Friday, April 8, 2011

केरळ भेट भाग २





ठेकडी येथील हॉटेलचा परिसर पाहून आम्ही बेहद्द खुश झालो. तेथून पेरियार येथील तलाव आणि त्या सभोवतालचे वन्य जीवन पाहण्यासाठी आम्ही निघालो. पेरियार जलाशयातील बोट दुपारी ३:३० वाजता निघणार होती. योग्य माहितीच्या अभावी आम्ही तेथे २ वाजताच जावून पोहचलो. तिकीटे घेतल्यावर आम्ही बोटींच्या धक्क्यावर जावून पोहोचलो. तेथे आजूबाजूंच्या झाडांवर माकडांनी वास्तव्य केले होते. जसजशी लोकांची गर्दी वाढू लागली तसतसे माकडांनी झाडांवरून खाली उतरण्यास प्रारंभ केला. लोकांजवळील खाद्यपदार्थ हिसकावण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे काही वेळ तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. थोड्या वेळाने काळ्या माकडांच्या दुसर्या एका टोळीने ह्या आधीच्या समूहावर हल्ला करून त्यांना हिसकावून लावले. शेवटी एकदा तिथे बोटींचे आगमन झाले. जलतरींगिनी (चुकलो जलथरींगिनी) ह्या बोटीत आम्ही बराचश्या विदेशी पर्यटकांबरोबर बसलो. ह्या बोटीबरोबर अजून तीन बोटी होत्या. आम्हाला जबरदस्तीने संरक्षक jacket घालावी लागली. ही jacket म्हणा किंवा विमानातील प्राणवायूचे मास्क म्हणा, हे आपल्या किंवा त्या कंपनीच्या समजुतीसाठी! पुढील दोन तास आम्ही एका अवर्णनीय अनुभवाचे साक्षीदार होतो. जलाशयाभोवती घनदाट जंगल आणि ठिकठीकाणी जलाशयाच्या काठावरील विस्तीर्ण कुरणांमध्ये चरणारे, शहरीकरणाचा स्पर्श न झालेले वन्य प्राणी! हरणे, कोल्हे आणि हत्ती ह्या प्राण्यांचे आम्हाला दर्शन झाले. वाघाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या आम्हां सर्वांची मात्र थोडी निराशाच झाली. जंगलाचे वातावरण मात्र मला बरेच गूढ वाटले आणि मला त्याने मोहवून टाकले. शतकोशतके न बदललेली ही भूमी आणि त्यात फक्त अन्न ही मुलभूत गरज भागविण्यासाठी जीवन मरणाचा खेळ दररोज खेळणारे वन्यजीव आपल्याला आपल्या दररोजच्या संघर्षाच्या निरर्थकतेची जाणीव करून देतात. ह्या जलाशयात बरेच वठलेले वृक्ष आणि त्यावर वास्तव्य करणारे पक्षी आढळतात. हे पक्षी आपल्याला मासे पकडण्याची कसरत सुद्धा करून दाखवतात. बाकी मध्येच एका हत्तींचा समूह जवळून बघण्याच्या नादात आमच्या बोटीला बाकीच्या बोटींनी मागे टाकले. त्यामुळे सोहमची बैचैनी वाढली. आपण बाकीच्या बोटींना कधी एकदा मागे टाकतो असे त्याला झाले. त्या जलाशयाच्या दुसर्या टोकाला पोहचून आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. आता बोटीचे सारथ्य दुसर्या माणसाने हाती घेतले, आता हा तरी दुसर्या बोटींना मागे टाकेल ही सोहमची अपेक्षा मात्र काही सार्थ झाली नाही. शेवटी मात्र फक्त आमच्याच बोटीला एका हत्तीणीने आणि तिच्या पिल्लाने जवळून दर्शन दिले आणि फोटोसाठी पोझही दिली. मसाल्याची थोडीफार खरेदी करण्याच्या नादात थोडा वेळ झाला आणि रात्र उजाडली. परतीचा प्रवास २० किलोमीटर होता. अंधारातील निर्मनुष्य रस्ते पाहून सोहमने रात्रीचा प्रवास करणे कसे चुकीचे आहे हे आम्हाला समजावले आणि खरेदी वेळीच आटोपणे आवश्यक आहे असा सल्लाही दिला. बर्याच वेळा आपले