Thursday, November 29, 2012

शीर्षक नाही!


आठवड्याच्या उत्तरार्धात सुट्टी घेतल्याने ब्लॉगचे प्रमाण वाढले आहे. ब्लॉगच एक बर असतं, शब्दमर्यादा नसते त्यामुळे एका परिच्छेदाचा देखील ब्लॉग होवू शकतो. आला मनात विचार की लिहिला ब्लॉग. विषयाचे पण बंधन नाही. अचानक एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारली तरी कोण काही शक्यतो बोलत नाही.
आपलेच मागचे ब्लॉग वाचताना थोडी गंमत येते. आपल्या मनात असे विचार आले होते ह्याचे कधी कधी आश्चर्य वाटते. कधी आपण त्या विचारांशी सहमत होतो तर कधी नाही. कधी कधी पुनुरावृती आढळते! समजा प्रत्येकाने असा लहानपणापासून ब्लॉग लिहून ठेवला तर! आपले व्यक्तिमत्व कसं बदलत गेलं याचा आढावा घेता येईल नाही? व्यक्तिमत्व म्हणजे तरी काय? प्रत्येक माणसाकडे उपजत कौशल्य आणि स्वभाव असतात. माणसाला जे लौकिकार्थाने, व्यावहारिक प्रशिक्षण मिळते त्याने माणसाच्या कौशल्यात भर पडते. स्वभावाचा मूळ गाभा कधी बदलत नाही परंतु परिस्थिती कधी माणसाला स्वभावाला आवरण घालायला लावते तर कधी माणसाच्या एखाद्या पैलूला चौखूर उधळून देते. कौशल्याच्या पायावर उभारलेला तत्कालीन परिस्थितीनुसारचा माणसाच्या स्वभावाचा प्रभावशाली पैलू म्हणजे त्याचे तत्कालीन व्यक्तिमत्व! एखाद्या व्यक्तीच्या अशा सर्व तत्कालीन व्यक्तिमत्वांची आयुष्यभराची घेतलेली सरासरी म्हणजे त्या व्यक्तीचे एकंदरीत व्यक्तिमत्व!
हल्ली माणस बदलतात! म्हणजे तशी ती पूर्वीपासून बदलायची पण हल्ली जरा जास्तच बदलतात! नोकरी - व्यवसायात माणसांना यश मिळायचे प्रमाण वाढलंय. यश मिळाले की माणसांना खूप बर वाटत. काहींना इतक बर वाटत की त्यातून कधी बाहेर येवू नये असे ते ठरवतात, मग ज्या वातावरणात आपल्याला हे यश विसरावे लागेल असे वातावरण, अशा व्यक्तींना ही माणसे टाळतात किंवा त्यांच्याशी वेगळ्या प्रकारे वागतात. पण कितीही केल तरी त्यांचे मूळ व्यक्तिमत्व बदललेले नसते. असा अनुभव आपल्याला आल्यास फारसं काही वाईट वाटून घेऊ नये. एवढ्या मोठ्या दुनियेत अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात.
गावस्कर आणि अनेक माजी खेळाडू क्रिकेटचे समालोचन करतात. हे समालोचन सतत २-३ तास ऐकले की १-२ सुविचार कानी पडतात. सतत अपयशी ठरणाऱ्या फलंदाजाला, गोलंदाजाला गावस्कर नेहमी 'He should go back to Basics' असा सल्ला देतात. आयुष्यातील हा एक सर्वात धडा आहे. आपापल्या व्यवसायात लागणाऱ्या मुलभूत गोष्टी ओळखणे आणि त्या सातत्याने अचूकपणे करत राहणे हा यशाचा एक उपलब्ध मार्ग आहे. परंतु त्यासाठी संयम हवा. बाकी ह्या आठवड्यात सलमान १-२ चांगली वाक्य बोलला. तो म्हणाला हल्लीच्या कलावंतांपैकी हृतिक रोशन हा सर्वोत्तम नर्तक आहे पण त्याची नृत्याच्या स्टेप्स सर्वसामान्यांना झेपणाऱ्या नसतात. माझा बेल्ट पकडून केलेला नाच कोणालाही जमतो त्यामुळेच तो जास्त प्रसिद्ध होतो. तो अजून म्हणाला की मी हल्ली जितकी मेहनत करतो तितकीच काही काळापूर्वी सुद्धा करायचो पण तेव्हा मात्र माझे चित्रपट सतत आपटले. सध्या माझी वेळ चांगली आहे इतकेच! जबरदस्त वाक्य! आयुष्यात कोण किती यशस्वी होणार हे भाकीत करण्यासाठी कोणतं गणिती सूत्र नाही. वेळ कशीही असो आपापल्या मुलभूत गोष्टी सातत्याने करत राहा हेच खरे.
चला आटपत घेतलं पाहिजे! कोणी काही बोलू शकत नाही म्हणून आपली फलंदाजी सुरूच ठेवायला आपण थोडेच सचिन तेंडूलकर आहोत!

मदिराप्राशनास समाजमान्यता



काळ कोणासाठी थांबत नाही, तो सदैव पुढेच जात असतो. बदलत्या काळानुसार समाजाने स्वीकारलेल्या रूढी बदलत जातात. पूर्वी वर्ज्य असलेल्या रूढी कालांतराने समाज स्वीकारतो. मद्यपान ही पूर्वीच्या काही पिढ्या वर्ज्य असलेली गोष्ट आज समाजाने बर्याच प्रमाणात स्वीकारलेली आहे. ह्याबाबत असा आक्षेप घेतला जावू शकतो की देव देखील सोमरस पान करायचेच ना ? पण आजच्या लेखाचा विषय प्रामुख्याने सुशिक्षित मध्यमवर्गाशी निगडीत आहे. मी जाणीवपूर्वक मद्यपानाच्या आहारी जाऊन संसाराची परवड करणाऱ्या लोकांविषयी इथे वळत नाही. त्यांचे मनावर नियंत्रण नाही. पूर्वीचा शिक्षित वर्ग जो बहुसंख्येने निर्व्यसनी असायचा तो आज विशिष्ट प्रसंगी मद्यपान करतो. ह्यातील बहुसंख्य लोक एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जात नाहीत. मद्यपानाचा ते आपल्या व्यावसायिक जीवनावर परिणाम होवून देत नाहीत. त्यांना मद्यपान का करावे वाटते? मला ह्यात अनुभव नाही पण एकंदरीत असे जाणवते की व्यावसायिक, वैयक्तिक जीवनातील ताणतणावापासून मुक्त होवून काही काळ एका वेगळ्या विश्वाचा अनुभव घेता यावा म्हणून त्यांनी हा पर्याय स्वीकारलेला असतो. माझे म्हणणे एकच की वेगळ्या विश्वात जाण्यासाठी केवळ मद्यपान हाच एक मार्ग नाही, संगीत, भटकंती, चित्रकला अशा अनेक मार्गांचा आधार आपण घेवू शकतो. हे पर्याय प्रथम अवलंबिण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. मला खटकणारा मुख्य मुद्दा म्हणजे घरगुती समारंभात ह्या मद्यपानाचा प्रवेश. ही सर्व दर्दी मंडळी एका वेगळ्या बैठकीच्या खोलीत जावून हा कार्यक्रम करतात. त्यामुळे सर्व लोक एकत्र येण्याची जी संधी होती ती गमावली जाते. घरात मद्यपान करणे हा पुढील पिढीसाठी आपण एक सर्वमान्य शिरस्ता करून ठेवत आहोत हे मला खूपच खटकते. दुर्दैवाने ह्या प्रथेला विरोध करणारी फार कमी अधिकारी मंडळी आता शिल्लक राहिली आहेत.

