http://patil2011.blogspot.in/2015/03/blog-post_27.html
अचानक बाहेर आवाज आला म्हणून साधनाने बाहेर येऊन पाहिलं तर तिचा गावाकडचा मामा सुद्धा आला होता. मामाला पाहताच साधनाला बरं वाटलं तशी ती चिंतेतसुद्धा पडली. मामाने आयुष्य फक्त गावातच काढलं होतं. त्यामुळे त्याच्याशी बोलताना आपण कोणत्या जुन्या जमान्यातील माणसाशी बोलतो आहोत असा तिला सदैव भास होत असे. ह्या क्षणी त्याचं अस्तित्व काहीसं गरजेचं होतं.
मामाला घेऊन ती प्रतीक्षागृहात आली. तिथून मामानं मोहनकडे एक नजर टाकली आणि त्याच्या चेहऱ्यावरील भाव अचानक पालटले. "झाड धरलंय! झाड धरलंय!" असं काहीसं तो पुटपुटला. तो जसा आला तसा दुसऱ्याच क्षणी वेगानं जवळजवळ धावतच बाहेर पडला.
आजूबाजूच्या अर्धपारदर्शक आकृत्या अचानक शांत होऊ लागल्याचं पाहताच मोहन आश्चर्यचकित झाला. त्यानं बाजूला पाहिलं तर बाजूची आकृती अगदी ताणली गेली होती.
"ह्या दुनियेतून बाहेर निघण्याचा विचार सुद्धा कसा मनात आणलास तू!" त्या पोकळीतील एका कोपऱ्यातून एक गंभीर आवाज आला. रुहीचं प्रतिनिधित्व करणारी आकृती शांतच होती. अचानक तिच्या अवतीभोवती दिवे पेटवले गेले. त्या दिव्यांच्या आगमनाने मात्र रुहीला असह्य असा त्रास होऊ लागल्याचं तिच्या विव्हळण्याच्या आवाजातून भासू लागलं.
"तुम्हां दोघांना असंच असंख्य वर्षे वेदनेत ठेवणार आहोत आम्ही!" तो आवाज जणू काही आपला निर्णय सुनावत होता.
http://patil2011.blogspot.in/2015/03/blog-post_27.html