Monday, March 30, 2020

Discovery Time






जगावर येणाऱ्या भयावह संकटाच्या संकल्पनेवर बेतलेले अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. जगाचा शेवट जवळ आला आहे, केवळ नायक, मोजकी मंडळी त्या संकटाचा मुकाबला करत आहेत असं काहीसं चित्र ह्यात रेखाटलं गेलेलं असतं. आज आपण ज्या परिस्थितीत सापडलो आहोत ती परिस्थिती काहीशी ह्या चित्रपटांची आठवण करुन देणारी आहे. 



करोना पुर्वीचे जग !

करोनापुर्वीचे जग काहीसं वेगळं होतं. तुमचा पैसा, तुमची पत ह्याचा तुम्हांला गर्व करता येत असे. पैसे खर्च करुन तुम्ही काहीही विकत घेता येण्याची घमेंड बाळगु शकत होता. निसर्गानं सर्व माणसांना एका पातळीवर निर्माण केलं असलं तरी माणसानं कृत्रिम पातळ्या निर्माण केल्या होत्या. आभासी दुनिया निर्माण करुन त्यात आभासी चलनाद्वारे संपत्ती निर्माण करण्याच्या मागे बहुतांशी मनुष्यजात लागली होती. 

सद्यस्थिती 

आजच्या परिस्थितीत हे सर्व काही नाहीसे झालं आहे. आपला जीव वाचवण्याची काळजी घेणे हा सर्व मानवजातीचा प्राधान्यक्रम झाला आहे. ह्यात राव-रंक सर्वजण एका पातळीवर आले आहेत. 

मनःपुर्वक आभार !

इथं आपल्या सर्वांचा दिनक्रम सुरु ठेवण्यास जी मंडळी हातभार लावत आहेत, त्यांचे मनापासुन आभार मानावेसे वाटतात. किराणामाल दुकानदार, दूधवाला, सफाई कामगार, पोलीस,टोलनाक्यावरील  कर्मचारी हे सर्व कोणाचे तरी पती, मुलगा, पिता आहेतच.  आपण साधं थोडा वेळ बाहेर पडलो तर घरात आल्यावर तातडीनं हात स्वच्छ धुण्याच्या मागे लागतो, अंघोळ करतो. ही मंडळी मात्र दीर्घकाळ बाहेर राहत आहेत ते केवळ आपला दिनक्रम सुरळीत चालु राहावा ह्यासाठी! 

इस्पितळात काम करणारे नर्स, डॉक्टर आणि बाकीचा कर्मचारीवर्ग हे तर अधिक धोकादायक परिस्थितीत कार्य करत आहेत. ज्यांना करोनाची लागण झाली आहे अशा रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात ही मंडळी येत आहेत ते केवळ मास्क, बाकीच्या प्रतिबंधात्मक आवरणे आणि ईश्वरावर विश्वास ठेवून ! त्यांच्या स्वाथ्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ईश्वराकडे प्रार्थना! 

दृढ मनोबलाची आवश्यकता 

ह्या करोनाने काही वेगळ्या परिस्थिती निर्माण केल्या आहेत. दहावीच्या एस. एस. सी. बोर्डाचा शेवटचा पेपर बाकी आहे. वर्षभर अभ्यास करुन सतत तणावाखाली राहणाऱ्या मुलांना कधी एकदा आपण ह्या तणावातुन मुक्त होऊ असं झालं असेल. परंतु आता त्यांना परिस्थिती निवळण्याची वाट पाहावी लागणार! ह्या प्रदीर्घ कालावधीनंतर ज्यावेळी पेपर पुन्हा घेतले जातील त्यावेळी अशा परीक्षांसाठी लागणारी मनःस्थिती पुन्हा आणणे कठीण असणार आहे. एस. एस. सी. परीक्षा हे केवळ एक उदाहरण झाले अशा अनेक परीक्षांत मुलं अडकून बसली आहेत. त्यांनी ह्या काळात आपलं मनोधैर्य शाबुत ठेवावं ! ज्यांच्या परीक्षा आटोपल्या आहेत त्यांनासुद्धा घरातच बसावं लागणार आहे! वर्षभराच्या अभ्यासाच्या तणावमुक्तीसाठी ज्या काही योजना आखल्या होत्या त्या सर्वांवर पाणी पडलं आहे ! 

परदेशी शिक्षणासाठी, नोकरीसाठी गेलेल्या तरुण मुला-मुलींसाठी हा कसोटीचा काळ आहे. आपल्या कुटुंबियांपासुन दुर तर राहावे लागणार आहे त्याचवेळी प्रदीर्घ काळ मोजक्या जागेत आपल्या रूममेट्स सोबत एकत्र राहावे लागणार आहे. 

