Friday, June 14, 2019

युवराज - नियतीला पडलेलं एक सुंदर स्वप्न!

माझ्या नियमित ब्लॉगची लिंक  साधं सुधं!! साधं सुधं!!



कलाक्रीडा क्षेत्रामध्ये दोन प्रकारचे कलाकार, क्रीडापटू असतात! पहिल्या प्रकारातील मंडळी ही चाकोरीबद्ध मार्गाने,  महत्प्रयासाने आपली कला अथवा क्रीडाकृत्ये पार पडत असतात.  यामध्ये कर्तव्यपुर्ती करणे हा एक महत्त्वाचा भाग असतो.  त्यामुळे होतं काय की ह्या कलेचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांना अथवा रसिकांना ह्या सादरीकरणातुन दिलखुलास आनंद मिळण्याची शक्यता कमी असते.  दुसऱ्या प्रकारातील कला-क्रीडाकार हे आपल्या मनाचे राजे असतात! कलंदर असतात! दुनियेनं आखुन दिलेल्या रितीप्रमाणे आपलं आयुष्य जगणं, आपली कला सादर करणे त्यांना मंजूर नसतं!  आपली कला, क्रीडा ते आपल्या मर्जीनुसारच रसिकांसमोर सादर करीत असतात.  मात्र जेव्हा केव्हा त्यांची भट्टी जुळून येते त्यावेळी त्यांनी सादर केलेला नजराणा हा रसिकांच्या मनात कायमचा घर करुन बसतो! असाच एक मनस्वी खेळाडु युवराज सिंग!! 

युवराज या आठवड्याच्या सुरुवातीला अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर करता झाला! माझा भावनाविवश होणारा मित्र राकेश याचा मला निरोप आला युवराजवर जमेल तितकं लिही!! माझ्या मनातही थोड्याफार प्रमाणात विषय हा विचार खूप घोळत होताच! राकेशनं सांगताच त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. 

युवराजने अचानक निवृत्ती घेतली असावी का? मला तरी नाही वाटत.  ज्या संघाविरुद्ध खेळताना तो पेटुन उठायचा,  त्याच्या डोळ्यांमध्ये ती चमक भरलेली दिसायची,  त्या ऑस्ट्रेलिया संघाचा भारताने आदल्या दिवशी विश्वचषक स्पर्धेच्या एका चित्तथरारक लढतीमध्ये पराभव केला होता. बहुधा त्या विजयाने तृप्त होऊनच युवराजने आपली निवृत्ती जाहीर केली असावी हा माझा सिद्धांत!  

माझं मन बरेच वर्षे मागे गेलं.  ते २००० साल होतं. मी इंग्लंडमध्ये असताना केनियामध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जात होती.  तिथं विशीसुद्धा न गाठलेला,  (मिसरुड सुद्धा पुर्ण न फुटलेला ! हा मराठीतील आवडता शब्दप्रयोग !)  एक पंजाबी युवक भारतातर्फे आपले पदार्पण करीत होता.  आपल्या पहिल्याच सामन्यात त्यानं एका दिलखुलास खेळीचा नजराणा भारतीय प्रेक्षकांसमोर पेश केला.  त्याची ८४ धावांची ही खेळी भारताला ऑस्ट्रेलियावर विजय मिळून दिली गेली! एका युवराजाचे आगमन झाले होते!! बाकी काही महिन्याची मैत्री असलेले माझे इंग्लिश मित्र युवराजने त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानं त्याच्यावर बेहद खुश होते !

