Wednesday, April 17, 2019

२०१९ - अमेरिकावारी - भाग १

Tuesday, April 9, 2019

२०१९ - अमेरिकावारी - भाग १



गेल्या आठवड्यात कार्यालयीन कामानिमित्त एक छोटी अमेरिका वारी झाली.  ही अमेरिका वारी बऱ्याच गोष्टींमुळे लक्षात राहण्यासारखी झाली.  कार्यालयीन बैठकी संस्मरणीय होतील हे म्हणण्याची वेळ तशी क्वचितच येते. परंतु यावेळची भेट मात्र त्याला अपवाद होती.  माहिती आणि तंत्रज्ञान विभागात काम करणारी लोक स्वतंत्रपणे काम एका विशिष्ट टप्प्यानंतरच करु शकतात. त्यांना त्यांच्या कामासाठी कोणीतरी ते विकसित करत असलेल्या आज्ञावलीच्या गरजा देणे आवश्यक असते. हे जे कोणीतरी असतात त्यांना बिझनेस असे म्हणण्याची प्रथा आहे.  

आठवड्यातील पहिले चार दिवस बिझनेस व माहिती आणि तंत्रज्ञान विभागांतील आम्ही लोक यांच्या बैठकींची शृंखला एका अद्ययावत कॉन्फरन्स रूममध्ये करण्यात आली होती. चौथ्या दिवशी ती कॉन्फरन्स रुम उपलब्ध नसल्यामुळे बैठकीची व्यवस्था वेस्टइन या हॉटेलात करण्यात आली. माहिती आणि तंत्रज्ञान विभागातील अमेरिकन मंडळीसुद्धा सतत भारतीयांच्या संपर्कात राहून त्यांचे काही प्रमाणात देशीकरण झाले आहे असं मला उगाचच गेले काही वर्ष वाटत आलं आहे. परंतु बिझनेस मात्र आपलं मूळ अमेरिकन रूप कायम ठेवून आहे. त्यामुळे अशा लोकांबरोबर चार दिवस व्यतीत करण्यात खरोखर आनंद वाटला. त्यातील काही लोकांची व्यक्तिमत्वे खरोखर भारदस्त होती. फिट अशी ही माणसं अगदी आकर्षक पद्धतीने व्यासपीठावर येऊन आपलं म्हणणं मांडत होती. जेवणाची व्यवस्थासुद्धा पूर्णपणे अमेरिकन पद्धतीने करण्यात आली होती.  त्यामुळे काही दिवशी तर सलाडवर दिवस काढण्याची आमच्यावर वेळ आली.  

ह्या भेटीतील काही मोजक्या फोटोंभोवती आजची ही पोस्ट गुंफण्यात आली आहे.   सुरुवातीला ब्रिटिश एअरवेजच्या बिझनेस क्लासने मुंबई ते लंडन आणि मग लंडन ते फिलाडेल्फिया असा प्रवास केला. ब्रिटिश एअरवेजचा बिझनेस क्लास इतकाच खास नाही. आपण बाजूच्या माणसाच्या जवळपास staring into face करत आहोत की काय अशा पद्धतीने यांच्या सीट्स आयोजित केलेल्या असतात. 



परंतु लंडनला असणाऱ्या गुजराती लोकांचे बाहुल्य लक्षात घेऊन इथं भारतीय पद्धतीचं जेवण मात्र अतिउत्तम मिळालं! लंडनला उतरल्यावर विमानात उद्घोषणा गुजरातीमध्ये सुद्धा करण्यात आल्या. 

