Thursday, August 30, 2012

एक गुलझार प्रतिक्रिया!



माझ्या एका खास मित्राची ही एक 'गुलझार' प्रतिक्रिया!

तुझ्या गुलझार लेखमालेच्या निमित्ताने एक प्रसंग आठवला.

" माझ्यासारखाच बालपण वसईत जगलेला वसईकर एका प्रकल्पावर सतत भेटत असे. एकदा म्हणाला की तुला वसईत जाऊन स्थाईक व्हावेसे वाटत नाही का? प्रश्न वाटतो तेवढा सरळसोट नव्हता. कळले नाही की तो प्रश्न बालपणाविषयी आहे की वसईविषयी आहे? नंतर जाणवले की बालपण तर कधीच संपले आणि ज्या वसईशी बालपण जोडले आहे ती वसई. ती ही ती राहिली नाही. विचार गद्यात करणे कठीण वाटू लागले. आणि माझ्यातला गुलझार जागा झाला.

बालपणाबरोबर हरवलेली वसई .......
झुळझुळणारे वारे होते, मतलई तर कधी खारे होते

बिदीत पकडलेले मासे तर जिवापेक्षा प्यारे होते
त्या काळात सण होते, गावात आपलेपण होते

निवांत असे क्षण होते, शाळेत बालपण होते
मैत्री प्रेमाचे बंध होते, निश्शब्द अदृश्य गंध होते

सोपे साधे छंद होते, क्षितिजावरचे वास्तव मात्र बेबंद होते
यथावकाश बदलले सारे, झुळझुळणारया वार्याच्या वेगाने
अजूनही आठवते सारे, हळहळणारया स्वप्नाच्या आवेगाने......

Wednesday, August 29, 2012

गुलजार भाग ३ - 'मेंरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा हैं'



१९८७ च्या सुमारास आलेला इजाजत हा चित्रपट तसा चिकित्सक लोकांसाठी! दोन नायिकेंमध्ये गुंतलेल्या नायकाच्या मनाचे हिंदोळे ह्या चित्रपटात सुरेखरीत्या मांडले गेले आहेत. एक प्रेयसी आणि एक पत्नी. प्रेयसी आणि पत्नीमध्ये नायकाची ये जा चालू असते. ह्या चित्रपटाच्या कथानकात काही मी खोलवर जात नाही. पण त्यातले एक गाणे, 'मेंरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा हैं' केवळ अप्रतिम. अशाच एका प्रेयसीकडून पत्नीकडून परत गेल्यानंतरच्या क्षणी नायक प्रेयसीला तिच्या राहिलेल्या वस्तू परत पाठवून देतो. आपल्या ह्या वस्तू परत करून नायक आपली आठवण विसरण्याचा प्रयत्न करतोय हे जाणवून दुःखी झालेली अनुराधा पटेल हे सुंदर गाणे गाते.

ती नायकाला भौतिक वस्तूंच्या पलीकडील राहिलेल्या आठवणींची जाणीव करून देते. यात श्रावणातील (सावन ह्या शब्दाची शृंगारिक जाणीव श्रावण ह्या शब्दात येत नाही, असो!) एकत्र घालविलेले पावसातील भिजलेले क्षण, तिच्या पत्रात गुंतलेल्या रात्रीच्या आठवणी परत करण्याची ती मागणी करते. पानझडीच्या मौसमात पानांचा पडणारा आवाज मी कानात साठवून मी परत आले होते, ती झाडाची फांदी अजूनही माझ्या मनात थरथरत आहे. ती फांदी, त्या फांदीच्या आठवणी मिटवून टाक असे ती म्हणते. एका पावसाच्या वेळी एका छत्रीत आपण अर्धे सुके आणि अर्धे भिजले होतो. त्यातला केवळ सुका भागच (तुझा रुक्षपणा) मी घेवून आले आहे. त्यातला तुझा प्रेमाचा ओलावा तुझ्याचकडे राहिला आहे, तो मला परत पाठवून दे.

ह्या पुढील भाग माझ्या आकलन शक्तीपलीकडील. अनुराधाला नायकासोबत घालविलेल्या एकशे सोळा चांदण्या रात्री आठवतात! आता ११६ च का यावर मी बरीच डोकेफोड केली. वर्षाच्या रात्री ३६५. त्यातील शुक्ल पक्षाच्याच रात्री समाविष्ट करायच्या असे ठरविले तर १८२ रात्री. पावसाळ्यातील १२० पैकी ६० शुक्ल पक्षाच्या रात्री ढगाळ वातावरणाने गेल्या तर राहिल्या १२२ रात्री. असा विचार करता करता डोक्यात प्रकाश पडला की इथे कविमन पाहिजे, यांत्रिकी नव्हे! असो, त्या नायकाबरोबर घालविलेल्या ११६ रात्रीतील एक त्याच्या खांद्यावर टेकून घालविली होती आणि त्यावेळी आपण दोघांनी खोट्या खोट्या तक्रारी, खोटी खोटी आश्वासने दिली होती. त्या तक्रारी, ती आश्वासने तू मला परत दे!

