सध्याच्या आशियाई स्पर्धा पहाणे हा एक माझ्यासाठी आनंददायी अनुभव ठरतोय. गेल्या आठवडाभर भारतीयांची कामगिरी बेताचीच होत होती. पण आज मात्र भारतीयांनी कमाल करत ३ सुवर्णपदकांची कमाई केली.
चीनच्या खेळाडूंनी स्पर्धेच्या सुरुवातीपासून पदकांची लयलूट केली. चीनने गेल्या काही वर्षांपासून क्रीडा क्षेत्रामध्ये अविश्वसनीय कामगिरी केली आहे. या कामगीरीमागे त्यांची जबरदस्त मेहनत तर आहेच पण अजून एक घटक कारणीभूत असावा असे मला वाटते. चीनच्या राजसत्तेला ज्याप्रमाणे राजकीय विरोध आवडत नाही त्याप्रमाणे तेथील क्रीडा अधिकार्यांना त्यांच्या खेळाडूंचे अपयश कितपत पचनी पडत असावे याचा मला प्रश्न पडतो.
शनिवारी जपान आणि चीनच्या महिला खेळाडूंमध्ये टेबल टेनिसचा उपांत्य फेरीचा सामना खूप रंगला. सातव्या गेममध्ये चीनची खेळाडू मागे पडली असताना देखील तिने यंत्रवत खेळ करीत शेवटचे काही गुण खेचून आणीत सामना जिंकला. गेल्या आठवडाभर बरेच वेळा हे चित्र पहावयास मिळाले. आज मात्र पुरुषांच्या डबल Trap स्पर्धेत भारताच्या सोधीने शेवटच्या काही फेर्यात पिछाडी भरून काढीत सुवर्णपदक पटकावले. त्या वेळी आनंदित होतानाच मला मात्र शेवटच्या क्षणी ढेपाळलेल्या चीनी खेळाडूची दया आली. त्याला आता कोणत्या प्रकारची वागणूक मिळेल या विचाराने मी चिंतातूर झालो.
या बाबतीत चीन परवडला असा एक देश आहे. उत्तर कोरिया हे त्याचे नाव. या वर्षी जूनमध्ये फुटबाल स्पर्धेत पोर्तुगालने त्यांचा ७ -० असा धुव्वा उडविला. हा पराभव त्यांच्या राज्यकर्त्यांच्या इतका जिव्हारी लागला की संघाच्या प्रशिक्षकास परतल्यावर एका बांधकाम कामावर बिनपगारी काम करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. मध्यंतरी त्याने आपल्या जीवाला धोका असल्याची भीतीही व्यक्त केली होती.
शेवटी काय तर अतिरेक प्रत्येक ठिकाणी आहेच. त्यांचा शिस्तीचा अतिरेक तर आपला भ्रष्ट्राचाराचा! आज Times मध्ये भ्रष्ट्राचाराच्या प्रकरणांची जी यादी देण्यात आली आहे ती वाचून हा देश चालला तरी कसा आहे हा प्रश्न पडतो. हा देश चालला आहे तो काही समंजस, प्रामाणिक लोकांमुळे!
Sunday, November 21, 2010
आशियाई स्पर्धा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment