Wednesday, December 25, 2019

ययाति - वि. स. खांडेकर



 गतकाळातील वैभवशाली साहित्यिक इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी आपण जरी गमावली असली तरी सुदैवानं ह्या कालखंडातील उत्कृष्ट कादंबऱ्यांद्वारे ह्या सुवर्णकाळाचा अनुभव आजही आपण काही प्रमाणात घेऊ शकतो. वि. स. खांडेकर ह्यांच्या अश्रू ह्या कादंबरीचे मला झालेलं आकलन ह्या आधी एका पोस्टद्वारे केलं होतं. ह्या सिद्धहस्त लेखकाच्या ययाती ह्या अविस्मरणीय कादंबरीविषयीच माझं मनोगत मी इथं मांडत आहे. ह्या कादंबरीस १९७६ सालचा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. 

वि. स. खांडेकर हे अत्यंत बुद्धिमान, प्रतिभाशाली साहित्यिक होते. त्यांनी दिलेल्या प्रस्तावनेतुन आणि पार्श्वभुमी ह्या विभागातुन कादंबरीतील विविध व्यक्तिरेखांचा त्यांनी केलेला अभ्यास आणि ह्या कादंबरीतुन सद्य समाजानं शिकण्यासारख्या असलेल्या अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे. 

ययाती 

स्त्रीसुखासाठी आंधळा होऊन स्वतःच्या पुत्राकडं तारुण्याची मागणी करणारा एक निर्दयी पिता अशी ययातीची ओझरती ओळख घेऊन ह्या कादंबरी वाचनास मी आरंभ केला होता. कादंबरीच्या पुर्वार्धात ययातीच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलु खांडेकरांनी उलगडुन दाखविले आहेत. प्रत्यक्ष इंद्राला पराभुत करणाऱ्या पराक्रमी नहुष  राजाचा हा पुत्र. परंतु आपल्या पित्याकडुन विजयाच्या एक उन्मत्त क्षणी घडलेल्या चुकीमुळं मिळालेल्या शापाचे ओझे सदैव घेऊन वावरणारा! "नहुष राजाची मुले कधीही सुखी होणार नाहीत" हा तो शाप ! स्वतः खुप पराक्रमी. अश्वमेधाच्या घोड्यासोबत स्वतः स्वारी करत मोठमोठ्या राजे - महाराजांना स्वतःसमोर लोटांगणे घालावयास भाग पाडणारा ! आपल्या जन्माआधी राजमहालातील वैभवाचा त्याग करुन गेलेल्या आपल्या थोरल्या भावाशी म्हणजेच यतीशी त्याची ह्या प्रवासात अचानक भेट होते. यतीचं आपलं आयुष्य पुर्णपणे तपश्चर्येला वाहुन देणं ययातीला विचारात पाडतं. हे वादळ संपतं तितक्यात अंगिरस ऋषींच्या शांतीयज्ञात  राक्षसांकडुन होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासुन संरक्षणासाठी ययाती काही काळ त्या ऋषींच्या आश्रमात घालवितो. तिथं त्याची भेट कचाशी होते! ययातीच्या पत्नीचं म्हणजेच देवयानीचे पहिलं प्रेम हा कच ! परंतु एकंदरीत देवयानी प्रेमापेक्षा सामर्थ्याला महत्व देणारी ! त्यामुळं योगायोगानं भेटलेल्या ययातीला तो केवळ एका बलवान साम्राज्याचा चक्रवर्ती आहे म्हणुन पती म्हणुन स्वीकारण्यात तिला कोणताही संदेह नव्हता. परंतु ह्याच कारणामुळं ती ययातीची प्रेयसी केव्हाच बनु शकली नाही! म्हणुनच की काय ययाती मग शर्मिष्ठेकडं आकर्षिला गेला! ययातीचे शर्मिष्ठेकडे आकर्षित होणं प्रेमाच्या भुकेखातर असं जरी क्षणभर मानलं तरी त्याआधी आणि त्यानंतर त्यानं केलेल्या अनेक स्त्रियांच्या सहवासाचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येत नाही! 