बाकी अमेरिकन इमिग्रेशन ऑफिसरने यावेळेला मला चार प्रश्न विचारून माझ्या आधीच्या सर्व भेटीतील प्रश्नांच्या संख्येच्या बेरजेला आव्हान दिले.   त्यातच कस्टमवाल्यांनी सुद्धा मला अधिक तपासणीसाठी बाजूला घेतले.  कारण असे होते की माझ्या पुढील माणसाने त्याच्या बॅगमध्ये हे फळे आणली होती.  कस्टमवाल्याच्या कुत्र्याने जो एकदम गोंडस दिसत होता त्यानं ह्या माणसाला बरोबर पकडले होते. त्या माणसाबरोबर त्याचे कुटुंब होते आणि त्यांच्या मागे असलेल्या बहुदा मी त्यांच्याप्रमाणेच दिसत असल्यानं मला देखील त्यांच्यासोबत बाजूला घेण्यात आले. एकंदरीत प्रसंगात मला रस निर्माण झाल्यानं मी याविषयी फारसा निषेध नोंदवला नाही.  एप्रिलमधील हवामानसुद्धा बऱ्यापैकी थंड होते. सोमवारी बैठकीला जाताना भलत्या आत्मविश्वासाने मी जॅकेट न घालता गेलो.   मग 3-4 डिग्री सेल्सियस तापमानामध्ये ज्याला बोचऱ्या वाऱ्यांची साथ मिळत होती, माझे धाबे पूर्णपणे दणाणले. 

सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत रेंगाळत असणाऱ्या सूर्याने सुद्धा निळ्या आकाशात विविध रंगांची उधळण केली होती. 

यावेळच्या प्रवासात माझा jet-lag शेवटपर्यंत कायम राहिला. रात्री दहाला झोपो वा अकराला!! मला नियमितपणे एक ते दीडच्या सुमारास जाग येत राहिली. मग मी सकाळी सहा वाजेपर्यंत प्रत्येक तास घड्याळामध्ये कसा पुढे सरकतो याची शहानिशा करीत चार पाच रात्री जागून काढल्या. 
अशाच एका पहाटे साडेतीन वाजता पूर्णपणे हताश होऊन ऑफिसच्या कामाच्या नोट्स काढण्याचा निष्फळ प्रयत्न करणारे आदित्य पाटील!!


2002 पासून जे काही अमेरिकेत वर्षे घालवली होती त्या वास्तव्यामध्ये कॉस्को, टारगेट, मार्शल, wal-mart, कोल यासारख्या दुकानांसोबत काही भावनिक बंधन निर्माण झाले होते. या आठवड्यातील भेटीने या भावनिक बंधांना उजाळा मिळाला. परंतु भावनिक बंध कितीही असोत मी ह्या दुकानांमध्ये खरेदी मात्र किमान केली ! ह्या दुकानांत आवडलेल्या काही कलाकृतींची ही छायाचित्रे !



पाहता पाहता आठवडा  समाप्तीच्या मार्गाला लागला. पाचव्या दिवशी मात्र माहिती आणि तंत्रज्ञान विभागातील व्यवस्थापकांची बैठक झाली. त्यामध्ये आमच्या अमेरिकन ऑफिसमधील बहुतांश व्यवस्थापक होते. बिझनेस मंडळींनी आपल्या बैठकी चार वाजता आटोपल्या तर माहिती आणि तंत्रज्ञान बैठक मात्र शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालली. ही माझ्या भारतीयकरणाच्या मुद्द्याला दुजोरा बाब ! आकाश त्यावेळी मेघाच्छादित होते आणि पावसाच्या सरी देखील अधून मधून येत होत्या. या दिवशी सायंकाळी माझ्या आवडीच्या ऑलिव्ह गार्डन या इटालियन रेस्टॉरंट मध्ये आम्ही जेवण घेतले!

