Saturday, August 31, 2013

IT मधल्या रात्रपाळ्या - भाग २


मागील भागात रंजूचा उल्लेख करायचा राहून गेला. जसजसे एकक परीक्षण प्रगतावस्थेत गेले तसतशा  काही क्लिष्ट समस्या पुढे येऊ लागल्या. मग रंजूला पाचारण करण्यात आले. आता रात्रपाळीत तीस चाळीस लोक धडपडत असायची आणि रंजूसाहेब एका संगणकावर कारचा खेळ खेळत असायचे. सुरुवातीला मला रंजुची आणि त्याच्या मेनफ्रेमवरील करामतीची माहिती नव्हती. आणि त्यातच रंजूचे आगमन झाल्यावर पहिले काही दिवस काहीच प्रश्न उदभवले नाहीत. त्यामुळे ह्या माणसाला खेळ खेळण्यासाठी इथे का बोलावलं असा मला प्रश्न पडायचा. बाकी तो कारचा खेळ मात्र उत्तम खेळायचा. मग एकदा आमचा एक संघ एका समस्येत अडकला. आता DB२ टेबल लोड होत नव्हते की nomad प्रोग्रॅम चालत नव्हता हे नक्की आठवत नाही. पण दिवसभर संघ अथक प्रयत्न करीत होता. रंजूचे रात्री नऊच्या सुमारास आगमन झाले. पाच दहा मिनिट त्या समस्येकडे त्याने पाहिलं. मग आपल्या डेस्कवर गेला. एक कारची शर्यत खेळला. त्यावेळी त्याच्या डोक्यात त्या प्रश्नाचे उत्तर कसे शोधायचं ह्याचा विचार चालू होता हे नक्की. मग ती शर्यत जिंकून आल्यावर गडी त्या प्रश्नावर बसला. दोन तीन प्रकारे प्रयत्न झाले आणि मग दहा मिनिटात तो प्रश्न सुटला होता. रंजूविषयी माझा आदर दुणावला होता. कोणत्याही क्षेत्रात मेहनत वगैरे ठीक असते पण अफाट गुणवत्तेला पर्याय नसतो ह्याची नोंद मी त्यावेळी केली.
रंजू खट्याळ होता. आपल्या खट्याळपणासाठी तो मेनफ्रेमच्या रेक्स ह्या भाषेचा वापर करायचा. रेक्समध्ये मेक्रो लिहून आम्हा गरीब आत्म्यांचा तो छळ करायचा. मेनफ्रेममध्ये लॉगऑन करताना किंवा मध्येच कधीही आमची हिरवी काळी स्क्रीन अचानक मोठमोठ्या संदेशांनी भरून जायची. मग आम्ही समजायचो की रंजूची आमच्यावर वक्रदृष्टी झाली आहे. एकदा त्याने असाच एकाला संध्याकाळच्या वेळी मेसेज पाठवला की मेनफ्रेमचे TSO सेशन  आता पाच मिनिटात बंद होणार आहे. तो बिचारा गरीब जीव खुशीने सर्व तयारी करून घरी जायला तयार होवून बसला.  सेशन बंद होण्याची वाट पाहत! एव्हाना ही बातमी शंभर जणांच्या संघाला पोहाविण्याची काळजी रंजुने घेतली होती त्यामुळे सर्वजण गालात हसत त्या गरीब जीवाकडे बघत होते. मग काही वेळाने त्या गरीब जीवाने (रमेश) बाकीच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली आणि सर्वत्र हास्यकल्लोळ पसरला!
कालांतराने Y२K प्रोजेक्ट संपलं. मग मी इंग्लंडला गेलो तिथे सुदैवाने रात्रपाळी करण्यापर्यंत वेळ आली नाही. शनिवारी मात्र जावं लागायचं. तिथे त्या मजल्याच्या दुसऱ्या भागात  त्या वित्तीय संस्थेचे कॉलसेंटर सुद्धा होते. एकदा त्यांचा दुभाषा आला नव्हता आणि पाकिस्तानातून क्रेडीट कार्डच्या चौकशीसाठी एक कॉल आला. मग तेथील एक गौरवर्णीय ललना माझ्याकडे आली आणि तिने मला तो कॉल घेण्यासाठी बोलाविले. अस्मादिक धन्य झाले! बाकी तो कॉल मात्र मी कसाबसा निभावला.
मधली काही  वर्ष रात्रपाळीशिवाय गेली. ०३-०४ साली मी फ्लोरिडात गेलो. तिथे एक मोठे प्रोजेक्ट प्रोडक्शनमध्ये  जायचं होत. त्याचं सर्व प्रकारचं परीक्षण आम्ही सहा - सात महिने करीत होतो. त्यातील शेवटचा एक महिना implementation डे (अंमलबजावणीचा दिवस) च्या दिवशी कराव्या लागणाऱ्या कृतींचा क्रम आणि त्यासाठी जबाबदार व्यक्तींची नेमणूक हे ठरविण्यात गेला. ही एकूण अंमलबजावणी ३६ - ४२ तास चालणार होती. प्रथम युरोप, मग अमेरिका आणि मग आशिया - ऑस्ट्रेलिया अशा प्रकारे ही अंमलबजावणी करण्यात येणार होती. ह्यात कोणत्याही महत्त्वाच्या क्षणी जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर आज्ञावली आणि माहितीभांडार ह्यांना कसे पूर्वपदावर आणायचे ह्याचेही नियोजन करणे आवश्यक होते. कितीही नियोजन केले तरी ही (पूर्वपदावर आणण्याची) वेळ येऊ नये ही प्रार्थना आम्ही करीत होतो. माझी नेमणूक शुक्रवारी आणि शनिवारीच्या रात्रपाळीसाठी करण्यात आली होती. थोडक्यात म्हणजे मी आघाडीचा आणि शेवटचा फलंदाज होतो.
शुक्रवार संध्याकाळ सात ते शनिवार पहाट चार अशी माझी शिफ्ट होती.  माझ्याबरोबर गॅरी होता. गॅरी तसा प्रेमळ माणूस होता. त्याच्याकडे आणि त्याच्या एका मित्राकडे विविध प्रकारच्या चॉकलेटचा मोठा साठा असे . माझ्या अमेरिकतील वास्तव्यातील प्रत्येक दिवशी तो तीन - चार चॉकलेट माझ्या आणि आम्हा काही जणांच्या डेस्कवर आणून ठेवी. आणि ही चॉकलेट न खाल्ल्यास तो नाराजी व्यक्त करी. त्यामुळे सुरुवातीला मी दररोज ती खात असे. पण नंतर कंटाळा आल्याने मी ही चॉकलेटस खणात ठेवून घरी नेऊन ठेवण्यास सुरुवात केली. घरी मोठा चॉकलेटचा डबा भरला. मला काही काळाने गॅरी तसला म्हणजे गे असल्याचे एका मित्राकडून कळाले. मला मोठा धक्का बसला. परंतु त्याचे ऑफिसातील वागणे चारचौघासारखे होते. त्यामुळे चिंता न करण्याचे आम्ही ठरविले.
आमची सुरुवात थोडी अडखळत झाली. काही सुरुवातीचे जॉब अबेंड (अयशस्वी) झाले. परंतु आम्ही त्यातील समस्या सोडवून पुढे मार्गक्रमणा सुरु ठेवली. मग IMS माहितीभांडार रूपांतरण करण्याची वेळ आली. कोट्यावधी रेकॉर्ड असलेले हे माहितीभांडार. ज्यावेळी त्याचे रूपांतरण करण्याचा क्षण येतो तेव्हा भलेभले तणावाखाली येतात. तुम्ही भले आधी कितीही परीक्षण केले असो, प्रोडक्शन ते प्रोडक्शन! तिथे डेटाच्या असंख्य शक्यता (combination) असतात. त्यातील काही जर परीक्षणात समाविष्ट झाल्या नसतील तर बोंब लागली म्हणून समजाच! अशा सगळ्या वाईट विचारांना बाजूला सारून आम्ही देवाचे नाव घेत हे जॉब सुरु करण्याची सूचना दिली. जसजसे हे जॉब व्यवस्थित धावू लागले तसतसा आमचा जीव भांड्यात पडला. हे जॉब एकूण अडीच तीन तास चालले. जॉब चालू असताना आम्ही काही फारसे करू शकणार नव्हतो.  मध्ये पिझ्झा येवून गेला. आमच्या मोठ्या डायरेक्टर बाईचे रात्री दोन वाजता  आगमन झाले. एकंदरीत काम व्यवस्थित चालल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पहाटे चारच्या सुमारास दुसऱ्या फळीचे आगमन झाले. त्यांना माहिती हस्तांतरित करून आम्ही निघालो. मला गॅरीने घरी सोडण्याची तयारी दर्शविली. काहीशा धाकधुकीतच मी त्याच्या गाडीत बसलो. त्याने सुखरूपपणे घरी सोडल्यावर मी देवाचे आभार मानले.
बाकी मग अंमलबजावणी यशस्वी झाली. सर्वत्र आमचे कौतुक वगैरे झाले.
०५ साली मी न्यू जर्सीला एका  भाड्याने कार देणाऱ्या कंपनीच्या संगणक विभागात दाखल झालो. बाकी काम तसे ठीक होते. अचानक एका निवांत संध्याकाळी विविध रेंटल स्टेशनच्या उत्पन्नाचे शहर, जिल्हा, विभाग ह्यानुसार वर्गीकरण करून माहिती साठविणारा डेटाबेस करप्ट झाल्याची चिन्हे दिसू लागली. ऑनलाईन आणि  बेच (हे नीट टाईप होत नाहीय) अशा दोन्ही प्रोसेस आचके देऊ लागल्या. हा उत्पन्न नोंद ठेवण्याचा डेटाबेस असल्याने ही नक्कीच आणीबाणीची वेळ होती. आम्ही सर्व एकत्र येऊन नक्की कोठे प्रश्न निर्माण झाला असावा ह्याचे विश्लेषण करू लागलो. अशा विश्लेषणात ही स्थिती टेस्ट रिजन मध्ये निर्माण करता येणे ही मोठी बाब असते. आमचा अमेरिकन व्यवस्थापक देखील आमच्या मागे येवून आम्ही काय करतो आहोत हे पाहू लागला. दुर्दैवाने आमचे सर्व अंदाज चुकत होते . त्या डेटाबेसमध्ये ही माहिती रात्रीच अपडेट होणे अत्यावश्यक होते. त्यामुळे घरी जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसे कंपनीचा VP सुद्धा येवून बसला. तो  मुळचा इंग्लिश. परंतु गेले वीस वर्षे अमेरिकेत ह्या कंपनीत होता. आणि सुरुवातीच्या दिवसात त्याने  ह्या आज्ञावलीवर काम केले होते. त्यामुळे तोसुद्धा आपल्या स्मरणशक्तीला ताण देऊन आम्हाला विविध प्रोग्रॅम उघडायला सांगू लागला. ह्या प्रोग्रॅमच्या ह्या पराग्राफमध्ये बघा वगैरे वगैरे. दुर्दैवाने ते ही उपयोगी पडत नव्हते. बाकी इंग्लिश आणि अमेरिकन लोकांचे संबंध सलोखा, जिव्हाळा ह्या सर्व संज्ञांना कोसभर दूर ठेवणारे. त्यामुळे आमचा व्यवस्थापक आणि हा VP ह्यांचे एकमेकाला चिमटे काढीतच होते. शेवटी मग  एक मोठा कॉल झाला आणि बेच प्रोसेस तशीच पुढे दामटवायचा निर्णय घेण्यात आला. मध्येमध्ये जॉब अबेंड करीत होता पण शेवटी आम्ही सकाळपर्यंत ती प्रोसेस संपविली.  आता डेटाबेस अधिकच भ्रष्ट झाला होता आणि  पुढील काही दिवस, आठवडे तो सुधारेपर्यंत देशभरातून येणाऱ्या चौकशीसत्राला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट होते. आणि झालेही तसेच! आणि हो रात्री अकराच्या सुमारास मागवलेला पिझ्झा खाण्याची सुद्धा फारशी इच्छा आम्हाला झाली नव्हती.
ह्याच कंपनीत रेंटल स्टेशनचे नंबर साठवणारा एक डेटाबेस होता. त्याची व्याख्या काहीशी चुकीची केली गेल्यामुळे तो एका वेळी मर्यादित नंबर साठवू ठेवू शकत असे. त्यामुळे दरवर्षी आम्ही न वापरात असलेले नंबर आणि त्यासंबंधीची माहिती उडवून टाकून तो नंबर नवीन ठिकाणच्या रेंटल स्टेशनला देत असू. हा नंबर खरोखरच वापरात नाही ह्याची खात्री करून घेण्यासाठी आम्ही खूप पाठपुरावा करीत असू. परंतु कधीतरी गोंधळ व्हायचाच! ही माहिती उडविण्याची प्रक्रिया संध्याकाळी ज्यावेळी डेटाबेस थोडी शांतता अनुभवत असेल अशा वेळी अमलात आणली जायची. अशाच एका डिसेंबर महिन्यातील थंडीच्या दिवशी आम्ही ही  प्रक्रिया संध्याकाळी सहाच्या सुमारास चालू केली. सुरुवातीला सारे काही आलबेल होते. सर्व काही नियोजनानुसार चालले होते. त्यामुळे आम्ही आठ वाजायच्या सुमारास घरी परतलो. सर्व रस्ते बर्फाच्छादित होते. पण नंतर मग अबेंड यायला सुरुवात झाली. अर्ध्या तासातच आम्हाला कळून चुकले की उडविलेल्या स्टेशनपैकी एक स्टेशन खास उपयोगातील होते. त्याचा बिसनेस काही वेगळ्या कारणासाठी उपयोग करायचे. हे उडविल्यामुळे बराच गोंधळ माजला. आम्ही आपापल्या गाड्या घेवून आठ मैलावरील ऑफिसात परतण्याचा निर्णय घेतला. शून्याखालील तापमानात रात्री दहा वाजता घराबाहेर पडणे हा नक्कीच आनंददायी अनुभव नव्हता. आणि गाडी जोरात पळविली तर जागोजागी दिसणाऱ्या पोलिसांचा धाक वाटत होता. ऑफिसात पोहोचल्यावर त्या स्टेशनला परत डेटाबेसमध्ये समाविष्ट करण्याचे उत्तर फारसे कठीण नसल्याचे जाणविले. तरीही ते उत्तर अंमलात आणण्यासाठी विविध परवानग्या घ्याव्या लागल्या. त्या परवानग्या घेवून, त्या स्टेशनला समाविष्ट करून सर्व काही आलबेल होण्याची खात्री करेपर्यंत सकाळचे चार वाजले होते. यशस्वी होवून सकाळी घरी परतण्याचा आनंद काही औरच होता. मग दुसऱ्या दिवशी हे स्टेशन उडविण्याची ज्याने परवानगी दिली होती त्याचा आमच्या व्यवस्थापकाने व्यवस्थित समाचार घेतला!
अशा ह्या काही गमती जंमती! आपणास आवडल्या असाव्यात ही आशा !

