रात्रीची वेळ असल्याने इंद्रायणी आणि यमुनाबाई झोपल्या होत्या. मी घरी परतलो आहे हे कोणालाच कळता कामा नये अशी सक्त ताकीद गोपाळरावांनी सगुणाबाईंना दिली होती. त्यामुळे अर्थातच इंद्रायणी आणि यमुनाबाईंनासुद्धा ह्या गोड बातमीपासून वंचित ठेवावं लागणार होतं. गोपाळराव स्वच्छ आंघोळ करून आले. कांबळीवर झोपलेल्या आपल्या लाडक्या इंद्रायणीला पाहून त्यांना अगदी गहिवरून आलं. "तीन महिन्यात आपली छकुली किती मोठी झाली नाही?" त्यांनी सगुणाबाईंना म्हटलं. असा थेट संवाद आपल्याशी कधी साधला असेल ह्याच्याच विचारात पडलेल्या सगुणाबाई आपल्या स्वामीकडे एकटक पाहत होत्या. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाकडे खरंतर त्यांचं लक्षही नव्हतं. पण डोळ्यातील भावातून त्यांनी ओळखलं की ते इंद्रायणीविषयीच काहीतरी कौतुकाने बोलत असावेत. मानेनेच त्यांनी त्यांना हो म्हटलं. आपल्या धन्याच्या खंगलेल्या प्रकृतीकडे पाहून त्यांचे डोळे सारखे भरून येत होते. गोपाळरावांनी न राहवून इंद्रायणीच्या कपाळावरून हात फिरवला. गाढ झोपेतल्या इंद्रायणची झोप काहीशी चाळवली गेली. तिने कूस बदलली. गोपाळराव सावधपणे मागे अंधारात गेले. आणि काही क्षणातच इंद्रायणीने डोळे उघडले. "बाबा, बाबा!" तिची चौकस नजर सर्वत्र भिरभिरत होती. "नाही ग! बाबा कोठे आहेत! तुला भास झाला असेल!" सगुणाबाईंनी प्रसंगावधान राखून दिवा विझवता विझवता तिला म्हटलं. इंद्रायणीची समजूत काही झाली नाही. बराच वेळ ती अंधारात चाहूल घेत राहिली. "बाबा खरंच येऊन गेले, त्यांनी माझ्या डोक्यावरून हात सुद्धा फिरवला!" असंच काही वेळ पुटपुटत शेवटी ती निद्राधीन झाली.
पुढे वाचा
http://patil2011.blogspot.in/2014/12/blog-post_26.html
No comments:
Post a Comment