नावाने युवराज असला तरी त्याच्या आयुष्याची पटकथा काही एखाद्या सिनेमातील काल्पनिक राजकुमाराच्या जीवनकथेसारखी आनंदभरी नव्हती.  बहुदा त्यामध्ये दुःखाचे क्षणच अधिक पेरलेले असावेत.  त्याच्या आयुष्यात लहानपणापासूनच नियतीने संघर्षाच्या क्षणांची पेरणी केली होती.  बालपणात केव्हातरी आई-वडिलांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.  युवराज आपल्या आईसोबत राहू लागला.  खरंतर वडील भारतातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले खेळाडू !परंतु युवराजने मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे त्यांचा आणि युवराजचा अबोला अनेक वर्षे टिकून राहिला.  ते बहुदा खूप कडक असावेत.  क्रिकेट सोडून बाकी कोणताही खेळ युवराज ने खेळावा हे त्यांना मंजूर नव्हते, मित्रमंडळींबरोबर जास्त भटकणे सुद्धा त्यांना खपत नसावे.  या सर्वांमुळे कुठेतरी हा युवराज आपल्या वडिलांपासून मनानं आणि संगतीने दुरावला गेला. गेल्या आठवड्यात त्याच्या आईच्या मुलाखतीची काही क्षणचित्रे पाहायला मिळाली. त्यात युवराज फलंदाजीला आला की मी प्रत्यक्ष त्याची फलंदाजाची पहात नाही असं ती म्हणाली !  कारण मी जर त्याची फलंदाजी पाहायला लागले तो तात्काळ बाद होतो अशी त्या भोळ्या माऊलीची भाबडी समजूत!!

२००० सालच्या त्या स्वप्नवत आगमनानंतरसुद्धा युवराज भारतीय संघात कायमचा स्थिरावला असे नाही.  एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याचे स्थान जरी बऱ्यापैकी पक्के असले तरी कसोटी संघात मात्र त्याला सुरुवातीच्या काळात क्वचितच स्थान मिळाले.  मुलाखतीत बोलताना त्यानं ह्याचा उल्लेख केला.  त्यावेळच्या संघाच्या मधल्या फळीत राहुल, सचिन, गांगुली, लक्ष्मण यांच्यासारखे रथी-महारथी होते. त्यामुळे यातील कोणी दुखापतग्रस्त झाला तरच बाकीच्यांना संधी मिळायची.   ऐन उमेदीच्या काळात त्याला कसोटी संघाबाहेर राहावं लागलं.  

कालांतराने T20 प्रकारानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चंचूप्रवेश करून विविध आंतरराष्ट्रीय लीगद्वारे चांगलंच बस्तान बसविले.  २००७  सालच्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेतील दारुण पराभवानंतर भारतीय संघ लगेचच तीन-चार महिन्यांनी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या T20 सलामीच्या विश्वचषक स्पर्धेसाठी गेला होता.  एका विसरण्याजोग्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेनंतर या T20 विश्वचषक स्पर्धेत मात्र भारतानं अविस्मरणीय कामगिरी करत ह्या चषकावर आपले नाव कोरले.  या सर्व स्पर्धेत लक्षात राहण्यासारखा क्षण म्हणजे स्टुअर्ट ब्रॉडला युवराजने एका षटकांमध्ये ठोकलेले सहा षटकार!  आणि ह्याला कारणीभूत ठरलं ते इंग्लंडच्या एका खेळाडूनं या षटकाआधी युवराजला डिवचणं! या देखण्या पंजाबी तरुणाचे रक्त खवळले की काय होऊ शकतो याचा पुरावा साऱ्या विश्वाने त्यादिवशी अनुभवला.  भारताने हा सामना आणि मग त्या पुढे विश्वचषक स्पर्धा देखील जिंकली! 

२००८ साली आयपीएलचे भारतात आगमन झाले.  युवराज पंजाब किंग्स इलेव्हनतर्फे अधुनमधुन धमाकेदार खेळ्या खेळत राहिला! मग आली ती  २०११ साली भारतात आयोजित केली गेलेली विश्वचषक स्पर्धा! या स्पर्धेत युवराज पुर्ण बहरामध्ये होता! फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांमध्ये त्याने आपल्या कर्तुत्वाची झलक दाखवत या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेँट हा किताब पटकावला! भारताला विश्वचषक स्पर्धा जिंकून देण्यात त्यानं मोलाचा वाटा दिला! त्यानंतर कसोटीतील मधल्या फळीतील ते चार दिग्गज एकामागून एक निवृत्त होत गेले. मधल्या फळीतील काही जागा रिकाम्या झाल्या.  परंतु सरासरीकडे लक्ष देत शिस्तबद्ध खेळ खेळण्याची सवय युवराजला कधीच अंगवळणी पडली नाही.  तो आपली जिंदगी जगला तो आपल्या मर्जीने! 