Tuesday, August 27, 2013

IT मधल्या रात्रपाळ्या - भाग १



माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र बाहेरून फार आकर्षक वाटते किंबहुना वाटायचं. परंतु त्यातही बऱ्याच वेळा घी देखा लेकीन बडगा न देखा अशी स्थिती असते.   रात्री उशिरापर्यंत थांबणे, किंवा बिकट परिस्थिती उदभवल्याने पूर्ण रात्र कार्यालयात घालविण्यास भाग पडणे असले प्रसंग वारंवार येतात. हल्ली काही सुदैवी लोकांना घरून कार्यालयाचे काम करण्याची सुविधा (?) मिळाल्याने, रात्री बेरात्री घरच्या सकट सर्वांना उठवून मग कार्यालयाचे काम करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होते.

रात्रपाळीची माझी गाठ प्रथम ९८ साली सीप्झ मध्ये Y२K प्रोजेक्टवर  काम करताना पडली. सुरुवातीला कंपनीने एकदम १०० लोकांना त्या प्रोजेक्टवर घेतले खरे परंतु सर्वांसाठी संगणक नव्हते, त्यामुळे आमच्यासारख्या सुदैवी लोकांची निवड रात्रपाळीसाठी झाली. पहिल्या काही दिवसात मेनफ्रेमची लिंक नव्हती आणि त्यामुळे आम्ही आज्ञावली मायक्रोसोफ्ट वर्ड मध्ये बदलून ठेवत असू. ह्यात काय साध्य होतंय हे फक्त आमच्या व्यवस्थापकालाच कळत असावे. परंतु त्याला आव्हान करण्याचे धारिष्ट्य आम्ही दाखविले नाही.

