Monday, October 1, 2012

भावनिक सुसंवाद


रविवारच्या वर्तमानपत्राच्या पुरवण्या वाचताना कधी कधी त्यातील एखाद वाक्य विचार करायला भाग पाडत. असंच त्यादिवशी वाचलेला एक लेख. विषय होता मनुष्याची वाढलेली आयुष्यमर्यादा आणि एकंदरीत बदलत्या वातावरणाचा जोडप्यांवर होणारा परिणाम! सारांश असा, पूर्वी मनुष्याची आयुर्मर्यादा कमी होती, शिक्षणाचा प्रसार सर्वत्र नव्हता, पुरुष असो वा स्त्री, त्यांचा जनसंपर्क मर्यादित होता. अपत्यांची संख्या तुलनेने जास्त होती आणि घरकामातच दोघांचा बहुतांशी वेळ जात असे. त्यामुळे संसारातील भावनिक जीवन फारस फुलत नसाव. ह्याला काही प्रमाणात अपवाद नक्की असणार, पण ही एकंदरीत सर्वसामान्य परिस्थिती होती.

बदलत्या काळानुसार अपत्यसंख्या १-२ वर आली, सर्वजण खूप शिकले, सर्वांचाच जनसंपर्क वाढला, स्त्री पुरुष विविध क्षेत्रातील निपुण लोकांच्या संपर्कात येवू लागली. अप्रत्यक्षरीत्या बाहेर भेटलेल्या लोकांच्या वागण्याची आपल्या साथीदाराशी तुलना होवू लागली. ह्या सर्वांमुळे नवीन पिढीतील पुरुष आणि स्त्री ह्या दोघांवर संसारातील जबाबदाऱ्या वाढल्या, ह्या जबाबदाऱ्या घरकामातील नव्हेत तर आपल्या साथीदाराच्या भावनिक जगाशी संबंधित होत्या. समस्या अशी होती की मुळातच आपल्या साथीदाराला भावनिक गरजा असतात ह्याचे सर्वानाच भान नसते, आणि असल्याससुध्दा त्या भावनिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे हे सर्वच मान्य करणार नाहीत. पुन्हा भावनिक गरजा स्थिर नसतात, त्या वयानुसार बदलत जातात. एकंदरीत प्रकार कठीण आहे! ही आजच्या पिढीची स्थिती, पुढच्या पिढीला भावना कितपत शिल्लक राहतील ह्यावर त्या पिढीतील जोडप्यांचा भावनिक सुसंवाद अवलंबून राहील.
 

No comments:

Post a Comment