Tuesday, July 31, 2012

I MISS YOU पांगारा!



लहानपणची गोष्ट! वसईची थंडी मार्च सुरु झाला तरी मागे सरण्याचे नाव काढत नसे. शाळेतील क्रीडा महोत्सव फेब्रुवारी मध्ये व्हायचा. त्यानंतर स्नेहसंमेलन वगैरे झाले की वार्षिक परीक्षांचे वारे सुरु व्हायचे. दहावी बारावीच्या परीक्षा सुरु झाल्यावर आमची शाळा अर्धवेळ म्हणजे दुपारी ३ वाजताच्या सुमारास चालू व्हायची. अशा सुमारास मला अभ्यासासाठी गच्चीवर जायला आवडायचे. आंघोळ, न्याहारी आटपून सकाळी साडेआठ - नऊच्या सुमारास मी दोन तीन विषयाची पुस्तके घेवून जात असे. अभ्यासाबरोबर तिथला एक उद्योग म्हणजे गच्चीजवळील पांगार्याच्या झाडाचे निरीक्षण. मार्च महिन्याच्या सुरुवातीस हे झाड लाल फुलांनी बहरून जाई. आजूबाजूच्या परिसरातील पक्षी ह्या झाडावर गर्दी करीत. पोपट, कोकिळा, कावळा अशा नेहमी आढळणाऱ्या पक्ष्यांसोबत बाकीचे पक्षीही गोळा होत. मग झाडावर चाले तो ह्या पक्ष्यांचा सुमुधुर कलकलाट! ह्या कलकलाटासोबत अभ्यास करण्याचा आनंद वेगळाच. हे सर्व पक्षी ह्या फुलांचा मध पिण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत. कावळे थोडीफार दादागिरी देखील करीत. एप्रिल मध्ये परीक्षा सुरु होईपर्यंत ही फुले मग हळू हळू नाहीशी होत. उरे मग केवळ काट्यांनी व्यापलेले पांगार्याचे झाड! पुढे पावसाला आला की हेच झाड हिरव्या पानांनी बहरून जाई. आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला आपला पर्णसंभार झाडून देई! ह्या पांगार्याच्या झाडाच्या बिया दगडावर घासल्या की बर्यापैकी गरम होत आणि मग बालमित्रांना चटका द्यायला उपयोगी पडत!

पुढे काळ बदलला. हे झाड आमच्या आणि शेजार्याच्या बरोबर हद्दीवर होते. ह्या जगात नुसत्या कलात्मक सौंदर्याला किंमत नसते, टिकायचे असेल तर एकतर ही कला बाजारात विकता यावी किंवा त्या वस्तूचे व्यावसायिक मोल असावे लागते. बिचाऱ्या पांगार्याच्या झाडाच्या लाकडाला काही व्यावसायिक किंमत नव्हती आणि एके दिवशी येवून लाकूडतोड्यांनी ह्या झाडाला तोडून टाकले. ते झाडही गेले आणि त्याबरोबर नाहीसा झाला तो मार्चच्या सुंदर सकाळचा पक्ष्यांचा सुमधुर किलकिलाट. ह्या नष्ट झालेल्या आनंदस्थळामुळे त्या परिसरातील पक्ष्यांचे दुखावलेले भावविश्व आपणास कसे कळावे? बाकी वसईत ह्या झाडांची संख्या मग झपाट्याने कमी होत गेली. रमेदी ते पारनाका ह्या रस्त्यांवरील वेगाने कमी झालेल्या जुन्या वाड्यान प्रमाणे!  आज अचानक ह्या पांगार्याची आठवण आली. नेटवर मिळालेला हा एक पांगार्याचा फोटो!

Friday, July 27, 2012

बदलांचा मागोवा!