दुसऱ्या आठवड्यापर्यंत लिंक आली. प्रत्यक्ष मेनफ्रेमवर काम करण्याची संधी मिळतेय ह्याचा आम्हा पामरांना कोण आनंद झाला. तो काळ वेगळा होता. लोक मेनफ्रेमचा थोडाफार अभ्यास करीत, जमल्यास एखाद्या कंपनीत तीन चार महिने काम करीत आणि मग काहीसा अनुभव फुगवून दाखवून अमेरिकेला पळ काढीत. त्यामुळे आपल्या सोबत काम करणारा आपला सहकारी किती दिवस आपली सोबत करणार आहे हे समजावयास वाव नसे. लिंक आल्यावर मला मेनफ्रेममध्ये असलेल्या काही JCL / PROC चे पृथ्थकरण करून त्याची नोंद एक्सेल मध्ये करण्यास सांगण्यात आली. अशाच एका अशुभ शुक्रवारच्या रात्री (ज्या वेळी बाकी दुनिया FRIDAY NIGHT चा आनंद उपभोगत होती) मी आणि माझा सहकारी किरण, अजून पाच दहा सहकाऱ्यांसोबत दुःखी अंतकरणाने, मनात आमच्या व्यवस्थापकाचे गुणगान करीत हे पृथ्थकरण करीत होतो. त्यावेळी बहुधा एक्सेलमध्ये ऑटोसेव पर्याय (जो तुम्ही एक्सेल मध्ये उतरविलेली माहिती थोड्या थोड्या वेळाने कायमस्वरूपात उतरवितो) उपलब्ध नव्हता. रात्रीचे जेवण दहा वाजेपर्यंत आटोपले. मी माझ्या अननुभवी स्थितीमुळे अजून एकदाही उतरविलेली माहिती सेव केली नव्हती. गप्पाटप्पा आणि अधूनमधून काम असला प्रकार चालला होता. तीनच्या आसपास डोळे पेंगुळाय़ला लागले. आणि मग तो दुर्भाग्यपूर्ण  क्षण आला. मी चुकून एक्सेल बंद करण्याच्या कळीवर क्लिक केले. 'पामरा तुला तुझी गेल्या सहा तासातील धडपड कायमस्वरूपी करायची आहे का?' एक्सेलने मला विचारलं. आयुष्यात काही क्षण किंवा काळ असे येतात की ज्यावेळी आपल्या कृतीवर आपले नियंत्रण नसतं, कोणती तरी बाह्य शक्ती आपले नियंत्रण घेते. माझेही असेच झाले, किंवा सोप्या शब्दात झोपेने माझ्यावर अंमल बजावला होता त्यामुळे मी नाही म्हणून मोकळा झालो. एक्सेलने ते वर्कबुक बंद करताच माझी झोप खाडकन उतरली, आपल्या हातून काय चूक घडली हे ध्यानात आले. आता पश्चात्ताप करण्यात काही अर्थ नव्हता. बाकी आपल्या हातून मोठी चूक झाल्यास आपण पेटून उठतो आणि ती चूक निस्तरायचा प्रयत्न करतो. माझेही तसेच झाले. मी झोपेचा विचार सोडून देवून गेल्या सहा तासातील काम पुढील तीन तासात पुन्हा आटोपले.

हळूहळू काम वाढत चालले होते. आज्ञावली लिहायची, तिचे एकक परीक्षण (युनिट टेस्टिंग) करायचे हा प्रकार सुरु झाला. प्रियु आणि रमाकांत असे आमचे वरचे बॉस होते. त्यांचे १०० जणांच्या संघावर बारीक लक्ष असायचे. एखादी मूर्खपणाची चूक झाल्यास त्यातील एक अपराध्याला सर्वांसमोर ओरडे पण मग दुसरा काही वेळाने त्या चूककर्त्याची समजूत घाली. प्रियु सकाळी साडेनऊच्या सुमारास ऑफिसात येत . आणि रात्री बऱ्याच उशिरापर्यंत थांबे. सीप्झची दारे रात्री १२ वाजता बंद होत आणि सकाळी पावणे सहाच्या सुमारास उघडत.  प्रियु पावणेबारा पर्यंत ऑफिसात थांबणे हे नित्याचे असे. परंतु त्यापलीकडे ते ऑफिसात थांबले की आम्ही बेचैन होत असू! न जाणो त्यांना सीप्झच्या गेटवरून घरी जाऊ नाही दिले तर? एकदा खरोखर तसे झालेही परंतु प्रीयुंनी मग एक दोघांना फोन करून आपली (आणि आमची सुद्धा) सुटका करून घेतली. प्रियु साधारणतः अकरा वाजता सर्व फ्लोअरवर चक्कर मारीत आणि सर्वांचे स्टेटस विचारीत. सुरुवातीला असेच एकदा त्यांनी मला आणि दहा पंधरा जणांना स्टेटस विचारलं. मग ते घरी निघून गेले. त्या दिवशी पोरे टाईमपासच्या मूड मध्ये होती आणि मी ही! बहुधा प्रीयुंना घरी झोप लागत नसावी.  पहाटे चार वाजता माझा फोन खणखणला. प्रियु फोनवर होते. "आदित्य आपण कोठवर आलो आहोत?" ११ वाजल्यापासून काही केलेच नाही तर माझी काय प्रगती होणार? मी अकरा वाजताचेच स्टेटस ऐकवण्यास सुरुवात केली. दीड मिनिटातच समोरून आवाज आला, "बॉस, ये तो ग्यारा बजे का स्टेटस है, जावो अभी काम करो!" मी पूर्ण शरणागती पत्करली.

आमच्यात कलाकार लोक होतेच. त्यातील मनीषला प्रियुचा आवाज बऱ्यापैकी जमे. मग त्याने रात्री दीड दोनला पब्लिकला स्टेटस विचारणारे फोन करण्यास सुरुवात केली. अर्धेअधिक लोक त्यात फसले जात आणि मनीषला स्टेटस देत. मनीष सुद्धा त्यांना झाडून घेत असे. असेच एकदा त्याने रविकृष्णला फसविले. रवीचा संताप संताप झाला. रवीच्या दुर्दैवाने पुढील दोन तीन दिवसात खरोखर प्रियुचा फोन आला. रवीने त्यांना मनीष समजून आपला सर्व राग त्यांच्यावर काढण्यास सुरुवात केली. पुढील संभाषण आठवले की मला अजूनही जोरदार हसू येते. आधी सिंहाच्या आवेशाने संभाषण सुरु करणारा रविकृष्णा शेवटी अगदी गोगलगाय बनून गयावया करू लागला होता.

रात्री बारा वाजता चहावाला येई. त्याभोवती आम्ही एकत्र जमू आणि चहा, बिस्किटे अशा मेनूचा आनंद घेत असू. जनतेने मग गाणी संगणकावर आणून टाकली. R D बर्मनची 'पन्ना कि तमन्ना है' वगैरे गाणी वाजवली जात. ती गाणी ऐकताना मेनफ्रेमच्या हिरव्या - काळ्या स्क्रीन कडे पाहत काम करण्याचा आनंद काही औरच असे. तीन साडेतीन वाजता अमेरिकतील संघ घरी निघून जाई. मग आम्हीसुद्धा चार चार खुर्च्या एकत्र लावून साधारणतः अंधारातील जागा पाहून  झोप काढीत असू. सकाळी सहा वाजले की मी सीप्झच्या गेटकडे धाव घेई आणि रिकाम्या विरार लोकल पकडून वसईला परतत असे. कधी कधी ह्यातही धमाल येई. काहीजण (पुन्हा रविकृष्णा आलाच!) SHORT PANT वर झोपित. असेच एकदा मंडळी SHORT PANT आणि गंजी अशा वेशात निद्राधीन झाली होती . त्यावेळी सकाळी काही मुली कामानिमित्त सात वाजताच ऑफिसात आल्या. त्यांना पाहून रविकृष्णा लज्जेने चुरचुर झाला! त्या मग बाजूला गेल्यावर "तुम लोगको मेरेको उठाने को नही होता क्या?" असे म्हणत त्याने आम्हाला फैलावर घेतले!

गेले ते दिन गेले! अशाच पुढील काही आठवणी पुढच्या भागात!

Wednesday, August 21, 2013

महाविद्यालयीन आवार मुलाखत (कॅम्पस इंटरव्यू)



