आपण अधूनमधून काहीजणांच्या चांगुलपणाविषयी बोलत असतो. तो माणूस तसा भला आहे / चांगला आहे वगैरे वगैरे..तसं बघायला गेलं तर दुसऱ्यांची प्रशंसा करण्याच्या वृत्तीचा आपल्यात थोडा अभाव असल्याने आपण दुसर्यांच्या चांगलेपणाविषयी तसे अभावानेच बोलतो. चांगुलपणाची निरपेक्ष व्याख्या कशी असावी? जो माणूस मनुष्यजातीने आखून दिलेल्या सुसंस्कृत वागण्याच्या सर्व चालीरीती पाळतो, दुसर्यांना जमेल तितकी मदत करतो तो चांगला माणूस. आता एखादा माणूस चांगुलपणाने का वागतो? अशा चांगल्या माणसांचे विविध प्रकार असतात. काही माणसे भोवतालच्या परिस्थितीचा आपल्या चांगलेपणावर परिणाम होवू देत नाहीत. सुखदुःखात, सज्जन दुर्जन लोकांशी वागताना ती आपला चांगुलपणा कायम ठेवतात. काही माणसांचा चांगुलपणा मात्र परिस्थितीवर अवलंबून असतो. सर्व काही अनुकूल चालू असतानाच ते चांगले वागू शकतात. त्यानंतर काही प्रकार येतात ज्यात माणसे चांगलेपणाचा मुखवटा घालून वावरतात. मुद्दा असा आहे की आपण अवतीभोवतीच्या लोकांमधील चांगुलपणा बाहेर आणू शकतो का? प्रत्येक माणूस हे एक अनोखे व्यक्तिमत्व असते. हे व्यक्तिमत्व काही टक्के भागात एकदम व्यवस्थित वागते, पण एका छोट्याशा भागात ह्या व्यक्तिमत्वाची वागणूक अनाकलनीय बनू शकते. ह्या व्यक्तिमत्वाचा हा अनाकलनीय वागणुकीचा हा भाग कोणत्या परिस्थितीत बाहेर येतो हे त्या व्यक्तीच्या जवळच्या लोकांना माहित असणे चांगले असते. जसा अनाकलनीय भाग तसा चांगला भागही, आपल्या जवळच्या लोकांचा चांगुलपणा आपण कसा बाहेर काढू शकतो यावर प्रत्येकाने थोडा विचार करणे चांगले असते.
दुसरा मुद्दा तक्रारीचा. आपला स्वभाव असा असतो की आपण बर्याच वेळा आपल्याजवळ जे काही आहे ते गृहीत धरतो आणि जे काही मिळाले नाही त्याविषयी तक्रार करीत बसतो. बारावीची माझी गोष्ट, भौतिक, गणित आणि रसायनात क्ष गुण मिळाले आणि यांत्रिकी / विद्युत ह्या शाखांत प्रवेश न मिळता स्थापत्य शाखेत प्रवेश मिळाला. क्ष + १ गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना यांत्रिकी/ विद्युत शाखेत प्रवेश मिळाला. भौतिक शास्त्राच्या परीक्षेत एका प्रश्नात सदिशाची दिशा आणि परिमाण दोन्ही अपेक्षित होते. मी दिशा काढणे विसरून गेलो. पुढे अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात, सरदार पटेल महाविद्यालयातील मित्रांसोबत बोलताना मी त्या सदिशाच्या दिशेविषयी सदैव बोलत असे. एकदा एक मित्र म्हणाला अरे तुझे बाकीचे बरोबर आलेले प्रश्न देखील चुकण्याची शक्यता देखील होती. ते व्यवस्थित बरोबर आले त्याच्याविषयी तू कधी विचार करतोस का? त्याचे हे वाक्य माझ्या सदैव लक्षात राहिले. तसेच हल्लीच एका प्रशिक्षण वर्गात कंपनीचे उच्च पदस्थ अधिकारी म्हणाले की तुम्ही सुदैवी आहात हे लक्षात असू द्यात. इथे ह्या वर्गात बसलेल्या प्रत्येक व्यवस्थापकाइतकेच सक्षम लोक केवळ उत्तम संधी न मिळाल्याने बाहेर संघर्ष करीत आहेत. त्यांचे हे वाक्य मला अंतर्मुख करून केले.
आता दोन्ही गोष्टी एकत्र केल्यास थोडी गंमत येते. आपण बरेचजण केबल टीवीच्या वाईट परिणामाविषयी तक्रार करतो. पण त्यातही शोधल्यास चांगलेपणा आढळतो. डिस्कवरीच्या विविध वाहिन्यांवर मोटारगाड्या, जगातील विविध विस्मयकारक भूप्रदेश, विज्ञानातील नवनवे शोध यांची सुंदर माहिती मिळते. रात्री नऊनंतर संगीत वाहिन्यांवर लता, किशोर, गुलजार भेटतात. दूरदर्शनच्या ज्या काही वाहिन्या अजून आपले अस्तित्व टिकवून आहेत त्यात जुने साधे चित्रपट, संगीताचे कार्यक्रम पहावयास मिळतात. स्टार क्रिकेटवर जे जुने कसोटी सामने दाखवतात त्यात बेदी, चंद्रशेखर भेटतात. आणि दोन बळींच्या मधल्या वेळात मैदानावर खेळाडूंना पाहण्याची संधी मिळते जी आज जाहिरातीने हिरावून घेतली आहे.
आता थोडे विषयांतर, हल्लीच एकदा एक जुनी मालिका बघितली. त्या मालिकेत दाखविलेले घर किती साधे होते, आजच्या मालिकांत कशी चकचकीत घरे असतात. ह्या मालिकेतील चकचकीत घरांचा महिला प्रेक्षक वर्गांवर हळूहळू प्रभाव पडतो. ही घरे अप्रत्यक्षरित्या मध्यमवर्गीयांच्या घरांचे मापदंड प्रस्थापित करतात. आणि आपण सर्व घरांच्या नूतनीकरणाच्या मागे लागतो. आज गिरीश कुबेरांचा लोकसत्तेतील 'चला चंगळवादी बनुयात' हा लेख वाचला. आपण सुस्थितीत असल्यास योग्य खर्च करून अर्थव्यवस्थेस चालना देणे अयोग्य नाही हा त्यांच्या लेखाचा विषय. त्यांचे एक वाक्य सुंदर आहे 'अंथरूण पाहून पाय पसरण्यापेक्षा अंथरूण मोठे करण्याचा देखील विचार करावा' असे ते म्हणतात. एकंदरीत त्यांच्या ज्ञानाचा, लेखनशैलीचा मी चाहता बनत चाललो आहे!