क्षण अनुभवावा
क्षण आणि युग यांचे नाते तसे अतूट! एका क्षणाच्या सुखासाठी युगांची तपस्या लागते आणि एका क्षणाच्या चुकीची सजा युगोंयुगे भोगावी लागू शकते. मर्त्य मानवांच्या भाग्यात युगे पाहण्याचे लिहिले नाही तेव्हा त्यांनी क्षणांचे महात्म्य ओळखणे केव्हाही उचित!
आयुष्यात अविस्मरणीय असे क्षण वारंवार येत नाहीत. ज्यांच्या आयुष्यात असे क्षण कमी वेळा येतात तो दुर्दैवी परंतु त्याहून दुर्देवी तो ज्याला आयुष्यात आलेले असे अविस्मरणीय क्षण ओळखता / अनुभवता येत नाहीत. असे हे क्षण कोणते? ही प्रत्येकाची वेगवेगळी संकल्पना. 'दिल ही छोटासा, छोटीसी आशा' अशी परिस्थिती असल्यास, अविस्मरणीय क्षण वेगळे आणि 'ये दिल मांगे मोर' अशी परिस्थिती असल्यास असे क्षण वेगळे.
अगदी लहानपणापासून सुरुवात करायची झाली, तर मे महिन्यातील एकत्र कुटुंबात / मामाकडे घालविलेल्या सुट्ट्या, सकाळी उठून गोळा केलेले आंबे, शाळेतील स्पर्धेत पहिल्यांदा मिळालेले पारितोषक, सायकलवर तोल सांभाळता आलेला पहिला क्षण असे काही क्षण सांगता येतील. महाविद्यालयीन जीवनात ह्या क्षणांची परिसीमा अधिक व्यापक होते. आपल्या व्यावसायिक जीवनावर पकड मिळविणे हे प्राथमिक ध्येय बनते. त्यामुळे ११ -१२ मध्ये भौतिक, रसायन आणि गणित ह्या विषयात मिळविलेले उत्तम गुण हे अशा क्षणांचा भाग बनू शकतात. अशातच केव्हा एखादी आवडलेली मुलगी ज्यावेळी स्मितहास्य देते किंवा बोलते त्यावेळी तो ही एक महाअविस्मरणीय क्षण बनून जातो. पुढे पहिली नोकरी मिळते, त्यावेळी स्वअस्तित्वाला मिळालेली मान्यता त्या क्षणाला संस्मरणीय बनवितो. पुढे परदेश प्रवास, लग्न, नोकरीत बढती, अपत्याचे आगमन असे क्षण येत राहतात. पण मधल्या काळात जीवनसंघर्ष आपल्या ह्या क्षणांना उत्कटतेने अनुभवण्याच्या क्षमतेला काहीसे कमजोर बनवितो. आपण चिंतातूर जंतू बनून सदैव चिंताग्रस्त होवून राहतो आणि हे क्षण अनुभवण्याचे सुख गमावून बसतो.
कलाकार लोकांचे एक बरे असते. बर्याच वेळा त्यांना ब्रह्मानंदी टाळी लागते (आता हा शब्दप्रयोग मी योग्य अर्थाने वापरतो आहे की नाही याची मला खात्री नाही). त्यांच्यासाठी असे क्षण नक्कीच अविस्मरणीय असतात. एखाद्या खेळत देशाचे प्रतिनिधित्व ज्यांना करायला मिळते त्यांच्यासारखे भाग्यवान तेच. आणि आयुष्यात पहिल्यांदा देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा क्षण अविस्मरणीयच!
ह्याचा एक वेगळा पैलू देखील आहे. बेशिस्तीत वाढलेली गर्भश्रीमंत लोकांची मुले, आयुष्यात लहानपणीच यशाची परमोच्च शिखरे गाठलेले कलाकार, खेळाडू यांची मनःस्थिती काहीशी नाजूक बनते. यातील काही जण ह्या अविस्मरणीय क्षणाच्या, अलौकिक अनुभवांच्या वेगवेगळ्या चवींच्या शोधात नको त्या मार्गाला लागू शकतात.
जर आपण फार पुढचा विचार केला तर आयुष्याच्या सायंकाळी मागे वळून बघता आपल्याला हे क्षण नक्कीच आठवतील. त्यावेळी ही खंत वाटायला नको की मी हा क्षण गमावला.
म्हणूनच मी म्हणतो क्षण ओळखावा, क्षण अनुभवावा!
No comments:
Post a Comment