आयुष्यातील अनुभवांची आणि त्या अनुभवाद्वारे मनात निर्माण होणाऱ्या भावनांची विविधता अफाट असते. आयुष्यात आपण विविध प्रसंगातून जात असतो. प्रत्येक प्रसंगात विविध भूमिका असतात. काही प्रसंग आपल्या आयुष्यात परत परत येतात, आपली भूमिका मात्र बदललेली असते. अशा वेळी मन सहजच मनातील आठवणींना शोधत बऱ्याच वर्षामागे जाते. अशीच एक आठवण कॅम्पस इंटरव्यूची!
कॅम्पस इंटरव्यू हा अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील महत्वाच्या घटकापैकी एक! महत्त्वाचा कशासाठी बघायला गेले तर प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा! काहींना कौटुंबिक जबाबदारी पेलण्यासाठी लवकरात लवकर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे आवश्यक असते, काहींना आपल्या यशस्वी शैक्षणिक कारकीर्दीवर एखाद्या मोठ्या कंपनीच्या नोकरीच्या ऑफरची मोहर असणे आवश्यक वाटते. प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा! काळाप्रमाणे ह्यातसुद्धा काही बदल घडून आले आहेत. पूर्वी ह्या मुलाखती देणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये असणारी नम्रतेची भावना हल्ली काहीशी ओसरली आहे. किंवा स्वतःला आत्मविश्वासपूर्ण दाखविण्याचा जो प्रयत्न केला जातो तो करताना नम्रता झाकली जात असावी. आत्मविश्वासाचे दोन प्रकार असतात. ज्ञानी, अभ्यासपूर्ण विद्यार्थ्याचा खराखुरा आत्मविश्वास आणि ज्ञानाचे पाठबळ नसतानाचा आणलेला आत्मविश्वासाचा आव! मुलाखत घेणाऱ्याला आपल्या अनुभवाच्या जोरावर ह्या दोन प्रकारातील फरक जाणून घेणे फारसे अवघड नसते.
एकंदरीत कॅम्पस इंटरव्यू बऱ्याच स्थितीतून जातो. सुरुवात होते ती कंपनीच्या स्वतःची माहिती देणाऱ्या सत्रापासून. बऱ्याचदा ह्यासाठी पॉवरपॉईट सादरीकरण केले जाते. मायक्रोसॉफ्टचे एक्सेल गणिती लोकांसाठी, वर्ड कवी-लेखकांसाठी तर पॉवरपॉईट जादुगार लोकांसाठी आहे असे कधीकधी मला वाटून जाते. समोरील श्रोते / प्रेक्षक वर्गाला भारावून टाकण्यासाठी पॉवरपॉईटचा वापर केला जातो. कंपनीने सादर केलेली ही माहिती पाहून बरेच जण भारावून जात असले तरी 'ह्यात माझ्यासाठी काय?  (what is in  it for me? ) असा प्रश्नसुद्धा काही जणांना पडतो. ह्यानंतर मुलाखत घेणाऱ्या गटाची ओळख करून देण्यात आली. मी ह्याच विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे हे कळल्यावर विद्यार्थांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
कंपनीच्या सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाते. ह्या लेखी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी गुणांची विशिष्ट पात्रता असणे आवश्यक असते. लेखी परीक्षेत विविध विषयातील  (तांत्रिक, गणिती, बुद्धिमत्ता, भाषा) विषयातील विद्यार्थ्यांचे ज्ञान आजमावले जाते. ह्यात वेग आणि अचूकता ह्यांचे योग्य मिश्रण हा महत्त्वाचा घटक असतो.
लेखी परीक्षेनंतर त्याची तपासणी चालू असताना विद्यार्थ्यांना चार गटात विभागून त्यांना व्यवस्थापक गटांशी चर्चा करण्याची संधी देण्यात आली. ह्यात व्यावसायिक जगाविषयी अधिकाधिक माहिती मिळविण्याचे विद्यार्थांचे औत्सुक्य दिसून आले. काळानुसार विद्यार्थी अधिकाधिक धीट होत चालले आहेत हे ही जाणवले.
लेखी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सामुहिक चर्चेसाठी (group discussion) एकत्र बोलावण्यात आले. दोन्ही बाजूसाठी हा एक थोडा अधिक सावधानी बाळगण्याचा प्रसंग असतो. सहभागी होणार्याने मुद्देसूद, मोजके  बोलायला हवे आणि बोलताना दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे आणि त्यांच्या मताचा आदरही केला पाहिजे. परीक्षकाने पहिल्या काही क्षणातच आपले मत बनवता कामा नये आणि दिलेल्या कालावधीत सर्व सहभागी उमेदवारांनी दिलेल्या परीक्षण घटकावर कशी कामगिरी बजाविली ह्याचे मुद्देसूद विश्लेषण करावयास हवे. स्मरणशक्ती पणाला लागते ह्या प्रसंगात!
मध्येच काही वेळ मोकळा मिळतो. महाविद्यालयाची चक्कर मारण्याची संधी मिळते. जुन्या आठवणीना उजाळा मिळतो. प्रत्येक वर्षाचा वर्ग, प्रात्यक्षिक वर्ग, रूप बदललेले कॅन्टीन - प्रत्येकाकडे अनेक प्रसंगाचा, अनेक मित्रांच्या आठवणीचा खजाना असतो. तो धबधब्यासारखा अंगावर येतो आणि त्या ओलाव्याने मन हळवे होते. 'दिल धुंडता है फिर वही फुरसत के रात दिन' ह्या गाण्याच्या ओळी सहजच ओठावर येतात. 
माझे नशीब काहीसे कमजोर होते. माझ्या वेळचे प्रोफेसर कॉलेजात असूनही त्यांच्या आणि माझ्या वेळापत्रकाच्या न जुळण्याने  त्यांना मी भेटू शकलो नाही.
निवडप्रक्रियेत प्रत्येक पातळीत काही विद्यार्थी बाद होत होते. शेवटच्या वैयक्तिक मुलाखतीसाठीची यादी तयार झाली. एका दीर्घ दिवसाच्या अंतिम भागात आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी बजाविण्यासाठी विद्यार्थी तयार होते. टेबलच्या  त्या बाजूला बसून घालविलेले पूर्वीचे दिवस आठविले. उमेदवाराला पूर्ण संधी देवून मुलाखत घेणे ही एक कला असते. प्रत्येक प्रश्न विचारताना हा प्रश्न आपल्याला अंतिम निर्णय घेण्यासाठी कसा मदत करील ह्याचे अवधान राखणे आवश्यक असते. उमेदवाराच्या बाह्यरुपावरून, त्याच्या बोलण्यातील  आत्मविश्वासावरून आधीच आपले मत बनविणे चुकीचे असते. उमेदवार सुरुवातीलाच कठीण प्रश्नाने किंवा असाही गांगरला तर त्याला सावरण्यासाठी मदतही करावी. तो जास्तच उड्डाण करू लागला तर त्याला जमिनीवर आणावे! असो शेवटी रात्री ८ वाजता अंतिम यादी निवडण्यात आली.
अंतिम निर्णय जाहीर करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना एका कॉन्फरन्स रूम मध्ये बोलाविण्यात आले. चेहऱ्यावरील  उत्कंठेने परिसीमा गाठली होती. काही जणांनी ह्या कंपनीची स्वप्ने पाहिली होती. त्या स्वप्नपूर्तीचा / स्वप्नभंगाचा क्षण जवळ आला होता. एकेका यशस्वी उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येवू लागले. निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता. बाकीच्याचा तणाव वाढत होता. शेवटच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले गेले. दोन्ही गटातील काही विद्यार्थी डोळ्यात येऊ पाहणारे अश्रू रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. परंतु अश्रू बडे बेरहम असतात. त्यांनी काही डोळ्यांना व्यापून टाकलेच! काही आनंदी अश्रू होते, ह्या नोकरीने आपल्याला दिलेल्या आपल्या कुटुंबाला मदत करण्याच्या क्षमतेमुळे! तर काही दुःखी अश्रू होते, इतक्या उत्तम संधीच्या इतक्या जवळ येवूनसुद्धा वंचित राहिल्याने! आभारप्रदर्शनाचे दोन शब्द झाले! यशस्वी विद्यार्थी केव्हा एकदा ही बातमी आपल्या कुटुंबियांना सांगायला मिळते ह्याच्या प्रतीक्षेत होते! आणि बाकीचे दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता येणाऱ्या दुसऱ्या एका कंपनीच्या  निवडप्रक्रियेची तयारीसाठी मानसिकदृष्ट्या कसे तयार व्हावे ह्याचा विचार करू लागले होते.
जगात काही क्षणी यशस्वी होणे किती सुदैवी असते नाही का?

 

