मध्येच एकदा होवच्या मैदानात केंट आणि ससेक्स ह्यांचापंचेचाळीस षटकांचा मर्यादित सामना मी आणि श्रीकांत पाहून आलो. ससेक्स मध्ये राहत असल्याने आम्ही त्या संघाला पाठींबा देत होतो. आपला राहुल द्रविड पाहुण्या केंट संघातून आला होता. आम्ही तिथे पोहोचेतोवर राहुल फलंदाजीस आला होता. थंड हवेत बियरचे ग्लास मुक्तपणे प्राशन केले जात होते. आमच्या समोर बसलेल्या आणि केंटला पाठींबा देणार्या दोन प्रेक्षकांवर बियरप्राशन आणि थंड हवा ह्यांचा परिणाम झाल्याने त्यांनी ससेक्स संघाच्या नावाने खडे फोडण्यास सुरुवात केली होती. गंभीर स्वभावाच्या इंग्लिश प्रेक्षकांना हा प्रकार आवडत नसल्याने त्यांनी शांत राहणे पसंत केले होते. परंतु जवळच बसलेल्या दहा वर्षांच्या आसपास वयाच्या दोन मुलांना आपल्या संघाचा हा असा अपमान न आवडल्याने ते अधूनमधून त्या दोघांजवळ जाऊन ओरडून येत होते. सामन्यात द्रविड व्यतिरिक्त बेवन आणि एल्हम ह्या आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या खेळाडूंचा समावेश होता. ४५ षटकामधील २१५ ही केंटची धावसंख्या फारशी खास नव्हती. मध्यंतरात लहान मुले मैदानात उतरून आपल्या चेंडू फळीने खेळत होती. काही मोटारस्वार तात्पुरत्या उभारलेल्या लाकडी मंचावरून कसरती करत होते. जोरदार इंग्लिश गाणी वाजवली जात होती.
ससेक्सची फलंदाजी सुरु झाली. सलामीच्या फलंदाजांनी १२० च्या आसपास भागी केली. मग दोन विकेट पटकन गेल्या. नंतर शांत डोक्याचा बेवन आणि एक सलामीचा फलंदाज खेळू लागले. केंटच्या संघात पटेल नावाचा गोलंदाज होता. मध्येच इंग्लंड मध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात एका संघातून ११ ही खेळाडू पटेल असल्याची ह्या निमित्ताने आठवण झाली. केवळ दोनच विकेट गेल्याने सामना तसा ससेक्सच्या आवाक्यात होता. परंतु शेवटची दोन षटके बाकी असताना सलामीवीर बाद झाला आणि मग बेवनला स्ट्राईकच मिळाला नाही. जेव्हा मिळाला तेव्हा दोन चेंडूत चार धावा हव्या होत्या. बेवनने चेंडू हवेत उंच टोलवला. खरंतर तो सीमारेषेबाहेर जायचा पण दुर्दैवाने सीमेवरील एका क्षेत्ररक्षकाने झेल घेतला. आणि अशा प्रकारे ससेक्स अनपेक्षितरित्या सामना हरलं. श्रीकांतने मैदानात उडी मारली तशी एकटं राहायला नको म्हणून मी सुद्धा मारली. श्रीकांत साहेब थेट द्रविडजवळ जाऊन उभे राहिले आणि त्याने जोरात "राहुल" अशी हाक मारली. इथे आपल्याला इतक्या अधिकारवाणीने हाक मारणारा हा कोण हे पाहण्यासाठी द्रविडने आमच्याकडे पाहिले. अनोळखी चेहरे पाहून मग तो आनंद व्यक्त करणाऱ्या केंट खेळाडूमध्ये मिसळला. राहुल द्रविडला तीन चार फुटाच्या अंतरावरून ह्याची देही डोळा पाहण्याची संधी मिळाल्याने मी धन्य झालो होतो.
त्या सामन्याचा हा क्रिकइंफोवरील धावफलक!
http://www.espncricinfo.com/ci/engine/current/match/421500.html
होवच्या मैदानाचं हे एक सुरेख चित्र
विक हॉल मध्ये राहण्यास गेल्यापासून जेवणाची परिस्थिती बरीच सुधारली होती. मुख्य म्हणजे भात खायला मिळू लागले होते. दोन्ही पार्टनर शाकाहारी असल्याने मी मांसाहारापासून वंचित राहत होतो. म्हटलं तर मांसाहारी स्वयंपाक करण्यास त्यांची ना नव्हती. परंतु माझे पाककौशल्य मर्यादित होते आणि तीन माणसांत किती वेगळे प्रकार करणार म्हणून मी पुढाकार घेत नव्हतो. पण मग एकदा न राहवून मी वेटरोज मधून चिकन ड्रमस्टिक घेऊन आलो. आईला वसईला फोन लावला आणि तिच्या मार्गदर्शनाखाली चिकन बनवलं. इतक्या दिवसाच्या अंतराने चिकन मिळाल्याने ते अगदी रुचकर लागले.
