Friday, March 18, 2011

चंद्र


चंद्र भूतलावरच किंवा आकाशातला, तसा प्रत्येकाच्या मनात वास्तव्य करून असतो. तसे मलासुद्धा चंद्राचे आकर्षण! लहानपणी चंद्रग्रहण होणार अशी बातमी ऐकून मी गोंधळून गेलो. पण त्यात काय, फक्त पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार अशी समजूत काढताच, आपल्या मुंबईला राहणाऱ्या आपल्या मामाची सुद्धा सावली मला चंद्रावर दिसणार असा विचार माझ्या डोक्यात आला.

गणपतीच्या दिवशी चंद्र बघायचा नाही, पाण्यातील किंवा दुधातील त्याचे प्रतिबिंब तर अजूनही वर्ज्य अशी शिकवण लहानपणापासून मला मिळालेली! पण बर्याच वेळा हा नियम माझ्याकडून मोडलेला. बारावीला असताना गणपतीच्या दिवशी संध्याकाळी रुपारेलच्या होस्टेलला जाताना वांद्र्याला गाडी बदलून माटुंग्याला उतरण्यासाठी पश्चिमेला तोंड उभ्या करून असलेल्या मला चंद्राने हसून दर्शन दिले. बाकी ढगाळ वातावरण असताना, अचानक चंद्रास्त व्हायच्या वेळी एकदा चान्दोबाबा माझ्यासमोर प्रकट झाले. अगदी गेल्या वर्षी हेमंतकडून गणपती पाहून येत असताना, शनीदेवळानंतर डावीकडे वळण घेताच चंद्र दिसला.

बाकी पृथ्वीला एकच चंद्र असल्याचे मला सदैव दुःख होते. आतापर्यंत मला कित्येक वेळा पृथ्वीला दोन चंद्र असल्याचे स्वप्न पडले. प्रत्येक स्वप्नात खूप खुश झाल्यावर जाग आल्यानंतरचे दुःख मात्र अतोनात! हेच स्वप्न पुढे खेचून, पृथ्वीला ३० चंद्र असावेत आणि त्या प्रत्येकाची वेगवेगळी तिथी असावी अशी इच्छा मी मनात बाळगली. म्हणजे काय तर, कोणत्याही दिवशी आकाशात प्रत्येक तिथीचा एक चंद्र असणार! संकष्टी पाळणारे एकदम धर्मसंकटात!

ह्या चंद्राची काही रूपे एकदम लक्षात राहिलेली. न्यू जर्सीच्या पहिल्या बर्फवृष्टीनंतर ह्या बर्फावर चकाकणारा आकाशातील चांदोबा, पहिल्या परदेशवारीनंतर परत येताना दुबईवरून विमानाने उड्डाण केल्यावर ढगातून डोकावणारा चांदोबा लक्षात राहिलेत! बाकी वसईच्या शुद्ध वातावरणातल्या चंद्राचे सौंदर्य काही औरच!

चंद्र दररोज आधीच्या दिवसापेक्षा ५२- ५३ मिनटे उशीरा उगवतो. आता ही ५२- ५३ मिनटे भारतात खरी, ती बहुदा अक्षांशानुसार आणि रेखांशानुसार बदलत असावी असा माझा समज आहे. ते नक्की गणित एकदा समजून घ्यायचे आहे. पूर्णिमेला सूर्य मावळल्यानंतर उगवणारा चंद्र कृष्ण अष्टमीच्या वेळी मध्यरात्री उगवतो. आणि असे करीत करीत अमावास्येला सूर्याबरोबर उगवतो. चन्द्रोदयावेळी आणि चंद्रास्तावेळी ओहोटी असते आणि ज्यावेळी चंद्र बरोबर डोक्यावर किंवा पायाखाली असतो त्यावेळी भरती असते. हे तत्व बोर्डीच्या आजोबांनी लहानपणी सांगितले तेव्हा खूप आनंद झाला. हे आता रविवारी सकाळी क्रिकेट खेळायला जायच्या वेळी लक्ष्यात ठेवायचे!

असा हा चंद्र उद्या पृथ्वीच्या अगदी जवळ येतोय! लक्षात ठेवा एक नजर टाकायला त्याच्यावर!

No comments:

Post a Comment