ह्या लेखात कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. ह्या विषयावर एक खुली चर्चा व्हावी हाच एक उद्देश! 


 

Tuesday, November 27, 2012

गोंधळलेला बुद्धिमान वर्ग - भाग दुसरा




शरयुताईनी एक मर्मावर बोट ठेवणारे विधान केलं. 'तथाकथित बुद्धिमान लोकांची कोणतीच जबाबदारी घेण्याची तयारी नसल्याने त्यांचा समाजाला उपयोग होत नाही किवा समाजवाद्यानी रूढ केलेली बुद्धिमंतांची व्याख्या बरोबर नाही असे असेल'.
बुद्धिमान लोक सामाजिक जबाबदारी घेत नाहीत हा इतिहास आहे. जो देश, ज्या देशातील राज्यकर्ते बुद्दीमंतांसाठी पोषक वातावरण निर्माण करतात तो देश प्रगती करतो.मध्यंतरी माझा एक मित्र म्हणाला की अमेरिका बरेच काळापर्यंत जगावर वर्चस्व गाजवेल, कारण जगभरातील बुद्धिमान लोक त्या देशाकडे आकर्षित होतील असे वातावरण, अशी धोरणे त्या देशाने आखली आहेत. ज्या वेळी ह्या परिस्थितीत बदल होईल, त्यावेळी अमेरिकेला प्रश्न भेडसावेल.
आता भारताची परिस्थिती पाहूया. आपल्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला, जो आपण स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत अनुसरला आहे त्यात आपली धोरणे बहुसंख्य लोकांसाठी (जे अजूनही प्रगतीच्या प्राथमिक टप्प्यावर आहेत) आखली जातात. बुद्धिमान जर प्रगतीच्या आठव्या पातळीवर असतील तर आपण दुसर्या, तिसर्या पातळीवर असलेल्या बहुसंख्य लोकांना आठव्या पातळीवर पोहचविण्याचा प्रयत्न करतो. ह्या पर्यायात दोन मुलभूत त्रुटी आहेत, पहिला म्हणजे बुद्धिमान लोक स्वतःला दुर्लक्षित भासून घेतात आणि परदेशगमन करतात. दुसरा म्हणजे बाकीचे प्रगत देश प्रगतीचे मापदंड उंचावत नेतात त्यामुळे आपला बुद्धिमान वर्ग मागे पडतो.
दुसरा पर्याय जो माझ्या मते आपण आता अनुसारायला हवा तो म्हणजे आपली धोरणे बुद्धिमान वर्गावर लक्ष केंद्रित करून बनवायला हवीत. बुद्धिमान वर्गाची प्रगती झाली की देश आपसूकच पुढे जाईल. कारण बुद्धिमान लोकांच्या प्रगतीमुळे बहुजनांसाठी अनेक संधी निर्माण होवू शकतात. भारताने स्वीकारलेल्या सद्य राजकीय प्रणालीत हे कितपत शक्य आहे याविषयी मी बराच साशंक आहे.
 

Saturday, November 24, 2012

गोंधळलेला बुद्धिमान वर्ग!!

 

हल्लीच एक मस्त वाक्य वाचनात आलं, जगाचा मुलभूत प्रश्न असा आहे की बुद्धिमान लोक गोंधळलेले आहेत आणि मूर्ख लोकांचा आत्मविश्वास ओसंडून वाहत चालला आहे. पण मला जाणवले की माझाही आत्मविश्वास सध्या ओसंडून चालला आहे. त्यामुळे मी थोडे गोंधळलो!!! अथवा गोंधळण्याचे नाटक केले.



असो, बुद्धिमान लोक का गोंधळले असावेत? ज्ञानाचा विस्फोट झाल्यामुळे? ज्ञानतृष्णा भागवायची असेल तर मर्यादा कधी नव्हती आणि कधी नसणारच! माझ्या मते बुद्धिमान लोकांना सामाजिक जीवनात त्याचं झपाटयान खालावणारे स्थान गोंधळवून टाकत आहे. पूर्वी जातीव्यवस्था एक गृहीतक करत असे की बुद्धिमान लोक एका विशिष्ट जातीतून निर्माण होणार. त्यामुळे त्या जातीने एकत्रित राहून सामाजिक जीवनात वर्चस्व प्रस्थापित केलं. परंतु ही व्यवस्था दीर्घकाळ टिकणारी नव्हती. ही व्यवस्था कोलमडून पडल्यावर त्याला पर्यायी व्यवस्था जी विविध जातीतील बुद्धिमान लोकांना एकत्र आणू शकेल, निर्माण करण्यास भारतीय समाजास अपयश आल. त्यामुळे बुद्धिमान लोक विखुरले गेले. त्यामुळे मूर्ख लोकांचे फावले. गोंधळ घालायला एक मूर्ख पुरेसा असतो, परंतु त्याचा गोंधळ आवरायला एकट्या बुद्धीमानास धैर्य नसत.

त्यामुळे आपल्या समाजात नव्याने रूढ होणार्या चालीरीती प्रस्थापित करण्यात बुद्धीजीवी वर्गाचा फार कमी सहभाग दिसतो. बुद्धिमान वर्गाची अजून एक गरज म्हणजे त्याला विचार करायला शांत वातावरण हवे असत. ही शांतताच बर्याच प्रमाणात त्याच्याकडून हिरावून घेतली गेली आहे. आता ही शांतता का हिरावली गेली कारण बुद्धिमान लोकांनी लक्ष्मीचा मोह धरला. लक्ष्मीचा मोह स्वतःचा उत्कर्ष करून शकतो परंतु समाजाचा नव्हे. बुद्धीमान लोकांनी सरस्वतीची उपासना करावी हेच खरे. परंतु त्यांच्यापुढे प्रलोभने इतकी निर्माण केली गेली की त्यांनी सरस्वती उपासना सोडली. बुद्धिमान लोकांना एकत्र आणू शकणारा एक समान घटक शोधून काढणे ही काळाची गरज आहे!

Saturday, November 17, 2012

सरमिसळ

 



१> प्रेमात पडलेली माणसे!



माणसे पूर्वीपासून प्रेमात पडतात. साधारणतः दुसर्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेली माणसे सहज ओळखु येतात. ही माणसे एका वेगळ्याच विश्वात वावरत असतात. लोक अशा माणसांपासून जरा दोन हात दूरच राहतात. प्रेमात पडण्याची प्रक्रिया कधी दीर्घ तर कधी अल्प काळ घेते. ती एका व्यक्तीकडून आरंभिली जाते आणि प्रेमाचे दृश्य / अदृश्य संदेश आपल्या लक्ष्य व्यक्तीच्या दिशेने पाठविले जातात. लक्ष्य व्यक्तीकडून ह्या संदेशांचे वस्तुनिष्ठरित्या मूल्यमापन केले जाते आणि कधी हे संदेश स्वीकारले जातात तर कधी धुडकावले जातात. ज्या उदाहरणात हे संदेश स्वीकारले जातात तेव्हा त्या लक्ष्य व्यक्तीची वस्तुनिष्ठरित्या मूल्यमापन करण्याची क्षमता धुळीस मिळते. स्त्रोत व्यक्तीने ही क्षमता आधीच गमाविलेली असते. त्यामुळे हे दोघे एका वेगळ्याच दुनियेत वावरत असतात असे आपण म्हणतो.



प्रेमात पडलेल्यांची ह्यापेक्षा एक वेगळी जमात असते. ही जमात चक्क स्वतःच्या प्रेमात पडलेली असतात. हे प्रेमात पडणे एकतर पूर्णपणे स्वतःच्या प्रेमात पडणे अथवा स्वतःच्या एखाद्या गुणाच्या / कलेच्या प्रेमात पडणे असतं. हे लोकं सुद्धा प्रमाणात लौकिकार्थाने वस्तुनिष्ठ विचार करण्याची क्षमता गमावितात. काही क्षेत्रात हे स्वतःच्या प्रेमात पडणे आवश्यक असत जसा की एखादा गायक किंवा धडाकेबाज फलंदाज. आता वीरेंदर सेहवाग हा स्वतःच्या प्रेमात पडलेला माणूस आहे. तो लौकिकार्थाने वस्तुनिष्ठ विचार करीत नाही म्हणून तो आपल्यासारख्या चाकोरीबद्ध जीवन लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकतो. एक जातिवंत कलाकार स्वतःच्या प्रेमात पडला असेल तरच तो अलौकिक कलेची निर्मिती करू शकतो. परंतु सामान्य माणसे जेव्हा स्वतःच्या प्रेमात पडतात तेव्हा ती डोकेदुखी बनतात! आधीच्या एका ब्लॉगमध्ये उल्लेखलेली नवलेखक, नवकवींची जमात हे एक उदाहरण! अशी स्वप्रेमाच्या कोशात गुरफटलेली माणसे दुसर्या व्यक्तीकडून वेळोवेळी दाद अपेक्षितात. हे स्वप्रेम जोपर्यंत निरपेक्ष असते तोपर्यंत ठीक असते पण ज्यावेळी ह्या स्वप्रेमाने आंधळी झालेली माणसे जेव्हा दुसर्याशी तुलना करतात तेव्हा परिस्थिती काही प्रमाणात धोकादायक बनते.



२> सद्यकालीन पालक!



१९९० च्या दशकातील आर्थिक बदलांमुळे पालकांचे वर्गीकरण करणे सोपं झालं आहे. १९९५ च्या आसपास आणि त्यानंतर पालकत्व स्वीकारलेल्या पिढीविषयी आपण बोलूयात. ह्या पिढीवर जुन्या पद्धतीनुसार संस्कार झाले परंतु बाह्यजगतात त्यांना एकदम नवीन, आधुनिक असे जग पहावयास मिळाले. आता आपल्या मुलांशी कोणत्या प्रकारे नात विकसित करायचं याचा ह्या नवपालकांनी आपापल्या परीने विचार केला असावा. मी समवयस्क पालकांचे निरीक्षण करतो त्यावेळी असे आढळून येते की त्यातील बहुतांशी पालकांनी नवसंस्कृतीला अंगिकारिले आहे. माझा त्यांच्या नवसंस्कृतीला स्वीकारण्याविषयी आक्षेप नाहीय, आक्षेप आहे तो त्यांच्या काहीश्या प्रमाणात हतबल होवून ही नवसंस्कृती स्वीकारण्याला! इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पूर्वीच्या पालकांनी १०० टक्के संस्कृतीचे हस्तांतरण करण्याचा प्रयत्न केला तर आज त्याचे ५०% हस्तांतरण (आज पालक असलेल्या पिढीकडे) झाल्याचे आपण पाहतो. जर आजच्या पिढीने केवळ थोडाफार प्रयत्न केला तर मात्र पुढील पिढीकडे झालेले हस्तांतरण शुन्य टक्क्यांकडे झुकेल यात शंका नाही. तेव्हा प्रत्येक पालकांनी विचार करायला हवा की मला हेच हवे आहे काय?



३> सर्वसामान्यांशी संवाद!



सर्वसामान्य माणसांशी संवाद ही एक महत्वाची गोष्ट आहे. सर्वसामान्य माणूस जीवनात विविध प्रसंगांना सामोरे जात असतो. ह्या प्रसंगावरील आपली टिपण्णी तो खुल्या दिलाने सार्वजनिक ठिकाणी (बस, लोकल ) सर्वांशी चर्चित असतो. त्यामुळे अशा ठिकाणाचा आम आदमीबरोबरचा संवाद ही आपली जीवनाची विविध रूपे समजून घेण्याची संधी असते. परंतु मला अचानक जाणविले की आजचा सुशिक्षित वर्ग चारचाकी वाहनातून/ रिक्षातून फिरणारा झाला आहे, तो काम करतो ते परदेशी लोकांच्या संगणक प्रणालीवर, बोलतो ते परदेशी लोकांशी, भाजी घेतो ती mall मधून! अशा प्रकारे आपण आम आदमीबरोबरचा संवाद ही एक महत्वाची गोष्ट गमावून बसलो आहोत! तेव्हा जमेल तेव्हा ही संधी निर्माण करावी हेच माझे म्हणणे!



Thursday, November 8, 2012

अंतर्मन एक पहारेकरी!




