Sunday, November 21, 2010

आशियाई स्पर्धा



सध्याच्या आशियाई स्पर्धा पहाणे हा एक माझ्यासाठी आनंददायी अनुभव ठरतोय. गेल्या आठवडाभर भारतीयांची कामगिरी बेताचीच होत होती. पण आज मात्र भारतीयांनी कमाल करत ३ सुवर्णपदकांची कमाई केली.

चीनच्या खेळाडूंनी स्पर्धेच्या सुरुवातीपासून पदकांची लयलूट केली. चीनने गेल्या काही वर्षांपासून क्रीडा क्षेत्रामध्ये अविश्वसनीय कामगिरी केली आहे. या कामगीरीमागे त्यांची जबरदस्त मेहनत तर आहेच पण अजून एक घटक कारणीभूत असावा असे मला वाटते. चीनच्या राजसत्तेला ज्याप्रमाणे राजकीय विरोध आवडत नाही त्याप्रमाणे तेथील क्रीडा अधिकार्यांना त्यांच्या खेळाडूंचे अपयश कितपत पचनी पडत असावे याचा मला प्रश्न पडतो.

शनिवारी जपान आणि चीनच्या महिला खेळाडूंमध्ये टेबल टेनिसचा उपांत्य फेरीचा सामना खूप रंगला. सातव्या गेममध्ये चीनची खेळाडू मागे पडली असताना देखील तिने यंत्रवत खेळ करीत शेवटचे काही गुण खेचून आणीत सामना जिंकला. गेल्या आठवडाभर बरेच वेळा हे चित्र पहावयास मिळाले. आज मात्र पुरुषांच्या डबल Trap स्पर्धेत भारताच्या सोधीने शेवटच्या काही फेर्यात पिछाडी भरून काढीत सुवर्णपदक पटकावले. त्या वेळी आनंदित होतानाच मला मात्र शेवटच्या क्षणी ढेपाळलेल्या चीनी खेळाडूची दया आली. त्याला आता कोणत्या प्रकारची वागणूक मिळेल या विचाराने मी चिंतातूर झालो.

या बाबतीत चीन परवडला असा एक देश आहे. उत्तर कोरिया हे त्याचे नाव. या वर्षी जूनमध्ये फुटबाल स्पर्धेत पोर्तुगालने त्यांचा ७ -० असा धुव्वा उडविला. हा पराभव त्यांच्या राज्यकर्त्यांच्या इतका जिव्हारी लागला की संघाच्या प्रशिक्षकास परतल्यावर एका बांधकाम कामावर बिनपगारी काम करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. मध्यंतरी त्याने आपल्या जीवाला धोका असल्याची भीतीही व्यक्त केली होती.

शेवटी काय तर अतिरेक प्रत्येक ठिकाणी आहेच. त्यांचा शिस्तीचा अतिरेक तर आपला भ्रष्ट्राचाराचा! आज Times मध्ये भ्रष्ट्राचाराच्या प्रकरणांची जी यादी देण्यात आली आहे ती वाचून हा देश चालला तरी कसा आहे हा प्रश्न पडतो. हा देश चालला आहे तो काही समंजस, प्रामाणिक लोकांमुळे!

Tuesday, November 16, 2010

समंजस, असमंजस


समाजातील लोकांचे साधारणतः ४ प्रकारात वर्गीकरण करता येते. शिक्षित समंजस, शिक्षित असमंजस , अशिक्षित समंजस, अशिक्षित असमंजस हे ते चार प्रकार होत. काही लोक समंजस आणि असमंजसपणाच्या कुंपणावर बसलेले असतात. परिस्थितीनुसार ते समंजस अथवा असमंजसपणा दाखवितात. आता समाजमनावर या चार प्रकारातील कोणता वर्ग अधिक प्रभावशालीपणे वर्चस्व गाजवितो यावर त्या समाजाचा बौद्धिक प्रवास सुरु राहतो.

७० - ८० च्या दशकात महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय समाजाचे एकूण सामाजिक परिस्थितीवर नियंत्रण होते. ह्या वर्गाला आपण शिक्षित समंजस म्हणूयात. हा वर्ग एकंदरीत साधेपणाने राहणारा, नैसर्गिक स्तोत्रांवर कमी ताण देणारा असा वर्ग. समाजमनावर वर्चस्व गाजविण्यासाठी ह्या वर्गास काही विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. बहुतांशी शिक्षकी पेशात असणाऱ्या या वर्गाने शाळेच्या माध्यमातून मध्यमवर्गीय विचारसरणीचा प्रसार केला. समाजातील वरच्या बौद्धिक पातळीतील लोक शिक्षकी पेशात असल्याने हा प्रसार अतिशय प्रभावशाली पद्धतीने झाला. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ही मध्यमवर्गीय विचारसरणी जोपासली गेली.

त्यानंतरच्या कालावधीत खुल्या आर्थिक धोरणांमुळे मध्यमवर्गीयांच्या पुढील पिढीस अनेक नवीन संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे आणि राखीव जागांच्या धोरणांमुळे बौद्धिक गुणवत्ता शिक्षकी पेशापासून दुरावली गेली. समाजमनावर मध्यमवर्गीय विचारसरणीचा प्रसार करण्याचे एक माध्यम शिक्षित समंजस वर्गाने हळूहळू गमावले. ह्या वर्गाची पुढील पिढी मेंढपाळाच्या भूमिकेतून मेंढ्याच्या भूमिकेत शिरली. असमंजस वर्गाने ही संधी बरोबर हेरली. मोकळी झालेली मेंढपाळाची भूमिका ह्या वर्गाने बघता बघता हेरली. दूरदर्शन, चित्रपट, मासिके आणि mall ह्या माध्यमावर असमंजस वर्गाने वर्चस्व प्रस्थापित केले. प्रसारमाध्यमात थिल्लरपणा बोकाळला. कोकणातील एका प्रसिद्ध गावाचे नाव आपल्या आडनावात समाविष्ट केलेली आणि एका वाहिनीवर लग्नाचे नाटक करणारी तथाकथित अभिनेत्री हे अशिक्षित असमंजस वर्गाचे मूर्तिमंत उदाहरण होय. अशा व्यक्तीस समाज सहन करतो हे समाजात मेंढ्याची भूमिका किती खोलवर रुजली आहे याचे ज्वलंत उदाहरण आहे.

अजूनही समंजस वर्ग मेंढ्याच्या रुपात का होईना पण अस्तित्वात आहे. असमंजस वर्ग brainwashing ने समंजस पणा नष्ट करण्या आधी, समंजस वर्गाने विविध माध्यमातून आपल्या विचारसरणीचा प्रसार करणे आवश्यक बनले आहे. आजही समंजस वर्ग बहुसंख्येने अस्तित्वात आहे. विखुरलेल्या ह्या वर्गाने एकमेकास साद देवून आपल्या सामर्थ्याची जाणीव समाजास करून देण्याची आज नितांत गरज आहे.

ह्या लेखावरील आपले अभिप्राय जरूर कळवा