पुढे एकदा अशीच दुधीची आमटी खायची हुक्की आली. माझी मोठी काकी (मोठीआई) वसईला ह्याची उत्तम आमटी करते. मग मागच्या एका भागात सांगितल्या प्रमाणे मी २.२९ पौंडांचा दुधी घेऊन आलो. एव्हाना वसईवाले झोपले असतील म्हणून अमेरिकेत राहणार्या निउला फोन लावला. तिच्या दुपारच्या तिने १५ मिनिटात दुधीच्या आमटीची रेसिपी अगदी सविस्तरपणे सांगितली. त्यात शेवटी शेंगदाण्याचं कूट टाकावं असा तज्ञ वर्गात मोडणारा सल्लाही दिला. ही आमटीसुद्धा सुंदर झाल्याने माझा पाककलेतील आत्मविश्वास आता बळावत चालला होता.
मध्येच विम्बल्डन होऊन गेले. सिंटेलचे काही जण जाऊन प्राथमिक फेरीचे सामने पाहून आले. प्रफुल्ल फुटबॉलचा मोठा चाहता! इंग्लिश प्रीमियर लीगचे सामने पाहायला जायचा आणि मग येताना तो प्रेक्षकवर्ग आगगाडीत कशी हुल्लडबाजी करतो हे ही सांगायचा.
एका वीकएंडला युरो २००० चा इंग्लंड आणि जर्मनी ह्यांचा सामना होता. तेव्हा मला अमेक्सच्या गायने सामन्याच्या निकालावर लक्ष ठेवत इंग्लंड हरल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला. अशा प्रकारे इंग्लंडचे फुटबॉल चाहते त्यांच्या हुल्लडबाजीसाठी कुप्रसिद्ध होते / आहेत.
माझी आधी ठरल्याप्रमाणे तीन महिन्याची मुदत संपायला आली होती. पण आम्ही हे दोन महत्वाचे प्रोग्रॅम विकसित केल्याने मला कंपनीने माझं वास्तव्य वाढवायला सांगितलं. पौंडाच्या वाढत्या दराकडे पाहत मी ही ते मान्य केलं. इंग्लंडच्या बँकेत आता बचत वाढत चालली होती. इथे पैसे असले तरी आमच्या मनाला काही खात्री वाटत नव्हती. त्यामुळे मंडळी नियमितपणे भारतीय खात्यात पैसे पाठवून देत. ही रक्कम १ लाखाच्या आत असल्यास आयकर खात्याचं लक्ष जात नाही असा समज आमच्या मंडळीत रूढ होता. एकदा का बार्कलेस बँकेतून मुंबईच्या बँकेत पैसा ट्रान्सफर करायची सूचना दिली की पाचव्या दिवशी ते भारतीय खात्यात दिसत. परंतु काही कारणाने वसईच्या खात्यात मात्र हीच ट्रान्स्फर २१ दिवस घेत असे. ही सूचना दिल्या दिल्या हे पैसे बार्कलेज मधून गायब होत असल्याने मी मात्र पुढील वीस दिवस अगदी जीव मुठीत ठेवून बसत असे.
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आपल्या भारतीय कंपन्या काही मनाला न पटणारे प्रकार करतात. अमेक्स चे युरो साठी बदलले जाणारे प्रोग्रॅम विविध गटात विभागले गेले होते. ह्या प्रत्येक गटांना वर्कग्रुप असे संबोधिले जाई आणि त्या गटातील तज्ञांना वर्कग्रुप चॅम्पियन असे संबोधिले जाई. अमेक्सचे वर्कग्रुप चॅम्पियन साधारणतः २० - २५ वर्षे अनुभव असणारे होते आणि त्यातील बर्याच जणांनी त्यातील आज्ञावलीचा बराच भाग कोळून प्याला होता आणि त्यांच्यासमोर उभं केलं गेलं ते एकूण २-३ वर्षे अनुभव असणाऱ्या आणि ह्या अमेक्सच्या व्यावसायिक नियमांचा अभ्यास उपलब्ध माहिती वाचून करण्यास सुरु केलेल्या आम्हांला!! अमेक्सच्या खर्या तज्ञ लोकांची नाराजी त्यांच्या वागण्यातून स्पष्ट दिसत असे!
(क्रमशः)