आधुनिक जमान्यात मानवाला सतत बदलत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागतं. ह्यात काही प्रसंग (बहुदा व्यावसायिक जीवनात) मानवाच्या सद्य क्षमतेच्या पलीकडचे असतात. हे प्रसंग उपलब्ध शाब्दिक, व्यवहारचातुर्य ह्या कौशल्याच्या आधारावर मानवास निभावून न्यावे लागतात. कालांतराने मानव ह्या परिस्थितीला सरावतो आणि तो पर्यंत मानवाला नवीन भूमिका मिळते आणि मग पुन्हा हे चक्र सुरु होते.
वैयक्तिक जीवनात हल्ली एक नवीन खूळ निघाले आहे. बालकांच्या मनोभूमिका समजून घेणे, त्यांना कोणत्या मानसिक संघर्षास सामोरे जावे लागते ह्यावर बरेच लेख लिहून येतात, दूरदर्शन वाहिन्यावर बऱ्याच चर्चा घडून येतात. मला हा गेल्या १० वर्षात पालकत्वाची भूमिका पत्करलेल्या पालकांवर अन्याय वाटतो. ही पिढी ज्यावेळी बालक होती त्यावेळी सुजाण पालकत्व असा शब्द अस्तित्वात नव्हता. एकत्र कुटुंबपद्धती आणि वडिलधाऱ्या माणसांचा धाक यावर बरीचशी पालकत्व निभावून गेली.
थोडक्यात सांगायचे झाले तर सध्या तीस - चाळीस ह्या वयोगटात असलेल्या पिढीकडून वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर अपेक्षांचे ओझे वाढले आहे. आणि बिचाऱ्यांना सहानुभूती सुद्धा मिळत नाही. अगदी लोकसत्ताच्या चतुरंग पासूनची प्रसारमाध्यमे बालक आणि प्रौढ यांच्या समस्यावरील विषयांनी ओसंडून वाहत असतात. मग ही मधली पिढी आपल्या परिस्थितीचा कसा सामना करते हे पाहणे मनोरंजनाचे ठरते!
मनुष्याला पूर्वीपासून अंतर्मन ही देणगी देवाने दिली आहे. हल्लीच्या काळात मनुष्याचा हा अदृश्य अवयव अधिकाधिक जागृत / सक्रीय झाला आहे. अंतर्मन सतत मानवाला सामोरे जाणार्या प्रसंगाचे ग्रहण करीत असतं. थोडा एकांत मिळाला की अंतर्मन, मानवाशी संवाद साधत, त्याला आपण विचार म्हणतो. अंतर्मनाकडे मानवाने अनुभवलेल्या प्रसंगाचा माहितीसंग्रह (data ) असतो. बहुतांशी सर्वांच्या अंतर्मनाकडे भोवतालच्या परिस्थितीत आपलं स्वतःचे स्थान कोठे आहे हे ठरविण्याची क्षमता असते.
काही माणसे अंतर्मनाचे हे विश्लेषण जसेच्या तसे स्वीकारतात आणि मग खुल्या दिलाने बाह्य जगाला सामोरे जातात.
काही माणसांच्या बाबतीत अंतर्मनाचे हे विश्लेषण त्यांना सांगत की अरे बाबा तू बाह्य जगतापेक्षा पुढारलेला आहेस. अंतर्मनाची विश्लेषण क्षमता बरोबर आहे असे गृहीत धरल्यास दोन शक्यता निर्माण होतात. पहिली म्हणजे मानव खुश होवून त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि क्वचितच त्याचे गर्वात रुपांतर होत. दुसर्या शक्यतेत मनुष्य स्वतःसाठी अधिक आव्हानात्मक परिस्थितीचा शोध घेवू लागतो.
जर समजा अंतर्मनाच्या विश्लेषणाने मानवाला सांगितलं की तू सभोवतालच्या जगापेक्षा जरा मागासलेला आहेस तर पुन्हा वेगवेगळ्या शक्यता निर्माण होतात. पहिली म्हणजे माणसात न्यूनगंड निर्माण होवू शकतो. काही माणसे अशा वेळी कमी आव्हानात्मक परिस्थितीचा शोध घेवून ती स्वीकारतात.
काही माणसे अंतर्मनाचे हे विश्लेषण धुडकावून लावतात, ते अंतर्मनातील विश्लेषणावर एक रुपांतरक बसवितात जो ह्या माणसास बाह्य जगतात आपण कसे श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करण्याची धडपड करण्यास भाग पाडतो.
आतापर्यंतच्या लेखात अंतर्मन आणि मानव हा संवाद ध्यानात घेतला. परंतु जेव्हा दोन व्यक्ती संवाद साधतात तेव्हा खर तर मानव १, मानव २, अंतर्मन १ आणि अंतर्मन २ हे घटक समाविष्ट असतात. असो एका कंटाळवाण्या लेखाच्या ह्या शेवटापर्यंत तुम्ही पोहचला असाल तर तुमचे आभार!  

Saturday, November 3, 2012

न्यू इंग्लिश स्कूल वसई- शालेय जीवनातील आठवणी


आमची १९८८ साली दहावी उत्तीर्ण झालेली बैच. ह्या आठवणींना आमच्या सहध्यायानी २००९ च्या स्नेहसंमेलनात उजाळा दिला. त्या लिखित स्वरुपात उतरविण्याचा हा प्रयत्न!

१९७८ साली आम्ही बालवाडीत प्रवेश केला. बालवाडीचा वर्ग शाळेच्या वाचनालयात भरत असे, साधले बाई ह्या आमच्या वर्गशिक्षिका आणि ठाकूर बाई ह्या मुख्याध्यापिका होत्या. शाळा बहुदा ३-४ तासांची असे आणि त्यातील बहुतांशी वेळ आम्ही रडण्यात घालवत असू. माझ्या काकी / काकू नंदिनी पाटील आणि त्यांच्या जिवलग मैत्रीण असलेल्या मांजरेकर मॅडम मला बघून जाण्यासाठी अधून मधून त्या वर्गात फेरी मारत. एकंदरीत मजेचेच वातावरण असे.

बालवाडी
रोहिणी चौधरी बाई ह्या आमच्या पहिलीच्या वर्गशिक्षिका होत्या. शालेय जीवनातील आमच्या त्या आवडत्या बाई होत. बालवाडीत एकत्र असलेले राकेश आणि निलेश राऊत ह्या राऊतबंधूंना पहिल्या इयत्तेत वेगळ्या तुकडीत जावे लागल्यामुळे त्यांच्या निरागस मनांवर फार मोठा आघात झाला :). पहिलीत जमिनीवरील बैठी बाके आणि सतरंजी अशी आमची बैठक व्यवस्था असे. वर्षात एकंदरीत चार परीक्षा असत, दोन घटक चाचण्या, सहामाही आणि वार्षिक परीक्षा. बाकी पहिलीचा अभ्यासक्रम वगैरे काही लक्षात नाही. पहिलीत असलेली स्मरणशक्ती स्पर्धा मात्र आठवते. एका खोलीत १० वस्तू ठेवल्या होत्या. आम्हा सर्व मुलांना तिथे नेवून  २ मिनटे त्या वस्तू दाखवण्यात आल्या आणि मग परत येवून त्या वस्तूंची नावे लिहिण्यास सांगण्यात आली.

आमचे क्रिकेट वेड पहिलीपासून होते. शाळेच्या मागील बाजूस असलेल्या शिक्षक वसाहतीतील पिंगळे सरांच्या दिवाणखान्यातील दूरदर्शन संच आम्ही बाहेरून पाहत असू. त्यावेळी आलेला इंग्लंडचा संघ अजून लक्षात आहे. त्यावेळी थम्स अपच्या बाटल्यांच्या झाकणात चित्र मिळत आणि ह्या चित्रांचा एक समूह गोळा केल्यास एक छोटी पुस्तिका मिळे. अशा एका पुस्तिकेत असणारी कपिल देवची असंख्य चित्रे भराभर चाळल्यास तयार होणारी गोलंदाजीची लयबद्ध धाव अजून लक्षात आहे. वर्गातील बहुसंख्य मुले वसई गावातीलच असल्यामुळे त्या सर्वांचे पालकही एकमेकांचे ओळखीचे असत. बालवाडीतील एक दुःखद प्रसंग म्हणजे वर्गशिक्षिका न येण्याचा दिवस. त्या दिवशी पूर्ण वर्ग फोडला जावून बाकीच्या तुकड्यांमध्ये तो विभागला जाई. मधल्या सुट्टीत हे सर्व बिछाडलेले जीव एकत्र येण्याचा क्षण फारच हृदयस्पर्शी असे! आमच्या वर्गात एक मंगेश पाटील नावाचा मुलगा होता. एका परीक्षेच्या वेळी तो अनवधानाने उत्तरपत्रिका घेवून घरच्या मार्गी लागला. काही अंतर कूच केल्यावर त्याला आपली चूक ध्यानात आली आणि तो बाईंना परत येवून आपली उत्तरपत्रिका देता झाला.

दुसऱ्या इयत्तेत बऱ्याच काळापर्यंत आम्हाला वर्गशिक्षिका नसल्याने आम्ही वर्ग फोडण्याच्या दुर्धर प्रसंगास बराच काळ सामोरे गेलो. काही काळानंतर कुंदा बाई ह्या वर्गशिक्षिका म्हणून आल्या. उंच वैद्य बाई आम्हाला विज्ञान शिकवीत. त्यांनी शिकवलेली वाऱ्याची 'हलत्या हवेला वारा म्हणतात' ही व्याख्या अजूनही माझ्या ध्यानी राहिली आहे. त्याच प्रमाणे विरारच्या चोरघे बाई आणि छबीला बाई ह्या आम्हास शिकविण्यास होत्या. त्यावेळची मुले चळवळी असत. वर्गात, पटांगणात, मैदानात नियमितपणे पडत. पडल्यावर त्यांना जखमा होत आणि अशा वेळी बेबीताई धावून येई आणि मग ते प्रसिद्ध लाल औषध जखमेवर लावले जाई. बहुतांशी जखमा ह्या औषधापुढे माघार घेत. शाळेच्या शिक्षकांसाठी एक कठीण प्रसंग म्हणजे शाळा तपासणी अर्थात इन्स्पेक्शन! मुलांच्या कामगिरीवर शिक्षकांचे भवितव्य ठरत असे. अशाच एका शाळा तपासणीच्या प्रसंगी आमच्या वर्गातील एका मुलास केवळ प्रसंगाच्या दडपणामुळे सीता कोण ह्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. पहिली दुसरीमध्ये केव्हातरी आमची सहल तुंगारेश्वर इथे बसने गेली होती. परत येताना आरक्षित केलेली बस बराच वेळ न आल्याने आम्हांला आणि त्याहून जास्त आमच्या बाईंना जास्त दडपण आले होते. शेवटी एकदाची बस आली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

तिसरी इयत्ता एका आनंददायी घटनेने सुरु झाली. साधना फडके ही शालांत परीक्षेत महाराष्ट्र बोर्डात सर्वप्रथम आली. सनईच्या मंगल स्वरांनी शाळेचा आसमंत भरून गेला. आम्हा सर्वांना पेढे देण्यात आले आणि शाळा लवकर सोडल्याने आमचा आनंद द्विगुणीत झाला. दूरध्वनीचे प्रमाण अत्यल्प असल्याच्या ह्या काळात ही गोड बातमी आम्ही मुलांनी आपापल्या घरी पोहचवली! चौधरी बाई ह्या आमच्या वर्गशिक्षिका म्हणून परत आल्यामुळे आम्ही आनंदलो! एका विशिष्ट दिवशी (बहुधा भगिनी चंद्राबाई ह्यांच्या स्मृतीदिनी) शाळेतील शिक्षिका जेवण बनवीत. आपल्या आवडत्या शिक्षिकांच्या हाताचे रुचकर भोजन घेणे हा एक आनंददायी प्रसंग असे. शाळेत संगीताचाही एक तास असे आणि त्यावेळी मुंडले बाई आम्हास शिकविण्यास येत. त्यावेळी बामचा घमघमाट वर्गात पसरे. मुंडले बाईंची 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे' आणि अशी अनेक गाणी अजूनही लक्षात आहेत.

