आमचे कुटुंब तसे प्रातिनिधिक वसईचे कुटुंब. लहानपणी गल्लीत क्रिकेट खेळावे, वसई मैदानावर जाऊन होळी विरुद्ध पारनाका या संघातील मे महिन्यातील दोन दिवसांचा अंतिम सामना पाहावा, ऑस्ट्रेलिया मध्ये खेळल्या जाणार्या सामन्यासाठी सकाळी साडेचार वाजता उठून दूरदर्शन समोर जाऊन बसावे (माझे वडील तर सामन्याच्या अर्धा तास आधी उठून चहा बनवून मग TV पुढे बसत), जुन्या जमान्यातील खेळाडूंच्या आठवणी तासंतास काढाव्यात हे काही आमच्या कुटुंबीयांतील पुरुष मंडळींचे गुणधर्म! आमच्या आधीची पिढी (वडील, काका) ही एकदम बिनधास्त, कौटुंबिक शांततेसाठी क्रिकेटचा त्याग करावा असा विचार त्यांच्या मनाला शिवलासुद्धा नाही. पण मी आणि माझा भाऊ मात्र नवीन पिढीतील, आमचे क्रिकेट वेड बदलत्या काळानुसार (सुज्ञानी समजून घ्यावे) आटोक्यात आले. तर अशा या क्रिकेट वेडाच्या या काही आठवणी
क्रिकेटची पहिली आठवण पहिलीतील (साल १९७९) , इंग्लंडचा संघ भारतात आलेला, बोथम एकदम जोरदार फॉर्ममध्ये होता पण आपला कपिल सुद्धा त्याच्या तोडीस तोड. साडेचारच्या १० मिनिटांच्या सुट्टीत अनुप बरोबर जाऊन पिंगळे सरांच्या घरांच्या बाहेरून त्यांच्या दिवाणखान्यातील दूरदर्शन संचावरील दिवस अखेरीचा स्कोर बघण्याची मजा काही औरच! त्यावेळी घरी TV नसल्याने सगळा शौक वोल्वच्या रेडिओवर धावते समालोचन ऐकून घेवून भागवावा लागत असे. १९८१ साली भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेला असताना तिसर्या कसोटी सामन्यात सुनील गावस्करला चुकीच्या पद्धतीने पंचाने बाद ठरविल्यावर त्याने चेतन चौहानला आपल्यासोबत मैदानाबाहेर नेण्याचा निर्णय घेतला. नशिबाने संघ व्यवस्थापनाने त्याला वेळीच रोखले. आता ही गोष्ट धावते समालोचन ऐकून आम्हाला कळली नाही ती बाब वेगळी. शेवटच्या दिवशी कपिलने वेदनाशामक injection घेवून घावारीच्या मदतीने ऑस्ट्रेलिया संघाला ८३ धावांत गारद केले. हे पूर्ण समालोचन रेडिओवर मी ऐकले. क्रिकेट आणि अंधश्रद्धा ह्या दोन्ही बहुदा एकत्रच असतात. त्या दिवशी कपिल आणि घावरी ऑस्ट्रेलियाला गारद करत असताना ज्या वेळी आम्ही समालोचन ऐकत होतो त्यावेळी विकेट पडत नव्हती आणि रेडिओ बंद केल्यावर मात्र पटकन विकेट पडायची. त्यामुळे रेडिओ बंद / चालू करत करत आम्ही ऑस्ट्रेलियाचा डाव संपविण्यात मोलाचा हातभार लावला.