Sunday, August 18, 2013

क्षणभंगुर ते शाश्वत


१९९९ सालची गोष्ट. बऱ्याचशा Y2K प्रोजेक्टची कामे भारतीय कंपन्यांनी आटोक्यात आणली होती. Y2K प्रोजेक्टच्या निमित्ताने पारंपारिक अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवीधरांनी संगणक क्षेत्रात प्रवेश केला होता. Y2K प्रोजेक्ट मुख्यत्वे करून मेनफ्रेम क्षेत्रातील होते. आणि ह्या प्रोजेक्टद्वारे आज्ञावलीत केले गेलेले बदल अगदी प्राथमिक स्वरूपाचे होते. त्यामुळे जसजसे हे प्रोजेक्ट समाप्तीला येवू लागले तसतसे ह्या पदवीधरांच्या मनात असुरक्षिततेची भावना मूळ धरू लागली. ही प्रोजेक्ट संपल्यावर आपले काय होणार? हे भय मनात मूळ धरू लागले. आधीच आपण आपले मूळ क्षेत्र सोडले आहे आणि आता ह्या नवीन क्षेत्रात सुद्धा आपण तुलनात्मकदृष्ट्या जुन्या तंत्रज्ञानावर काम करत आहोत, त्यामुळे आपल्याला नवीन संगणकीय भाषा शिकली पाहिजे ह्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले.
मागे वळून पाहता १९९९ साली ज्यांनी जावा सारख्या भाषा शिकून स्वतःला विकसित करून घेतले त्यांचेही भले झाले आणि ज्यांनी कोबोलवर काम करत राहणे पसंत केले त्यांचेही भले झाले. फरक इतकाच की जावा शिकलेल्यांना सतत काळानुसार येणाऱ्या नवीन तंत्राशी स्वतःला विकसित करीत ठेवावे लागले ह्याउलट मेनफ्रेम मध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांना थोड्या कमी प्रमाणात हे श्रम घ्यावे लागले. हे वाचलेले श्रम मेनफ्रेम व्यावसायिकांनी त्या विशिष्ट क्षेत्रातील ज्ञान (domain knowledge) संपादन करण्यात गुंतविले. 
मेनफ्रेमच्या बाजूला काही मोठी अनुकूल बाबी आहेत. काही दशकांतील त्या त्या विशिष्ट क्षेत्रातील गुंतागुंतीचे नियम ह्या आज्ञावलीत लिहिले गेले आहेत आणि मेनफ्रेमची डेटा पृथ्थकरण करण्याची क्षमता अफाट आहे . ह्या अनुकूल बाबींच्या जोरावर मेनफ्रेम इतकी दशके टिकून राहिली आणि पुढील काही दशके सुद्धा राहणार. ह्यात लक्षात घेण्यासारखा एक मुद्दा! मेनफ्रेम काही अगदीच बदलली नाही असे नाही. नव्या युगातील ग्राहकांना जे भुरळ घालतात त्या नवीन युगातील आकर्षक GUI शी संवाद साधण्याची कला तिने साध्य केली. मेनफ्रेमची खासियत तिचा गाभा आणि त्यातील अफाट वेगाने महाकाय माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता! तिचा तिने पुरेपूर वापर करत आपले अस्तित्व टिकवून धरलय.
आज हे सर्व आठविण्याचे कारण काय तर रविवारी सायंकाळी लॉक झालेला IPAD परत सुरु करण्यासाठी केलेली आणि whatsapp भ्रमणध्वनीवर कार्यरत करण्यासाठी केलेली धडपड.
असो आपल्या पारंपारिक संस्कृतीचे आणि आधुनिक संस्कृतीचे सुद्धा काहीसे असेच आहे ना! पारंपारिक संस्कृतीचा गाभा अगदी मुल्याधिष्ठित परंतु दर्शनी रूप मात्र काहीसे अनाकर्षक आणि कर्मठ! तो बहुमुल्य गाभा कायम ठेवून नव्या पिढीशी सुसंवाद साधणारा दुवा शोधणे आवश्यक आहे असे तुम्हाला सुद्धा नाही वाटत? 
 

Friday, August 16, 2013

तपोवन - भाग ११



राजा प्रद्द्युत आणि राणी आश्लेषा ह्यांच्या राजमाता शर्मिष्ठा व मंडळीबरोबरच्या फिस्कटलेल्या बैठकीची खबर लगोलग शत्रुघ्नच्या वर्तुळात पोहोचली होती. शत्रुघ्नच्या आनंदाला सीमा राहिली नव्हती. भावनांची तीव्रता जोरात असतानाच त्यांचा  भडका उडवावा असे त्याचे कुटील मन त्याला वारंवार सांगू लागले. कुटील मनाचे सांगणे ऐकत शत्रुघ्न आपल्या पथकाबरोबर राजा प्रद्द्युतच्या नगरीकडे निघाला. मनातील विचार कुटीलतेच्या विविध पातळ्या गाठत होते. राजमातेच्या नकाराची राणी आश्लेषानी वैयक्तिक अपमान म्हणून समजूत  करून घेतली असेल हे तो पुरेपूर जाणत होता. दोन स्त्रियांच्या मनातील ईर्षा कोणत्या कारणावरून निर्माण होऊ शकते ह्याचा ठाव घेणे अशक्य आहे हे तो पुरेपूर जाणून होता.
शत्रुघ्नच्या आगमनाने राजा प्रद्द्युत फारसा काही आनंदला नाही. शत्रुघ्नच्या कुटील कारस्थानाचा त्याला हल्ली काहीसा उबग येवू लागला होता. एकंदरीत ह्या सर्व राज्यविस्ताराच्या मोहापासून दूर राहावे अशी त्याची भूमिका होवू लागली होती. अशा मनोवस्थेतच तो शत्रुघ्नबरोबरच्या बैठकीसाठी स्थानापन्न झाला. शत्रुघ्नने सिद्धार्थच्या रणसज्जतेविषयी इत्यंभूत अहवाल सादर केला. सिद्धार्थला पूर्ण सैन्याला युद्धासाठी सज्ज करण्यासाठी किमान एका सप्ताहाचा अवधी लागेल असे त्याचे म्हणणे होते. ह्या अवधीतच सिद्धार्थच्या साम्राज्यावर जोरदार हल्ला करून ते नामशेष करावे असा त्याचा प्रस्ताव होता. राजा प्रद्द्युतची सद्सदविवेक बुद्धी ह्या विचाराला साथ द्यायच्या विरुद्ध होती. ज्या युवराजाचा आताच आपण पाहुणचार स्वीकारून आलो त्याच्याच साम्राज्यावर इतक्या लगेच आक्रमण करावे हे त्यांना अजिबात पटत नव्हते. परंतु शत्रुघ्नाला शब्द तर ते देवून बसले होते आणि कोणत्याही योग्य कारणाशिवाय आपला शब्द फिरवणे योग्य नव्हते. राजा प्रद्द्युतनी सर्व अटींची उजळणी करण्यास शत्रुघ्नाला सांगितले. आपल्या विचारांना काही वेळ द्यावा हाच हेतू त्यामध्ये होता. शत्रुघ्नने सुरुवात केली. त्याच्या बोलण्याकडे प्रद्द्युतचे फारसे लक्ष नव्हतेच. "सिद्धार्थच्या साम्राज्याचा पाडाव करण्यात यश आल्यास त्यातील अर्धे  साम्राज्य राजा प्रद्द्युतच्या राज्यात सामील करण्यात येईल", शत्रुघ्नच्या ह्या वाक्याने मात्र प्रद्द्युत खडबडून जागे झाले.   " मी तर तीन  चतुर्थांश साम्राज्याच्या बोलीवर ह्या योजनेत सामील झालो होतो" राजा प्रद्द्युत ह्यांच्या आवाजातील राग अगदी स्पष्ट प्रकट झाला होता. "वा राजे! सर्व योजना आखायची आम्ही! सर्वांना एकत्र आणायचे आम्ही! आणि मोठा वाटा मात्र तुम्हाला!" शत्रुघ्नचे कुटील रूप आता उघड झाले होते. शब्दाने मग शब्द वाढत गेला. बैठक फिस्कटणार अशीच लक्षणे दिसू लागली होती.
लगोलग ही खबर राणी आश्लेषाच्या दालनापर्यंत जावून पोहोचली. लगबगीने त्या बैठकीत येवून पोहोचल्या. त्यांच्या आगमनाने राजा प्रद्द्युत प्रचंड नाराज झाला तर शत्रुघ्न अत्यंत आनंदी! आपला अंदाज अगदी बरोबर ठरला ह्याचा त्याला मनोमन आनंद झाला. राणी आश्लेषानी प्रथम दोघांची अशा बैठकीतील स्वतःच्या आगमनाबद्दल माफी मागितली. मग त्यांनी एकंदरीत विसंवादाचे कारण जाणून घेतले. त्यांचाही थोडा संताप झालाच, शत्रुघ्नच्या कुटील बुद्धीने! परंतु राजमाता शर्मिष्ठाची मुद्रा डोळ्यासमोर येताच त्यांच्या मनातील संभ्रम दूर झाला. "आम्हाला तुमच्या सुधारित अटी मान्य आहेत", राणी आश्लेषा ह्यांच्या उद्गारांनी राजा प्रद्द्युत ह्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी तत्काळ क्रुद्ध मुद्रेने बैठकीतून प्रस्थान केले. त्यांचा राग कसा दूर करायचा हे राणी आश्लेषा बरोबर जाणून होत्या. सध्यातरी त्यांनी मुख्य मुद्द्यावर लक्ष केंद्रित करायचे असे ठरविले. सेनापतींना बैठकीत पाचारण करण्यात आले. बैठक पुढील तीन - चार तास सुरु होती. बैठक संपल्यावर ज्यावेळी शत्रुघ्न बाहेर पडला त्यावेळी तो अत्यंत खुश झाला होता. दोन दिवसातच सिद्धार्थच्या साम्राज्यावर आक्रमणाची योजना अगदी सूक्ष्म तपशिलासहित तयार होती.
सिद्धार्थ, राजमाता, सेनापती, प्रधान ह्यांचीही बैठक सुरु होती. महर्षी अगस्त्य सुद्धा राजमहाली आले होते.  शत्रू नक्कीच प्रबळ होता. आणि हेरांनी आणलेली शत्रुघ्नच्या भेटीच्या बातमीचा अर्थ स्पष्ट होता. आक्रमण अगदी उंबरठ्यावर येवून ठाकले होते. थेट मुकाबला करता करता शत्रूच्या रणनीतीची आतल्या गोटातून बातमी काढणे गरजेचे होते. आणि त्यासाठी कुशल हेरांची आवश्यकता होती. अंशुमत ह्याच्या कारकिर्दीत सैन्यबळ इतके प्रबळ होते की हेरखात्याकडे तसे म्हणावे तर दुर्लक्षच झाले होते. आता वेळ कमी होता. सिद्धार्थने निर्णय जाहीर केला. सर्व सामर्थ्यानिशी शत्रूशी मुकाबला करण्याचा! "मी स्वतः आघाडीच्या तुकडीत सामील असणार!" त्याच्या ह्या उद्गाराने प्रत्यक्ष अंशुमत महाराज समोर ठाकले आहेत असा केवळ शर्मिष्ठा ह्यांना नव्हे तर सर्वांनाच भास झाला.
सिद्धार्थला आशीर्वाद देवून आणि राजमाता शर्मिष्ठेला धीर देवून महर्षी अगस्त्य आश्रमाकडे निघाले. त्यांच्या मनात विचारांचे वादळ सुरु होते. तपोवनात शिरताच सीमंतिनीचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांची काहीशी चिंतीत मुद्रा पाहून ती काळजीत पडली. काही वेळाने ती महर्षीच्या कुटीत शिरली. तिला पाहून महर्षीनी स्मित हास्य केले. महर्षीनी तिला सर्व हकीकत सविस्तर सांगितली. आपल्या मनीच्या राजकुमारावर आलेला हा कठीण प्रसंग ऐकून महर्षी पुढे काय बोलत आहेत ह्यावरील सीमंतिनीचे चित्त उडाले. "सिद्धार्थला कुशल हेरांची गरज आहे" हे एकच वाक्य तिच्या कानात सतत रेंगाळत होते.
निशादेवतेने आश्रमावर आपले पांघरुण पसरविले होते. सुरक्षासेवकांनी सुद्धा एकंदरीत परिस्थिती पाहून निद्राधीन होणे पसंद केले होते. आणि अशा ह्या थंड वातावरणात हळूच एक युवक कोणी पाहत नाही ह्याची खात्री करून घेत बाहेर पडला. अश्वशालेतील एका घोड्याला मोकळे करून त्याने त्या घोड्यावर मांड ठोकली. तो काही फारसा कुशल दिसत नव्हता. पहिल्यादा अडखळला सुद्धा परंतु शेवटी एकदाचा घोड्यावर बसून त्याने घोड्याला भरधाव वेगाने आश्रमाबाहेर पिटाळले. सुरक्षासेवकांची झोप इतकी गाढ होती की हा घोड्यांच्या टापांचा आवाज आपल्या स्वप्नातील असावा अशी त्यांनी स्वतःची समजूत करून घेतली व ते परत निद्राधीन झाले. 