मोजक्या जागेत एकत्र राहण्याचा प्रसंग एखाद्या कुटुंबासाठीसुद्धा कठीण ठरु शकतो. संवाद,चर्चा काही काळ ठीक असते परंतु प्रदीर्घ चालत राहिल्यास त्याचं परिवर्तन विसंवादात होऊ शकतं. त्यामुळं ह्या काळात कुटुंबाने संवाद कसा साधायचा ह्याविषयी काही मार्गदर्शक तत्वे आखुन घ्यावीत.  आलटुन पालटुन कुटुंबसदस्यांनी संवाद - पर्यवेक्षकाची भुमिका बजावावी. संवाद जराही कटुतेकडे जात असल्याची शक्यता निर्माण झाल्यास टाईमआउट घोषित करावा.

काही कुटुंबांना एकत्र बसुन संवाद करण्याची कदाचित सवयही नसेल. ह्या निमित्तानं जी संवादसंधी निर्माण झाली आहे त्याचा पुरेपूर लाभ उठवावा. एका घरात वेगवेगळी आयुष्य जगणारी अनोळखी माणसे ह्या निमित्तानं एकत्र येऊ शकतात. माझ्या नोकरीधंद्यात  काय घडत आहे, मला ह्या क्षणी कोणत्या गोष्टींविषयी आशावादी वाटत आहे, कोणत्या गोष्टींविषयी असुरक्षितता वाटत आहे इथुन प्रारंभ करावा ! 

नातेवाईक, मित्रमंडळी ह्यांच्याशी प्रत्यक्ष फोनवर आपलं बोलणं कमी झालं आहे. प्रथम फोन कोणी करावा हा इगोचा भाग सर्वप्रथम आडवा येतो. त्याला सरळ बाजुला सारावे. आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक चांगल्या मंडळींशी आपण संपर्क गमावलेला असतो तो केवळ वेळ नाही ह्या कारणास्तव ! त्यांचा फोन नंबर चिकाटीनं शोधुन काढुन मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलावं !  

कार्यालयात एकत्र येऊन काम केल्यामुळं संघभावनेस चालना मिळत असे. आता सर्वजण घरुन काम करत असल्यानं केवळ कामासाठी फोन कॉल्स होतात. ह्या रिमोट काम करण्याच्या कार्यपद्धतीत संघभावनेस चालना देण्यासाठी काही नवीन सर्जनशील पद्धतींचा अवलंब करावा लागणार आहे. लंच अवर ऑन व्हिडिओ कॉल  असं काही थोड्याच दिवसात ऐकायला मिळालं तर आश्चर्यचकित होऊ नकात ! 

एकंदरीतच हा काळ सर्वांसाठी कसोटीचा असणार आहे ! ज्यांचं मनोबल चांगलं आहे अशी मंडळी ह्यातुन सहजपणे तावूनसुलाखून बाहेर निघतील. भविष्यात असले प्रसंग वारंवार येऊ शकतात. त्यामुळं पुढील पिढीला मानसिकदृष्ट्या कणखर बनविणं किती महत्वाचे आहे ह्याची जाणीव करोनाने आपल्या सर्वांना करुन दिली आहे. 

करोनानंतरचे जग !

जग करोनामुक्त कधी होईल हे आजच्या घडीला छातीठोकपणे कोणीच सांगु शकत नाही. किंबहुना करोनाचा प्रभाव कमी झाला तरी त्याची भिती सदैव मनुष्यजातीच्या आसपास राहणारच आहे. सध्याच्या काळात आपल्या वागण्यात करोनाने काहीसा बदल घडवुन आणला आहे. जीवनाच्या अशाश्वततेच्या जाणिवेनं आपल्या सर्वांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडलं आहे. 

पण ज्या क्षणी ह्या भयाची तीव्रता काहीशी कमी होईल किंवा पैशाच्या जोरावर करोनापासुन जीव वाचविण्याची हमी माणसाला प्राप्त होईल त्यावेळी माणसांचे वागणं कसे असेल? करोनापुर्वीची मग्रुरी परत त्याच प्रमाणात मनुष्यजातीतील काही लोकांना ग्रासुन टाकेल का?  हल्लीच्या जगाविषयी, त्यातील मनुष्यांविषयी भाबडेपणा बाळगणं फार कठीण आहे. त्यामुळं बहुतांशी मंडळी पुन्हा संपत्तीनिर्मितीच्या मागे लागतील. 

करोनाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर बरेचसे प्रतिकुल परिणाम होऊ शकतील. ही शक्यता प्रत्यक्षात उतरू शकते ह्याची जाणीव असु द्यात आणि ती प्रत्यक्षात उतरली तर आपल्या बाबतीत जो काही worst case scenario होऊ शकतो ह्याची आधीच अटकळ बांधुन ठेवा, त्यासाठी मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या तयारी करा ! केवळ चांगला विचार केल्यानं एखादी वाईट गोष्ट घडायची टळत नाही, पण जर वाईट शक्यतेचा आधीपासुन विचार केला तर त्याचा धक्का कमी बसतो. जगात वाईट गोष्टी अहोरात्र घडत असतात त्यातील काही गोष्टी क्वचितच आपल्या वाट्यालाही येणारच. पण वाईट गोष्टी घडल्यानंतर गगनभरारी घेणाऱ्या लोकांची संख्या कमी नसते हे ही ध्यानात ठेवा !