पहिल्यांदा अमेरिकेत आम्ही जेव्हा २००२ साली गेलो तेव्हा माझी  बहीण निऊ आणि तिचे यजमान निशांक हे अमेरिकेमध्ये होते. त्यानंतर काही काळ ते अमेरिकेत होते तर आम्ही नव्हतो. काही काळ आम्ही होतो तर ते नव्हते. तर काही काळ आम्ही सर्वजण होतो. परंतु आम्ही अमेरिकेत प्रत्यक्षात केव्हाही भेटलो नाही.  आता ते काही वर्षांपुर्वी परत अमेरिकेत वास्तव्यास गेले आहेत. ही संधी साधून यंदाच्या अमेरिका भेटीवेळी मी त्यांच्या डॅलस येथील घराला भेट देण्याचा बेत आखला. वेगवेगळ्या प्रकारची उड्डाणे तपासून पाहून सकाळी पाच वाजताचे अमेरिकन एअरलाइन्सचे फिलाडेल्फिया ते डॅलस हे विमान पकडण्याचे मी निश्चित केले होते. पाच वाजताचे विमान पकडण्यासाठी नक्की किती वाजता निघायचे हे ठरवणे जरा कठीणच होते. परंतु माझ्या अत्यंत सावध स्वभावाला अनुसरून मी दोन वाजताच उबेर करून फिलाडेल्फिया एअरपोर्टच्या दिशेने निघालो. परंतु तेथील बॅग्स चेकइन करणारे कर्मचारी मात्र सव्वातीन वाजल्याशिवाय येत नाहीत. त्यामुळे काही काळ माझा त्यांची प्रतीक्षा करण्यात व्यतीत करण्यात गेला. पुन्हा एकदा एका कष्टप्रद अशा सुरक्षा तपासणीला तोंड देऊन अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानात स्थानापन्न झालो! हे विमान आंतरराज्य विमानांच्या मानाने चांगलेच मोठे होते आणि फिलाडेल्फिया ते डल्लास हे कागदोपत्री पावणेचार तास दाखवणारे अंतर या विमानाने सव्वा तीन तासात पार पाडले. मला ह्या प्रवासात चक्क एक बिस्कीट पुडा, एक कोक आणि एक ऑरेंज जुस देण्यात येऊन जबरदस्त आदरातिथ्य करण्यात आले !

 गेले तीन वर्ष भारतात येऊन शकलेल्या निऊला मला पाहून गहिवरून आले.  त्यावेळचा हा फोटो!!  



निशांक आणि निऊ यांचे डल्लास येथील घर भव्य दिव्य असे आहे. 



सुरुवातीला आम्ही निऊच्या हातचा चविष्ट नाश्ता करून गप्पा मारत बसलो. रात्री केवळ दोन तास झोप झाली असल्यामुळे मी मध्येच एक तासभर झोप काढण्याचा प्रयत्न केला.  दुपारी मात्र पुन्हा एकदा आम्ही गप्पांना बसलो असताना बाहेर जाऊन येणे योग्य ठरेल असे निशांकने सुचविले. त्याच्या सल्ल्यानुसार आम्ही पुढील चार तासभर येथील बऱ्याच ठिकाणांना भेटी दिल्या.  या भेटीवर काहीतरी लिहायचे हे नक्की असल्यामुळे मी आयपॅड घेऊन सज्ज होतो.  मी कुठेही फोटो काढत होतो.  परंतु त्याची आगाऊ सूचना या सर्वांना दिल्यामुळं त्यांनी त्यावर फारसे आश्चर्य व्यक्त केले नाही.  सर्व जो माझा भाचा! त्याने माझा आयपॅड सांभाळण्यात अत्यंत मोलाचा वाटा उचलला. 
ह्या शहराची ही काही छायाचित्रे ! 

आठच्या आकड्याशी साधर्म्य दर्शविणारा हा उड्डाणपूल !!






आपण  एखाद्या गुढ प्रवासाला निघालो आहोत की काय असा भास निर्माण करणारा हा फोटो !!



निशांक यांच्या ऑफिसला सुद्धा आम्ही भेट दिली. या ऑफिसातून डल्लास शहराचे एक नयनरम्य असे दर्शन घडते. तिथं नियमित बैठकीसाठी असणाऱ्या रुमसोबत सुद्धा वेगळ्या विभागांची खास सोय केली करण्यात आली आहे. या विभागात सुद्धा आम्ही छायाचित्रण केले.  त्यानंतर आम्ही नव्याने उभारण्यात आलेल्या साईबाबा मंदिराकडे कूच केले.  


त्यावेळी मनुचा ऑस्ट्रेलियातून फोन आला. तिने गुढीपाडवा ते रामनवमी अशी नवरात्र केवळ शाकाहार करून व्यतीत करण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला. तिच्या या दृढनिश्चयावर आणि  एकंदरीत तिच्या पाक कलेवर मी संशय व्यक्त करण्याचे दुःसाहस केले!  त्याची शिक्षा म्हणून मला पुढील अर्ध्या तासात खास ऑस्ट्रेलियातून विविध पाककलेचे कौशल्य दर्शविणाऱ्या पदार्थांचे फोटो सादर करण्यात आले.  







(क्रमशः )