कमाई करण्याचे दायित्व ज्यावेळी ह्या मध्यमवर्गीय तरुणावर येऊन पडते आणि आपल्या असलेल्या मर्यादांची त्याला जाणीव होते त्यावेळी हा युवक निरागसता विसरतो. गर्भश्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या बालकास ज्यावेळी स्वतःला वारसाहक्काने मिळालेल्या सामर्थ्याची जाणीव होते त्यावेळी त्याची निरागसता मग्रुरीत परिवर्तीत होण्याची शक्यता असते. पालकांचे योग्य संस्कार ह्या गोष्टीस परावृत्त करू शकतात.
आजी आजोबा नातवंडांची निरागसता जास्त काळ टिकवून ठेवण्याचे काम करतात पण त्यासाठी त्यांना नातवंडासमवेत वेळ मिळावयास हवा. निरागसतेच्या बाबतीत माझी काही निरीक्षणे आहेत. एकदा का निरागसता गेली की ती त्या जन्मात बहुदा परत मिळविता येत नाही. मागच्या ब्लॉगमध्ये मी आपल्या मागील विश्वातील स्वतःचा शोध घेण्याच्या अयशस्वी प्रयत्नाविषयी लिहिले होते. बहुधा हा शोध आपल्या हरविलेल्या निरागसतेचा असतो आणि त्यामुळेच तो असफल होतो. ह्याला अपवाद काही जणांचा, जे आपली निरागसता आयुष्याच्या संध्याकाळी परत मिळवितात. निरागसतेच्या विरुद्ध धूर्तता. ही का एकदा एखाद्या व्यक्तीत शिरली की त्याच्या पुढच्या पिढीमध्ये ही कायम वास्तव्य करून राहते आणि त्यामुळे पुढील पिढ्या पुन्हा कधीच पूर्णपणे निरागस होवू शकत नाहीत.
समाजाची निरागसता ही एक पुढील पायरी. सध्या आपण समाजाच्या पातळीवरील निरागसता झपाट्याने गमावत चाललो आहोत. आतापर्यंत सामाजिक निरागसतेचे दायित्व ज्यांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलले ती ज्येष्ठ नागरिकांची पिढी तंत्रज्ञानांच्या आलेल्या सुनामीने आपला आत्मविश्वास गमावून बसली आहे.
बर्याच वेळा मला असे वाटत असते की ही पृथ्वी आणि त्यावरील आपली मनुष्यजमात हा एक कोणी तरी मांडलेला खेळ आहे. आपल्या मनातील विचार, आपली धडपड यावर जरी आपणास आपले स्वतःचे नियंत्रण वाटत असले तरी तसे नाहीय. ह्या मनुष्यजातीचा आणि त्या जातीच्या निरागसतेच्या लोपाचा मार्ग आधीच कोणी आखून ठेवला आहे आणि त्या आखलेल्या मार्गावर आपली वाटचाल चालू आहे.