गुण मुलामध्ये उतरलेले दिसतात आणि त्यावेळी मन कुठेतरी सुखावते. वयानुसार आपण भावना मनातच ठेवून द्यायला सरावतो परंतु लहान मुलांचे मात्र तसे नसते. मनातील विचार ते बिनधास्त बोलून दाखवितात. बर्याच दिवसांनी विमानात बसल्यावर ज्यावेळी उड्डाणाची वेळ आली तेव्हा मनात थोडी धाकधूक असताना 'बाबा आपले विमान पडणार तर नाही ना? असा प्रश्न ऐकल्यावर मन धन्य होते. आमचा ड्रायव्हर दररात्री कारमध्येच झोपायचा. ही गोष्ट आपल्याला जशी खुपते तशी सोहमला ती पटली नाही. काही गोष्टी आपल्याला पटत नसतात, पण त्या बदलणे शक्य असूनही आपण त्या बदलत नाही. प्रवासाचा पाचवा दिवस उजाडला. आजचे आकर्षण अल्लेपी येथील नावेतील प्रवास आणि रात्रीचे वास्तव्य हे होते. आतापर्यंत अतिशय शांतपणे कार चालविणारा आमचा ड्रायव्हर आज मात्र सुसाट सुटला होता. मल्याळम भाषेतील शेलके शब्द ऐकायची संधीही आम्हाला या निमित्ताने मिळाली. संधी मिळताच त्याला मी विचारले, काय रे बाबा आज काय झाले? तो तोडक्या मोडक्या हिंदीत उत्तरला की आज तो त्याच्या अल्लेपी येथील घरी जाणार होता आणि पाच दिवसाने बाबा येणार म्हणून त्याच्या मुलाने शाळेला सुट्टी घेतली होती! बर्याच जणांकडून ऐकलेल्या केरळच्या backwater चा प्रवास सुरु झाला. नावेत सारथ्याने, त्याच्या मदतनीसाने आणि आचार्याने शहाळ्याचे पाणी देवून आमचे स्वागत केले. ही हाउसबोट तशी भव्य पण मस्त्यगंधाने सुगंधीत! दिवसाचा प्रवास तसा मजेचा! सर्वत्र जलाशय आणि काठावर झाडांमध्ये वसलेली केरळची गावे हे पाहण्यास मजा आली. संध्याकाळी साडेपाचनंतर ह्या बोटींना जलसंचार करण्यास कायद्याने बंदी आहे. त्यामुळे एका गावाच्या काठी ही बोट वास्तव्याला आली. गावात एक फेरफटका मारण्याचा आमचा उत्साह थोड्याच वेळात मावळला! जलाशयाच्या काठी दात घासणारे, भांडी धुवणारे गावकरी पाहण्यास आम्ही सरावत होतो तितक्यात आमच्या समोरच आमच्या आचार्याने त्याच पाण्यात डुबकी मारून त्यांचे संध्याकाळचे स्नान आटोपले. ते पाहून आम्ही याची देही डोळा धन्य झालो! बाजूला अशा अनेक बोटी वास्तव्याला आल्या होत्या! त्यातील कुटुंबेही फेरफटका मारण्यासाठी निघत आणि मग थोडा वेळ आमच्याशी गप्पा मारून जात. ही रात्र आता अशा ठिकाणी काढायची अशा विचाराने कंटाळलो असताना 'बाबा येथे रात्री डाकू तर येणार नाहीत, या सोहमच्या प्रश्नाने आमची करमणूक झाली. नावाड्याने विचारले हा काय विचारतो आहे? डाकू हा शब्द त्याला हिंदीत समजावू न शकल्याने मी शेवटी त्याला फुलनदेवी हा शब्द सांगितल्यावर त्याची हसताहसता पुरेवाट झाली. बाकी ह्या हाउसबोटीवर जेवण मात्र अगदी रुचकर होते. रात्री डासांचा मुकाबला करावा लागला. शेवटी एकदा बेडरूम मधला AC सुरु केल्यावर आम्ही सुखावलो. शेवटच्या दिवशी कोचीनच्या दिशेने आम्ही प्रस्थान केले. तिथे थोडीफार खरेदी करून भारताचा विश्वचषक स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना बघण्यासाठी आम्ही विमानतळावर येवून दाखल झालो. रात्री बोरीवलीला परतल्यावर भारताने सामना जिंकला आणि एका छान सुट्टीची सांगता झाली.

No comments:

Post a Comment