"बापलेकीचा काय वार्तालाप चालू आहे?" देवघरातून आपली पूजा आटपून येणाऱ्या यमुनाताईंनी प्रेमाने विचारलं. तिला गोपाळराव उत्तर देणार इतक्यात "बाबा बाबा आपण फनचाच झाड बगायला जाऊ या का!" असं इंद्रायणीने विचारलं. आज तिचा हा हट्ट मोडण्याची गोपाळरावांची अजिबात इच्छा नव्हती. "चला जाऊयात!" पायात पुन्हा वहाणा चढवीत गोपाळराव म्हणाले. त्यांच्या वाक्य ऐकताच सगुणाबाईंनी सुटकेचा निश्वास टाकला. आता भाकऱ्या सुद्धा होणार होत्या आणि गोपाळरावांची आवडती वाल वांग्याची भाजी सुद्धा!
वाडीत फेरफटका मारताना गोपाळराव नेहमीच प्रसन्न होत. आज इंद्रायणी सोबत असल्याने त्यांना तिची दुडकी चाल पाहण्यात अजून मजा वाटत होती. घनदाट सावलीने त्यांची वाडी व्यापली होती. वाडी नारळ, सुपाऱ्या, फणस आणि आंबे अशा झाडांनी भरगच्च भरली होती. काही वड, पिंपळाची मोठाले वृक्षही होते. गोपाळरावांच्या वाडीला लागुनच त्यांच्या चुलत्याची जमीन होती. फणसाचे झाड दिसताच इंद्रायणीच्या छोट्या पावलांची गती आपसूकच वाढली. "अग अग धावू नकोस! पडशील!" पित्याच्या मायेने गोपाळराव बोलायला आणि इंद्रायणीचा पाय अडखळून ती पडायला नेमकी गाठ पडली. तिचे कपडे मातीने माखले. इंद्रायणी तशी धीट! ती झटकन उठली. तोवर गोपाळराव तिच्याजवळ पोहोचले होते. त्यांनी तिला उचलून घेतलं आणि छातीशी कवटाळून धरलं. आता मात्र इंद्रायणीच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरु झाल्या. "अग वेडूबाई असं जरासं पडलं म्हणून काय रडायचं असतं थोडंच!"
पुढे वाचा
http://patil2011.blogspot.in/2014/12/blog-post_12.html
No comments:
Post a Comment