असे म्हणतात की सद्ययुगात एकच गोष्ट कायम आहे आणि ती म्हणजे बदल! खाजगी क्षेत्रातील यशस्वी कंपन्या हे सत्य ओळखून आहेत आणि जगातील संभाव्य बदलांचा मागोवा घेत त्यानुसार भविष्यकाळातील धोरणे आखण्यासाठी ह्या कंपन्यांनी सल्लागार लोकांची नेमणूक केली असते. ज्या कंपन्यामध्ये अशा पदांवर योग्य व्यक्ती असतात त्याच कंपन्या कालौघात टिकून राहतात. परंतु बाकीच्या क्षेत्रांचे काय? स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही शासनपद्धतीचा अंगीकार केला. त्याचबरोबर छुप्या रूपाने काही गोष्टी घडल्या. ज्या विशिष्ट वर्गाने आधी बराच काळ भारतीय सामाजिक जीवनावर आधिपत्य गाजविले त्या समाजाला राजकारणापासून पद्धतशीररित्या दूर ठेवले गेले. त्यामुळे भारतीय समाज त्या वर्गातील अंगजात असलेल्या नेतृत्वगुणाला मुकला. स्वातंत्र्यकाळापासून आजवर भारताने प्रगती तर केली परंतु नक्कीच आजचे चित्र पाहता आपणास आशादायक भविष्यकाळ दिसत नाही. खाजगी क्षेत्र असो की राजकारण असो, एका विशिष्ट बिंदूच्या पलीकडील प्रगतीसाठी 'तिथे पाहिजे जातीचे' म्हणजेच त्या कामासाठी योग्य व्यक्तीच हवी ही उक्ती सार्थ ठरते. आपल्या देशातील लोकशाही पद्धतीच्या संरचनेमुळे लोकानुनय करण्याऱ्या धोरणांचाच स्वीकार केला जातो. प्रादेशिक पक्षांचे वाढलेले सामर्थ्य देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक अश्या धोरणांच्या आड येते. साधे उदाहरण घ्यायचे झाले तर आपल्या भारतात तयार होणारे अभियान्त्रिक पदवीधर. पुढील २० वर्षात भारताला आणि जगाला किती अभियान्त्रिक पदवीधरांची गरज आहे आणि एकंदरीत उद्योगधंद्यांची वाढ कोणत्या दिशेने होणार आहे याचा अभ्यास करण्याच्या दूरदृष्टीचा पूर्ण अभाव सध्याच्या राजकीय नेतृत्वात दिसतो. साधारणतः १५ वर्षापूर्वी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी गरज निर्माण झाली. त्यासाठी आपण तयार नव्हतो. मग काय झाले तर बाकीच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील लोक त्या क्षेत्रात शिरले. प्राथमिक पातळीवरील कामे करण्यासाठी हे ठीक होते परंतु नवीन product निर्माण करणे अशा विकसित स्वरूपांच्या कामासाठी आपण तयार नव्हतो. आजची स्थिती काय आहे तर आपण फक्त माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते निर्माण करण्यावर लक्ष देत आहोत. अभियांत्रिकीच्या मुलभूत शाखांमध्ये (स्थापत्य, विद्दुत, mechanical ) भविष्यातील गरज काय आहे याचा अभ्यास करण्याच्या दूरदृष्टीचा / किंवा ह्या दूरदृष्टीच्या क्षमतेचा पूर्ण अभाव आपल्या राज्यकर्त्यांकडे दिसतो. वाईट इतक्याच गोष्टीचे वाटते की खाजगी क्षेत्रात ह्या सर्व प्रश्नांचा दूरगामी विचार करू शकणारे अनेक व्यवस्थापक आहेत. परंतु सद्य राजकीय प्रणाली अशा सक्षम लोकांना भविष्यातील धोरणे ठरविण्यासाठी समाविष्ट करून घेत नाही. काही अपवाद आहेत जसे की नंदन निलकेणी यांचा UIDAI प्रकल्पातील समावेश! परंतु लालफितीचा मुकाबला करण्यात त्यांची अर्धी शक्ती वाया जात असल्याचे जाणवते.

जाता जाता हेच म्हणावेसे वाटते, भारताचे सध्याचे यश दोन घटकांमुळे आहे एक खाजगी क्षेत्रातील सक्षम नेतृत्व आणि चांगुलपणावर विश्वास ठेवून जीवनातील असंख्य अडचणींचा शांतपणे मुकाबला करणारा मध्यमवर्ग. परंतु आपल्या देशाची ही एक उत्तम स्थिती आपण राजकीय क्षेत्रातील दूरदृष्टीच्या अभावामुळे वाया घालवीत आहोत हीच खंत. ह्या राजकीय प्रणालीत बदल कोण आणि कसे आणणार हाच खरा प्रश्न आहे.
 