Tuesday, August 13, 2013

कांदा, पेट्रोल, चेन्नई एक्स्प्रेस आणि टक्केवारी!


भारताची लोकसंख्या १०० कोटीच्या वर! गणिती आकडेवारीसाठी १०० कोटी पकडूयात! ज्यावरून बराच हलकल्लोळ माजला ते भारतीय नागरिकाचे उत्पन्न आणि त्या अनुषंगाने भारतीय नागरिक जीवनावश्यक गोष्टीवर करणारा सरासरी दैनिक खर्च १०० रुपये मानूयात! म्हणजे आपल्या देशात सरासरी दिवसाला दहा हजार कोटी रुपये जीवनावश्यक गोष्टीवर खर्च होतात असे ढोबळमानाने गृहीतक आपण करू शकतो! आता ह्या खर्चात जरी १ टक्के फेरफार केला तरी १०० कोटी दिवसाला मधले दलाल कमवू शकतात. आता ह्या फेरफार करण्याच्या संधी कोणत्या ते पाहूयात!

१ > कांदा, बटाटा आणि टोमाटो ह्या भारतीय स्वयंपाकघरातील अत्यावश्यक गोष्टी! ह्या तिन्ही गोष्टींचा भाव वर्षातून एकदा - दोनदा गगनाला भिडतो. कारण मग काहीही असते, पाऊस कमी पडला, जास्त पडला कोणतीही परिस्थिती असो भाव चढतो! ह्यातील खरी भाववाढ किती आणि फुगवलेली किती हे फक्त ह्या विषयातील तज्ञलोकच सांगू शकतात!
२> त्याच प्रमाणे पेट्रोलचे! पेट्रोलचा दर महिन्याला १ - २ रुपये वाढत असतो. अशा चार पाच दरवाढीनंतर एकदा तो खाली आणला जातो. ह्या सर्व प्रकारात पारदर्शकता नाहीच!
३> सुखवस्तू भारतीय मध्यमवर्ग, साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कुटुंबासमवेत बाहेर पडतो. ह्यातील मुख्य हेतू, नेहमीच्या कंटाळवाण्या जीवनापासून मुक्तता हा असतो. ही मानसिकता लक्षात घेऊन चित्रपटाच्या तिकिटाचे दर, रिसोर्टचे दर साप्ताहिक सुट्टीच्या वाढविले जातात आणि आपण बिनबोभाट हे चढे दर भरतो!ह्यात सुद्धा साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी किती प्रेक्षक वैचारिक चित्रपट पाहणे पसंत करतात आणि किती प्रेक्षक चकचकीत, वेळकाढू, डोक्याला त्रास न देणारे चित्रपट पाहतात ह्याचीही टक्केवारी आहेच!

ह्या सर्व प्रकरणात कमावला जाणारा नफा हा विविध गटात वाटला जातो. हे गट कोणते हे आपण सर्व जाणून आहोत. हे सर्व प्रकार मध्यमवर्गीय माणसाला समजत असतात परंतु त्याविरुद्ध लढा देण्यासाठी आपणाकडे वेळ नसतो! सुशिक्षित मध्यमवर्गीयाला विचार करण्यासाठी वेळ मिळणार नाही ह्यासाठी त्याचा प्रवास दमछाक करणारा असेल, दूरदर्शनवर सतत त्याची बुद्धी भ्रष्ट करणारे कार्यक्रम चालू असतील ह्याची काळजी घेतली जाते.
ह्यावर बँक खात्यातील रकमेकडे पाहून खुश होणारा मध्यमवर्ग काही करू शकत नाही. फार तर आपण एक वेळ कांदा कमी वापरू किंवा फारच संताप आला तर बेस्ट बसच्या रांगेत उभे राहू!

Saturday, August 10, 2013

चेन्नई एक्स्प्रेस - एक सुंदर रंगरंगोटी!


