Saturday, October 13, 2012

PICTURE PERFECT अर्थात परिपूर्ण चित्र


लहानपणी चांदोबा हे माझे आवडते मासिक होते. त्यातली चित्रे मला अतिशय आवडायची. सुंदर घरे, आजूबाजूला हिरवीगार झाडी, व्यवस्थित कपडे परिधान केलेली त्यातली पात्रे. सर्व काही नीटनेटके. प्रत्यक्षात असं काही असू शकत का असा मला प्रश्न पडायचा. पुढे अमेरिकेत असताना उड्डाण / आगमनाच्या वेळी दिसणारं दृश्य मनाला भावून गेलं. भूमातेचा प्रत्येक भाग एकतर हिरवळीने व्यापलेला किंवा मनुष्यनिर्मित सुबक संरचनेने! अमेरिका मला जशी भावली तशी बऱ्याच भारतीयांना सुद्धा! त्या देशाने मानवी भावबंध वगळता सर्व काही कसे आखून रेखून ठेवले आहे.

अमेरिकेच्या ह्या परिपूर्ण चित्राच्या अनुभवाने प्रभावित झालेली मंडळी जेव्हा भारतात परत आली तेव्हा त्यांनी हे picture perfect आपल्या परीने अमलात आणण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर तो सार्वजनिक जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु येथील मुरलेल्या system पुढे बहुतांशी सर्वांनी हार मानली. मग ह्या सर्वांनी आपला मोर्चा वैयक्तिक जीवनाकडे वळविला. आता वैयक्तिक जीवनातील picture perfect साठी लागणारे घटक कोणते? एक सुंदर घर, त्यात दिवाणखान्यातील भिंतीवर टांगणारे एक सुंदर चित्र, सुशिक्षित / सुस्वरूप बायको, CBSE / ICSE बोर्डात शिकणारी मुले, एखादी गाडी, व्यायामशाळेचे सदस्यत्व, SECOND HOME मधील गुंतवणूक, साप्ताहिक सुट्टीत मॉलला भेट, वर्षातून एकदा कौटुंबिक सहल, त्याचे फेसबुकवरील मित्रांनी LIKE केलेले फोटो यादी अशी वाढतच जाते. मुक्त अर्थव्यवस्थेने ह्या picture perfect ला पूर्ण पाठींबा दिला. किंबहुना मुक्त अर्थव्यवस्थेचा हे picture perfect म्हणजे कणाच होता.

हे picture perfect असं कायम राहत का हा मला पडलेला प्रश्न? picture perfect चा एक कमकुवत दुवा म्हणजे ह्यातील काही घटक पृष्ठभागावरील आणि क्षणिक असतात. हा डोलारा ज्यावर उभा आहे ती नोकरी/ व्यवसाय हा एकूण चित्रातील एक महत्त्वाचा घटक बनतो, वाढणारी मुले आपल्या आवडीनुसार आपले स्वतःचे एक picture perfect बनवितात आणि ते आपल्या परिपूर्ण चित्राशी मिळतेजुळते असेलच असे नाही. एकंदरीत काय, picture perfect वर जास्त मेहनत घेऊ नका. मित्र मंडळी, नातेवाईक, कला याच्यावर लक्ष द्या.....

No comments:

Post a Comment