Saturday, February 26, 2011

भावना आणि व्यवहार



मनुष्यजातीचा भावना आणि व्यवहार यातील संघर्ष पुरातन कालापासून चालू असावा अशी माझी समजूत आहे. हल्लीच्या काळात मात्र हा संघर्ष थोडा तीव्र झाला इतकेच. प्रत्येकजण आपापल्या परीने ह्या दोघांत समन्वय साधायचा प्रयत्न करतो. मनुष्याच्या भावना त्याचे जन्मस्थळ, जवळचे नातेवाईक, मित्र यांच्याशी निगडीत तर व्यवहार हा पैसा, नोकरी आणि जीवनाच्या संघर्षाशी संबंधित! काही उदाहरणे तात्कालिक पातळीवरची तर काही उदाहरणे आयुष्यातील मोठमोठे निर्णय घेतानाची!

उदाहरणे द्यायची तर कित्येक, आपल्या मातापित्यांना सोडून नोकरीनिमित्त परदेशी निघालेलं अपत्य, वार्षिक APPRAISAL च्या वेळी होणारी संवेदनशील व्यवस्थापकाची स्थिती. काही भोळीभाबडी माणसे हा संघर्ष सुप्रसिद्ध लोकांपर्यंत नेवून ठेवतात. पहिल्या IPL च्या वेळी मुंबई इंडिअन संघात सचिनने विनोद कांबळीला संघात घेण्यासाठी वजन टाकावे, बोरिस बेकार आणि स्टेफी ग्राफ यांचा विवाह व्हावा ही मराठी माणसाची भावनात्मक होऊन पाहिलेली स्वप्ने.

ह्या संघर्षाला सामोरे जाण्याची तंत्रेसुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी. व्यवहाराच्या बाजूने निर्णय घेताना परिस्थितीला दोष देणे हे एक नेहमीचे तंत्र. या जागी मी नसतो आणि दुसरा कोणी जरी असता तरी त्याला सुद्धा हाच निर्णय घ्यावा लागला असता असे स्पष्टीकरण देणे हा सर्वात सोपा उपाय. काही माणसांना मात्र आयुष्यात कधी व्यवहार जमत नाही आणि व्यवहार न जमल्याची त्यांना खंतही नसते. 'दिल का राजा' असलेली अशी लोकं आपल्या मर्जीने आयुष्य जगात असतात. 3 Idiot मधला आमीर खान हे त्याचे उदाहरण. काही उच्च पदावरील माणसांचा एक गुण मात्र वाखाणण्याजोगा आणि तो म्हणजे 'switching technique'. एक काम झाल्यावर त्यातील आपल्या भावना, विचार तत्काळ बंद करून लगेच नवीन कामाच्या भावना, विचार मनात आणायचे हे ते तंत्र. त्या विषयी पुढे कधी तरी!

Friday, February 25, 2011

वटवृक्ष



वसईत आणि एकंदरीत आमच्या समाजात वावरताना अनेक एकत्र कुटुंबांना जवळून पाहण्याचा योग आला. एकत्र कुटुंबाचा चेहरा म्हणजे त्या कुटुंबातील कर्ता पुरुष! ह्या कर्त्या पुरुषावर कुटुंबांची वाटचाल अवलंबून असायची. असायची म्हणायचे कारण म्हणजे आता एकत्र कुटुंब ही संस्था जवळपास नामशेष झाली आहे. हा कर्ता माणूस कुटुंबातील बर्याच गोष्टींवर आपले नियंत्रण ठेवू शकत असे.

