Friday, January 27, 2012

वसईची पिशवी



लहानपणची गोष्ट, मुंबईला राहणाऱ्या आत्या वसईच्या मुक्कामाहून परत मुंबईला जायला निघाल्या की आजी त्यांच्या हातात भाजीची पिशवी देई. वाडीतील भाजी, केळ्याचा फणा, सुरण तत्सम पदार्थांचा त्यात समावेश असे. वसईच्या भाज्या ताज्या, मुंबईला परत गेल्यावर लगेच बाजारात जायला लागू नये म्हणून आजी ह्या भाज्या देत असेल अशी माझी समजूत. काही वर्षाने बहिणींची लग्न झाल्यावर हेच चित्र पुन्हा अवतरले. ह्या ही वेळेला माझ्या समजुतीत फारसा काही फरक झाला नाही.

काही वर्षे गेली, शिक्षण संपले, नोकरी चालू झाली. प्रथमच परदेशगमनाचा योग आल्यावर सामान भरताना मध्येच आईने त्यात लाडूचा एक डबा भरला. हा डबा कशाला, असा थोडासा तिच्याशी वाद घातल्यावर मी तो डबा नेण्याचे कबूल केले. शनिवारी रात्री ब्रायटन (इंग्लंड) येथील हॉटेलात आगमन झाले. व्यवस्थित पोटपूजा होण्याची काही शक्यता नव्हती. रविवारी सकाळी, इंग्लंडच्या थंड हवेत उठून बाहेर एक फेरफटका मारून आल्यावर अचानक ह्या लाडूच्या डब्याची आठवण झाली. तो एक लाडू तोंडात घालताच हजारो मैलांचे अंतर पार करून मी थेट घरापर्यंत पोहोचलो. पुढे हा डबा मी बरेच दिवस पुरविला. त्यानंतरच्या प्रत्येक परदेशवारीला घरून दिलेली ही पिशवी मी नेत गेलो.
बोरिवलीला राहायला गेल्यानंतर वसईच्या फेर्या शनिवार- रविवारकडे होत राहिल्या. मुंबईत वाढलेली बायको, वसईच्या भाज्यांची, माश्यांची रसिक बनली. वसईहून आम्ही आता पिशव्या घेवून येवू लागलो. मेरू, स्विफ्ट मध्ये एकावेळी सर्वाधिक पिशव्या घेवून येण्याचा विक्रमही बहुधा आम्ही प्रस्थापित केला.

ह्या सर्व प्रवासात वसईची पिशवीतील भाजीच्या ताजेपणापेक्षा त्यातील भावनिक गुंतवणुकीचा, मायेचा उलगडा केव्हा आणि कधी झाला हे माझे मलाच कळले नाही. एका पिढीतील माया दुसर्या पिढीपर्यंत भौगोलिक अंतराचे बंध ओलांडून पोहचविण्याचे काम ही वसईची पिशवी अनेक वर्ष करीत राहील याविषयी मात्र माझ्या मनात अजिबात शंका नाही!

3 comments:

  1. गेस व्हॉट गेली जी काही वर्षे मी ब्लॉग लिहितेय नं त्यात कुणी वसईचं कसं नाही ही एक रुखरुख तुमच्या या ब्लॉगमुळे थोडी कमी झाली....
    आता खरं तर आईनेही घर बदललं आणि मी तर देश पण ही पोस्ट खूप रिलेट होतेय...:)

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for the comments! I happen to see it today! Do let me know your comments on other blogs! BTW tumacha blog konata aahe?

      Delete
    2. आत्ता पाहतेय ही कमेंट...
      माझा ब्लॉग http://majhiyamana.blogspot.com/

      आणि हो तू म्हटलंस तरी चालेल...बहुतेक मी तुझ्या आसपासच्या वयाची असेन.... :)

      तुला कमेंट देणार्‍या कुठल्याही ब्लॉगरच्या प्रोफ़ाईलला गेलास की त्याच्या ब्लॉगची लिंक दिसते...हे अवांतर... :)

      Delete