चौथीत मराठीला शेंडे बाई, गणिताला कुंदा बाई, विज्ञानाला देवयानी बाई आणि इतिहासाला राऊत बाई असा शिक्षक वर्ग होता. आमचा चौथीचा वर्ग शाळेच्या प्रवेशद्वाराशी होता. त्या वर्गातून बाहेर जाण्याचे दोन मार्ग असत, एक दारातून येण्याजाण्याचा अधिकृत मार्ग आणि दुसरा गमनाचा खिडकी मार्ग! एकदा हा गनिमी मार्ग अवलंबिल्यामुळे देवयानी बाईंनी मला ओरडले होते. राऊत बाई स्कॉलरशिपचा क्लास शनिवारी शाळा संपल्यावर आणि रविवारी घेत असत. शाळेच्या मागच्या बाजूला असलेल्या पहिल्या मजल्यावरील वर्गात बऱ्याच वेळा हा क्लास होई. तेथून वसई मैदान आरामात दिसे. आमचे आणि बाईंचेही लक्ष अधून मधून तिथे असे. आंतरशालेय स्पर्धेच्या वेळी आमच्या वर्गातील रेखा कारवाल्हो बऱ्याच वेळा धावताना दिसल्यामुळे ती जिंकत असावी असा निष्कर्ष बाईंनी काढला. असेच एकदा मला एक निरोप देण्यासाठी शिक्षकांच्या कक्षात पाठविण्यात आले. तिथे शाळेचा कर्मचारी प्रश्नपत्रिकेच्या छायाप्रती काढत होता. तिथे इतिहासाच्या प्रश्नपत्रिकेतील शहाजीराजाविषयीचा प्रश्न माझ्या दृष्टीस पडला. शालेय जीवनातील माझे बरेच दिवस ठेवलेले गुपित होते. चौथी ड वर्गात धनाजी आणि कनोजिया ही मस्तीखोर जोडी प्रसिद्ध होती. ह्या दोघांच्या पट्टीच्या मारामार्या त्याकाळी विख्यात होत्या. शालेय क्रीडा महोत्सवाच्या वेळी लंगडी स्पर्धेवर आमचे विशेष लक्ष असे. फार प्रयत्न करून सुद्धा आमचा संघ लंगडी स्पर्धा कधी जिंकू शकला नाही. चौथीची परीक्षा जिल्हा पातळीवर घेतली जात असे. आमची परीक्षा बहुदा १९ आणि २० एप्रिल १९८२ रोजी झाली. प्रथम दिवशी मराठी, गणित आणि दुसर्या दिवशी इतिहास-भूगोल, विज्ञान असे वेळापत्रक होते. ह्या परीक्षेनंतर प्राथमिक शालेय जीवन संपले. एक विशेष नमूद करण्याची गोष्ट म्हणजे यात सर्व बाईच होत्या आणि कोणी गुरुजी नव्हते.

तत्कालीन शाळेतील मुलांचे वेळ घालविण्याचे काही समान छंद / उद्योग होते. बिदीच्या बाजूला वाहणाऱ्या ओह्ळातील मासे पकडणे हा फार वरच्या क्रमांकावरील उद्योग होता. तसेच जवळच असणाऱ्या वाडीतील केळींच्या फण्याविषयी ह्या मंडळीनी कधी दुजाभाव बाळगला नाही. ह्या वाड्या आपल्या असो की दुसर्यांच्या, त्यातील केळ्यांना / पपयांना ह्या शालेय विद्यार्थ्यांनी सारख्याच प्रेमाने वागविले. तत्कालीन वसईतील वातावरणाविषयी कविता आपण http://nes1988.blogspot.in/2012/08/blog-post_30.html इथे वाचू शकता.

पाचवीत प्रवेश करताना आम्ही इंग्लिशच्या आगमनामुळे उत्साहित होतो. मदने मॅडम ह्या आमच्या वर्गशिक्षिका होत्या. अत्यंत कडक शिक्षिका म्हणून त्यांची ख्याती होती. मस्तीखोर मुलांची डोकी एकमेकांवर आपटण्याची शिक्षा त्या क्वचितच अमलात आणीत. माझ्या आईची आणि त्यांची शिक्षकांच्या आंतरशालेय व्यासपीठावर ओळख असल्यामुळे मी स्वतःला काहीसा सुरक्षित समजत असे. वर्तक बाई हिंदी शिकवीत असत आणि इंग्लिश साठी मुंडले सर होते. CLASS ह्या शब्दाचे अनेकवचन मी CLASSS असे लिहिले. तेव्हा त्यांनी भर वर्गात माझे नाव न घेता 'एका गाढवाने' CLASSS असे अनेकवचन लिहिले असल्याचा उल्लेख केला. सुहास पाटीलचे ह्या वर्षी आमच्या वर्गात आगमन झाले आणि मला शाळेत येण्याजाण्यासाठी सोबती मिळाला. १९८२ साली एशियाडच्या निमित्ताने रंगीत दूरदर्शन प्रसारणास प्रारंभ झाला. ह्या स्पर्धेतील हॉकीच्या अंतिम सामन्यातील पाकिस्तानने केलेला ७ - १ असा दारूण पराभव अजूनही लक्षात आहे. मी पाचवीत असताना गणित प्राविण्य आणि प्रज्ञा स्पर्धेत भाग घेतला. ह्या स्पर्धा अंधेरीच्या परांजपे विद्यालयात झाल्या. मजेची गोष्ट म्हणजे लोकलने जाताना दोन्ही वेळा माझ्या वडिलांचे पाकीट मारले गेले. दुसऱ्या वेळी तर वरच्या खिशात पाच रुपये शिल्लक राहण्याचा दुर्धर प्रसंग ओढविला.

