पत्नी आणि बायको हे म्हटले तर समानार्थी शब्द असले तरी ह्या दोघांचा वापर कधी करायचा ह्याविषयी काही पायंडे पडून गेले आहेत असे आपल्याला जाणवतं. बायको ह्या शब्दाशी "त्रागा", "कटकट", "घरातील संपलेलं किराणा सामान", "घरातला रगडा", "शॉपिंगला जायची इच्छा व्यक्त करणारी" असे शब्दप्रयोग निगडीत आहेत. तर पत्नी ह्या शब्दाशी "मर्मबंधातील ठेव", "नाजूक भावबंध", "जीवनप्रवासातील साथी", "पडत्या काळात आपली साथ देणारी" वगैरे शब्दप्रयोग वापरले जाण्याची प्रथा असावी. मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात पत्नी हा शब्द वापरला जाण्याचे भाग्य क्वचितच असते. माझ्या मर्यादित मराठी वाचनात "शिवाजी- सईबाई" , "माधवराव - रमाबाई" ह्या जोडप्यांत पत्नी ह्या शब्दाचा योग्य वापर आढळतो.
तर बायको ही व्यक्ती आपलं मनोगत सतत नवर्यापुढे व्यक्त करत असते. त्याला कटकट असे म्हणण्याची नवरेवर्गात प्रथा आहे. ह्या मनोगताला कसे सांभाळायचे ह्याची प्रत्येकाची वेगवेगळी तंत्रे असतात. आता एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो कि वरील सर्व विधाने ही एकंदरीत मराठी मध्यमवर्गीयांना उद्देश्यून केली गेली आहेत आणि ह्यात माझ्या किंवा माझ्या ओळखीतल्या कोणाचा अनुभव वापरला गेला नाहीये!
आता माझ्या घरची गोष्ट! पत्नी प्राजक्ता म्हणाली, "तुझा बाह्य जगतातील जनसंपर्क कमी होत चालला आहे! तुझी पांढरपेशाच्या मार्गावर वाटचाल सुरु आहे". Point Taken. मला मुद्दा पटल्याने मी सहसा जो प्रतिकार करण्याचा लुटूपुटीचा प्रयत्न करतो तो ही केला नाही. नेहमीप्रमाणे मी मग अंतर्मुख झालो.
प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार सुरूच असतात. आयुष्य म्हणा किंवा एखादा खेळाचा सामना असो - तुम्हांला अनुकूल क्षण येतात. काही जण हे अनुकूल क्षण ओळखतात, त्या क्षणापासून प्रगतीच्या शिखरावर जाण्याचा त्यांच्या समजुतीप्रमाणे जो मार्ग असतो त्याला धरून ठेवतात. आणि त्याप्रमाणे आयुष्य व्यतीत करतात. प्रगतीपथाची असलेली त्यांची ही समजूत कधी अचूक असते तर कधी नाही!
ह्यात अजून एक खास गोष्ट! ही सहसा उघडपणे कोणी बोलून दाखवत नाहीत. व्यावसायिक जगात यशस्वी झालेल्यापैकी बहुतेकांच्या बाबतीत "योग्य जागी योग्य वेळी असणे" हे यशस्वी होण्याच्या मागचे मुख्य कारण असते. आपल्याइतक्याच किंबहुना त्याहून जास्त क्षमतेचे अनेक लोक बाहेरील जगात आहेत, हे सर्वांना माहित असते. त्यामुळे एकदा का ही योग्य स्थिती मिळाली की मेहनतीच्या जोरावर ही टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ह्यात मग तुमच्या जीवनातील शिस्त, वेळ योग्य प्रकारे व्यतीत करण्याची तुमची क्षमता हे सर्व महत्वाचे घटक येतात. शिस्त येते ती वागण्यातील आणि आहारातील! वेळ योग्य प्रकारे व्यतीत करण्याची क्षमता ह्यात कार्यालयाच्या जवळ घर घेणे किंवा घराच्या जवळ कार्यालय शोधणे हा प्रकार, साप्ताहिक सुट्टीत मनाला पूर्णपणे उल्हसित करण्याची तंत्रे वगैरे प्रकार येतात. जुनी लोक म्हणतात की आयुष्यात सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्या पाहिजेत. सगळ्या ह्या शब्दात प्रामुख्याने "लग्न" "मुलेबाळे" हे अभिप्रेत असतं. करियर करायचं ते ५८ वर्षांपर्यंत! त्यात ३५ च्या नंतर बायको, (नव्हे पत्नी!) मुले ह्यांची साथ नक्कीच महत्वाची आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी वेळीच व्हायला हव्यात. माझी गणना जुन्या लोकात झाल्याची ही लक्षणे!!
असो मी पांढरपेशा का? तर एक साप्ताहिक सुट्टीत भाजीमार्केट मधील माझी फेरी वगळता मी बाकी कधीच घर आणि कार्यालयापलीकडील लोकांशी संपर्क साधत नाही. कार्यालयात बराच वेळ अमेरिकेतील अर्थव्यवस्थेचे विचार घोळत राहतात. घरी इंग्लिश माध्यमात शिकणाऱ्या मुलाचा अभ्यास आणि ब्राझीलातील वर्ल्ड कप! ह्या सर्व प्रकारात माझा मेंदू ऑफिसातील कामापासून, तिथल्या वातावरणापासून फारसा लांब जाणार नाही ह्याचीच मी अप्रत्यक्षरित्या काळजी घेत असतो. म्हणजेच मी सुदैवाने मिळालेल्या आणि माझ्या समजुतीप्रमाणे चांगल्या असलेल्या परिस्थितीला घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.
बाकी हे ब्लॉग लिहिणं म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण!
बायको कधी कधी खास बोलते हे मात्र खर आहे!
No comments:
Post a Comment