Tuesday, July 24, 2012

रिकामी न्हावी...



मुलांना मे महिन्याच्या सुट्ट्या पडल्या की शहरातील पालक धास्तावतात! पूर्वीसारखा नातेवाईक, शेजारी असणारा समवयस्क मुलांचा घोळका हल्ली कमी होत चालला आहे आणि त्यामुळे मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी पालकांना उद्योग शोधावे लागतात. हे झाले एकदम प्राथमिक उदाहरण, पण ह्या प्रश्नाची प्रगतावास्थेतील उदाहरणे अनेक, सतत कामात गुंतून राहणाऱ्या नोकरपेशा किंवा व्यावसायिक माणसाला अचानक मोकळी अशी साप्ताहिक सुट्टी मिळाली किंवा त्याने / तिने एका आठवड्याची सुट्टी टाकली तर ही व्यक्ती घरी शांतपणे बसू शकत नाही. व्यावसायिक स्त्रियांना बाळंतपणानंतरची अल्पमुदतीची किंवा कायमची सुट्टी, नवऱ्याच्या नोकरीनिम्मित परदेशी / परगावी स्थायिक व्हावे लागल्यामुळे सुटलेली नोकरी ही अजून काही उदाहरणे. माणसाची नोकरी गेली किंवा माणूस निवृत्त झाला तरी हा प्रश्न उद्भवतो.

कधीतरी वाचले होते की माणसाचे अर्धे प्रश्न त्याच्या एका खोलीत शांतपणे बसू शकण्याचा क्षमतेच्या अभावामुळे निर्माण होतात. हे विधान बऱ्याच प्रमाणात मला पटले. आता हा प्रश्न गावापेक्षा शहरात अधिक उग्र स्वरूप निर्माण करतो. अमेरिकेतील कुटुंब फोन न करता अगदी जवळच्या मित्राच्या घरी देखील जाणार नाहीत. मुंबईत फोन न करता घरी जाण्याचा हक्क आपण काही मोजक्या कुटुंबात गाजवू शकतो. वसईत मात्र आपण बहुतांशी सर्वांच्या घरी हा हक्क बजावू शकतो. समजा एखादे आई, बाबा आणि मुल असे छोटे कुटुंब आहे तर हे कुटुंब रविवारी संध्याकाळी काही न करता दूरदर्शन न लावता, संगणक सुरु न करता किती वेळ घरात सुसंवाद साधू शकते हा ह्या कुटुंबातील सुसंवाद किती आहे याचा मापदंड असू शकतो.

माणसाला समाजाशी संवादाची गरज का भासते? आपल्याला समाजाने स्वीकारले आहे ह्या जाणीवेवर माणसाला वेळोवेळी शिक्कामोर्तब हवे असते. हे शिक्कामोर्तब किती प्रमाणात हवे आणि त्याची वारंवारता किती असावी हे व्यक्तीनुसार बदलते. निवृत्त माणसांना हा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतो. ह्यातील काही नशीबवान माणसे सामाजिक संस्थावर एखादे मानाचे स्थान मिळवून वर्षोनवर्षे बसून राहतात. आणि आपल्या अनुभवाचा समाजाला उपयोग करून देतात! पण एक क्षण असा येतो की ज्या क्षणी ह्या पदावरील ह्या व्यक्तीचे अस्तित्व ही समाजापेक्षा त्या व्यक्तींची गरज बनते. एकंदरीत हा आपण भारतीयांचा सामाजिक आणि राजकीय जीवनातील प्रश्नच आहे ना! तरुणपणीच्या उमेदीच्या वर्षात आपल्याला कधी संधीच मिळत नाही मग ते सामाजिक जीवन असो की राजकीय जीवन. ८० व्या वर्षी राष्ट्रपती झालेल्या प्रणावदांचे अभिनंदन!