इथं खांडेकर ययातीची तुलना आधुनिक काळातील मानवाशी करतात. त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर "शास्त्राने, यंत्राने आणि संस्कृतीनं निर्माण केलेलं आधुनिक सुंदर व संपन्न जगआजच्या ययातीपुढं पसरलं आहे. सुखोपभोगांची विविध साधने घेऊन ते त्याला पळापळाला आणि पावलोपावली मोह घालीत आहे!" १८५७ ते १९४७ च्या काळात पेटलेल्या पवित्र यज्ञकुंडांच्या ज्वाला विझुन गेल्या आहेत आणि मोठमोठे ऋत्विज यज्ञभूमी सोडुन गेले आहेत! - 

पहा किती सौंदर्यपुर्ण अशी ही उपमा! 

देवयानी 

देवयानी ही शुक्राचार्यांची कन्या ! पित्याचा महत्वाकांक्षी स्वभाव तिच्यात उतरलेला! आपल्या बालपणात शर्मिष्ठेचं वैभव तिनं अगदी जवळुन पाहिलेलं. आपल्या पित्याला, त्याच्या विद्वतेला कितीही मान असला तरी प्रत्यक्ष राजाकडे असणाऱ्या सत्तेविषयी तिच्या मनात सुप्त आकर्षण कायम वसलेलं असतं. त्यामुळं कचाविषयी तिच्या मनात आकर्षण असलं तरी त्याच्याशी विवाह करण्याचा विचार ती कधीच करत नसते. ययातीसोबत योगायोगानं झालेल्या एका भेटीमुळं तिला आपल्या महत्वाकांक्षांना मुर्त रुप देण्याची संधी आपसुक गवसते. जिच्या वैभवाच्या सावलीत आपलं बालपण घालवलं त्या शर्मिष्ठेविषयी असणाऱ्या असुयेमुळं ती तिला आपली दासी बनवुन आपल्यासोबत हस्तिनापुरात घेऊन येते. इथं तिला हवं असलेलं सत्तासामर्थ्य लाभतं. एक सम्राज्ञी म्हणुन देवयानी यशोगाथा बनली असली तरी एक पत्नी म्हणुन एक जिवंत शोकांतिका बनुन वावरत राहते! खांडेकरांनी ही कादंबरी लिहिताना ज्या स्रोतांचा संदर्भ घेतला आहे तिथं एका ठिकाणी ती ययातीने शर्मिष्ठेला तीन पुत्र दिले आणि आपल्याला दोनच पुत्र दिले अशी तक्रार करत असल्याचा उल्लेख आहे. म्हणजेच तिला ययातीने आपल्याशी केलेल्या प्रतारणेविषयी खंत नाही. पण तत्कालीन संदर्भानुसार स्त्रीला समाजात ज्या बाबींमुळं मान मिळायचा त्या पुत्रांच्या बाबतीत ययातीने दुजाभाव केल्याची खंत ती बाळगुन आहे.  

सद्यकालीन समाजाशी तुलना करता येनकेनप्रकारे प्रतिष्ठेच्या मागे लागलेल्या समाजातील मनोवृत्तींसोबत देवयानीची तुलना होऊ शकते. इथं ह्या प्रतिष्ठेच्या मागं धावताना जीवनातल्या गमावलेल्या अनेक अमुल्य गोष्टींचं भान अशा मनोवृत्तींना राहत नाही !

