सद्यकाळात घरातुन पार पाडाव्या लागणाऱ्या कार्यालयीन कामकाजाची व्याप्ती व्यवस्थित आहे. आज बऱ्याच दिवसांनी आलेल्या दीर्घ साप्ताहिक सुट्टीमुळं वसईच्या घरातील कपाटाची तपासणी केली असता सांजशकुन हे जी. ए. कुलकर्णी ह्यांचं पुस्तक हाती लागलं. त्यातील सत्यकथा ह्या मासिकात १९७१ साली प्रसिद्ध झालेल्या अस्तिस्तोत्र आणि १९७० साली प्रसिद्ध झालेल्या पत्रिका ह्या कथांचा मला झालेला बोध ! जी. ए. कुलकर्णी ह्यांच्या कथांमध्ये बरंचसं गुढ वातावरण असतं. त्यातील पात्रे ही कोणत्या तरी अद्भुत शक्तीच्या प्रभावाखाली वावरताना आढळतात. त्या कथांमधील विश्वही आपल्या भोवताली असणाऱ्या विश्वापासुन बरंच फारकत घेऊन आपलं वेगळं असं एक अस्तित्व जपते.
अस्तिस्तोत्र
कथेची सुरुवात होते ती "उन्हात तावून निघालेल्या कवटीप्रमाणं वाटणाऱ्या स्वच्छ चकचकीत आभाळाखाली समुद्र स्थिर आहे " ह्या खोलवर अर्थाच्या वाक्यानं ! आभाळाच्या कवटीशी केलेल्या तुलनेशी आपण स्वतःला काहीसं सरावून घेत असतानाच जी. ए. समुद्राकडं वळतात. प्रत्येक परिच्छेदानंतर ते समुद्राच्या शांततेकडं, स्तब्धतेकडं, निर्ममतेकडं आणि त्यानं बजावलेल्या केवळ निरीक्षकाच्या भूमिकेकडं अंगुलीनिर्देश करीत राहतात.
समुद्र केवळ शांत आहे, समुद्र केवळ स्तब्ध आहे....
कथा संपुर्णपणे प्रतीकात्मक विश्वात वावरत राहते. त्यामुळं कवटीमय वाटणारं आकाश, अनासक्त पाणी बाळगणारा समुद्र, त्यातील विक्षिप्त आकृतीचे क्षारांचे खडक, भोवताली पसरलेली रखरखीत वाळु हे सर्व घटक मानवी मर्त्य किंवा त्यापलीकडील जीवनातील ज्ञात / अज्ञात शक्तींचे रुपक असावेत असं सदैव वाटत राहतं.
त्यानंतर सुरु होते ती एक श्रुंखला ! आभाळ ही एक कवटी, त्यानं आच्छादलेल्या वाळवंटात पसरलेले टेकाड्याएवढ्या कवट्या असलेल्या अतिप्राचीन प्राण्यांचे सांगाडे, त्या कवट्यांचं उन्हानं कोलमडून जाणे, तरीही एका कवटीने तग धरुन राहणे, दुरवरुन आलेल्या एका वृद्धाने ह्या एकमेव कवटीचा सहारा घेणे, कालपरत्वे त्या महाकाय कवटीने सुद्धा धगीपुढे कोलमडुन जाणे. धगीपासुन आपले रक्षण करणाऱ्या त्या कवटीच्या विनाशामुळं त्या वृद्धाचे सुद्धा कोलमडणे. त्याची जगण्याची जिद्द संपताच त्याच्या कवटीच्या सावलीत आलेला कीटक, कालांतरानं त्याचा संपलेला प्रवास आणि त्याच्या शरीराच्या आधाराला आलेली मुंगी ! ही शृंखला जी. ए. इथेच संपवतात ती "कोठेतरी तिच्याहुनही लहान जीवाणू वाट पाहत आहे" ह्या वाक्यानं !
संपुर्ण कथेत रंगविलेल्या जीवनाच्या एकमेव चाहुलीचा प्रतीकात्मक पुरावा! त्यानंतर जी. ए. मृत समुद्रातील जीवनाच्या संपुर्णपणे अभावाकडं वळतात. मृत समुद्राच्या चिंतनाची सर्व सांगता झाली आहे! कथा संपते ती "आता समुद्र केवळ आहे !" ह्या वाक्यानं !
