आमच्या वसईच्या घराजवळील छोटे तळे म्हणजे बावखल. आता ह्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचे विवेचन करण्यासाठी मी भाषातज्ञ नव्हे तरी देखील बाव म्हणजे विहीर आणि खल हा शब्द खोल या शब्दाचा अपभ्रंश होऊन आला असावा असे माझे मत. या बावखलाशी निगडीत अशा काही आठवणी सांगण्याचा हा प्रयत्न.
माझी आजी १९९९ साली गेली त्यावेळी ती साधारणतः ९२ - ९३ वर्षांची असावी. तिच्याकडून मी जुन्या काळाच्या आठवणी मिळवण्याचा प्रयत्न करीत असे. ही बावखले मानवनिर्मित असावी असा एकंदरीत तिचा निष्कर्ष. जलसिंचनासाठी पूर्वीच्या पिढीने खणलेले हे जलाशय. त्यातील काही जलाशय भूभागाने पूर्णपणे वेढलेले तर काही बाकीच्या जलस्तोस्त्रांशी जोडलेले. आमचे बावखल वसईच्या खाडीला जोडलेले. भूभागाची रचना अशी की जोराचा पाउस पडला की आजूबाजूचे छोटे छोटे जलप्रवाह या बावखलात पाणी आणून ओततात. ते सर्व गढूळ पाणी एकत्र बावखलात साठले की त्याच्या रंगामुळे ते थोडेफार चहासारखे दिसते. या बावखलात सर्वात प्रथम एक रहाट होता. शाळेच्या दिवसात या रहाटाची उर्वरित लाकडे मी पाहिली होती काळाच्या ओघात तीही नाहीशी झाली.
साधारणतः ६० - ७० च्या दशकात ह्या बावखलाच्या एका कोपर्यात आमच्या कुटुंबीयांनी विहीर खणली आणि त्यावर पाण्याची मोटार बसवली. हि विहीर बावखलापासून पूर्ण विभक्त नाही त्यामुळे बावखलाचे पाणी एका विशिष्ट पातळीच्या वरती गेले की ते ह्या विहिरीत जाऊन मिळते. तर आधी म्हटल्याप्रमाणे जोरदार पाऊस झाला की या बावखलात पाणी येते पण त्यानंतर मात्र काही महिने बावखलातून पाणी बाहेर वाहत राहते. आता मासे हे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत असल्यामुळे ह्या बावखलात त्यांचे आगमन होते. बावखलात माशांच्या विविध जाती सापडतात. निवटी, कोलंबी, चिवडा, कलकत्ता, चिंबोरी ही त्यांची नावे, त्यातील काही नावे स्थानिक.
६०-७० च्या दशकात आमच्या घरातील सुना या बावखालाच्या काठी भांडी घासण्यासाठी जात असत. साधारणतः एप्रिल महिन्याचा मध्यावर या बावखलात पाण्याची पातळी कमी व्हायला सुरुवात होते. मग घरी मासे पकडण्याच्या गोष्टी सुरु होत. या बावखलावर माझ्या आजोबांच्या दोन भावांचाही काही हिस्सा. त्यामुळे आमचे ते कुटुंबीय देखील मासे पकडण्याच्या कार्यक्रमात सहभागी होत. एप्रिल मे महिन्यात साधारणतः दोन वेळा हा मासे पकडण्याचा कार्यक्रम होत असे. आमची आजी ही सर्वात मोठी सून असल्यामुळे ह्या पूर्ण कार्यक्रमाचे ती नियंत्रण करे. मोठी माणसे जाळ्याने मासेमारी करीत. त्यातील काही मासे हाताने देखील पकडून बावखलाच्या काठावर फेकले जात. हे मासे पकडून बादलीत टाकण्याची जबाबदारी आमची असे. एकदीच राहवले नाही तर बावखलाच्या काठाकाठाने फिरणारे छोटे मासे हाताने पाण्याबाहेर उडवून त्यांना आम्ही पकडीत असू. सकाळी १० च्या आसपास सुरु झालेला हा मासेमारीचा कार्यक्रम एक दीड च्या आसपास आटपे. मोठी मग सुरु होई तो मासे वाटपाचा कार्यक्रम. आजीचा इतक्या वर्षीचा मुत्सद्दीपणा या मासे वाटपात परिवर्तीत होत असे. आजीच्या जावयांना हे मासे फार आवडत असल्यामुळे त्यांना या मासेमारीच्या दिवशी खास जेवणाचे आमंत्रण असे. एके वर्षी या कोलंब्या खाल्ल्यामुळे माझ्या अंगावर पुरळ उठल्यामुळे काही वर्षे मला कोलंबी वर्ज्य करण्यात आली होती.
मे महिन्याच्या मध्यावर बावखलातील पाणी पूर्ण आटून जाते. मग मे महिन्याच्या सुट्टीत उद्योगाच्या शोधात असलेली आम्ही मुले संध्याकाळी चार नंतर या बावखलात उतरत असू. पाणी पूर्ण आटल्यामुळे जमिनीला भेगा पडत. माझ्याहून तीन वर्षे मोठा असलेला माझा आत्येभाऊ ह्या भेन्गामुळे झालेल्या आकारांना महाराष्ट्राचे जिल्हे असे संबोधित असे. ह्याच वेळी बावखलात झरसे नावाची पालेभाजी उगवित असे. माझे आजोबा जे १९७२ च्या फेब्रुवारी मध्ये निवर्तले त्यांना ह्या पालेभाजीची भाकरी फार आवडत असे. मलाही ही भाकरी आवडू लागली होती. एक दोन वर्षे या बाव खलात पीच बनवून क्रिकेट खेळण्याचा उद्योगहि आम्ही केला. त्यावेळी उंचावर मारलेला फटका जमिनीवर जाऊन पडत असे. मार्च महिन्याआधी अंगणात खेळताना मारलेला फटका या बावखलातील पाण्यात पडल्यास तो चेंडू काठीने काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागत असत. या पाण्यावर सपाट पृष्ठभागाचे दगड क्षितिजसमांतर पातळीत जोरात फेकल्यास ते त्याच दिशेने बर्याच वेळ उड्या मारत पुढे जात. हा खेळ खेळण्यास खूप मजा येई. एके वर्षी आमच्याकडे काम करणाऱ्या गड्याच्या मुलाने केळीच्या दोन खोडांना (ज्यांना स्थानिक भाषेत लोद असे म्हटले जाते) एकत्र जोडून त्याची पाण्यावर तरंगू शकणारी संरचना बनवली होती. त्यावर उभे राहून बावखलात मुक्त संचार करणाऱ्या त्याला पाहून मी धन्य झालो होतो.
९०च्या दशकात वसईत इमारतींचे प्रस्थ वाढू लागले. परंतु सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची काळजी न घेता हे पाणी नैसर्गिक जलप्रहावात सोडण्यात आले आणि तेथून ते आमच्या बावखलात शिरले. तेव्हापासून बावखलाच्या पाण्याचे प्रदूषण सुरु झाले. त्याच वर्षीच्या मे महिन्यात बावखलातील मासे खाल्ल्यामुळे घरातील बर्याच जणांना पोटाचे विकार झाले आणि तेव्हापासून आम्ही हे मासे खायचे सोडून दिले.
आज मी देखील बोरिवलीत राहतो. जमल्यास शनिवार रविवार आणि दिवाळी, मे महिन्यात वसईला जातो. प्रत्येक भेटीच्या वेळी ५ मिनटे का होईना शांतपणे या बावखलाच्या जवळ जाऊन उभा राहतो. जुन्या आठवणींना उजाळा देत!
No comments:
Post a Comment