ह्या गाण्याचा शेवट पहाना! ह्या सर्व आठवणी परत दे आणि ह्या सर्व आठवणी जमिनीत पुरून टाकण्याची तू मला परवानगी दे असे हरिणाक्षी अनुराधा बोलते. ह्या आठवणी पुरल्यावर मी पूर्णपणे तुझ्यापासून मोकळी होईन आणि मग माझ्याकडे काहीच बाकी उरणार नाही आणि मग मी तिथेच निद्रिस्त (कायमची) होऊन जाईन! वा गुलजार साहेब वा! प्रेमभंग झाल्यानंतरची विरहिणीचे दुःख याहून अचूक शब्दात कोण पकडू शकेल असे मला वाटत नाही.

एकंदरीत प्रेमिकांच्या विश्वात नात्यांच्या अनेक छटा असतात. एक गीतकार म्हणून विविध चित्रपटांसाठी गाणी लिहिताना ह्या छटा गीतकारास अचूक पकडाव्या लागतात (किंवा लागत असत). गुलजार यांच्या विविध गाण्यांचा अभ्यास करता करता त्यांनी ह्या विविध छटा कशा ओळखल्या आहेत आणि एकाच भावनेला वेगवेगळ्या चित्रपटात समर्पक शब्दांद्वारे / रुपकांतून कसे अचूकपणे पकडले आहे हे पाहून मन थक्क होते.

Tuesday, August 28, 2012

गुलजार भाग २ - घर चित्रपट


 
पहिल्या भागात आप की आखों में कुछ, महके हुए से राज हैं ह्या गाण्याचा उल्लेख आला. एका अतिशय सुंदर अशा घर ह्या चित्रपटातील हे गाणे. हा चित्रपट पाहावा तो विनोद मेहराच्या अभिनयासाठी, सुंदर रेखासाठी, मनाला भिडणाऱ्या कथानकासाठी आणि गाण्यांसाठी! एकमेकांच्या प्रेमात पडलेले नायक, नायिका, वडिलांची लग्नाला परवानगी न मिळाल्यामुळे घर सोडून जाणारा नायक, लग्नानंतरचा सुखद काळ, मग नायिकेच्या आयुष्यात होणारा हादसा आणि त्यानंतर त्या दोघांचा मानसिक संघर्षाचा काळ. हा सर्व चित्रपटाचा मूड गुलजार यांनी कसा गाण्यातून अप्रतिमरित्या टिपला आहे पहा.

पहिलं गाणं 'आजकल पाँव ज़मीं पर नहीं पड़ते मेरे'. हा लग्नाआधीचा प्रेमिकांचा प्रणयाराधनेचा काळ, प्रेमिका इतकी सुखात न्हाऊन निघाली आहे की तिचे पाय जमिनीवर पडत नाहीत. आता पुढे अतिशोयक्ती अलंकारांचा वापर करून ती नायकास विचारते की तू मला उडताना तर पाहिले नाहीस ना? तुझा हात तर हातात आला आहे. लोक म्हणतात की दोघांच्या हस्तरेषा मिळाल्यात, पण इथे तर मी दोन आयुष्य, दोन भाग्य मिळताना पाहिली आहेत. मी रात्रंदिवस एका वेगळ्याच दुनियेत असते, आणि तुझाच चेहरा सतत माझ्या डोळ्यासमोर असतो. माझ्या अवतीभोवती दिवस रात्री काही बाही होत असत. त्याचा आपल्याशी संबध असो वा नसो पण माझ्या हृदयाची धडधड ते वाढवून जात! प्रेमात पडलेल्यांना वास्तवाचे भान नसतं हे आपण म्हणतो. गुलजार ह्यांनी हे कसे अचूक शब्दात पकडलं आहे बघा.

नंतरच गाणे 'तेरे बिना जिया जाये ना'. दोघांचे लग्न होते. लग्नानंतर व्यावहारिक जीवनाचं वास्तव समोर येत. नायक कार्यालयात जातो. नायिकेस घरी करमत नाही. त्यावेळचे हे गाणे. तुझा विचार येताच माझे सर्वांग सुगंधाने भरून जात आणि अशा स्थितीत मी बैचैन होऊन जाते, एकटी राहू शकत नाही. तुझा रेशमी सहवास मला काही दररोज मिळू शकणार नाही अशी खंत ती व्यक्त करते. ह्या जीवनात मला तुझ्याशिवाय काहीच रस वाटत नाही असे ती म्हणत असतानाच नायक घरी परततो.