शर्मिष्ठा 

केवळ एका दुर्दैवी घटनेमुळं आपलं राजकन्यापद सोडुन देऊन शर्मिष्ठेला देवयानीचं दासीत्व पत्करावं लागतं. शुक्राचार्यांच्या रागीट स्वभावाची पुर्ण कल्पना असल्यानं त्यांच्या मुलीचा हा दुराग्रह पुर्ण न करण्यामुळं होऊ शकणाऱ्या सर्व संभाव्य धोक्यांचा तिला पुर्ण अंदाज आहे. आपल्या ज्ञातीसाठी स्वतःच्या जीवनातील सर्व सुखांचा ती त्याग करण्यास तयार होते. तिनं केलेल्या ह्या त्यागासाठी सद्यकालीन समाजात समांतर उदाहरण मिळणं तसं कठीणच! परंतु शर्मिष्ठा हस्तिनापुरात आल्यावर पुर्णपणे आपल्या नशिबाला दोष देत बसलेली दिसत नाही! ययातीने शर्मिष्ठेला वश केलं की त्यासाठी शर्मिष्ठेनं स्वतःहुन काही पावलं उचलली असावीत ह्याची खोलवर मीमांसा करण्याइतका  माझा अभ्यास नाही ! परंतु शेवटी ययातीच्या हृदयातील स्थानाच्या बाबतीत देवयानीवर कुरघोडी करण्यात ती यशस्वी होते! इतकंच नव्हे तर तिचा पुत्र पुरु अत्यंत सुस्वभावी आणि कर्तृत्ववान निघतो. पित्यासाठी आपलं तारुण्याच नव्हे तर देवयानीच्या मुलासाठी राज्यावरील आपला अधिकार सोडुन देण्यास तो तयार होतो. त्याच्या ह्या वागण्यानं देवयानीसारख्या स्त्रीचं हृदयपरिवर्तन करण्यात त्याला यशही मिळतं ! 

सद्यकालीन समाजातील आपल्या मेहनतीनं अधिकारपदाकडं वाटचाल करणाऱ्या वर्गाचं प्रतिनिधित्व शर्मिष्ठा करते असं ढोबळमानाने विधान आपण करु शकतो ! कठोर तपस्या करणारा कच बहुदा समाजातील ज्ञानपूजक वर्गाचं प्रतिनिधित्व करतो.

मुकुलिका, अलका या दासींची वर्णनं ह्या कादंबरीत विस्तारानं येतात. ह्या दासी कुशाग्र बुद्धीच्या असाव्यात. स्वपराक्रमावर मोठाली युद्धं जिंकुन आणणाऱ्या ययातीसारख्या यशस्वी सम्राटाला सर्वपरीनं त्या समाधानी ठेवतात! इथं एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. देवयानी असो की ययातीची आई असो; सम्राज्ञीपणाच्या भूमिकेच्या ओझ्याखाली कुठंतरी ह्या स्त्रिया एक पत्नी म्हणुन कमी पडत असाव्यात !  आणि म्हणुनच ह्या बुद्धिमान दासींची ह्या कथांमध्ये आणि सम्राटांच्या आयुष्यात महत्वाची भुमिका ठरते !

खांडेकरांच्या प्रतिभेचा  मेरु ह्या कादंबरीत चौखेर उधळला आहे! आपल्या ह्या काळातील जीवनाचं हुबेहूब वर्णन ते वाचकांच्या डोळ्यासमोर उभं केलं आहे. मी पुर्णपणे ह्या कादंबरीशी आणि तात्कालीन व्यक्तिरेखांसोबत समरस होऊन गेलो ! एक अजरामर पौराणिक कथा आणि त्या कथेला यथायोग्य न्याय देणारा तितक्याच ताकदीचा प्रतिभाशाली साहित्यिक असा दुग्धशर्करायोग ह्या कादंबरीच्या निमित्तानं जुळून आला आहे. ह्या कादंबरीतील प्रत्येक वाक्य साहित्यिक श्रीमतीनं ओथंबुन भरलं आहे! ह्या रसाचा अत्यंत शांत मनःस्थितीत आस्वाद घेण्यासाठी ह्या कादंबरीचं पुन्हा सखोल वाचन करणं अनिवार्य आहे असा माझा समज आहे ! खांडेकरांना आणि त्यांच्या अफाट प्रतिभेला माझा सादर प्रणाम! सद्यकाल AI, ML, Cloud ह्या दिशेनं कितीही वेगानं जात असला तरी साहित्यातील अशा अमुल्य ठेव्यांचा आपण स्वतः आनंद घ्यावा आणि जमल्यास पुढील पिढीपर्यंत सुद्धा ह्या ठेव्यांचं हस्तांतरण करावं ही माझी कळकळीची विनंती!

No comments:

Post a Comment