माणसाला मोकळा वेळ घरी शांतपणे घालविता येत नाही ह्या गृहितकावर अनेक उद्योगधंदे सध्या निर्माण झाले आहेत. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी ओसंडून वाहणारे मॉल, मे महिन्यात पालकांचा खिसा रिकामी करणारे तथाकथित ज्ञानी लोकांनी चालविले सुट्टीतील वर्ग ही त्याची उदाहरणे होत. अरेच्या हा ब्लोग पण त्याचे उदाहरण नव्हे ना :)

Sunday, July 22, 2012

हल्लाबोल


मागच्या सायकल शर्यतीच्या लेखात एक मुद्दा मांडायचा राहून गेला. आघाडीचा जथ्था बरेच अंतर एकत्र जात असतो. अंतिम रेषेला २-३ किमी अंतर बाकी असताना त्यातला एखादा स्पर्धक अचानक ह्या समूहातून पुढे निघतो, शेवटचा हल्ला चढवितो. ह्या क्षणाच्या निवडीमागे मोठे गणित असते. ह्या क्षणानंतर असतं ते अंतिम युद्ध! आपण हा शेवटचा निकराचा प्रयत्न किती काळ टिकवू शकतो, शेवटचा मार्ग कसा आहे, आपली आणि प्रतिस्पर्ध्याची शक्तिस्थाने, कमकुवत दुवे कोणते ह्या सर्वच अभ्यास करून ह्या क्षणाची निवड केली जाते. हा हल्लाबोल चढविणारा स्पर्धक नेहमीच शर्यत जिंकतो असे नाही, पण तरीदेखील प्रत्येक दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीत असा एक स्पर्धक असावाच लागतो. इथले उदाहरण शर्यतीचे, पण तसेच लागू पडते ते स्पर्धात्मक व्यवसायात, युद्धात असे क्षण येतातच!

परवा ओवल सामन्यात शतक पूर्ण केल्यावर ग्राहम स्मिथ म्हणाला की पहिल्या दिवसानंतर इंग्लंडने सामन्यावर बर्यापैकी पकड बसविली होती. बहुतांशी कसोटी सामने ह्या स्थितीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकतात. परंतु दक्षिण आफ्रिकेने दुसर्या दिवसानंतर सामना फिरवला. इंग्लंडला झटपट गुंडाळून धावांचा डोंगर उभा केला. इथे मुद्दा येतो तो मनसामर्थ्याचा, ज्याचे मनोबल जास्त तो आपल्या जवळील साधनांचा, आपल्या कौशल्याचा पुरेपूर उपयोग करून घेतो आणि यशस्वी बनतो. बारावीला असताना रुपारेल होस्टेलला राहिलो. तिथेही काहीसा असाच प्रकार अनुभवायला मिळाला होता. तिथे बारावीच्या मजल्यावर राहणारे सर्वजण एकदम हुशार, योग्य पात्रतेचे. दहावीपर्यंत अतिशय चमकलेले. फरक इतकाच की बारावीत पालकांचे संरक्षक कवच वसतिगृहात २४ तास उपलब्ध नव्हते, आपल्याहून अधिक क्षमतेची मुले आपल्या डोळ्यासमोर होती. आपल्यातील काही कच्चे दुवे प्रथमच स्वतःला कळत होते. मग १२ वीच्या निकालानंतर दोन वर्ग समोर आले. काही जणांनी ह्या सर्व घटकांना तोंड देत दैदिप्यमान यश मिळविले आणि काहीजण मात्र आपल्या क्षमतेइतके यश मिळवू शकले नाहीत.

अजून एक महत्वाची बाब डोळ्यासमोर येते आणि ती म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीचे झटपट विश्लेषण करून योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता. तुमची परिस्थिती कितीही बिकट असो, त्या परिस्थितीतही तुमच्यासमोर एखादा उत्तम मार्ग उपलब्ध असतो. तो तुम्हाला शोधता आला पाहिजे.