पुढे ह्या दोघांच्या जीवनात एक दुर्देवी घटना घडते. नायिकेवर बलात्कार होतो आणि ती उद्ध्वस्त होऊन जाते. आपण नायकाच्या प्रेमास पात्र राहिलो नाही असे तिला वाटू लागते. मध्येच तिची मनःस्थिती पूर्ण बिघडून जावून ती नायकाला तू माझ्यावर दयेचे नाटक करू नकोस असा आरोपही करते. अशा वेळी नायक मात्र आपला संयम कायम ठेवतो. तो म्हणतो ही रात्रही तीच आहे आणि आपण दोघेही तेच आहोत. आणि अशा रात्री बघितलेली स्वप्नेही तीच आहेत आणि त्या स्वप्नात मी अजून तुलाच पाहतोय. ह्या अशा रात्री तू जे स्वप्न बघशील त्यात तू मला पापण्याच्या पडद्याआडून बोलाव असे आर्जव तो करतो. आता तो थोड वास्तवाकडे वळतो, ही स्वप्न काचेच्या तुकड्यासारखी आहेत ती थेट डोळ्यांना टोचू शकतात,म्हणजेच प्रत्यक्षात ही स्वप्ने उतरवणे कधीकधी दुखदायक असू शकतो म्हणून त्यांना झोपेतच बंद पापण्यात ठेवून डोळ्यात साठवण्याचा तो सल्ला तिला देतो.

बघा कसं आहे. एका बाजूला आहे दोन तासांचा चित्रपट आणि दुसऱ्या बाजूला आहेत १५ मिनिटांची ही चार गाणी. संपूर्ण चित्रपट ह्या चार गाण्यातून साकार केला आहे गुलजार यांनी!
जे न देखे रवी, ते देखे कवी!


Sunday, August 26, 2012

गुलजार भाग १



अकरावीत प्रवेश घेतल्यावर दादरला वर्तक वसतिगृहात मी रहावयास गेलो. माझा मोठा भाऊ आणि त्याचे मित्रमंडळ त्यावेळी तिथे वास्तव्यास होते. मुंबईत एकंदरीत कसे वावरायचे याचे धडे मला भावाकडून आणि त्याच्या मित्रमंडळीकडून मिळाले. राजेश सावे हा भावाचा एक खास मित्र. राजेशबरोबरच्या भावाच्या गप्पा बऱ्याच विषयांवर चालत. ह्या दोघांचा हिंदी चित्रपटाचा व्यासंग दांडगा. आधीच्या वर्षी इजाजत हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. एकदा हे दोघे ह्या चित्रपटाच्या गाण्याविषयी चर्चा करीत होते. एक सो सोला चांद कि राते वरून त्यांची गाडी गुलजारवर आली. त्यांची ती चर्चा आज मला फार काही आठवत नाही पण माझी आणि गुलजारची ही पहिली ओळख. त्यानंतर जेव्हा केव्हा गुलजार यांची प्रेमिकांच्या भावनांचे विविध कंगोरे शब्दात अचूक पकडणारी गाणी मी ऐकतो तेव्हा मी मंत्रमुग्ध होतो. काहींचा अर्थ मला समजला, काहींचा नाही ! अशाच काही गाण्यांचे मला समजलेल्या अर्थाचे हे वर्णन!
सुरुवात करूया आँखों में हम ने आप के सपने सजाये हैं या गाण्यापासून! यात प्रियकर प्रेयसीच्या प्रेमात आकंठ बुडला आहे. त्याच्या स्वप्नात, वास्तवात फक्त तीच आहे. त्याने हिऱ्यांची कठोर तपासणी करून तिच्या डोळ्यांचा रंग निवडला आहे. बऱ्याच परिश्रमानंतर त्याला जीवनाचे रंग गवसले आहेत. त्यामुळे तिची मिळालेली साथ सहजासहजी सोडायला तो स्वप्नातही तयार नाही. ती जेव्हा जेव्हा हसते तेव्हा त्याला जीवनाचा खरा अर्थ गवसतो. ती जेव्हा त्याच्या डोळ्यात बघते तेव्हा कालचक्रच थांबून जाते आणि त्या थांबलेल्या क्षणात त्याला तिच्याबरोबरच्या युगोनयुगे सहवासाचा आनंद मिळतो.
असेच एक दुसरे प्रेयसीच्या डोळ्यांविषयीचे अप्रतिम गाणे, आप की आखों में कुछ, महके हुए से राज हैं. यात प्रेयसीच्या डोळ्यांत दडलेली गूढ रहस्ये प्रियकराला शोधायची आहेत. प्रेयसिपेक्षा तिची अदा अधिक मोहक आहे असे म्हणण्याचे धाडसही तो करतो. तिने ओठ उघडल्यावर त्याला मोगऱ्याची फुले फुलल्याचा भास होतो, तिच्या डोळ्यात जीवनभराची साथ देणाऱ्या साथीदाराची त्याला खात्री पटते आणि तिच्या अबोलतेतही ती तिला जे काही म्हणायचे आहे ते सर्व सांगून जात आहे असे त्याला वाटते. आता वेळ आली ती नायिकेची! नायकाच्या बोलण्यात अवखळपणा नाही, तो आपली उगाचच स्तुती करीत नाही.पण त्याचे एकंदरीत अविर्भाव बघता त्याच्या मनात काही भलतासलता विचार तर नाही ना अशी शंका तिच्या मनात येते आणि ही तर तुझ्या बदमाशीची हद्दच झाली असा सरळसरळ आरोप करावयास ती कचरत नाही.
नंतरचे एक गाणे मासूम चित्रपटातील! हा चित्रपट एकदम भावूक. पिता असूनही अनाथपण अनुभवायला लागलेल्या एका लहान मुलाच्या भावविश्वाभोवती गुंफलेला! अशा ह्या चित्रपटात अचानक प्रियकराची / नवऱ्याची प्रेयासिविषयी असलेली मालकीभावना सुंदर शब्दात पकडणारे हुजूर इस कदर भी ना इतराके चलिए हे एक सुंदर गाणे. यात प्रेयसीने आपल्या सौंदर्याचे उगाचच प्रदर्शन करून नये असे प्रियकराला वाटते, तिच्या सौंदर्याने भाळून कोणी एखादा आशिक तिच्या मागे लागेल असे त्याला वाटते. पण ह्या गाण्याच्या शेवटी मात्र प्रियकर एक खंत व्यक्त करतो. हे सौंदर्य वगैरे सर्व ठीक आहे पण प्रेयसीकडे हृदयच नसल्याचे त्याला दुःख वाटते. तिच्याकडे जर हृदय असते तर एक सुंदर प्रेमकहाणी इथे लिहिली गेली असती असे त्याला वाटते. ह्या गाण्याचा पूर्वार्धाच्या मला समजलेल्या अर्थाविषयी मला पूर्ण खात्री नाही.
गुलजार ऐकणे हा सुंदर अनुभव आहे, पण गुलजार समजणे हे फार मोठे कठीण काम आहे. ज्याला जसा गुलजार समजेल तसा त्याने समजून घ्यावा आपापल्या भावविश्वाशी जोडावा. खूप आनंद मिळतो. असाच मला समजलेले गुलजार तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न मी पुढील काही दिवस चालू ठेवीन!