एकंदरीत विविध रुपातील मनुष्यजन्माच्या श्रुंखलेतील प्रवास आणि त्यानंतर अस्तित्वात असु शकणाऱ्या मुक्तीचे रुपक असणारा समुद्र ! जो आपले कायमस्वरुपी अस्तित्व बाळगुन असतो!
पत्रिका
एका प्रासादाच्या विशाल पायऱ्यांपाशी आलेला परंतु आपली स्मृती गमावुन बसलेला हा कथेचा नायक ! प्रथमदर्शी उघडण्यास कठीण परंतु नायकाच्या हळुवार स्पर्शानं सहज उघडणारं प्रासादाचे महाकाय द्वार !प्रासादाच्या अंतर्भागात व्यापुन टाकणारा किट्ट अंधार ! अंधाराला सरावलेली त्याची नजर. त्या प्रासादात कोणी आहे का हे जाणुन घेण्यासाठी त्यानं दिलेल्या अनेक हाका ! आणि प्रत्युत्तर म्हणुन आलेले केवळ त्याचेच शब्द !
मग त्याला दिसलेला अनेक वेटोळी घेतलेला आणि बऱ्याच उंचावर जाणारा एक जिना. त्या जिन्याच्या वरच्या सज्ज्यावर कठड्यावर तेजस्वी कृष्ण्वस्त्रे परिधान केलेली आकृती ! त्या जिन्याची एकेक पायरी ओलांडण्यासाठी त्यानं केलेला कष्टप्रद प्रवास ! शेवटी एकदाचा त्या आकृतीसमोर उभं ठाकून त्यानं माझ्या सादीला तुम्ही उत्तर का नाही दिलंत असा केलेला निकराचा प्रश्न ! त्यावर त्यानं ऐकलेली प्रत्युत्तरे म्हणजे माझीच उत्तरे असा त्या आकृतीने केलेला खुलासा ! त्यानंतर तु उंबरा ओलांडुन मला ती पत्रिका दे आणि मला मुक्त कर ही त्या आकृतीने केलेली विनंतीवजा आज्ञा ! तो उंबरा ओलांडताना सर्पमुखांनी केलेले विषारी फुत्कार !
ती पत्रिका त्या आकृतीला सुपूर्द केल्यानंतर त्या आकृतीने मानलेलं आभार आणि त्यासोबत परत जाण्याची धुडकावून लावलेली विनंती ! त्या आकृतीने ती कृष्ण्वस्त्रं ह्याला परिधान करायला लावत तुला मुक्तीसाठी असंच कोणीतरी पत्रिका घेऊन घेण्याची वाट पाहत राहावं लागेल हे सांगणं ! मग त्या व्यक्तीचं निर्भरपणे उंबरा ओलांडून, जिना उतरत, महाद्वार उघडून प्रासादाच्या बाहेर पडणे !
आता ह्या नायकाच्या वाट्याला आलेली दीर्घ प्रतीक्षा, ती त्याची पत्रिका घेऊन येणाऱ्या दुसऱ्या कोणाची ! ह्या प्रतिक्षेचा कालावधी किती असणार हे कोणीच सांगु शकणार नाही ! तोवर सहन करावं लागणारं प्रदीर्घ एकटेपण!
पुन्हा एक प्रतीकात्मक कथा ! बहुदा जन्म-मृत्यू, आत्मा ह्यांच्यातील मनुष्याच्या प्रवासाची ! ह्यातील कोणतं रुपक कसलं ते फक्त जी. ए. च जाणोत !
प्रत्येक कथा केवळ ३-४ पानांची पण समजण्यास प्रचंड वेळ लावणारी ! आणि इतक्या प्रयत्नानंतर सुद्धा आपणास समजलेला अर्थ जी. ए. ना अभिप्रेत असलेल्या अर्थाशी अंशतः तरी जुळला असेल ह्याची शाश्वती नाही !
शीर्षक भाग १ जरी असलं तरी हे धाडस सातत्यानं करण्याची हिंमत मी पुन्हा करेनच ह्याची हमी मी सध्यातरी देणार नाही !