सहावीत गावडे मॅडम ह्या आमच्या वर्गशिक्षिका होत्या आणि त्या आम्हास इंग्लिश विषय शिकवीत. त्या वर्गातील तीन रांगांमध्ये स्पेलिंग स्पर्धा भरवित असत आणि आम्ही त्यात मोठ्या चढाओढीने भाग घेत असू. गानू सर हिंदी शिकवीत. त्यांची छडी फार प्रसिद्ध होती. एक धडा शिकवून झाल्यावर त्यावर ते मुलांना पंधरा गाळलेले शब्दांचे प्रश्न आणि दहा एका वाक्यातील प्रश्न बनवून आणायला सांगीत. त्यामुळे राम खेत गया हे वरवर निरुपद्रवी वाटणारे वाक्य मी रिक्त स्थानोंकी पूर्ती करो आणि एक वाक्य में जबाब दो अशा दोन्ही ठिकाणी टाकल्याचे मला आठवते. मी तसा शांत मुलगा होतो. एकदा गानू सरांनी २९ चा पाढा वर्गासमोर येवून बोलण्याचे आम्हास आव्हान दिले. मी ते स्वीकारले परंतु २९ सक १७४ आणि २९ साता २०३ ह्या मध्ये कोठेतरी मी गडबडलो आणि छडीचा प्रसाद मला मिळाला. ह्या वर्षी ज्ञानेश, वैभव बाबरेकर ह्या सारख्या काही नवीन मुलांचे आमच्या वर्गात आगमन झाले. ज्ञानेशचे कथ्थक नृत्य ह्या वेळी प्रसिद्ध होते. १९८३ साली भारताने क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा जिंकली आणि त्यामुळे आमच्या वर्गात क्रिकेटचे वेड नव्याने पसरले. नारळाचा थोपा आणि कोनफळे ह्यांनी आम्ही बरेच क्रीडा तास क्रिकेट खेळण्यात घालविले. आता इथल्या काही आठवणीत सहावी सातवी यांची सरमिसळ होत आहे. चूकभूल द्यावी घ्यावी. पिंगळे सर मराठी शिकवीत. एकदा त्यांनी मराठी निबंध लिहावयास दिला होता. मी चुकून 'मजा आली' च्या ऐवजी मजा आला असे लिहिले. सरांनी माझा हा उर्दू वापरण्याचा प्रयत्न समजून माझी प्रशंसा केली, त्यात सुधारणा दाखविली आणि शेवटी मराठीच्या निबंधात उर्दू वापरणे शालेय जीवनात तितकेसे बरोबर नाही असे मत नोंदविले. भारताने ह्याच सुमारास INSAT ह्या मालिकेतील उपग्रह अंतराळात सोडण्यास सुरुवात केली होती. पहिला पाऊस ह्या विषयावर निबंध लिहताना आम्ही सर्वांनी त्यावेळी दूरदर्शनवर दाखविल्या जाणाऱ्या INSAT उपग्रहाद्वारे घेतल्या गेलेल्या चित्राचा संदर्भ देण्यास सुरुवात केली. बाबरेकर सर इतिहास शिकवीत. परीक्षा झाल्यावर मुले उत्तरपत्रिका आणल्या का असे प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडत असत. अशा वेळी आताच वाटेत रद्दीवाला भेटला आणि त्याला तुमच्या उत्तरपत्रिका देवून टाकल्या असे त्यांचे आवडते उत्तर असे. वैद्य सरांचे धाकटे भाऊ आम्हाला सातवीस इंग्लिश शिकविण्यासाठी आले. त्यांची 'तर सांगायची गोष्ट अशी की' ही प्रस्तावना आमची आवडती बनली होती. पाचवी ते सातवी शाळा सकाळची असे आणि ह्यातील एक दिवशी सकाळी PT चा तास असे. त्यावेळी उभ्या आणि बैठ्या व्यायामप्रकारांचा सराव होत असे. पठाण सर ह्यात पुढाकार घेत असत. ह्या वेळी वाजविले जाणारे Tudutu tudutu tudutu tu …. Tudutu tudutu tudutu tu …. हे संगीत न्यू इंग्लिश स्कूलच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या अजूनही चांगलेच स्मरणात आहे. त्यावेळी statue आणि जॉली असल्या प्रकाराने मुले आपली करमणूक करून घेत असत. सातवीत पुराणिक सर हिंदी शिकविण्यासाठी आले. सर मध्येच उग्र स्वरूप धारण करीत. असेच एकदा त्यांनी कोणी कोणी पुस्तके आणली नाहीत ह्याची तपासणी करण्यास सुरुवात केली. पुढील बाकांची तपासणी करत करत ते मागे येत असता समीर कंक ह्याने पुढचा दुर्धर प्रसंग ओळखून बाकांच्या खालच्या मार्गाने प्रस्थान केले आणि तो पहिल्या बाकावर प्रकटला. हा प्रसंग आमच्या सर्व वर्गाच्या अजूनही चांगलाच लक्षात आहे. ह्यावेळी शाळेचे स्नेहसंमेलन हा एक चांगला उपक्रम असे आणि मुल-मुली त्यात उत्साहाने भाग घेत. 

 सातवीची स्कॉलरशिप परीक्षा सेंट ऑगस्टीन शाळेत १० मार्च १९८५ रोजी झाली. ह्याच दिवशी बेन्सन आणि हेजेस स्पर्धेचा, भारत - पाकिस्तान असा अंतिम सामना होता. मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी ह्या तीन पेपरांच्या मधील सुट्टीत मी अवि सावे (१९८५ batch ) ह्यांच्या घरी जावून ह्या सामन्याचा आनंद लुटला. आठवीत गेल्यावर शाळा दुपारची झाली. काही गोष्टी नव्याने आल्या. NCC आणि Scout ह्या विद्यार्थी चळवळींचे आम्ही सभासद बनलो. ह्या मुलांना १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळे. ह्या कार्यक्रमाचा सराव फार जोरात चाले आणि अजूनही चालतो. NCC ची मुले Scout च्या मुलांपुढे भाव खात. वार्षिक लसीकरणाचा कार्यक्रम साधारणतः पावसाळ्यात हाती घेतला जाई. तो बाका प्रसंग ओढविल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने शाळेत पसरे. मग मुलांमध्ये हे टाळण्यासाठी काही निमित्त शोधता येईल काय याचा प्रयत्न सुरु होई. लसीकरणाच्या दुसर्या दिवशी बरीच मुले तापाने आजारी पडतआणि शाळेतील उपस्थिती कमी होई. न आजारी पडलेली मुले, आपल्या प्रतिकारशक्ती विषयी मोठी फुशारकी मारीत.

जानेवारी महिन्यात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आटोपल्यावर दुसरी घटक चाचणी होत असे. आणि मग फेब्रुवारी महिन्यात ३ दिवसाचा वार्षिक क्रीडामहोत्सव असे. त्यावेळी थंडी अगदी जोरात असे. सकाळी सात वाजता मैदानावर हजर व्हावे लागे. थंडीने दात कडकडा वाजण्याचा अनुभव ह्या क्रीडामहोत्सवात मी घेतला आहे. प्राथमिक शाळेत आधी वर्णन केल्याप्रमाणे लंगडी स्पर्धेत अजिंक्यपद मिळविण्यात आम्हां मुलांना कधीच यश मिळाले नाही. नववीत असताना क्रीडा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजता मी मैदानावर हजर होतो आणि अचानक आमचा कबड्डीचा सामना घोषित झाला. मला काहीशा नाइलाजाने मैदानात उतरावे लागले. राहुल सारखी आमच्या वर्गातील तगडी मुले त्यावेळी मैदानात नव्हती. त्यामुळे आमचा संघ आधीच कमकुवत होता आणि समोर बलवान ड वर्ग होता आणि बहुदा पठाण सर धावते समालोचन देत होते. कोणास ठाऊक कसं पण सुरुवातीलाच मी चुकून एक पकड केली आणि नंतर भाग्याने आम्हांला साथ दिली आणि बघता बघता आम्ही तगड्या ड संघावर लोण चढविला. त्यामुळे आणि सरांच्या रसभरिल्या धावत्या समालोचनामुळे ड वर्ग पुरता चवताळला. त्यानंतर मात्र त्यांनी आम्हांला जराही संधी दिली नाही. एक दोन वेळा माझी जोरदार पकड करून मग पिटाई सुद्धा करण्यात आली.

ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर अ संघ खोखोच्या सामन्यात अजिंक्यपद मिळवे. अमित काणे वगैरे लोकांनी असा इतिहास निर्माण केला होता. पण आमच्या संघात मात्र अशी कोणतीच लक्षणे दिसत नव्हती. आम्ही पहिल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यातच गारद होत असू.