ह्यात दोन प्रकारची कुटुंबे पाहण्यात आली. पहिल्या प्रकारात हा कर्ता माणूस समाजात प्रतिष्ठा प्राप्त केलेला असे. समाजातील बर्याच लोकांची ह्या घरी उठबस असे. एकंदरीत हे कुटुंब आणि घर ह्या कर्त्या माणसाच्या कर्तुत्वाने भारावून गेले असे. टोकाची भूमिका घेत मी ह्या माणसांना स्वतःच्या प्रेमात पडलेली माणसे असे म्हणतो. ह्याचा एक परिणाम कुटुंबातील बाकीच्या सदस्यांवर होत असे. ह्या कुटुंब प्रमुखाची मुले, भाऊ ह्यांच्या व्यक्तीमत्वाची वाढ काहीशी खुरटली जात असे.

दुसर्या प्रकारात कर्ता माणूस हा सामान्य वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा असे. ह्या माणसाने आपले आयुष्य एका धोपटमार्गाने जगलेले असते. पापभीरू असा हा माणूस पहिल्या प्रकारातील व्यक्तींच्या कामगिरीने भारावून गेलेला असे. आपल्याला न गाठता आलेली यशाची शिखरे आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या रूपाने गाठण्यासाठी जीवनात वाटेल तितका त्याग करण्याची त्याची तयारी असे.

अर्थात ह्या दोन टोकाच्या उदाहरणामध्ये मधल्या बर्याच छटा आहेत. आज एकत्र कुटुंब नाहीत. छोट्या कुटुंबात नवरा बायकोला विविध भूमिका निभावाव्या लागतात. ह्यातून एकाच मुद्दा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे आयुष्यात कोणत्या क्षणी तुमची PRIORITY ही तुमच्या स्वतःच्या कार्य क्षेत्राकडून निघून तुमच्या मुलांच्या शिक्षणावर, त्यांच्या सर्वागीण विकासावर येवून स्थिरावते. हा क्षण ओळखणे आणि तो पकडणे फार महत्वाचे असते. परंतु ह्या क्षण ठरविण्याचे प्रत्येकाचे मापदंड वेगवेगळे हे मात्र लक्षात येते!

Friday, February 18, 2011

आयुष्य



जगाच्या पाठीवर अनेक बहुरंगी बहुढंगी घटना घडत असतात. त्यातील काही आपल्या वाट्याला येतात. आपापल्या स्वभावानुसार आपण या घटनांचे विश्लेषण करतो आणि या अनुभवानुसार पुढे असे झाले तर काय करावे म्हणून उपाययोजना करतो.

आपल्या आयुष्याचे ढोबळमानाने दोन भाग मानता येतील. एक भाग जो आपण नियंत्रित करू शकतो असा आणि दुसरा म्हणजे ज्या भागावर आपले काही नियंत्रण नसते तसा. ह्या भागांची टक्केवारी वगैरे करण्याच्या फंदात पडण्याचा काही उपयोग नाही. नियंत्रण नसणाऱ्या भागांची उदाहरणे म्हणजे आजार, अपघात आणि आजच्या युगात काही प्रमाणात नाती. हाच भाग अगदी टोकाला खेचायचा झाला तर आपल्या घरावर विमान कोसळू शकते, पृथ्वीवर एक मोठी शीला कोसळून पृथ्वी नाश पावू शकते किंवा सर्व पृथ्वी कृष्णविवरात खेचली जाऊ शकते.

आयुष्याच्या बर्याच कालावधीत आपण नियंत्रित करू शकणार्या भागाशी सामना करत असतो. दुसरा भाग प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात अनुभवावा लागतो. परंतु ह्या भागाची क्षमता मात्र पहिल्या भागाचे आपले विश्व पूर्ण व्यापून टाकण्याची असते.

दैनंदिन जीवनातील आपला संघर्ष पहिल्या भागासाठीचा असतो. अधिकाधिक मेहनत करून बर्या वाईट मार्गाने ह्या भागावर आपण नियंत्रण आणू पाहतो. थोडक्यात म्हणायचे झाले तर आपणाजवळील संपत्ती ह्या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपणास मदत करते. समजा अंबानी बंधूचे उदाहरण घेतले तर त्यांचा ह्या भागावर पूर्ण ताबा असतो.