भारतीय संघाबरोबर आमचे गल्लीतील क्रिकेट सुद्धा जोरात होते. गल्लीतील प्रत्येक घरात एक दोन क्रिकेट वीर होते. माझ्या भावाच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली माझी जडणघडण (?) झाली. आमच्या गल्लीच्या संघाचे मैदान म्हणजे आमचे अंगण. स्टम्पच्या उजव्या बाजूला बाग. बागेतील झाडांना ही मुले कितपत हानी पोहचवतात यावर कडक नजर ठेवून असणारी आजी आणि डाव्या बाजूला चेंडू मारल्यास ओरडणारे शेजारी यामुळे V मध्ये खेळण्याची मला सवय लागली. समोरच आमच्या घरांच्या काचा होत्या. नरेंद्र हिरवानीने सनसनाटी कसोटी पदार्पण केल्यावर मी देखील गल्ली क्रिकेट मध्ये लेग स्पिन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी मला ३-४ विकेट मिळाल्या. परंतु शेवटी आमच्या एका शेजार्याने माझ्या गोलंदाजीवर फटका मारून घराची काच फोडली. त्या फटक्यानंतर त्या दिवशीचा खेळ अकस्मात संपला, त्या नंतर घराच्या तपास समितीपुढे (अध्यक्ष्य आजी), मला आणि माझ्या भावाला हजर करण्यात आले. तिथल्या चौकशीला तोंड देवून बाहेर पडताच माझ्या भावाने माझी कान उघाडणी केली. कशाबद्दल तर लेग स्पिन करून काच फोडण्यास अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरल्याबद्दल! गोलंदाजीच्या टोकाला असणारे आमचे जांभळाचे झाड मे महिन्यात जांभळाच्या भाराने वाकलेले असायचे. ती जांभळे तोडण्याचा बहाणा म्हणून आमचा शेजारी विजय वेगवान गोलंदाज झाला. जाम्बुंचा तोंडात बकाणा भरून जोरात धावत येणाऱ्या विजयला पाहून यष्टीरक्षण करणाऱ्या माझ्या छातीत धडकी भरत असे. विजय आणि मी एका संघात आणि माझा भाऊ आणि विजयचा भाऊ स्टीफन विरुद्ध संघात अशी संघ रचना असे.
शाळेत सातवी पर्यंत क्रिकेट खेळले जायचे ते PT च्या तासाला. बर्याच वेळा नारळाच्या झावळीचा थोपा आणि कोनफळ हीच आमची क्रीडा साहित्ये होती. आठवीच्या सुमारास अ विरुद्ध ब वर्गाचे सामने सुरु झाले. हे सामने शनिवारी शाळा सुटल्यानंतर लगेच आयोजित केले जायचे. राकेश आमचा त्यावेळेचा तथाकथित वेगवान गोलंदाज होता. वेगवान अशासाठी कि बर्याच लांबून येवून धावत येवून गोलंदाजी टाकायचा म्हणून. बाकी त्याची ही सवय अजून कायम आहे! राहुल साठेने आठवीत केव्हा तरी या सामन्यात पदार्पण केले आणि त्या दिवशी पहिल्याच ३-४ षटकात ब वर्गाच्या ५ विकेट घेवून त्यांना जोरदार हादरा दिला. का कोणास ठावूक पण मला आघाडीच्या फलंदाजाचे स्थान देण्यात यायचे. डावखुर्या योगेश पाटीलला एक चौकार मारल्यावर दुसर्याच चेंडूवर त्याने माझा उडविलेला त्रिफळा अजून लक्ष्यात आहे. त्या वेळी मी फेकी गोलंदाजी करत असल्याचे आमच्या गल्लीत जाहीर करण्यात आले होते, पण आमच्याच अंगणात खेळले जात असल्याने मी बिनधास्त गोलंदाजी करत असे. शाळेत ही गोष्ट कोणाच्या लक्षात आली होती कि नाही हे माहित नाही पण जर सर्व मुख्य गोलंदाज थकले तर माझ्याकडे चेंडू सोपविला जात असे. अश्या एका क्वचित क्षणी सुहास पाटीलचा उडविलेला त्रिफळा हा माझ्या गोलंदाजीच्या कारकिर्दीतला अविस्मरणीय क्षण!
१९८३ सालच्या prudential विश्वचषकाच्या वेळी साखळीचे सर्व सामने BBC रेडिओवर मी ऐकले. त्यावेळी ८ संघ विश्वचषक स्पर्धेत भाग घेत. ते दोन गटात विभागले गेले असत. एकाच दिवशी प्रत्येक गटातील २ याप्रमाणे एकूण ४ सामने खेळवले जात. त्या विश्वचषक वेळी मी सहावीत होतो. आणि गानू सरांनी दिलेले हिंदीच्या धड्यावर स्वतःच एका वाक्यातील उत्तरांचे १० प्रश्न आणि १५ गाळलेल्या जागा भरण्याचे गृहपाठ करीत हे सर्व सामने ऐकत होतो. समालोचनासाठी एकच स्टेशन, त्यामुळे प्रत्येक सामन्याचे १५ मिनिटे वर्णन केले जात असे. त्यामुळे रेडिओवर भारताच्या सामन्याची पाळी येण्यासाठी पुन्हा ४५ मिनिटे थांबावे लागत असे. भारतीय संघाचा ८३ सालची कामगिरी कोणालाच अपेक्षित नव्हती अगदी दूरदर्शनला देखील. भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाल्यावर अचानक त्यांना जाग आली आणि थेट प्रक्षेपणास सुरुवात झाली. त्यावेळी आमच्या एकत्र कुटुंबात TV आला. आम्ही सर्व भावंडांनी HALL मध्ये झोपण्यासाठी वास्तव्य केले. उपांत्य आणि अंतिम सामने आम्ही सर्वांनी मध्ये येणाऱ्या दूरदर्शनच्या बातम्या, खंडित होणारा वीजपुरवठा याचा मुकाबला करत पाहिले.
भारतीय संघाकडून पराभूत झालेला वेस्ट इंडीज संघ लगेचच १९८३ साली भारतात आला. त्या वेळी पहिलाच सामना श्रीनगर येथे खेळविला गेला. त्या सामन्यात प्रेक्षक चक्क विंडीज संघाला पाठींबा देत होते. त्या मुळे वैतागलेल्या कपिलच्या एका उत्कृष्ट क्षेत्र रक्षणाला ज्यावेळी प्रेक्षकांनी दाद दिली त्यावेळी कपिलने रागाने उलट प्रेक्षकांकडे पाहत टाळ्या वाजविल्या. १९८५ साली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया मध्ये जाऊन पाकिस्तान संघाचा पराभव करीत बेन्सन आणि हेजेस चषक पटकाविला. हा अंतिम सामना स्कॉलरशिप परीक्षेच्या दिवशी (१० मार्च १९८५) खेळविला गेल्याने मी मोठ्या संकट सापडलो होतो. परंतु माझ्या वडिलांनी त्यावर उत्तम तोडगा काढला. माणिकपूर च्या ऑगसतीन शाळेजवळ असलेल्या त्यांच्या चुलत बहिणीच्या घरी दोन पेपर मध्ये जात आम्ही या सामन्याचा आनंद लुटला. आईच्या होणार्या संतापाकडे आम्ही सोयीस्कररित्या दुर्लक्ष्य केले.
आठवी / नववीच्या सुमारास शालेय क्रिकेट संघाची स्थापना झाली. सुजित देवकर, मिलिंद पाटील (लेग स्पिनर) हे दिग्गज (?) खेळाडू ह्या वेळी झालेल्या आंतरशालेय स्पर्धेत उदयास आले. शाळेचे सामने बघण्यासाठी आम्हाला मैदानवर सोडले जात असे. उपांत्य फेरीच्या सामन्यात पंच आपल्या शाळेच्या गोलंदाजांना कशी गोलंदाजी करावी ह्याचे मार्गदर्शन करतात असा आरोप करीत प्रतिस्पर्धी संघाने काही काळ मैदान सोडले. त्यामुळे थोडा वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. नंतर शाळेने स्पर्धा जिंकताच मोठा समारंभ आयोजित करण्यात आला होता. नववीत असताना ऑस्ट्रेलिया संघाचे भारतात आगमन झाले. त्यावेळी २ ऑक्टोबर च्या सुट्टीच्या दिवशी भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात एक दिवसाचा सामना असताना भिडे सरांनी भौतिक शास्त्राच्या प्रयोगासाठी बोलाविल्यामुळे आम्हा क्रिकेट रसिकांमध्ये नाखुशीचे वातावरण पसरले होते. ह्याच दौर्यात एक कसोटी सामना टाय झाला. त्या दिवशी शाळा असल्यामुळे आम्ही सर्व बेचैनिनेच शाळेत होतो. दहावीच्या वर्षी माझे गल्ली क्रिकेट पूर्ण बंद झाले (केले गेले). फडके सरांच्या क्लास मध्ये जात असल्यामुळे माझे बर्याच वेळ त्यांच्या घरी अभ्यासासाठी वास्तव्य असे. १९८७चा विश्व चषक याच वेळी असल्याने मोठा दुर्धर प्रसंग ओढावला. गावस्करचे एक दिवशीय सामन्यातील एकमेव शतक, ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवरील लाहोर येथील उपांत्य सामन्यातील अविस्मरणीय विजय अशा न टाळता येणाऱ्या क्षणासाठी क्लासला दांडी मारत फडके सरांचा ओरडा खाण्याचे धाडस मी केले. १९८८ मार्च साली १० परीक्षा संपली. आणि आम्ही तयार झालो आमचे क्रिकेट प्रेम बाह्य जगतात घेवून जाण्यासाठी!
(क्रमश)