शनिवारची सकाळची शाळा संपल्यानंतर आठवी अ विरुद्ध ब किंवा आठवी अ विरुद्ध नववी अ असे टेनिस चेंडूंचे सामने घेण्याची त्यावेळी परंपरा होती. प्रत्येकी एक रुपया वर्गणी काढून हे सामने खेळले जात. त्यावेळी राकेश राऊत हा आमचा वेगवान (?) गोलंदाज होता. तो बऱ्याच लांबून धावत येवून चेंडू टाकायचा म्हणून वेगवान! तसं म्हटले तर अजूनही त्या परिस्थितीत काही बदल झाला नाही!! पण एकदा राहुल साठे सामना खेळावयास आला आणि त्याने वेगवान गोलंदाजी म्हणजे काय असते ह्याचे प्रात्यक्षिक घडविले. त्याने ३-४ षटकात प्रतिस्पर्धी संघाचे ५ -६ फलंदाज तंबूत परत पाठविले. त्या नंतर तो दमल्यावर पुढील तळाचे फलंदाज बाद करता करता आमच्या नाकी नऊ आले ही गोष्ट वेगळी! मी ह्या सामन्यात कधी कधी भाग घेत असे. तसा मी चांगला फलंदाज असल्याचा माझा विश्वास लहानपणापासून आहे. अशा सामन्यात मला सलामीला पाठविले जाई. प्रत्येक चेंडूवर एक तरी धाव झाली पाहिजे अशा माझ्या अट्टाहासापायी मी लवकरच बाद होई. योगेश पाटीलने त्याला मी चौकार मारल्यावर माझा उडविलेला त्रिफळा माझ्या अजूनही लक्षात आहे.
आठवीत मी पुन्हा गणित प्राविण्य आणि प्रज्ञा परीक्षेस बसलो. ह्यावेळी नारखेडे सर आमचे क्लास घेत. 0 ! = १ ही संकल्पना त्यांनी आम्हाला शिकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु काही कारणास्तव आम्हाला ते पटतच नव्हते मग शेवटी त्यांनी त्या दिवसापुरती क्लास सोडून देवून स्वतःची सुटका करून घेतली. ह्या वेळेला प्राविण्य परीक्षा शाळेतच झाल्याने पाकीटमारीच्या संभाव्य धोक्यापासून आम्ही वाचलो!

बाकी मुलांची मस्ती खूप वाढली होती. नववीत तुपकरी मॅडमना आमचा वर्ग भंडावून सोडीत असे. दहावीत एकदा गृहपाठ न केल्यामुळे मोद्गेकर सरांनी सर्व मुलांना बाहेर काढले होते. त्यात एकाही मुलीचा समावेश नव्हता! खरोखर त्या सर्वांनी गृहपाठ केला होता की नाही हे देव जाणे! पण मुलांनी बाहेर काढल्यावर फुटबाल घेवून मागच्या मैदानावर प्रस्थान केले. एकटा ज्ञानेश मात्र पश्चातापदग्ध होऊन वर्गाबाहेर तासभर उभा राहिला. आठवीत आमची सहल महाबळेश्वर आणि पाच किल्ले अशी गेली होती. त्यात मजेचे खूप प्रसंग आले. एकदा नदीवर आंघोळ केल्यावर मुलांनी बसवर कपडे वाळत घातले. काही वेळानंतर स्थळ दर्शनानंतर बस सुरु होताना वरील कपड्यांची आठवण कोणास राहिली नाही आणि तासाभराने आठवण झाल्यावर वार्यावर उडून गेलेल्या कपड्याच्या आठवणीने सर्व हवालदिल झाले! नववीत आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा वसई मैदानावर सुरु झाली! उद्घाटनाची ही स्पर्धा आपल्या शाळेने जिंकली. त्यावेळी सुजित देवकर, मिलिंद पाटील अशा दिग्गज (?) खेळाडूंचा उदय झाला! त्यावेळी बरेच विवादास्पद प्रसंग ओढवयाचे! उपांत्य फेरीच्या सामन्यात आपल्या गोलंदाजास पंच सल्ला देत असल्याचा आरोप नॉन - स्ट्रायकर फलंदाजाने केला. त्यानंतर अर्धा पाऊण तास मैदानावर गोंधळ माजला होता.

नववी, दहावी मी फडके सरांकडे क्लास सुरु केला. त्यांच्या आणि मृणाल / संगीता मॅडमच्या मार्गदर्शनाचा मला  लाभ झाला. नववी ते दहावीच्या मी महिन्याच्या सुट्टीत त्यांनी माझा दहावीचा बराच अभ्यास करून घेतला होता. पठण शक्ती कशी सुधारायची याचे उत्तम प्रशिक्षण मला इथे मिळाले. आठवी पासून शाळेत शिकविण्यासाठी N C राऊत, मोद्गेकर, भिडे सर, सापळे मॅडम, कुलकर्णी मॅडम, विंद्वास मॅडम ह्यांच्या सारख्या दिग्गज शिक्षकांचा समावेश होता. एकंदरीत ते वातावरण भाराविलेले होते. १९८५ साली वासंती केळकर, शीतल गवाणकर, १९८६ साली संयोगिता, १९८७ साली मोना, नीलिमा महाडिक ह्या सर्वांनी शालेय गुणवत्ता यादीत येवून शाळेचे नाव प्रसिद्ध केले होते. मोद्गेकर सरांची भूगोल शिकविण्याची पद्धत असो की भिडे सरांचे गणित शिकविण्यातील कसब, विषयाच्या मूळ गाभ्यापर्यंत जाण्याचे कसब ह्या दिग्गज शिक्षकांमध्ये होते. चंद्राची एकच बाजू पृथ्वीवरून का दिसू शकते हे मोद्गेकर सर स्वतः गोल गोल फिरून समजावून देत असत, दुसर्या महायुद्धाची कारणे स्पष्ट करताना सरांनी मनाने त्या काळात प्रवेश केलेला असायचा! कर्मधारय, बहुव्रीहि समास आणि संधी राऊत सरांकडून शिकण्याची संधी ज्यांना मिळाली त्यांच्यासारखे भाग्यवान तेच. बीजगणितातील समीकरणांचा पाया भिडे सरांनी इतक्या भरभक्कमरित्या उभारला की पुढील महाविद्यालयीन जीवनात गणित कधी कठीण वाटले नाही, तीच गोष्ट सापळे मॅडमनी शिकविलेल्या विज्ञान शाखेची! कुलकर्णी मॅडमनी शिकविलेल्या देव, माला आणि वन ह्या शब्दांची संस्कृत रूपे आठविण्याचा अयशस्वी प्रयत्न अजूनही मी कधी कधी करतो!

२० फेब्रुवारीला शाळेचा सेंड ऑफचा कार्यक्रम झाला. १६ मार्च ते २९ मार्च अशी दहावीची परीक्षा आटोपली आणि २० जूनला निकाल लागल्यानंतर सर्वांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी बाह्य जगात प्रवेश केला! अशा ह्या शालेय जीवनातील माझ्या आठवणी, जितक्या आठवल्या तितक्या इथे नोंदल्या!