Tuesday, December 17, 2019

संस्कृतीतरंग !




कालच्या पोस्टमध्ये वर्णन केलेल्या बैठकीनंतर मला एक दिवसीय प्रशिक्षणाला धाडण्यात आलं. धाडण्यात आलं हा सयुक्तिक शब्दप्रयोग अशासाठी की अशा प्रशिक्षणांना हजेरी लावण्याबाबत मी फारसा उत्सुक नसतो. जगभरातील विविध संस्कृतीच्या लोकांसोबत काम करताना कोणत्या मनोवृत्तीची (Mindset) आवश्यकता आहे ह्याविषयी हे प्रशिक्षण होते. ह्या प्रशिक्षणांची एक गंमत असते. आम्ही संवादाद्वारे प्रशिक्षण करतो असं म्हणत ही मंडळी आपल्याकडूनच बरंचसं वदवून घेतात. अधुनमधुन चर्चेला मार्गावर आणण्याचं काम ही मंडळी चोख बजावतात. 

ह्या प्रशिक्षणात एक मजेशीर मुद्दा प्रशिक्षकांनी मांडला. आपण भारतीय लोक कसे भावनिकरित्या सगळीकडे गुंतत राहतो हा तो मुद्दा !पाश्चात्य देशातील सहकारी आला की कंपनीच्या प्रवेशद्वाराशी रांगोळ्या काढतो. त्यांना कुर्ता, साड्या नेसवुन रंगीबेरंगी कपड्यात छायाचित्रे काढतो. हल्ली तर त्यांना बॉलीवूडच्या गाण्यांवर नृत्यसुद्धा करावयास लावतो! पण हेच आपण तिथं अमेरिकेत एका आठवड्यासाठी गेलो तर बऱ्याच वेळा आपले आपण असतो. एखादया सायंकाळी सर्वांसोबत डिनरला जाऊन आलो की सामाजिक बांधिलकीचं ओझं बहुदा संपते. अर्थात ह्याला हल्ली बरेच सन्माननीय अपवाद निर्माण झाले असावेत. 

अजून एक मुद्दा समजा आपले आणि ह्या परदेशी सहकाऱ्यांचे व्यावसायिक संबंध संपुष्टात आले की बऱ्याच वेळा त्यांच्या बाजुनं वैयक्तिक ऋणानुबंध कमी होतात. पुन्हा एकदा कदाचित ही निरीक्षणे काही वर्षापुर्वी खरी असावीत. हल्ली ह्यात खुप बदल घडुन आला आहे. मुख्य मुद्दा आपल्या आणि पाश्चात्य संस्कृतींमध्ये कसा फरक होता हे समजुन घेऊन त्यानुसार आपल्या व्यावसायिक अपेक्षांमध्ये, वागणुकीत योग्य बदल घडवून आणण्याविषयी होता. काही प्रशिक्षणार्थी पूर्वेच्या आणि युरोपातील सहकाऱ्यांसोबत कार्यरत आहेत. त्यांनीही आपले अनुभव मांडले. 

ह्यातील आपल्या संस्कृतीतील भावनिक गुंतवणुकीच्या मुद्द्याचा धागा पकडुन पुढे सरकूयात. ह्या सोशल मीडियाचा उद्रेक ज्या वेळी सर्वप्रथम झाला त्यावेळी काही काळातच आपण सर्वांनी ह्याच्या माध्यमातुन जुन्या काळाकडे धाव घेतली. जुन्या संस्कृतीला, गाण्यांना, मित्रमंडळींना एकत्र आणलं! आपण सर्व अगदी भावनाविवश होत ह्या जुन्या काळाच्या आठवणीत आकंठ बुडून गेलो. चाळिशीनंतर करिअर वगैरे गौण बाब आहे, ज्याच्या भोवताली मित्रमंडळी तोच खरा  श्रीमंत वगैरे वाक्य ऐकावयास आली! 

पण काही मंडळींनी मात्र ह्याच सोशल मीडियाचा वापर करत आपल्या करियरला नवचैतन्य दिलं. नव्यानं झेप घेतली. सत्तरीच्या पलीकडं सुद्धा व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय राहण्याचा चंग बांधला. 

वरील दोन परिच्छेदात मांडलेल्या दोन भिन्न मतप्रवाहांपैकी कोणता एक बरोबर आणि दुसरा  चुकीचा असं मी म्हणत नाही. दोन्हींच्या आपल्या परीनं चांगल्या वाईट बाजु आहेत. गेल्या महिन्यातील माझ्या अनुभवावरुन मी दुसऱ्या पर्यायाकडे काहीसा झुकला गेलो असलो तरी ही तात्कालिक स्थिती असु शकते. 

सारांश इतकाच की सांस्कृतिकदृष्या पाहायला गेलं तर आपण भावनिक मंडळी! त्यामुळं आपले बरेचसे निर्णय भावनेच्या भरात घेतले जाण्याची शक्यता अधिक असते. ह्या गोष्टीचे भान राखत योग्य ठिकाणी उपलब्ध माहितीच्या आधारे सारासार विचार करुन बौद्धिक निर्णय घ्यावा ही विनंती!

No comments:

Post a Comment