Thursday, August 23, 2012

कीर्तनकार


कंपनीत अधूनमधून प्रशिक्षण वर्गासाठी तुमची नेमणूक केली जाते. प्रशिक्षण वर्ग म्हणजे हे जग आदर्शवादी आहे असे समजून प्रशिक्षकाने दिलेले ग्यान! अशाच एका वर्गात प्रशिक्षक ग्यान देता झाला, एखाद्या माणसाला कठोर उपदेश द्यायचा असेल तर एकदम त्याकडे वळू नका, प्रथम त्याने केलेल्या चांगल्या कामाचा आढावा घ्या आणि हळूहळू कोठे चूक झाली, चुकीला कारणीभूत असलेले घटक कोणते याकडे वळा. आम्ही सर्वांनी माना डोलावल्या. नाण्याला दोन बाजू असतात. तुम्ही कधी उपदेश देणारे असता तर कधी घेणारे. थोडे विषयांतर, हल्ली एकंदरीत आपली झणझणीत बोलणे ऐकण्याची, खाणे खाण्याची क्षमता कमी झाली आहे हे मात्र खरे. पांढरपेशे बनण्याचा हा दुष्परिणाम!
माझ्या मनात मात्र संशयाचे भूत शिरले. कोणी बोलताना माझ्याविषयी चांगले बोलू लागले की मी हल्ली एकदम सावध होऊन जातो. त्या प्रशिक्षकाची आठवण येते आणि हा चांगले बोलण्याचा भाग खऱ्या उपदेशाची प्रस्तावना तर नव्हे असा संशय येतो. मध्येच एका जवळच्या मित्राने फोन केला. अरे आदित्य तू एकदम चांगले ब्लॉग लिहतो. झाले, मी सावध स्थितीत गेलो. प्रस्तावना झाल्यावर तो म्हणाला, तुझे ब्लॉग वाचून मला मंदिरातील कीर्तनकाराची आठवण येते. मी धन्य झालो. फोनच्या पलीकडील त्याचे अदृश्य हास्य मी पूर्णपणे पाहू शकत होतो.
बोलणे संपल्यावर काही वेळाने मात्र मी खुश झालो. मध्येच मी फेसबुकावर ग्यान पाजळले होते, दोन पिढ्यांमधील संघर्ष हा कायम राहणार. नवीन पिढीला जुनी पिढी सदैव पुराणमतवादी वाटणार आणि जुन्या पिढीला नवीन पिढी सदैव बंडखोर वाटणार. सध्याच्या युगातील तंत्रज्ञानाच्या झपाट्यामुळे जुनी पिढी काहीशी हबकली आहे. त्यांचा ज्ञान देण्याचा आत्मविश्वास काहीसा कमी झाला आहे. परंतु घाबरण्याचे कारण नाही, ही तंत्रज्ञानाचे दिंडोरे पिटणारी नवीन पिढी काही वर्षात आपली भूमिका बदलेल आणि मग मजा येईल असा माझ्या ज्ञानाचा सूर होता. तर मी माझी समजूत करून घेतली की मी जुन्या पिढीचा प्रतिनिधी आहे आणि त्या पिढीतर्फे कीर्तनकाराची भूमिका मी बजावतो आहे.
एखाद्या पिढीचे प्रतिनिधित्व करून ज्ञान देण्यासाठी कशाची गरज असते? मध्येच माझ्या पत्नीने चांगला मुद्दा मांडला identity चा. एखाद्या गावात, एकत्र कुटुंबात वाढलेल्या मुलास आपण त्या गावाचे, कुटुंबाचे प्रतिनिधी आहोत याचे बाळकडू लहानपणापासून अप्रत्यक्षरीत्या मिळत असते आणि मग तो आयुष्यभर त्या संस्कृतीचा पुरस्कर्ता बनतो. आजूबाजूच्या जगातील थिल्लर गोष्टींचा अशा मुलांवर परिणाम होण्याची शक्यता थोडी कमी असते. जेव्हा आजच्या युगात तुम्ही आपल्या मुलांस मुंबईत, अमेरिकेत वाढवता तेव्हा ह्या घटकांची उणीव भासते असा एकंदरीत तिच्या बोलण्याचा सूर होता. बायकोचे बोलणे निर्विवादपणे मान्य करण्याचे जे दुर्मिळ क्षण येतात त्यातला हा एक क्षण!
देवळातील कीर्तनकार हा उपदेश देणारा अधिकृत माणूस. पण गावात जवळजवळ सर्वचजण स्वखुशीने ही भूमिका बजावत असतात. शहरात मात्र लोक काहीसे अलिप्त बनतात. पूर्ण वाक्यातील संवाद मग तो सार्वजनिक जीवनातील असो की वैयक्तिक, झपाट्याने कमी होताना दिसतो. नक्कीच सध्या जगाला कीर्तनकाराची आवश्यकता आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल!