दुनियादारी चित्रपट न बघता चेन्नई एक्स्प्रेस बघण्याचा निर्णय माझा! बायको शाहरुकची चाहती असताना त्याचा चित्रपट रिलीज झाल्याच्या पहिल्या साप्ताहिक सुट्टीत बघण्याची संधी तिला मिळावी असा समजूतदारपणा मी दाखवला. काही काळ समजूतदारपणाचा असतो. त्यात असे काही निर्णय घेणे चांगले असते!
असो काही मुद्दे!
१> 'सकस कथेचा चित्रपट' असे आपल्याला हल्ली फार क्वचित बोलण्याची संधी मिळते. चेन्नई एक्स्प्रेसने सुद्धा ही संधी दिली नाही. बहुतांशी प्रेक्षकांना गंभीर कथानक झेपत नाही.  त्यामुळे 'खपते ते विकते'  ह्या न्यायाने असेच चित्रपट बनतात.  बाकी कथानकाच्या बाबतीत पूर्ण आनंदी आनंद असणार ही अपेक्षा ठेवून गेलो होतो त्यामुळे अपेक्षापूर्ती झाली.
२> चेन्नईच्या बाजूला इतका हिरवागार प्रदेश आहे हे पाहून मला खूप बरे वाटले. ह्या आधी केवळ केरळच इतका हिरवागार आहे असे मला वाटे. बाकी मग सर्व रंगांना समान संधी मिळाली. लाल पिवळ्या रंगांनी तर कमालच केली. मी पाचवीत प्रथम रंग हाती आल्यावर असेच बेसुमार रंग वापरीत असे त्याची आठवण झाली. सामनावीर पुरस्कार द्यावा तर तो ह्या रंगांना किंवा दिपिकेच्या अभिनयाला!  सुंदर निसर्गदृश्य दाखवावीत आणि प्रेक्षकाचे लक्ष अधून मधून विचलित करावे!
३> आधीच्या यशस्वी चित्रपटातील गाण्याचे ध्रुवपद / संवाद कधीही कोणीही कुठेही वापरावे आणि वेळ भरावा ही प्रथा आता राजमान्य झाली आहे. आपल्या कल्पनादारिद्र्याचे हे धिंडवडे आहेत. मध्यंतरानंतर एक बुटका माणूस शाहरुकला जंगलात भेटतो. आणि पाच मिनटे वेळ काढतो. त्या पाच मिनिटाचा कथानकाशी असणारा संबंध शोधण्यासाठी मी पुढील काही वर्षे खर्ची घालणार आहे.
४> दीपिका पदुकोण अगदी सुंदर दिसते आणि ह्या चित्रपटात सुद्धा एकदम मस्त दिसली आहे. दिसण्यापेक्षा तिचा अभिनय अगदी सहजसुंदर आणि पडद्यावर आपले अस्तित्व कसे प्रभावी बनवावे ह्याची तिला असलेली नैसर्गिक जाण अगदी वाखाणण्याजोगी! संवादफेक सुंदरच 
५> आता वळूयात ते नायकाकडे! चित्रपटात वास्तववादी होण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शाहरुख सुरुवातीलाच आपण चाळीशीचे असल्याचे स्पष्ट करतो आणि पन्नासीचे वाटत असू असा संशयही व्यक्त करतो. पूर्वीच्या जमान्यात राजेंद्रकुमार अथवा भारतभूषण वगैरे पन्नासीचे झाले तरी नायकाच्या भूमिका करीत. आपण त्या काळाकडे परत चाललो आहोत. जुने ते सोने हेच खरे!
६> शाहरुख हल्ली खूप तब्येतीने हटला आहे आणि त्याला अनुसरून तो चित्रपटातील बराचसा भाग खलनायक आणि त्यांच्या तथाकथित विनोदी टोळीला घाबरून राहतो. परंतु चित्रपटाच्या शेवटी हा वास्तववादी होण्याचा प्रयत्न सोडून दिला जातो आणि शाहरुख अवास्तव मारामारी करतो. परंतु शाहरुखला एक अनाहूत सल्ला! तुझी ती हटलेली तब्येत बघवत नाही रे बाबा!
  ७ > चाळीशीचा नायक आणि विशीतील नायिका हा प्रकार तसा चित्रपटात नवा नाही. परंतु हल्लीचा प्रेक्षक ह्या प्रकारात त्या प्रेमी युगुलाशी कनेक्ट होत नाही त्या युगुलाच्या अडचणीशी आणि भावनांशी समरूप होत नाही आणि मग चित्रपटाच्या यशाला मर्यादा येतात आणि हा नायिकेवर अन्याय आहे. परंतु आपण हल्ली brand ह्या संकल्पनेच्या सरसकट मागे लागलो आहोत आणि खेळ म्हणा की चित्रपट म्हणा आपल्याकडे वेळीच निवृत्त होण्याचे मनाचे मोठेपण मात्तबर लोकांकडे नाही.
मी हल्ली ब्लॉगच्या static hit count कडे (dynamic views नाही) लक्ष ठेवून असतो. एका ब्लॉगला सव्वाशेच्या आसपास हिट्स मिळतात. हिट्सकडे लक्ष ठेवून ब्लॉग लिहिणे जसे चुकीचे तसे शंभर कोटीचा गल्ला गोळा करण्याचे लक्ष समोर ठेवून चित्रपट बनविणे हे ही चुकीचे! सृजनशीलता संपून काहीसे यांत्रिकीकरण येते!
 आयुष्यात काही दुःख दीर्घकाळ टिकतात! बायको शाहरुखची चाहती असणे हे असेच दुःख! बघूया शाहरुख निवृत्त व्हायचे कधी मनावर घेतो ते नाहीतर अजून २० वर्षानंतर सुद्धा मी असाच ब्लॉग लिहित असीन!
 

Monday, August 5, 2013

नामवंत, सचिन आणि राज्यसभा


दोन भिन्न गोष्टींची जाणते / अजाणतेपणी गल्लत करण्यात हल्लीचा समाज  चांगले सातत्य दाखवत आहे. एखाद्या गोष्टीचा मूळ हेतू कोणता ह्याविषयी सद्सदविवेकबुद्धीने विचार करायचे ठरविल्यास समाजात हल्ली घडत असलेल्या बऱ्याच गोष्टी चुकीच्या वाटतात.
राज्यसभेत कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नामवंतांना राज्यसभेवर पाठविण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह! ह्या सभागृहात होणाऱ्या चर्चेत, घेतल्या जाणाऱ्या निर्णयात कला, क्रीडा क्षेत्रातील लोकांचे योगदान असावे हा ह्या प्रथेमागचा मूळ हेतू! हे साध्य होण्यासाठी ह्या नामवंतांनी पूर्वअभ्यास करून ह्या सभागृहातील चर्चेत भाग घ्यावा ही अपेक्षा. ही अपेक्षा एकतर साध्य होताना दिसत नाही किंवा साध्य होत असल्यास त्याला प्रसिद्धी दिली जात नाही.
काल सचिनच्या राज्यसभेतील उपस्थितीची बातमी सगळीकडे झळकली. सचिन प्रसिद्धी माध्यमांना सामोरे कसे जावे ह्यासाठी एखाद्या तज्ञाचा सल्ला घेत असावा अशी माझी अटकळ. त्यामुळे एकंदरीत सचिनचा लुक वगैरे अधिकाधिक तरुण दिसावा ह्यासाठी घेण्यात येणारी धडपड नक्की जाणवते. परंतु राज्यसभेचा खासदार म्हणून विचारांची प्रगल्भता, अभ्यासवृत्ती त्याने दाखवावी ही माझी आणि अनेक क्रीडारसिकांची अपेक्षा. जगप्रसिद्ध खेळाडू आणि राज्यसभेचा खासदार ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी. एक जगप्रसिद्ध खेळाडू राज्यसभेत आला म्हणून बाकीच्या जेष्ठ खासदारांनी आपले लक्ष त्याच्यावर केंद्रित करावे हे चुकीचे! बाकी केवळ सचिनलाच लक्ष्य करण्यात अर्थ नाही, रेखा, जया आणि हेमा ह्यांच्या कामगिरीबाबतही अजून काही 'अभ्यासपूर्ण विश्लेषण' वगैरे काही वाचायला मिळाले नाही.
 

