निरंजनचा लेख काहीजणांना भावला, त्यांनी तसे प्रतिक्रियेतून कळवलं सुद्धा! पण एक प्रतिक्रिया मात्र काहीशी अंतर्मुख करणारी होती. "निरंजनचे ठीक आहे, पण निरंजनाचं काय?"
खरतर निरंजनच्या लेखातील बराचसा भाग हा व्यावसायिक क्षेत्रात असणाऱ्या पुरुष आणि स्त्री ह्या दोघांना लागू असणारा होता, लेख लिहिताना निरंजनचा मी पुरुष म्हणून काही वेगळा विचार केला नव्हता. म्हणायला गेलं तर पुरुषांना थोड्याच स्वतःच्या वेगळ्या समस्या असणार! असे हे वाक्य पुरुषअधिकारवादी संघटनांना (अशा काही संघटना अस्तित्वात असल्यास!!) खटकू शकते. असो दुर्लक्षित पुरुषांच्या दुर्लक्षित अधिकारांकडे डोळेझाक करून पुढे सरकुयात!
हा विचार डोक्यात घोळत असतानाच काल फेसबुकच्या COO शेरील सैंडबर्ग आणि पेप्सीच्या CEO नुयी ह्या दोघींच्या मुलाखती वाचनात आल्या. त्यामुळे हा लेख लिहिलाच पाहिजे ह्या विचाराने उचल खाल्ली! आता CEO आणि COO ह्या दोन्ही शब्दांना मुख्य कार्यकारी अधिकारी हाच शब्द सध्या सुचत असल्याने मी अर्थ कायम ठेवण्यासाठी मूळ इंग्लिश शब्द कायम ठेवणे पसंत केले आहे हे मी नमूद करू इच्छितो. तर व्यावसायिक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जीवतोड मेहनत करणाऱ्या स्त्रियांच्या स्वतःच्या अशा काही समस्यांचा माझ्या परीने अभ्यास करणारा हा लेख. पूर्वी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावणे हा शब्दप्रयोग मला झेपत नसे. पुरुषांची सरासरी उंची कुठे आणि महिलांची सरासरी उंची कुठे असे विचार मनात डोकावत! पण हल्लीच्या नवीन पिढीतील मुलींची उंची पाहिल्यावर मी हा शब्दप्रयोग बिनबोभाट स्वीकारतो.
आता निरंजना हे अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या भाचीचं नाव, त्यामुळे ह्या पोस्टला हे शीर्षक द्यायला तसा मी धजावत नव्हतो. परंतु माझे ब्लॉग नित्यनेमाने वाचणारी तिची आई निऊ अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिवसानिमित्तच्या दीर्घ साप्ताहिक सुट्टीचा आनंद घेत असल्याची शक्यता असल्याने ती आणि निरंजना हे शीर्षक फारसे मनावर घेणार नाहीत असा सोयीस्कर समज मी करून घेतोय!
तर सुरुवात नुयीपासून! "स्त्रियांना ह्या युगात सुद्धा आयुष्यात सर्व काही का मिळू शकत नाही?" अशा काहीशा विवादास्पद शीर्षकाच्या प्रबंधावर नुयींची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यांनी ह्या शीर्षकाशी सहमती व्यक्त करताना म्हटलं "हे खरे आहे की आम्हां स्त्रियांना आयुष्यात सर्व काही मिळू शकत नाही! आम्ही फक्त सर्व काही मिळाल्याचं भासवून द्यायचा प्रयत्न करतो!" ३४ वर्षे संसारात असणाऱ्या आणि दोन मुलींच्या आई असणाऱ्या नुयी पुढे मुलींच्या बालपणातील काळातील दररोज सकाळी पडणाऱ्या प्रश्नाविषयी बोलतात "आज मी कोणती भूमिका निभावणार - आई/पत्नी की एक अधिकारी" शाळेतील इतर मुलींच्या आयांबरोबर असणाऱ्या साप्ताहिक कार्यक्रमाला हजर न राहता आल्याने मुलींच्या येणाऱ्या तक्रारीमुळे त्या अपराधीभावनेने ग्रासून जात. पुढे त्यावर त्यावर उपाय शोधला. हा कार्यक्रम अटेंड करू न शकणाऱ्या सर्व आयांची त्यांनी यादी शाळेकडून मागविली. पुढच्या वेळी जेव्हा मुलींनी तक्रार करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी मुलींना ही यादी वाचून दाखविली आणि सांगितलं की मी एकटीच काही वाईट आई नाहीये!