Tuesday, August 14, 2012

खेळ गृहितकांचा




माणसाचं आयुष्य हे एक गृहितकाने भरलेलं विश्व आहे. मनातल्या मनात आपण आजूबाजूच्या परिस्थितीविषयी, लोकांविषयी कळत न कळत अनेक गृहितक बनवत असतो. ही गृहितक बनविताना आपण आपल्याला आलेल्या अनुभवांचा किंवा ऐकीव / वाचलेल्या माहितीचा वापर करीत असतो. उदाहरणे द्यायची तर अनेक, रात्री झोपताना, झोपून उठल्यावर पृथ्वीने अर्धे परिभ्रमण पूर्ण करून सकाळ झाली असेल हे गृहितक आपण बनवितो, रात्रभरात वर्तमानपत्रे ताज्या बातम्या छापून सकाळी पेपर आपल्या दारात टाकतील हे अजून एक गृहितक. ही झाली सामान्य परिस्थितीविषयीची गृहीतके, तुम्ही जर अगदीच 'सिक्थ सेन्स' चित्रपटात नसाल तर बर्याच वेळा ही गृहीतके खरी ठरतात. पण हळूहळू ही गृहीतके थोडी क्लिष्ट स्वरूप धारण करू लागतात. बाजारात जीवनावश्यक वस्तूंचे भाव कसे बदलतील, निर्देशांक कसा उसळी मारेल याविषयी तुम्ही बनविलेली गृहीतके बर्याच वेळा चुकू शकतात. पण ठीक आहे, ही गृहीतके चुकू शकतात याची पूर्वकल्पना असल्यामुळे आपण त्यासाठी नियोजन करून ठेवले असते.

मामला जेव्हा व्यक्तींकडे वळतो तेव्हा थोडा गंभीर बनतो. आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविषयी काही ठोकताळे बांधतो. ह्या साठी आधी म्हटल्याप्रमाणे आपण त्या व्यक्तीच्या आपल्याला आलेल्या अनुभवांचा, त्यांच्याविषयी आपण ऐकलेल्या, वाचलेल्या माहितीचा वापर करतो. आपण म्हणजे आपला मेंदू. ह्या सर्व माहितीचे पृथ्थकरण करून त्या व्यक्तीविषयी आपण आपलं मत बनवितो आणि ही व्यक्ती विविध प्रसंगी कसं वागेल याचा अंदाज बांधतो. यात अजून एक गृहितक असत, आणि ते म्हणजे आपल्या मेंदूच्या पृथ्थकरण करण्याच्या क्षमतेच्या खात्रीविषयीचे आपले गृहितक. आपली ही पृथ्थकरण करण्याची क्षमता निर्विवादपणे श्रेष्ठ असणार हे अजून एक गृहितक आपण करतो. आपल्या भोवतालच्या व्यक्तीसुद्धा आपल्या विषयी अशी गृहितक करतात. अशी ही गृहितक दोन व्यक्तींच्या नात्याचा पाया बांधतात. जेव्हा केंव्हा ह्या व्यक्तीचा संपर्क येतो तेव्हा एकतर त्या व्यक्ती एकमेकांच्या गृहीताकांप्रमाणे वागतात किंवा नाही वागत! मग आपण निराश होतो, त्या व्यक्तीने आपला अपेक्षाभंग केला असे म्हणतो. या उलट कधी आपणास ह्या व्यक्ती अपेक्षेपेक्षा चांगले वागून सुखद धक्का देतात.

लेखाचा उद्देश एकच, ज्याने त्याने आपापली गृहीतके तपासून बघा आणि आपली पृथ्थकरण क्षमताही!
 

