मुंबईत शांतपणे वाहन चालवणे हे एक अवघड काम आहे. रस्ता पार करणारे पादचारी, तुमच्या वाहनाला कोपऱ्यात ढकलू पाहणारे बेस्ट बसचालक, उजवी वाहनमार्गिका (लेन) जी सर्वात जलद वाहनांसाठी आहे ती अडवून ठेवणारे, खडखड आवाज करणाऱ्या रिक्षाचे चालक आणि ह्या सर्वांना तोंड देत तुमच्या हातून कशी चूक होते ह्याची लपून वाट पाहणारे वाहतूक पोलीस. कालच पेपरात बातमी वाचली की सिग्नल (याला एक लांबलचक मराठी शब्द आहे तो आता आठवत नाही) तोडण्याचे प्रमाण मुंबईत फार वाढले आहे. आणि त्यासाठी माहिती मायाजालावर प्रयत्न करणाऱ्या गटाने प्रत्यक्ष एक सभा बोलावली होती. ही बातमी वाचून माझे मन पश्चातापदग्ध झाले. चिंचोली बंदर ते चिकूवाडी ह्या रस्त्यावर रात्री येताना तोडलेले असंख्य सिग्नल आठवले. ह्या पुढे सिग्नल थोड्या कमी प्रमाणात तोडायचे असा मनोमनी निर्धार केला. बघूया किती दिवस हा निर्धार टिकतो ते.
कार्यालयात कधी कधी एखादा मोठा तांत्रिक प्रश्न निर्माण होतो. काही वेळा तो आपसूक मिटतो तर काही वेळा विविध गटातील तज्ञ लोकांना दूरध्वनीवर बोलावून हा प्रश्न सोडवावा लागतो. प्रश्न सुटल्यावर ह्याचे मूळ कारण कोणते ह्यावर बरेच विचारमंथन केले जाते. दोन तीन गोष्टींना निवडले जाते आणि त्यातली एखादी मूळ कारण आहे ह्यावर सर्व एकमत होतात. ह्यात एक मेख असते. मूळ कारण सोडून बाकीच्या गोष्टी ह्या त्या समस्येच्या बळी असतात. म्हणजे कारण की बळी ह्यावर काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. हे सर्व आठवायचे कारण म्हणजे सिग्नल तोडून बेशिस्त वाहतुकीला आमंत्रण देणारे वाहनचालक हे समस्येचे कारण आहेत की ह्या शहरात वाढणाऱ्या बेसुमार लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या ताणाचे बळी आहेत ह्याचा विचार करायला हवा. थोडा खोलवर विचार केल्यास हे तत्व बर्याच ठिकाणी लागू होते. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक समस्यांचे खापर आपण वरवर दिसणाऱ्या कारणांवर फोडून मोकळे होते. पण जमल्यास थोडा विचार करून ह्या वरपांगी कारणामागे अजून काही घटक आहेत का याचा विचार करा!
कामे उरकण्याची मुंबईकराँची पद्धत हे सिग्नल तोडले जाण्यामागील कारण आहे.
ReplyDelete