Saturday, June 25, 2011

अभ्यास पद्धती भाग २





अभियांत्रिकी अभ्यासक्रम एकंदरीत वेगळ्या पद्धतीने हाताळावा लागतो. प्रत्येक सत्रात SUBMISSION नावाचा बागुलबुवा आपली पाठ पुरवीत असतो. प्रत्येक विषयाच्या मुलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक असते. आणि ह्या संकल्पना समजून घेण्यासाठी अध्यापकांच्या सर्व वर्गांना उपस्थित राहणे, विषयाचे नियमित वाचन करणे हे जरूर असते. ह्या पुस्तकांचे एक वैशिष्ट असते आणि ते म्हणजे reading between the lines. पुस्तकातील ओळींमध्ये गर्भितार्थ भरलेला असू शकतो आणि त्याचा आपापल्या मतीनुसार अर्थ लावण्याची आपणास मुभा असते! सबमिशन आटोपल्यानंतर मिळणाऱ्या अभ्यास सुट्टीवर आपण भिस्त ठेवल्यास हा गर्भितार्थ उमजून घेण्याची आपणास कमी संधी मिळते.

यात एक महत्त्वाची बाब म्हणजे आपणास योग्य अशा अभ्यासनोंदी (नोटस) मिळणे आवश्यक असते. ह्या नोटस मिळविण्यासाठी योग्य कंपूत आपण असणे आवश्यक असते. हा कंपू आपणास विषयाच्या चर्चेसाठी उपयोगी पडतो. त्याच प्रमाणे गेल्या काही वर्षांतील प्रश्नपत्रीकेंचे योग्य विश्लेषण करण्यासाठी ह्या अभ्यासकंपूचा आपणास उपयोग होतो.

अभियांत्रिकीच्या परीक्षा हा एक अजून सखोल विषय. चार तासांचे पेपर आणि त्या वेळात आपणास अवगत असणारे बरेचसे ज्ञान आपणास उत्तरपत्रिकेत योग्य प्रमाणात उतरावे लागते. ह्या वेळात आपल्याला काही निर्णय पटापट घ्यावे लागतात. प्रश्नपत्रिका हाती आली की पहिल्या पाच मिनिटात तिचे विश्लेषण करून आपण सोडवणार असलेले प्रश्न आणि त्यांचा क्रम ठरवावे लागतात. एखाद्या प्रश्नाच्या जास्त प्रेमात पडून सुद्धा चालत नाही. २० गुणाचा एक प्रश्न परीक्षकास तो विद्यार्थी असल्याच्या आविर्भावात स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी २० गुणांचे २ प्रश्न योग्य प्रकारे सोडविणे आवश्यक असते. ह्या चार तासात आपला आत्मविश्वास टिकविणे आवश्यक असते. त्यासाठी खात्रीचे प्रश्न प्रथम सोडविणे आवश्यक असते. एखाद्या विषयात बरीच सूत्र असल्यास उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर आणि प्रश्नपत्रिका मिळण्याआधी ही सूत्रे मागच्या पानावर पेन्सिलीने लिहून ठेवण्यात काहीच गैर नाही. प्रत्येक विषयाचे काही भाग आपणास पूर्ण उमजलेले असतात आणि त्यांची आपण योग्य तयारी सुद्धा केलेली असते. अशा भागाशी संबंधित प्रश्न प्रथम सोडवावेत. ज्या भागांची आपली तयारी कमी झालेली असते आणि त्या भागाशी संबंधित ज्ञान आपल्या मेंदूच्या कप्प्यातून खेचून घेण्यास (retrieve करण्यास कष्ट करावे लागणार असतात, असे प्रश्न शेवटी ठेवावेत. ह्या भागातील आपली कामगिरी त्यावेळच्या आपल्या मनःस्थितीवर अवलंबून असते. अशा वेळी मध्येच छताकडे एक मिनिट पाहत आपल्या विविध उल्लेखनीय कामगिऱ्या (आपल्या म्हणण्यानुसार!) आठवून स्वतःला प्रफुल्लित करावे.

व्यावसायिक अभ्यासक्रमाची ही वर्षे तशी हा हा म्हणता संपून जातात. महाविद्यालयातील सांस्कृतिक दिवस, वेगवेगळे 'Days' साजरे करता करता अंतिम वर्ष समोर येवून ठेपते. पुढे पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे (ते ही देशात की परदेशात), की प्रथम थोडा नोकरीचा अनुभव घ्यायचा हा निर्णय घ्यावा लागतो. अंतिम वर्षातील प्रोजेक्ट निमित्त आपली बाहेरील व्यावसायिक जगाशी तोंडओळख होते. व्यावसायिक जगात प्रवेश करता करता आपल्या वैयक्तिक जीवनातही बदल होत राहतात आणि अधिकाधिक जबाबदाऱ्या आपल्यावर येऊन पडतात. इथे मात्र कोणतेही पुस्तक आपल्यासोबत नसते. सोबत असतात नातेवाईक, मित्र, आपला स्वभाव आणि आयुष्य कशा पद्धतीने घालावावयाचे आहे याविषयीचे आपले विचार! यातील शेवटच्या दोन गोष्टी वयपरत्वे काही प्रमाणात बदलत जातात. आवश्यक असते ते आयुष्यातील विविध टप्प्यांवर घेतलेल्या निर्णयांशी प्रामाणिक राहणे!

No comments:

Post a Comment