काही जणांना बर्याच वेळा असे वाटते की आपण पहिल्या भागाच्या जोरावर दुसर्या भागावर सुद्धा नियंत्रण करू शकतो. लहानपणी वाचलेली एका राजाची गोष्ट, त्याला ज्योतिष्याने सांगितले की पाच दिवसाच्या आत तुला सर्पदंशाने मृत्यू येणार. तो बिचारा स्वतःला राजवाड्यात कडेकोट बंदोबस्तात ठेवतो. शेवटच्या दिवशी मात्र फळातून एक कीड निघून तिचे सापात रुपांतर होऊन तो राजाला दंश करतो आणि राजा मरतो. आता समजा हीच गोष्ट दररोज शेतात काम करून भाकरी मिळवणाऱ्या शेतकर्याची असती तर? तो बिचारा पाच दिवस स्वतःला बंद करून तर घेवू शकत नाही?

दुसर्या भागाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. काहीजण आस्तिक बनून दैवी शक्तीचा ह्या भागातील हस्तक्षेप अपेक्षितात. काही जण मात्र ह्या भागावर काही केल्या नियंत्रण करता येत नसल्याने आला क्षण मजेत जगावा अशा वृत्तीचे असतात.

लिहिता लिहिता असे जाणवले की काही गोष्टी मात्र ह्या दोन्ही भागांना समाविष्ट करतात. आपली मुलं पुढे काय करणार, कसे नागरिक बनणार? ही बाब म्हटली तर काही प्रमाणात आपल्या हातातली तर काही प्रमाणात आपल्या हाताबाहेरील. अशी अजून काही उदाहरणे असतील

दीपकने ह्या ब्लॉगची स्थापना करून १७ फेब्रुवारीला एक वर्ष झाले. एका वर्षात ७८ ब्लॉग! Not Bad at all!

Tuesday, February 15, 2011

चौथी पास


गेल्या महिन्यात आम्ही सर्व नातेवाईक अलिबाग जवळील आक्शी येथे एका वीकएंडला गेलो होतो. नातेवाईक म्हणजे माझ्या सर्व चुलत, आत्ये भाऊ आणि बहिणी, आणि त्यांची कुटुंबे! माझा मोठा भाऊ आणि आत्येभाऊ कार्यबाहुल्यामुळे येवू न शकल्याने मी एकटा भाऊ आणि बाकी सर्व बहिणी आणि त्यांचे यजमान अशी परिस्थिती उदभवली. धाकटी चुलत बहिण पंचविशीतील तर मोठीने नुकतीच पन्नाशी गाठलेली.

रविवारी सकाळी नास्ता करताना कशावरून तरी आजच्या बिकट कौटुंबिक परिस्थितीचा विषय निघाला. चर्चेला मजेशीर वळण देण्यासाठी मी विधान केले की यावर उपाय म्हणून मी एका नवीन संस्थेची स्थापना करीत आहे. चौथी पास झालेल्या मुलींना यात प्रवेश दिला जाईल. त्यांना पुढील १०- ११ वर्षे भारतीय संस्कृती, संस्कृत भाषा, पारंपारिक पद्धतीचे जेवण याबरोबर आधुनिक जगाचेही शिक्षण दिले जाईल. मोठ्यांशी कसे वागावे हे ही त्यांना शिकवले जाईल. २१- २२ व्या वर्षी या संस्थेतून बाहेर पडलेल्या मुली एक आदर्श पत्नी म्हणून संसार करण्यासाठी सज्ज असतील आणि उच्च विद्याविभूषित मुलांचे आई वडील त्यांना सून बनविण्यासाठी संस्थेच्या दारापुढे रांग लावतील. मी हे विधान करताच माझ्या लहान चुलत बहिणींनी माझ्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला, कर्मठ, बुरसटलेल्या विचाराचा म्हणून माझी बोळवण केली.