त्या पुढे म्हणतात - "ही तंत्र वगैरे सर्व काही जरी खरी असली तरी एक तणावाने भरलेली कारकीर्द आणि मुलांना वाढविणे हे खरोखर अवघड आहे असे त्या म्हणतात. ज्या काळात तुम्ही आपल्या निवडलेल्या क्षेत्रात स्थिरावत असतात त्यावेळी असतो त्याच वेळी तुमच्या जैविक घड्याळानुसार मुलांना जन्म देण्याची योग्य वेळ असते आणि ज्या तुमच्या व्यावसायिक कारकीर्दीचा आलेख अधिक जबाबदारीच्या व्यवस्थापनाच्या भूमिकेपाशी पोहोचलेला असतो त्यावेळी वयाच्या १३ - १८ वर्षाच्या गटात पोहोचलेल्या मुलांना तुम्ही हवे असता!" ह्या सर्व प्रवासात तुम्हांला अनेक जणांची मदत लागते. ह्या मदतीसाठी आपण आपल्या कुटुंबीयांकडे धाव घेतो. आपले वेळापत्रक इतकं अचूक बनवतो की आपण एक आदर्श पालक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकू! पण हे केवळ आपल्या नजरेतून किंवा फारतर दुनियेच्या नजरेतून! ज्यांच्यासाठी आपण ही सारी धडपड केली त्या मुलींना आजही आपण प्रश्न केलात तर मी एक आदर्श माता होते असे त्या म्हणतील ह्याची मला शाश्वती नाही!
नुयीची एक लक्षात राहण्यासारखी आठवण! कामामुळे दररोज घरी परतायला रात्रीचे बारा वाजत! ज्या दिवशी त्यांना आपण पेप्सी कंपनीचे प्रेसिडंट बनणार हे कळले तेव्हा घरच्यांना ही आनंदाची बातमी देण्यासाठी म्हणून त्या लवकर (म्हणजे रात्री १० वाजता) घरी परतल्या. गाडी पार्क करून घरात प्रवेश करतात तो आई जीन्याशीच उभी होती.
"आई, माझ्याकडे एक खास बातमी आहे!"
"बातमी थांबू देत पण घरात दुध नाहीये, पटकन जाऊन ते घेऊन ये!" आई म्हणाली.
गॅरेजमध्ये दिसणाऱ्या नवऱ्याच्या गाडीकडे निर्देश करीत नुयी उद्गारल्या, "हे किती वाजता घरी आले?"
"आठ वाजता!" आई म्हणाली.
"मग त्यांना का नाही सांगितलं?"
"प्रश्न विचारू नकोस, पटकन जाऊन दुध घेऊन ये, सकाळसाठी लागेल"
फणफणत (असे त्यांनी म्हटलं नाही, पण असे नाट्यमय शब्द वापरले म्हणजे मराठी भाषेला बरं वाटेल!) जाऊन नुयी दुध घेऊन आल्या. आणलेली पिशवी काउंटर वर आदळून त्या आईला म्हणाल्या - "कशी आई आहेस तू? आज माझी बोर्ड ऑफ डायरेक्टरवर प्रेसिडंट म्हणून नेमणूक झाली आणि तुला फक्त मी दुधाची पिशवी आणावी हीच अपेक्षा आहे!
"मला तुला काही स्पष्ट करू देत! तू भले पेप्सीची प्रेसिडंट असो वा तुझी भले बोर्ड ऑफ डायरेक्टरवर नेमणूक झाली म्हणून नेमणूक झाली असो, तू एकदा का ह्या घरात आलीस की तू एक सून आहेस, पत्नी आहेस आणि माता आहेस! ह्या सर्व भूमिका तुझ्याशिवाय कोणीच निभावू शकत नाही. तुझे सर्व मुकुट त्या गॅरेजमध्ये काढून ठेवत जा आणि मगच घरात प्रवेश कर! "
ह्या सर्व प्रकारानंतर सुद्धा आपल्या आईच्या हृदयात मात्र आपल्याविषयी दाट अभिमान वसत असणार ह्याची नुयी ह्यांना पुरेपूर खात्री आहे.
आता शेरीलताईंकडे वळूयात!
पहिला प्रश्न - व्यावसायिक जगात स्वतःला अतिमहत्त्वाकांक्षी म्हणविले जाण्याचा आणि त्यामुळे आपला स्त्री वर्गाची ओळख असलेला नाजूकपणा गमावून बसण्याचा धोका स्त्रियांनी कसा टाळावा?