Saturday, August 11, 2012

ऑलिम्पिक २०१२ एक आढावा


ऑलिम्पिक मी मनसोक्त बघतोय. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी तर भरभरून बघतोय. उद्घाटन सोहळा सुंदर झाला, अगदी बीजिंग इतका नसला तरी चांगला झाला. कोणी मधुरा नावाच्या बंगलोरच्या युवतीने भारतीय पथकात समाविष्ट होवून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणा तिला तरी दोष का द्यावा, फुकटच श्रेय मिळवण्याची सवय लागलेल्या हल्लीच्या भारतीय मनोवृत्तीचे तिने जगासमोर दर्शन घडविले.
  1. धनुर्धारी
पहिल्या शनिवारी पुरुषांच्या सांघिक धनुर्धारी स्पर्धेत भारतीय संघाच्या सहभागाने ऑलिम्पिक मधील भारताच्या मोहिमेची सुरुवात झाली. एका संघात तीन स्पर्धक, एका मागोमाग येवून समोरच्या निशाणाचा नेम साधायचा. बरोबर मध्यावर / आतल्या वर्तुळात नेम लागला तर १० गुण, त्याबाहेरील वर्तुळात नेम लागला तर ९ गुण आणि असेच पुढे! आपल्या संघाने सुरुवात तर चांगली करून जपानवर सुरुवातीला आघाडी घेतली. ह्यात दोन महत्वाच्या गोष्टी येतात, जेव्हा तुम्ही झोन मध्ये येता म्हणजे जेव्हा तुमची ब्रह्मांडी टाळी लागते त्यावेळी जमतील तितके १० गुण मिळवून घ्यावेत. आणि कितीही लक्ष विचलित झाले तरी ८ च्या खाली गुणसंख्या जावून द्यायची नाही. क्रिकेटच्या पंढरीवर (लॉर्डसवर) हे सामने खेळले जात होते. इंग्लंडचे लहरी हवामान, थंड वारा ह्या गोष्टी आपल्या धनुर्धारांबरोबर त्यांच्या बाणांचेही लक्ष विचलित करायला पुरेशा ठरल्या. मध्येच एक दोन वेळा आपल्या स्पर्धकांनी ६ गुणांचा नीचांक गाठला. २४ फेर्यांच्या शेवटी दोन्ही संघांच्या गुणांची बरोबरी झाली (२११ -२११) आणि कोंडीफुटीच्या (tie breaker ) मध्ये आपण हरलो. उत्तम लढत पण एक चांगली संधी आपण गमाविली.
महिला संघाकडून तर अधिक जास्त अपेक्षा होत्या कारण त्यात आपली जगज्जेती दीपिका समाविष्ट होती. तिथेही अशीच गोष्ट. पहिल्याच फेरीत आपण हरलो. महिला संघाने तर आपल्या क्षमतेच्या जवळपासही खेळ केला नाही. वैयक्तिक स्पर्धेतही दीपिका पहिल्याच फेरीत हरली. 'क्या हो रहा था यह समजने के पहेलेही सब ख़तम हुवा था' असे दुःखी स्वरात ती म्हणाली.
२. बॅडमिंटन
बॅडमिंटनमध्ये दुहेरी सामन्यापासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ज्वाला गट्टा दुहेरीच्या महिला आणि मिश्र अशा दोन्ही सामन्यात पराभूत झाली. नंतर मात्र महिला दुहेरीच्या सामन्यात तिने अश्विनी पोन्नापाच्या साथीने साखळीतील शेवटचे दोन सामने जिकून आशा जिवंत केल्या. त्यांचा शेवटचा सामना सुरु व्हायच्या आधी समालोचकाने म्हटले सुद्धा की उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशासाठी त्यांना हा सामना एका विशिष्ट गुण फरकाने जिंकणे आवश्यक आहे. चुरशीच्या पहिल्या गेम नंतर दुसर्या गेम मध्ये त्यांनी ९ -० आणि मग ११- १ अशी आघाडी घेतली सुद्धा, पण नंतर मात्र सिंगापोरच्या जोडीने चुरस देत पराभवाचे अंतर कमी केले. महिला दुहेरीचे सामने गाजले ते काही गटातील निर्णय दोन्ही जोडीनी आपसात ठरविल्याने. ह्यात चीनच्या जोडीचाही समावेश होता. त्या बद्दल शिक्षा म्हणून ह्या जोड्यांना बाद ठरविले गेले. हे तर योग्य झाले, पण हा आदेश त्यांना ज्यांनी दिला त्या उच्च पदाधिकाऱ्यांचे काय? आपल्या जोडीनेही आपल्या गटातील एका निर्णयावर आक्षेप घेतला पण तो मान्य केला गेला नाही. इतके करून सुद्धा चीनचे खेळाडू महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावून गेले.
बाकी सैना नैहवालचे कौतुक करावे तितके थोडे. तिची एकाग्रता वाखाणण्याजोगी, चीनच्या खेळाडूंच्या मोठ्या समूहाला एकटीने टक्कर द्यायची हे काय सोपे काम नाही. उपांत्य फेरीत ती हरली खरी पण कास्न्य पदकासाठीच्या सामन्यात तिला तमाम भारतीयांच्या प्राथनानी साथ दिली आणि चीनी खेळाडूला दुखापतीपायी माघार घ्यावी लागली. कश्यपने देखील सुखद धक्का देत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली.
३. टेनिस
हा एकमेव असा खेळ जिथे आपणाकडे दुहेरीतील जागतिक स्तरावरील खेळाडू आहेत. परंतु व्यक्तिगत अहंकाराने राष्ट्रभावनेला तिलांजली देण्यात आली. पेस - भूपती आणि भूपती - मिर्झा अशा आपल्या जोड्यांना विजयाची उत्तम संधी होती. पण आपल्या महान खेळाडूंनी तसे काही होवून दिले नाही. आणि आपले आव्हान दुसर्या फेरीच्या पुढे काही जावू शकले नाही.  बाकी फेडरर ज्या प्रकारे मरेकडून अंतिम सामन्यात हरला ते काही मला झेपले नाही. एक तर फेडरर अगदीच सुमार खेळ खेळीत होता किंवा दमला होता किंवा ....