ह्या हल्ल्यामुळे हतबल होऊन मी माझ्या संस्थेची घोषणा माघारी घेणार इतक्यात माझ्या दोन ज्येष्ठ भगिनी माझ्या मदतीला धावून आल्या. त्यांची मुले आता २३- २४ वर्षांची आहेत. त्या म्हणाल्या की आम्ही मात्र आदुच्या संस्थेपुढे रांग लावू. त्या दोघींच्या यजमानांनी त्यांना पाठींबा दर्शविला. त्यानंतर मात्र माझ्या धाकट्या बहिणींनी माझ्या मुलावर लक्ष केंद्रित करीत तुला तुझे बाबा चौथी पास बायको करून देतील असा नारा चालू केला.

वर वर मजेत चालू झालेल्या ह्या विषयावर काही वेळानंतर माझ्या दोन ज्येष्ठ भगिनी गंभीर चर्चा करताना मला दिसल्या!

(Disclaimer - या लेखातील विचार हे केवळ एक विचार म्हणून पाहावेत. त्यावरून लेखकाच्या मनोवृत्तीचा निष्कर्ष काढण्याचे प्रयत्न करू नयेत ही विनंती! )

Friday, February 4, 2011

संघर्ष


हल्ली बरेचजण भ्रष्ट्राचाराविरुद्ध बोलत असतात, राजकारणी लोक कसे देशाचे नुकसान करीत आहेत याविषयी तळमळीने बोलत असतात. अर्थात याला मीही अपवाद नाही. प्रश्न अशा आहे की हा संघर्ष लढायचा तर आपला शत्रू कोण आहे हे प्रथम ओळखणे आवश्यक आहे. नाहीतर मूळ कारण सोडून आपण फक्त त्या कारणाच्या परिणामांशी (outputs) लढत बसू आणि मूळ कारण मात्र तसेच राहील.

राजकारणी लोक किंवा भ्रष्ट लोक आले कोठून? ते तर आले आपल्यातून. ते आपले प्रतिनिधी. भ्रष्ट वृत्ती ही आपल्यातील प्रातिनिधिक लोकांची वृत्ती. मग अर्थात ती आपल्यात सुद्धा असणार. या भ्रष्ट वृत्तीचे कारण काय? तर समाजात मानाचे स्थान मिळविण्याचा अट्टाहास. येन केन प्रकारे मी समाजात प्रतिष्ठित बनणार ही प्रत्येकाच्या मनातील इच्छा! आता यासाठी मी प्रत्येक व्यक्तीला सुद्धा दोष देणार नाही. समाजात दोन प्रकारचे लोक. एक आधीच प्रतिष्ठित घरातून आलेले आणि दुसर्यांच्या घराणे आता पर्यंत प्रतिष्ठा न पाहिलेली. प्रतिष्ठित घरातून आलेल्या माणसांच्या गुणसूत्रात आपली प्रतिष्ठा टिकविण्याची सुप्त इच्छा तर अप्रतिष्ठित घरातून आलेल्या व्यक्ती मध्ये आतापर्यंत राहून गेलेला मान मिळविण्याची तीव्र धडपड! हा संघर्ष तर पूर्वीपासून असणार. परंतु पूर्वी सामान्य लोकांच्यात प्रारब्ध स्वीकारण्याची प्रवृत्ती होती, आज त्यांनी प्रारब्धाला झुगारून दिले आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे प्रयत्नवादी बनणे ही, परंतु त्यात आपला मार्ग कोणता याचे सारासार भान असणे आवश्यक आहे.

थोडक्यात भान ठेवा की भ्रष्ट्राचाराचा लढा आहे तो आपल्यातील वृत्तीशी, कोण्या एका व्यक्तीशी नव्हे! आणि म्हणूनच हा संघर्ष मोठा कठीण आहे. बाह्य शत्रूपेक्षा अंतर्गत शत्रूशी संघर्ष केव्हाही कठीणच असतो!