Thursday, March 29, 2012

विचारांची सरमिसळ



आज बर्याच विचारांची एकत्र सरमिसळ इथे मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे.

सुरुवात करतोय ते मृत्यूविषयीच्या काही विचाराविषयी! मृत्यूविषयी प्रत्येकजण आपापल्या परीने विचार लढवीत असतो. मृत्यूनंतर आपले काय होत असावे ह्याविषयी बरेच सिद्धांत आहेत. मला असे वाटते की जो कोणी सर्वशक्तिमान आहे त्याच्याकडे आत्म्याचे बरेच द्रव्य साठले असावे. नवीन जीव निर्माण होताना तो ह्या द्रव्यातील थोडा भाग काढून त्या जीवात आत्मा म्हणून पाठवून देत असावा. आणि मृत्युनंतर हा आत्मा परत अनंतात विलीन होत असावा. आता वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके आत्माद्रव्य ह्या सर्वशक्तीमानाकडे असेल की नाही, त्याच्याकडे ह्या द्रव्याचे वैविध्य कसे असावे आणि हा सिद्धांत प्राण्यांसाठी लागू होतो की नाही यावर आपणा पामरांनी विचार करू नये. ह्या भूलोकावरील जीवनाची, इथल्या नियमावलीची आपणास बर्यापैकी सवय झाली आहे. आपण नियमानुसार वागले तर आपणास दंड होण्याची शक्यता बरीच कमी. परंतु जर मृत्यूनंतर जर आपण मनाने (आत्म्याने) अस्तित्वात राहिलो आणि त्या अस्तित्वातील नियम आपल्या आकलनापलीकडील असतील तर लागली ना बोंब!

दररोज दिवस संपला की आपण जे काही समाधान मिळाले असेल त्यात आनंद मानून घरी येतो. आठवडा संपला की मागे वळून पाहता थोडे समाधानी होत, साप्ताहिक सुट्टीच्या पलीकडील दुसर्या आठवड्याकडे नजर लावतो. तीच गोष्ट वार्षिक सुट्टीची. आयुष्याच्या ह्या प्रत्येक टप्प्यावर समाधान मोजण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे मापदंड असतात. ह्या मापदंडानुसार काहीजण समाधानी होतात तर काही असमाधानी! प्रश्न असा आहे की आयुष्याच्या यशस्वीतेचे वा अयशस्वीतेचे मापदंड कोणी बनवितो का? आता हा मापदंडाला विविध मिती असतील; व्यक्तिगत यश, कौटुंबिक समधानाची पातळी, जोडलेली माणसे, समाजकार्य अशा विविध पातळ्यांवर आपण आपल्या आयुष्याची यशस्विता अजमावू शकतो. प्रश्न असा आहे की असा मापदंड बनविण्याची आणि त्या निकषानुसार हवी ती पातळी गाठल्यावर सामाजिक आयुष्यातून निवृत्ती घेण्याची आपली तयारी आहे काय?

तात्कालिक समाधानाची प्रत्येकाची आपली वेगवेगळी संकल्पना असते. लहान बालकाला आईचा सहवास समाधान देवून जातो. हल्लीच्या बर्याच लहान मुलांना (वयोगट ७ - ८ वर्षे आणि अधिक) मैदानी खेळापेक्षा संगणकीय खेळ अधिक समाधान देवू लागले आहेत. विद्यार्थांना परीक्षेतील गुण समाधान देवून जातात. माणूस वयाने कितीही मोठा होत गेला तरीही त्यास आपले कोणीतरी कौतुक करावे, आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी अशी सुप्त इच्छा असते. परंतु हे काही सदैव शक्य नसते. मग त्यावेळी आर्थिक लाभाकडे पाहत ही माणसे दिवस लोटतात. आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी ह्याच्या सुद्धा विविध छटा असू शकतात. काही जणांना आपली दखल घेतली तरी पुरसे असते तर काही जणांना इतरांपेक्षा आपली जास्त दखल घेतली जावी असा अट्टाहास असतो. सार्वजनिक समारंभात अशा व्यक्तींचे वागणे पाहणे हा एक मजेशीर अनुभव असतो. घरातील वयस्क माणसांना अन्य व्यक्तींचे असणे देखील समाधान देवून जाते. हल्ली फेसबुकने आपल्या अस्तित्वाची दुसर्यास जाणीव करून देण्याचा एक चांगला मार्ग उपलब्ध करून दिला.

कालच मी महाबळेश्वरला सुट्टीचा आनंद लुटून मुंबईला परतलो. महाबळेश्वर म्हणा किंवा वसई म्हणा ह्या दोन्ही ठिकाणात रोजच्या जगण्यात जीवन अधिक प्रमाणात अनुभवता येते असे माझे मत आहे. मुंबईत असतो तो जीवनाचा केवळ संघर्ष. जेवढे तुम्ही निसर्गाच्या अधिक सहवासात जाल तितकी त्या सर्वशक्तीमानाशी संवाद साधण्याची शक्यता अधिक प्रबळ होते. आता हा संवाद म्हणजे काय तर आपल्या ह्या शरीरात जो त्या सर्व शक्तीमानाचा अंश आहे त्याच्याशी त्या सर्व शक्तीमानाने साधलेला संपर्क. आतापर्यंत आज हा काय अध्यात्माच्या मार्गाने चालला की काय असे तुम्हाला वाटू लागले असेल. ह्या मार्गाविषयी मला काही अनुभव नाही परंतु ह्या मार्गावर खरोखर जे पुढे गेले आहेत त्यांच्या विचारांच्या परिपक्वतेविषयी मात्र अतीव आदर आहे! बाकी पुढील आठवड्यात एकदा का कार्यालयीन कामकाजात मग्न झालो की मग हे विचार मागे पडतील. कसे मजेशीर आहे पहा ना, माणसाच्या मनात विचारांची अगदी दाटीवाटी झाली असते, त्यातील काहीच मनाचा काही काळापर्यंत ताबा घेवू शकतात आणि त्यातील अगदी थोडेच भाग्यवान बोलण्या / लिखण्याद्वारे दुसर्यांपर्यंत पोहचू शकतात.

बाकी आधी म्हटल्याप्रमाणे ही विचारांची अगदीच सरमिसळ आहे. आपण जर ह्याचा सामना करीत लेखाच्या शेवटपर्यंत पोहचला असाल, तर धन्यवाद!



No comments:

Post a Comment