बहुदा "लेट गो" हा आजच्या जीवनांचा मुलमंत्र असावा! कार्यालय अथवा कार्यालयाबाहेरील आपले वैयक्तिक, सार्वजनिक जीवन असो! हल्ली अप्रत्यक्ष संघर्षाचे प्रसंग वारंवार येत असतात. हल्ली कोणी थेट वाद घालत नाही. मोजक्या शब्दांतुन कटु संदेश दिला जाणं, महत्त्वाच्या बैठकी, समारंभ, चर्चा ह्यातुन वगळलं जाणं किंवा आपल्या उपस्थितीची दखल घेतली न जाणं अशा प्रसंगांना बऱ्याच वेळी जनांना तोंड द्यावे लागते. दुनियेत हल्ली वाचाळ अर्थात Loud जनांचे प्रमाण वाढत चालले आहे. आपलं अस्तित्व जाणवुन देण्यासाठी अशा मोठ्यानं आरडाओरडा करण्याच्या संस्कृतीचा प्रसार वेगानं होऊ लागला आहे.
बहुतांशी संवेदनशील माणसे अशा अनुभवामुळे एकतर निराश होतात किंवा काही प्रमाणात खचुन जातात. या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी त्यांना एक तर काही काळ जाऊ देण्याची किंवा कोणाच्या मानसिक आधाराची गरज लागते. प्रत्येक वेळी अशा प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काळ जाऊन देणे शक्य होत नाही. कारण अशा अप्रिय प्रसंगांची आणि आपली भेट वारंवार होत असते. त्यामुळे आपल्याला मानसिक आधार देऊ शकेल अशा व्यक्तीची आपल्याला बऱ्याच वेळा गरज भासत असते.
पुढील काळात लोकांशी केवळ बोलून त्यांना मानसिक आधार देणाऱ्या व्यक्तींना खूपच मागणी येईल असं मला वाटतं! मुळ मुद्द्याकडे परत वळूयात! इथं बहुदा आपल्या या संवेदनशील स्वभावाकडं आत्मपरीक्षणाच्या नजरेतुन पाहणं इष्ट! आपल्याला कोणी काही बोललं तर त्याचा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत विचार करावा, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्याला उत्तर देण्यात आपली शक्ती खर्च करावी. त्यापलीकडे आपण डेटा पॉईंट तत्व लक्षात घ्यावे.
आपल्या आयुष्यात असंख्य डेटा पॉईंट असतात. ह्यातील काही कार्यालयात, काही वैयक्तिक जीवनात आणि काही तुमच्या दररोजच्या प्रवासात येतात. यातील प्रत्येक डेटा पॉईंटमध्ये तुम्हाला विजय मिळवणं शक्य नसतं. त्यामुळे एखाद्या डेटा पॉईंटमध्ये तुम्हांला जर काहीसा अप्रिय अनुभव येत असेल तर त्यामुळे आपल्या स्वतःच्या मनातील आपल्या विषयीच्या प्रतिमेला तडा जाऊ देऊ नये. इथे हमखास आपल्या मनातील आपली ही प्रतिमा उंचावता येईल येईल असा एखादा डेटा पॉईंट निवडावा, स्वतःला चांगल्या मनस्थितीत आणावं आणि आयुष्यात पुढं जावं! नाहीतर इतक्या संघर्षपूर्ण जीवनामध्ये तुम्हांला सतत मानसिक त्रास सहन करावा लागेल.
आता हे झालं सध्याच्या पिढीचे! पुढच्या पिढीचं कसं होणार याबाबतीत मात्र काहीशी चिंताजनक अशी परिस्थिती आहे. या पिढीची त्यांच्या मनामधील स्वप्रतिमा कशी आहे याविषयी बरंच संशोधन व्हायला हवं! या नवीन पिढीतील बऱ्याच मुलांच्या मनात स्वतःच्या एका अवास्तव प्रतिमेचं भुत शिरलेलं असतं. ही आभासी प्रतिमा त्यांनी आणि कदाचित त्यांच्या पालकांनी बनवून ठेवलेली असते. आयुष्याच्या सुरुवातीच्या काही वर्षात या आभासी प्रतिमेचे अस्तित्व सुरक्षित ठेवणे त्यांना शक्य जाते. परंतु त्यानंतर मात्र ही आभासी प्रतिमा आणि आपण वेगळे आहोत याचे खडतर जाणीव त्यांना होऊन जाते.
आपल्या मागच्या पिढीने आपल्याला आपल्या कठीण काळात विनाअट त्यांच्या पंखाखाली घेतलं. आपण कधीकाळी संकटात सापडलो तर कशामुळे आपण संकटात सापडलो याची अजिबात चौकशी न करता unconditionally त्यांनी आपल्याला आधार दिला. परंतु हीच घटना आपल्या आणि पुढील पिढीच्या बाबतीत मात्र कशाप्रकारे घडेल याविषयी मी साशंक आहे. एकतर ही पुढील पिढी ज्यावेळी त्यांना मानसिक आधाराची गरज असेल त्यावेळी खरोखर आपल्याला साद देईल का याविषयी आपण खात्री देऊ शकत नाही. कदाचित दुसऱ्यांची (यात त्यांचे पालकसुद्धा समाविष्ट ) मदत मागणे हे त्यांना कमीपणाचे वाटू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे असा प्रसंग उद्भवला असता या पिढीला पंखाखाली घेणे हा जो प्रकार आहे त्यासाठी आपण कितपत तयार आहोत हा प्रश्न ज्याचा त्याने स्वतःला विचारला हवा!