गेल्या महिन्याभरातील या काही घटना! म्हणायला गेलं तर असंबंधित पण अचानक त्यात काहीतरी समान सूत्र असल्याची जाणीव झाली.
- महाबळेश्वरला जाताना वाईपर्यंतचा सपाट भूभागावरील प्रवास आणि मग माथ्यावर घेवून जाणारा चढणीचा, वळणावळणाचा रस्ता.
- कंपनीने एका शैक्षणिक सत्राला पाठविले. विषय होता नेतृत्वमार्गातील विविध टप्पे आणि त्यातील वळणे
- गेल्या आठवड्यात काहीश्या चिंतीत स्वरात पत्नी म्हणाली, हल्ली सोहम कसा बदललाय, शाळेतून आल्याआल्या न सांगता अभ्यासाला बसला आणि रात्री शेवटी त्याला सांगावे लागले की बस झाले आता, राहिला असेल तर उद्या पूर्ण कर. सोहमचा अल्लडपणा संपण्याची प्रक्रिया सुरु झाली की काय हे तिच्या चिंतेचे मुख्य कारण होते.
अजून थोडा मागे गेलो. सोहमला संगणकीय खेळांनी झपाटून टाकले होते. Level1, Level2 ची संकल्पना त्याला भारी आवडली, संगणकावरून जबरदस्तीने उठवल्यावर गडी खेळण्यातील गाड्या घेवून शर्यतीचा रस्ता बनवे आणि मग त्यात अडथळ्याचे प्रमाण वाढवीत नेत त्याचे level1 , level2 चे पुराण पुन्हा चालू होई.
आयुष्याचा प्रवासही काहीसा असाच. कधी सपाट भूप्रदेशावरील प्रवासासारखा, एका दिशेतील, न चढणीचा, एका वेगाचा, तर कधी शिखरमाथ्यावर घेवून जाणार्या चढणीच्या रस्त्याप्रमाणे वळणावळणाचा! ह्या प्रवासात येतात ते मैलाचे दगड. शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, अभियांत्रिकी शाखेची निवड, नोकरीसाठी योग्य अशा क्षेत्राची निवड, व्यावसायिक जीवनातील विविध टप्पे, जीवनसाथीची निवड ही काही महत्वाच्या टप्प्यांची उदाहरणे. आता ह्या प्रत्येक milestone बरोबर आपली जीवनातील भूमिका आणि तिच्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदार्या बदलत जातात. Level बदलते.
आता त्या शैक्षणिक सत्रातील महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तिथे नेतृत्वामार्गातील विविध स्थितींची ओळख करून देण्यात आली होती. एका स्थितीतून दुसर्या स्थितीत होणारे संक्रमण हे एक वळण घेवून येत. ह्या वळणानंतर जबाबदार्यांची क्लिष्टता वाढते, त्यांचे स्वरूप बदलते. आता मुख्य आव्हान हे असते की, ह्या बदललेल्या जबाबदार्या नक्की काय हे बर्याच वेळा लिखित स्वरूपात उपलब्ध नसते. प्रत्येकजण आपापल्या अकलेनुसार ह्या जबाबदार्या आणि त्याबरोबर येणाऱ्या अपेक्षा पुर्या करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळी आपल्यात भिनलेल्या आधीच्या भूमिकेच्या मनोवृत्तीला झटकून टाकायचा प्रयत्न करतो. काही जण यशस्वी होतात तर काही जणांना हे जमत नाही. जितक्या उंच जावून तुम्ही कोसळाल तितक्या गंभीर स्वरूपाचे परिणाम भोगावे लागतात.
यातला एक मुद्दा माझ्या मनाला भिडला. आपल्यात भिनलेली आधीच्या भूमिकेतील मनोवृत्ती! हा मुद्दा किती योग्य आहे. ह्या मनोवृत्तीचा आवश्यक नसलेला भाग तुम्ही किती लवकर आणि केवढ्या प्रमाणात झटकून टाकू शकता ह्यावर तुमचे पुढील भूमिकेतील यश अवलंबून असते. आपल्या मुलाला तुम्ही शिशुवर्गात असताना जसं शिकविता त्या पद्धतीत आणि तो तिसरीत गेल्यावर शिकविण्याच्या पद्धतीत बदल व्हायला हवा. विशीमध्ये असताना न पटलेल्या गोष्टीविषयीची तुमची प्रतिक्रिया देण्याची पद्धत आणि तीशीमधील पद्धत आपसूक बदलते, कारण level बदलली असते. आपल्या पूर्वजांनी किती सोप्या पद्धतीने चार आश्रमांची व्याख्या ठरवल्या होत्या. एका प्रकारच्या level च होय. आज मात्र आपण किती level ठरवायच्या आणि त्यातल्या किती आणि कधी पार करायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न!