या आठवड्यात मुलाखतीत तो म्हणाला सुद्धा! "या कालावधीत माझी कसोटी सरासरी ही सदैव तीस-पस्तीसच्या आसपास घोटाळत राहिली! काश मलाही सरासरी पन्नाशीच्या आसपास नेता आली असती तर!!"  या सुमारासच नियतीने या युवराजच्या आयुष्याच्या कथेमध्ये एक एका कष्टदायी पर्वाची पेरणी केली होती.  या जिंदादिल पंजाबी युवकाला कर्करोगाने ग्रासले होते.  ही बातमी जाहीर होताच अवघा भारत हळहळला! परंतु हा युवराज कर्करोगासारख्या असाध्य रोगाला हार मानणाऱ्यातला नव्हता.  त्यानं  मोठ्या जिद्दीनं  या कर्करोगाला तोंड दिलं  आणि विजयी होऊनच तो बाहेर पडला. अमेरिकेतील इंडियानापोलिस येथे हे कर्करोगावर उपचार घेत असताना आपल्या मनस्थितीविषयी तो मुलाखतीत बोलत होता. अनिल कुंबळे म्हणाला की तिथं सुद्धा तो आपल्या या आधीच्या खेळांच्या चित्रफिती पहात होता.  बरं झालं की की पुन्हा एकदा पुनरागमन दणक्यात साजरं करायचं याची स्वप्न पाहत होता. या पठ्ठ्याने हे हे साध्य केलं सुद्धा! 

जरी त्याला आंतरराष्ट्रीय खेळामध्ये ते पुन्हा आपलं स्थान पक्क करता आलं नाही तरी तो आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळ्या करत राहिला. यावर्षी मात्र सुरुवातीला त्याला कोणत्याच फ्रॅन्चाइसीने  आपल्या संघांमध्ये घेण्यास फारसा रस दाखवला नाही.  शेवटी मुंबई इंडियन्सने  त्याला एक करोड या किमतीवर आपल्या संघात घेतलं. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये तो खेळला देखील!  परंतु तो सुरुवातीचा जोष, ती चमक कुठेतरी हरवली होती! हे जसं क्रिकेट रसिकांना समजलं तसं किंबहुना त्याहून आधीच युवराजला सुद्धा जाणवलं होतं.  एका मानी माणसाला आपल्या उतरणीला लागलेल्या कलेचं  सर्व जगासमोर प्रदर्शन करणं कदाचित खूपच जिव्हारी लागलं असावं! म्हणूनच त्यांना सन्मानपूर्वक निवृत्ती घेणे पत्कारला असावं !

युवराजने  मध्यंतरीच्या काळात विवाह केला आहे.  आता त्याचे वडिलांशी संबंधसुद्धा सुधारले आहेत! "क्रिकेटला देण्यासाठी माझ्याकडे अजून बरंच काही आहे.  मी आत्ताच निवृत्त झालो आहे.  काही काळ थोडी विश्रांती घेऊन मी कोणत्या ना कोणत्या रुपात तरी क्रिकेटला माझे योगदान देणे सुरू ठेवीन!"  युवराज म्हणाला!! आम्ही सर्व क्रिकेट रसिक त्याची आतुरतेने वाट पाहू!!

युवराज तु कायमचा लक्षात राहशील ते तुझ्या मैदानावरील राजेशाही वावरण्यामुळं,   गोलंदाजाने टाकलेला चेंडू येताना तुझ्या त्या डोळ्यातील  दिसणाऱ्या चमकीमुळे आणि एखादा षटकार ठोकतानादेखील चित्रकाराने आपल्या कुंचल्याचा एक हळुवार फटकारा मारावा त्याप्रमाणं जाणवणाऱ्या त्या नजाकतीमुळे!! 

युवराज लौकिकार्थानं जरी तुला महाराज बनता आलं नसलं तरी आम्हां साऱ्या क्रीडा रसिकांच्या हृदयावर मात्र तू नक्कीच साम्राज्य गाजवलं आणि गाजत राहशील! आयुष्यातील तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला आम्हां सर्वांच्या मनःपुर्वक शुभेच्छा !!

No comments:

Post a Comment