नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा! प्रत्येक नवीन वर्षी माणूस साधारणतः थोडासा भावूक बनतो. आयुष्यातील एक वर्ष निघून गेल्याची जाणीव मनात काहीशी खंत निर्माण करते. स्वतःच्या अक्षय अस्तित्वाच्या कल्पनेला कालरूपी वास्तवाने अजून एक छेद दिला हे नाही म्हटले तरी कोणाला आवडणार?
चाळीशीच्या उंबरठ्यावर एक मोठा प्रश्न मनात डोकावू लागतो. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे निघून गेली आहेत का? प्रगतीची शिखरे गाठण्याची संधी मी गमावली तर नाही ना?. ह्या प्रश्नाकडे बर्याच प्रकारे पाहता येईल. जो पर्यंत तब्येत धडदाकट आहे, मन चिरतरुण आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक दिवस हा तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस बनू शकतो. मी तर असे म्हणेन की केवळ अनुभवाने येणारी प्रगल्भता या वेळी आपणाकडे असते. स्वतःला विविध पातळ्यांवर काही प्रमाणात का होईना पण सिद्ध केल्याचा आत्मविश्वास तुम्हाकडे असतो. पिकल्या केसांनी (हे ह्या पिढीचे वास्तव) तुम्हाला संयमी बनविले असते. मान्य आहे की कौटुंबिक जबाबदार्या काही प्रमाणात वाढलेल्या असतात पण जर आपल्या जीवनसाथीदाराशी योग्य सामंजस्य निर्माण करण्यात तुम्हाला यश आले असेल तर ह्या जबाबदार्या सुद्धा तुम्ही सहजपणे पेलून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू शकता.
आता प्रगतीची शिखरे ह्या शब्दप्रयोगाकडे मी परत वळतो. प्रगतीची शिखरे म्हणजे केवळ व्यावसायिक जगातील यश असा अर्थ मला अभिप्रेत नाही आहे. प्रगतीची शिखरे मोजण्याचा मापदंड हा केवळ लौकिकार्थाने मिळालेले यश असा होत नाही. एखाद्या गृहिणीने संसारावर, मुलांच्या अभ्यासावर मिळविलेले नियंत्रण, एखाद्या कलाकाराने अथक प्रयत्नानंतर कलेवर मिळविलेले प्रभुत्व, एखाद्या छायाचित्रकाराने टिपलेले एक दुर्मिळ चित्र हे ही प्रगतीचे शिखर असू शकते. दहावीच्या मराठीच्या पुस्तकातील एक वाक्य कायमचे माझ्या लक्षात राहिले आहे. स्वानंद हे कवीचे सर्वात मोठे पारितोषिक आहे.
मीच माझ्या मनाचा स्वामी. त्यामुळे जर मी मनाला प्रसन्न ठेवू शकलो तर मी प्रगती करणारच. जगाने बनविलेले प्रगतीचे मापदंड माझ्या निकर्षाशी मिळतेजुळते असतील असेही नाही.
मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण!
अजूनही अर्धे आयुष्य बाकी आहे! मी वास्तववादी असे जीवनध्येय ठरविणार आणि जीवनाचा आनंद घेत ते साध्यही करणार! आणि दुनियेतील मला निराश करणाऱ्या घटकांपासून मला सांभाळण्यासाठी मनोबल वाढविणार!
Happy 2012!
No comments:
Post a Comment