आज आपली सर्व प्रसिद्धी माध्यमे केवळ शहरांवर लक्ष्य केंद्रित करून आहेत. किंवा आपण सुशिक्षित वर्ग केवळ शहरांतील बातम्यावर लक्ष्य देत असतो. विविध आर्थिक क्षेत्रातील भारताच्या प्रगतीकडे लक्ष्य देताना आपण भारतातील मूळ उद्योगाकडे म्हणजेच कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष्य करीत आहोत याचे आपणास भान नाही. इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे उपलब्ध असलेला आर्थिक निधी कृषी क्षेत्राचा पाया भक्कम करण्यासाठी वापरण्याचा दूरदृष्टीपणा आपल्याकडे नाही. कृषी क्षेत्राचा पाया भक्कम करणे म्हणजे पावसावर असलेली आपली अवलंबिता दूर करणे. त्यासाठी भारतातील विविध नद्यांना जोडण्याची एक महत्त्वाकांक्षी योजना कित्येक वर्षे इच्छाशक्तिअभावी तडीस जाऊ शकली नाही.
आपण आज विविध क्षेत्रातील विशेषतः माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताने केलेल्या प्रगतीचे गुणगान गातो. आता ही संधी आपणास काहीशी आपसूक उपलब्ध झाली. त्यासाठी एक राष्ट्र म्हणून आपण काही विशेष प्रयत्न केले असे मला वाटत नाही. आणि ह्या क्षेत्रातील संधी पुढील किती वर्षे उपलब्ध राहतील याविषयीची खात्रीलायक माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. या उलट सर्वात खात्रीचे उद्योगक्षेत्र म्हणजे कृषिक्षेत्र. आता या क्षेत्राकडे आपली बघण्याची दृष्टी बदलून केवळ भूक भागविण्याचे क्षेत्र म्हणून न बघता भविष्यात एक जबरदस्त आर्थिक फायदा करून देवू शकणारे क्षेत्र म्हणून या कडे बघणे आवश्यक आहे. आणि हो असा विचार करणे म्हणजे पाप नव्हे. जगाची लोकसंख्या वाढतच जाणार आहे. या वाढत्या लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी लागणारे अन्न निर्माण करण्यासाठी लागणारी जमीन आपल्याकडे आहे, पाऊस देखील आहे फक्त पाणी नियोजन करणे आवश्यक आहे. पाणी नियोजनासाठी लागणारा निधी सुद्धा आहे फक्त तो आपण नागरीकरणासाठी वापरतो. आज एक मोठी संधी आपण गमावत आहोत आणि त्याचे आपणास भानसुद्धा नाही.
मागच्या ब्लॉगचा संदर्भ देवून असे म्हणावेसे वाटते की एक तर आपण एक राष्ट्र म्हणून big picture बघण्यास असमर्थ ठरत आहोत किंवा एक चुकीचे big picture रेखाटून त्याच्या मागे धावत आहोत.
No comments:
Post a Comment