४. नेमबाजी
मला सुरुवातीपासून १० meter air rifle ह्या स्पर्धा प्रकारापासून खास आशा होत्या. कारण एकच ह्यात आपले दोन खंदे वीर गगन नारंग आणि अभिनव बिंद्रा भाग घेत होते. नेमबाजीच्या ह्या स्तरावरील स्पर्धेत शेवटी एकाग्रता आणि मानसिक सामर्थ्याची कसोटी लागणार. २००८ ला अभिनवने बाजी मारली आणि ह्यावेळी गगनने. गगनने पदकांचे खाते उघडले आणि मी धन्य झालो. १९८० च्या मास्को ओलीपिक मधील हॉकीच्या सुवर्णपदकानंतर १९८४, ८८, ९२ अशी तीन ओलीपिक मध्ये भारताच्या पदकाची पाटी कोरीच राहिली होती. त्या मुळे हल्ली प्रथम मी पहिले पदक कधी मिळते याची वाट पाहत असतो. बाकी त्यानंतर विजय कुमारने पिस्तोल शूटिंग मध्ये अनपेक्षितरित्या रौप्य पदक मिळवून दिले. जिंकल्यावर गडी म्हणाला, 'ह्या स्तरावर जिंकण्यासाठी मनोबलाची आवश्यकता असते आणि आम्हाला सैन्यात ह्याची सवय असते.' अखंड भारतात शिस्त कोठे अस्तित्वात असेल ती सैन्यात!
५. हॉकी
आज भारत दक्षिण आफ्रिकेकडून हरला. आणि बाराव्या / अंतिम स्थानावर राहिला. भारताचे ऑस्ट्रेलीयान प्रशिक्षक नोब्ब्स यांना अजून थोडी संधी द्यावयास हवी असे माझे वयैक्तिक मत. बाकी आपण ज्याकाळी जिंकायचो त्याकाळची आणि आजची हॉकी फारच वेगळी. तेव्हा नैसर्गिक मैदानावर सामने खेळले जायचे आणि त्यामुळे शक्तिमान लांबलचक पास देण्याची पद्धती अस्तित्वात नव्हती, हॉकीच्या काठीने चेंडू खेळवत नेत, प्रतिस्पर्ध्याला चकवत गोल करण्यात आपली खासियत. हॉकीचा पृष्ठभाग बदलला आणि खेळही बदलला. त्यामुळे मी मात्र आपल्या संघाकडे सहानभूतीने बघतो. इथे गरज आहे ती ललित मोदि किंवा शरद पवार सारख्या धूर्त लोकांची जे परत हॉकीला नैसर्गिक पृष्ठभागावर घेऊन येतील.
६. बॉक्सिंग
मेरी कोमने सुंदर खेळाचे प्रदर्शन केले. परंतु दुर्दैवाने उपांत्य फेरीत तिला सुवर्णपदकविजेत्या ब्रिटीश खेळाडूकडून हार पत्करावी लागली. आजच तिच्या आहाराविषयी लेख वाचला. तिने कारकिर्दीतील सुरुवातीचे बरेच दिवस भात आणि भाज्या अशा आहारावर काढले. बाकी विजेंदर सिंग आणि इतर बॉक्सर झुंज देत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहचले परंतु तिथे हरले. आपण निर्णयाविरुद्ध मागितलेली दाद फेटाळली गेली. इथे एक बाब मला खटकली. एक प्रश्न पडला, आपण हार खुल्या दिलाने पत्करू शकत नाही का?
७. कुस्ती.
प्रत्येक अंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी जेव्हा भारतीय संघ जाहीर होतो त्यावेळी मी कोल्हापूरच्या आखाड्यातील कोणी कुस्तीवीर दिसतो कि नाही याची तपासणी करतो.
योगेश्वर दत्तने कमाल केली. उपांत्यपूर्व फेरीत हरून सुद्धा त्याने मिळालेल्या संधीचे सोने करीत कांस्य पदक पटकाविले. सुशीलकुमारचे तर कौतुक करावे तितके थोडे. त्याने अनेक तगड्या पैलवान्नाचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. नंतर मात्र मान दुखावल्यामुळे तो अंतिम फेरीत हवा तसा प्रतिकार करू शकला नाही आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
८ Gymnastic
हा देखील एक सुंदर खेळ. महिला सांघिक स्पर्धेत रशिया संघ जिंकण्याच्या स्थितीत असताना एका खेळाडूची उडी चुकली आणि आणि त्यांचे सुवर्णपदक हुकले. ध्येयाच्या किती जवळ तरीही किती दूर!
९. लयबद्ध जलतरण
ह्या खेळात भारताचा सहभाग नसला तरी हा खेळ पाहणे अत्यंत आनंददायी अनुभव असतो. अनेक खेळाडूंनी पाण्यामध्ये साधलेल्या समन्वय हालचाली, त्यामागची मेहनत. धन्य ते खेळाडू!
असो प्रत्येक देशांच्या दृष्टीने प्राधान्य दिल्या जाणार्या गोष्टी वेगळ्या असतात. चीनच्या काही सुवर्णपदकविजेत्यांनी जो काही वैयक्तिक त्याग केला त्याच्या गोष्टी ऐकल्या की अंगावर शहारे येतात. उत्तर कोरियातील ज्या खेळाडूंना पदक मिळाले नाही त्यांना छळ छावणीत पाठविले जाते अशी वाचलेली बातमी खोटी असो अशी मी प्राथना करतो.
पुढील ऑलिम्पिक २०१६ साली ब्राझील मधील रिओ इथे होणार. एका विकसनशील देशाला ऑलिम्पिक भरविण्यासाठी माझ्या शुभेच्छा! बाकी २०१६ साठी भारताने १००० खेळाडू निवडून, त्यांच्या चरितार्थाची सोय करून त्यांना पुढील चार वर्षासाठी एका थंड हवेच्या ठिकाणी सरावासाठी ठेवावे अशी भोळीभाबडी सूचना! बाकी आतापर्यंतची ६ पदकांची आपली सर्वोत्तम कामगिरी बजाविणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन!