शेरील - आपल्याला समाजाचा दृष्टीकोन बदलावा लागेल. "बॉस्सी" ही मनोवृत्ति दर्शविणारा शब्द बऱ्याच वेळा स्त्रियांच्या संदर्भात वापरला जातो हे चुकीच आहे.
पुढे त्या म्हणतात की Mentor ची (अर्थात समुपदेशकाची) गरज स्त्रियांना जास्त आहे असाच सर्वत्र जो समज पसरला आहे तो दूर केला पाहिजे. संघटनेत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने संधी मिळायला हवी. ह्या साठी CEO
ते अगदी खालच्या पातळीवरील अधिकाऱ्यांनी स्त्रियांना अधिक संधी देण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा. कंपनीतील वातावरणात स्त्री पुरुष असा फरक जाणवता कामा नये! बाकी पुढे त्या बरेच काही म्हणाल्या पण ह्या लेखाच्या अनुषंगाने जुळेल असे फार काही त्यात सापडलं नाही.
आता पुरुष नोकरी करतात ते घरसंसार चालविण्यासाठी. काही स्त्रियासुद्धा नोकरी करतात त्या घरसंसाराला हातभार लावण्यासाठी किंवा पूर्ण भार उचलण्यासाठी! आणि बाकीच्या स्त्रिया नोकरी करतात ते आपल्या बुद्धीचा आणि शिक्षणाचा योग्य वापर व्हावा ह्यासाठी. हल्ली सर्वच पत्नी पत्नी सुशिक्षित असतात. अशा वेळी जर कोण्या एकाच्या पगारात संसार चालत असेल तर तो कोणी एक म्हणजे स्त्री असणे हा प्रकार फारच कमी वेळा आढळून येतो.
मुंबईसारख्या शहरात घर ते नोकरी हा प्रवाससुद्धा स्त्रियांना वाईट अनुभव देणारा असू शकतो. कार्यालयात मर्यादाभंगाच्या सीमारेषेवर जाणारे काही शेरे, काही अनुभव येवू शकतात. हे सर्व प्रकार आपल्या मनाची एकाग्रता मूळ कामापासून दूर करू शकतात. निरंजनला ह्या चिंता नसतात!
मुलांची चिंता, त्यांचं सर्व काही ठीक चाललं असेल की नाही हा विचार जितक्या प्रमाणात स्त्रियांच्या मनात डोकावतो त्या प्रमाणात सर्वसाधारण पुरुषांच्या मनात डोकावत नसणार. हा निसर्गसुलभ प्रकार आहे. करीयर मध्ये पुढं जाणाऱ्या स्त्रिया कार्यालयातील कालावधीत आपला भावनेचा स्विच ऑफ करून ठेवण्यात यश मिळवत असणार. कार्यालयातील भूमिका पार पडून घरी परतल्यावर नुयींनी म्हटल्याप्रमाणे सर्व मुकुट बाजूला ठेवून घरातील भूमिका बजाविण्यासाठी सज्ज व्हायचं! रात्री झोपण्याआधी निरंजन ज्याप्रमाणे फुरसतीचे गाणं ऐकतो तसे ह्यांना ऐकायला मिळेलच ह्याची शाश्वती नाही! अजूनही एखादं कर्तव्य पार पाडायचं बाकी असू शकत!
संघर्ष क्लिष्ट आहे! माता म्हणून आपली भूमिका काही काळापर्यंत परिपूर्ण बजावण्यासाठी आपल्या करीयरचा त्याग करायचा की काळजावर दगड ठेवत मुलांच्या बालपणाच्या कालावधीत तडजोडी करीत जीवन जगायचं! मुलं मोठी झाली की नाहीतरी स्वतंत्र होतातच की! जर लहानपणी त्यांच्यावर संस्कार घडवायला आपणास वेळ मिळाला असता तर ती अजून चांगली माणसं बनली असती असा विचार मनात येणे ही सुद्धा एक शक्यता आहेच. आणि हो जरी करियरचा त्याग करून होणाऱ्या मनाच्या घालमेलीकडे दुर्लक्ष करून मुलांचे बालपण अगदी आदर्श केले आणि तरीसुद्धा मोठे झाल्यावर त्यांना त्याची कदर नसेल किंवा त्यांनी संस्काराला विसंगत असे वागणं दाखवलं तर फिर्याद करायची कोणाकडे!
शेवटी म्हणतात तेच खरं - आपल्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करायचे आणि परिणामाची चिंता त्या सर्वशक्तीशाली ईश्वरावर सोडून द्यायची!
No comments:
Post a Comment