Saturday, July 21, 2012

टूर द फ्रांस, ऑलिम्पिक, रसिकता वगैरे वगैरे


मागच्या ब्लोगमध्ये ज्ञानी लोकांच्या लिखाणाविषयी म्हटले होते. ह्या लोकांचा त्या विषयातील व्यासंग दांडगा असतो. सद्यकालीन आणि माझ्या मर्यादित वाचनात आलेला असा ज्ञानी लेखक म्हणजे डॉ. गिरीश कुबेर! लोकसत्तेत शनिवारी ते सुंदर लेख लिहितात.
पहिला लेख होता कर्ता आणि करविता ह्या विषयावर! करविता ह्या वर्गातील लोक मुळच्या आर्थिक भांडवलाला कृत्रिम फुगवटा आणण्याची कामे करतात, ही फुगी खरी असल्याचा आभास निर्माण करण्याची किमया हे करविते करतात. असाच हा कृत्रिमरीत्या वाढविलेला फुगा केव्हातरी फुटतो आणि ह्या फुगवट्याच्या आधारावर केलेली सर्व गणिते कोलमडून पडतात. असा एकंदरीत ह्या लेखाचा मतितार्थ! आजचा दुसरा लेख होता विविध आर्थिक घोटाळ्यात सापडलेल्या उच्चपदस्थ अनिवासी भारतीयांविषयी! ह्या अशा उच्चपदस्थ घोटाळ्यातील भारतीयांची संख्या वाढत चालल्याचे त्यांनी सोदाहरण पटवून दिले आहे.
सध्या टूर द फ्रांस ही जगप्रसिद्ध सायकल शर्यत चालू आहे. बरेच दिवस चालणारी ही सायकल शर्यत, ज्या प्रमाणे स्पर्धकांच्या शारीरिक क्षमतेची कसोटी पाहते त्याचप्रमाणे स्पर्धकाच्या विविध गटांचे डावपेच पाहणे सुद्धा आनंददायी अनुभव असतो. मी जेव्हा संधी मिळते तेव्हा ही शर्यत पाहतो त्याचे मुख्य कारण फ्रान्सच्या नयनरम्य गावांचे घडणारे मनोहर दर्शन! ह्या स्पर्धेतील गट कसे पाडले जातात आणि त्यांची गुणपद्धती कशी आहे ह्याचा मला अजिबात ठावठिकाणा नाही. नयनरम्य फ्रान्सच्या भागातून जाणारे हे सायकलस्वारांचे जथ्थे! एक आघाडीचा आणि बाकी सर्व पिछाडीचे! ह्या सायकलस्वारांचा वेग तसा बर्यापैकी, ताशी २५ किमी ते शेवटच्या टप्प्यात ४० किमीपर्यंत जात असावा. आघाडीच्या समूहातील सायकलस्वार बरेच अंतर एकत्र पार पाडतात, त्यांच्याबरोबर असतात त्या मोटारी, बाइक्स आणि हेलीकोप्तर. इतके अंतर पार पाडायचे असल्याने शक्ती राखून ठेवणे आवश्यक, जरा वेळ मान समोर ठेवून सायकल चालविल्यावर थोडा वेळ मान खाली आणून सायकल चालावावयाची, मध्येच बाजूच्या सहाय्य चमूकडून पाण्याची बाटली घेवून आपली तहान भागवायची, हे सर्व करता करता आपल्या प्रतिस्पर्ध्यावर नजर ठेवायची ह्या सर्व गोष्टी हे स्पर्धक साधत असतात. त्यांचे हे सर्व डावपेच पाहणे मजेशीर असते. ही शर्यत जेव्हा एखाद्या गावातून जाते त्यावेळी तेथील ग्रामस्तांच्या चेहऱ्यावरील आनंद टिपण्याजोगा! अगदी पूर्वी बलिप्रतिपदेला वसईला होणार्या सायकल शर्यतीतील स्पर्धक रमेदिहून गेले की मला होणार्या आनंदासारखा!
पुढील आठवड्यात ऑलिम्पिक चालू होईल. माझी सर्वांना कळकळीची विनंती! सर्व मालिका, इंटरनेट सर्व काही बाजूला सोडा आणि ऑलिम्पिक पहा. देशाच्या प्रतिष्ठेसाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणर्या खेळाडूंचा यज्ञ पाहण्यासारखा आनंद नाही! लयबद्ध जलतरण स्पर्धा, मेराथोन स्पर्धा, नेमबाजी स्पर्धा, लांब पल्ल्याच्या धावण्याच्या / पोहण्याच्या स्पर्धा - मनुष्याच्या शरीराच्या / मनाच्या एकाग्रतेची कसोटी पाहणाऱ्या ह्या विविध स्पर्धा एकत्र पाहण्यासारखा दुसरा आनंद नाही! हा आनंद लुटताना आयोजकांच्या अथक परिश्रमाला दाद द्यायला विसरू नका!
लेखाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध ह्यात एकच समान सूत्र. जीवनातील झटपट आनंदाच्या / सुखाच्या मागे लागलेलो आपण बहुतांशी भारतीय. आणि छोट्या छोट्या सुंदर गोष्टीतून जीवनाचा आनंद खर्या अर्थाने लुटणारे प्रगत देशातील खेळाडू, क्रीडा आणि कलारसिक! आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्याचे आपले स्वप्न साकार करता करता आपली रसिकता जोपासण्याचे थोडेसे प्रयत्न आपण करून बघुयात का?