Sunday, August 5, 2012

दोन नियम



व्यावसायिक जगात अधूनमधून काही चांगल्या संकल्पना ऐकायला मिळतात. गेल्या एक दोन वर्षात ऐकलेल्या संकल्पना म्हणजे MOVE ON (झाले गेले विसरुनी जावे पुढे पुढे चालावे) आणि keep the emotions out of it . व्यावसायिक जीवनात असे काही प्रसंग येतात की जेव्हा आपल्याला हवे तसे घडत नाही त्यावेळी पहिली संकल्पना वापरावी असे म्हणतात आणि जेव्हा केव्हा काही कठोर चर्चेचे प्रसंग येतात आणि जिथे वस्तुनिष्ठरित्या विचार करण्याची गरज असते तिथे दुसरी संकल्पना वापरली जाते / वापरण्याचा प्रयत्न करावा.

व्यावसायिक जीवन आणि वैयक्तिक जीवनांत काही गोष्टी / नियम सारख्याच प्रमाणात लागू होतात. आता पहाना MOVE ON ची पहिली संकल्पना आपण वैयक्तिक जीवनात किती कमी प्रमाणात वापरतो. एखाद्याशी झालेल्या तंटा, कधी झालेला वैयक्तिक मानभंग आपण किती प्रदीर्घ काळ लक्षात ठेवतो. त्यावर किती प्रमाणात आपली बौद्धिक शक्ती खर्ची पाडतो. हेच जर आपण move on यशस्वीपणे अमलात आणू शकलो तर किती बरे होईल. तसेच बघायला गेले तर आयुष्यात आपल्याला कधी कधी अपयशाचा, आजारपणाचा मुकाबला करावा लागतो. काहीजण मात्र अरे माझ्याच बाबतीत असे का घडते ह्याच मुद्द्यावर अडून बसतात.

दुसरा मुद्दा keep the emotions out of it चा. काही चर्चेचे प्रसंग असे असतात जिथे दोन्ही पक्ष भावनाविवश होवू शकतात. राजकीय पक्षांच्या युतीमध्ये एखादी जागा असते जी एका पक्षाच्या वृद्ध आमदाराकडे असते आणि ही जागा आपल्याच मुलाला मिळावी असा त्याचा / त्या पक्षाचा अट्टाहास असतो. परंतु सद्यपरिस्थितीत सारासार विचार करता जोडीदार पक्षाला विजयाची तिथे जास्त संधी असते. तिथे हा मुद्दा लागू पडतो. नवराबायकोच्या सहजीवनात याची उदाहरणे खचखचून भरलेली असतात. दैनंदिन जीवनातील क्षुल्लक विवादाचा मुद्दा कधी आणि कसा भावनिक पातळीवर जावून पोहचतो हे कळतच नाही. परंतु एक मात्र खरे, ही नियम फक्त योग्य ठिकाणी आणि अगदी कमी प्रमाणातच वापरायला हवा.

मनुष्य म्हटला की भावना आल्याच! आणि उठसुठ का आपण ह्या भावना बाजूला ठेवायला लागलो की आपण यंत्र कधी बनू हे आपलेच आपल्याला कळणार नाही.