Sunday, July 8, 2012

नवलेखकाचे मनोगत!


लेखक बनण्यासाठी मुलभूत गुणधर्म कोणते? ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास विविध बाबी नजरेसमोर येतात.
  1. आपल्या संभाव्य वाचकवर्गाची माहिती, त्या वाचकवर्गाला आवडेल अशा विषयांची निवड, त्या वाचकवर्गाला आवडेल / समजेल अशी लिखाण शैली
  2. ज्या विषयात लिहायचे त्या विषयातील ज्ञान. (लिखाणाचे विषय अनेक; प्रवासवर्णन, ऐतिहासिक विषयांवरील लेखन, तात्कालिक घटनांवरील भाष्य, आत्मचरित्र, व्यक्तीचरित्र, सामाजिक समस्यांवरील लेखन, कथा (दीर्घकथा, लघुकथा). यादी अशी लांबतच जाईल.
  3. वाचक वर्गाला खिळवून ठेवण्यासाठी एक तर आपल्या लिखाणाने त्याच्या ज्ञानात भर पडली पाहिजे किंवा आपल्या विनोदी लिखाणाने त्यांना खिळवून ठेवता आलं पाहिजे.
जसजसा समाज प्रगत होत जातो तसतस लोक लिहू लागतात. वरील बाबींपैकी सुरुवातीला एकही बाब ह्या नवलेखकांमध्ये उपस्थित नसते, परंतु ह्या नवलेखकांची चिकाटी आणि उत्साह दांडगा असतो. ई-मेल ने धुमाकूळ घालण्याआधी भारतीय टपालखाते चालविले ते ह्या नवलेखाकानीच. आपले लेख सर्व वर्तमानपत्रे, मासिके यांना पाठविणे, आपल्या सर्व मित्रवर्गात, नातेवाईकांमध्ये आपल्या लेखांची चर्चा मुद्दामच उपस्थित करणे ह्यात ह्या नवलेखकांचा हात कोणीच धरू शकत नाही. ई-मेल / इंटरनेट आल्यावर तर या नवलेखकांचे काम सोपे झाले. ह्यांनी ब्लॉग लिहिले, लोकांचे मेल बॉक्स भरून टाकले. आता वरती म्हटल्याप्रमाणे बर्याच नवलेखकांकडे एखाद्या विषयावर अधिकारवाणीने लिहिण्याच्या मुलभूत गुणधर्माचा अभाव असल्याने ते तात्कालिक विषयांकडे,ढासळणार्या सामाजिक मूल्यांविषयी लिहितात. मराठी समाजाने लिखाणात आणि चर्चेत जो वेळ घालविला त्याच्या १० टक्के वेळ जरी त्या समाजाने प्रत्यक्ष कृतीत घालविला असता तर त्या समाजाची स्थिती बरीच वेगळी असती. दुर्देवाने नवलेखक ही गोष्ट विसरतात. हे नवलेखक प्रतिक्रियेचे आणि स्तुतीचे भुकेलेले असतात. त्यांना मिळालेली एक प्रतिक्रिया पुढील दहा लेखांना जन्म देते!
अशाच एका नवलेखकांच्या जबरदस्तीने बनविलेल्या वाचकवर्गा, माझा तुला सलाम!