Sunday, August 4, 2013

आमच्या बँचचे स्नेहसंमेलन



आम्ही दहावी ८८ साली उत्तीर्ण झालो. जीवनभर साथ देणाऱ्या शालेय जीवनातील आठवणी घेऊन आम्ही सर्व वेगवेगळ्या दिशेने बाह्य जगतात विखुरलो. पुढील काही वर्षे आम्ही जगाला आणि जगाने आम्हाला आजमावण्यात गेली. ह्या वयात आयुष्यात पुढे काय करायच ह्याविषयी जसे सर्वजण अनिश्चितता अनुभवतात तशी आम्ही सुद्धा अनुभवली. अनिश्चितता अनेक बाबतीत होती, आपल्या शैक्षणिक क्षमतेचा व्यावहारिक यशाशी असलेला अनोन्यसंबंध कसा असेल, जीवनसाथी कसा असेल आणि आयुष्याच्या वाटेवर त्याची / तिची कधी भेट होईल, पालकांच्या सुरक्षित कवचाखाली आयुष्य जगण्यापासून ते आयुष्यातील अधिकाधिक जबाबदाऱ्या अंगावर येवून पडण्यापर्यंतची अनेक स्थित्यंतरे ह्या काळात घडली.
रंगीला मधला मुन्ना आठवा! आवडणारी मुलगी भेटल्यावर  'लाईफ में सेटल होने का' हे ध्येय त्याने समोर ठेवले होते. आता लाईफ मध्ये स्थिरावण्याच्या होण्याच्या प्रत्येकाच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. आणि नोकरी व्यवसायात स्थिरावून होऊन लग्न करायचे की लग्न करून नोकरी व्यवसायात स्थिरावयाचे हा अजून एक प्रश्न!
असो शालेय जीवनानंतर साधारणतः पंधरा वर्षाचा काळ ओसरला. प्रत्येकजण स्थिरावण्याच्या विविध पातळीवर होते. आमच्यातील विशाल पाटीलला साधारणतः १९९८ सालापासून स्नेहसंमेलन भरविण्याचे वेध लागले होते. एक मधल्या काळात प्रयत्न झालाही परंतु त्या वेळी सोशल मीडिया इतकी प्रभावी नव्हती आणि मुलांनी चांगला प्रतिसाद दिला नाही. मधली काही वर्षे गेली. माझ्यासह बरेच जण परदेशी जाऊन आले. २००७ साल उजाडलं. मी दोन वर्षाच्या अमेरिकेच्या वास्तव्यानंतर परतलो होतो. आपली वसई काहीशी अनोळखी वाटू लागली होती. इमारती उभ्या राहू लागल्या होत्या आणि बरीच नवीन माणसे दिसू लागली होती. अशा वेळी शाळेचे मित्र भेटल्यावर खूप बरे वाटायचे, मग एकदा मी राकेशला आपण विशालच्या मानसाला सर्वांनी साथ देवूयात असे सुचविले. राकेशने ते मनावर घेतले. विशालला ही बातमी कळताच दुसऱ्या दिवशी सकाळी गडी माझ्या घरी दाखल झाला. त्याने अ आणि ब वर्गातील जवळजवळ शंभर जणांची नावे लिहून आणली होती. त्याच्याबरोबर राकेशही आला. साधारणतः ०७ च्या नोव्हेंबर महिन्यातील गोष्ट. स्नेहसंमेलन करायचे हे तर नक्की झाले होते परंतु तारखेच्या बाबतीत थोडा गोंधळ होत होता म्हणजे एकमत होत नव्हते. नाताळचा आठवड्यातील तारीख घ्यावी असा विचार सुरुवातीला मांडला गेला परंतु वसईत त्या आठवड्यात कला क्रीडा महोत्सवाचा माहोल असतो, शाळा एकत्र भेटण्यासाठी उपलब्ध नसते आणि काहीजण फिरायला बाहेर गेलेले असतात. त्यामुळे हा विचार मागे पडला. आणि मग पुढे आली ती २६ जानेवारीची तारीख. दरवर्षी सर्वांना ह्या दिवशी सुट्टी असणार तर मग हीच तारीख पक्की करावी हा विचार पुढे आला आणि पक्का झालाही.
एकदा तारीख पक्की झाल्यावर मात्र सर्वांनी कंबर कसली! प्रथम शाळेत जाऊन २० वर्षे पूर्वीचा हजेरीपट काढण्यात आला आणि त्यातील सर्वांची नावे घेण्यात आली. विशालच्या यादीशी ती बऱ्याच प्रमाणात मिळतीजुळती निघाली. एव्हाना ह्या उत्साहात हेमंत राजगोर, योगेश कोठावळे, दीपक कदम, अनिल जाधव, राकेश, वैभव आणि अजून काही मंडळी सामील झाली. मग सुरु झालं ते सर्वांना संपर्क करण्याचे अभियान! मुलांना शोधणे तसे सोपे होते. आम्ही बरेचजण पूर्वापार वसईत वास्तव्य करीत असलेल्या कुटुंबातील ! त्यामुळे मुले जरी नोकरीधंद्यानिमित्त बाहेर जाऊन राहिली तरी त्यांचे पालक वसईतच होते. विशाल आणि कंपूने ह्या सर्वांच्या घरी जाऊन २६ जानेवारीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. मुलींच्या बाबतीत थोडी वेगळी गोष्ट होती. लग्न होवून त्या बाहेरगावी, परदेशी गेल्या होत्या. त्यांच्या पालकाकडे जावून हे पत्ते गोळा करायचे आणि मग त्यांच्या सासरी संपर्क करायचा ही कामगिरी सुद्धा कंपूने पार पाडली.
शाळेचा वाचनालयाचा हॉल वापरण्याची आम्ही परवानगी वायंगणकर सरांकडून घेतली. एव्हाना मुलीसुद्धा ह्या तयारीत सामील झाल्या होत्या. मग कार्यक्रमाची रूपरेषा, अल्पोपहाराचा मेनू ह्याची आखणी करण्यात आली. स्वागत समिती सुद्धा नेमण्यात आली. बघता बघता २६ जानेवारीचा दिवस उजाडला. दुपारी ३ वाजताचे सर्वांना आमंत्रण होते. संयोजक  समिती आदल्या दिवसापासूनच तयारीत होती. हॉलमध्ये खुर्च्यांची मांडणी करण्यात आली. ध्वनीयोजनेची व्यवस्था करण्यात आली. राकेशने आपल्या कलात्मक हस्ताक्षरात स्वागतफलक सजविला. संयोजक समिती २ वाजल्यापासूनच शाळेत हजर होती. प्रतिसाद कसा मिळेल ह्याविषयी मनात धाकधूक होतीच. हळूहळू मुले जमा होवू लागली. काही चेहरे बदलले होते तर काही बऱ्यापैकी जसेच्या तसे! सर्वांनाच बाकीच्या शालेय साथीदारांना ओळखता येत नव्हते. साडेतीनच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली. बघता बघता सुमारे ६५ जण जमले होते. विशाल आणि साथीदारांचा हा मोठा विजय होता. स्वागतकक्षात प्रत्येकाचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहून घेतले जात होते. कार्यक्रमाची सुरुवात थोडी भावूक झाली. गेल्या काही वर्षात आमच्या काही साथीदारांनी ह्या जगाचा अकाली निरोप घेतला होता. आमच्यासाठी हा मोठा धक्का होता. आमच्या त्या साथीदारांच्या आठवणी आमच्या डोळ्यासमोर तरळून गेल्या. त्यानंतर प्रत्येकाने आपला परिचय आणि गेल्या २० वर्षातील आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचा आढावा घेतला. श्रोतेवर्गातून मार्मिक टिपण्णी चालू होती. विशालचे आभार मानण्यात आले. तीन चार तास बघता बघता निघून गेले. अल्पोपहार, समूह फोटो घेण्यात आले. शाळेतून पाय निघता निघत नव्हता. सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला तो संपर्कात राहण्याचे आश्वासन देवूनच!
कंपूचा उत्साह कायम होता. कार्यक्रमाची सीडी बनविण्यात आली. सर्वांच्या पत्त्यांची आणि भ्रमणध्वनीची एक्सेलशिट बनविण्यात आली.  त्यात वाढदिवससुद्धा सामील करण्यात आले. ही यादी सर्वाबरोबर शेयर करण्यात आली. कंपूने पुढाकार घेवून SMS सेवा नोंदवली. वाढदिवसाला सर्वांना संदेश पाठविले जावू लागले. मार्चच्या सुमारास कंपूच्या डोक्यात अजून एक किडा वळवळला. रविवार सकाळ क्रिकेट क्लबची स्थापना करण्यात आली. वसईच्या सुरुच्या बागेतील समुद्रकिनाऱ्यावर रविवारी सकाळी क्रिकेट खेळले जावू लागले. १२ - १५ जणांची उपस्थिती होवू लागली. मग अजून एक उपक्रम निघाला. शाळेसाठी मदत निधी गोळा करण्याचे ठरले. कंपू सक्रीय होताच. पुन्हा सर्वांशी संपर्क साधण्यात आला. बर्यापैकी चांगला निधी गोळा करण्यात यश मिळाले.
हल्ली आठवडा, महिने ज्या वेगाने निघून जातात त्याचा काही ताळमेळच नसतो. बघता बघता नोवेंबर उजाडला. कंपूचा उत्साह कायमच होता. आता ज्यांनी आपल्याला घडविले त्या शिक्षकांची भेट घ्यावी असा विचार पुढे आला. आदल्या वर्षी जी मेहनत कंपूने सहाध्यायीशी संपर्क गोळा करण्यात घेतली होती तितकीच ह्यावर्षी शिक्षकांशी संपर्क साधण्यासाठी घेतली. हा कार्यक्रम एकदम दृष्ट लागण्याजोगा झाला. सर्व जण एकदम खुशीत होते. अनुपने एक योग्य निरीक्षण नोंदवले. आता आपण साध्य करण्यासारखे काहीच ठेवले नाही.
आता उत्साह ओसरला आहे. २०१० - १३ ही पुढील चार वर्षे नित्यनेमाने २६ तारखेला आम्ही भेटलो. येणाऱ्यांची संख्या काही प्रमाणत घटली. ह्यात एक नियम आहे. कोणालाही फोन केला जात नाही, फक्त एक स्मरणाचे ई मेल पाठविले जाते. तरीही ह्या वर्षी २६ जानेवारीला १६ जण जमले. आता कंपूने क्रिकेटवेड  शाळेच्या इतर बँचपर्यंत पोहचविले. गेली दोन वर्षे शाळेच्या माजी बँचची बॉक्स क्रिकेटची स्पर्धा भरविली जाते.
गेल्याच आठवड्यात अमेरिकेतून सुट्टीवर आलेली नंदा आणि फ्रान्सवरून सुट्टीवर आलेला सुनील भेटले. आम्ही सुट्टीवर असताना आपण भेटत नाहीत अशी तक्रार त्यांनी केली. कंपू जागा झाला. चार दिवसात थोडीफार फोनाफोनी झाली. संपर्कयादीतील बरेचसे नंबर बदलले गेले होते. तरीही काल शनिवारी संध्याकाळी पाच वाजता शाळेच्या दहावीच्या वर्गात आम्ही जमलो तेव्हा वीस बावीस जण आले. अमेरिकेची नंदा, दुबईचा आदित्य महाडिक, फ्रान्सचा सुनील, ठाण्याहून अनघा, वैशाली, सुहास, पुण्याहून अनुप, बोरिवलीहून वैशाली, पार्ल्याहून तेजस्विनी, जुहूवरून प्रतीक्षा आले. गावातील मी, राकेश, रुपेश, राजेश, अरुण, वैभव बाबरेकर, दीपक, योगेश, संजय पाटील, सुजित, शिल्पा, पल्लवी, समिधा आले. हेमंत राजगोर, मेधा, अनिल, विशाल  हे काही कामानिम्मित येऊ शकले नाहीत. योगेशने झटपट अल्पोपहाराची सोय केली. पाच ते आठ गप्पा रंगल्या. फ्रान्स, अमेरिका, दुबईतील जीवन ते आपल्या देशातील बदलत्या जीवनशैलीची चर्चा झाली. एकीकडे बोलणे चालू होते आणि दुसरीकडे मनाच्या एका कोपऱ्यात दडल्या गेलेल्या आयुष्यातील अविस्मरणीय कालावधीच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या होत्या. दहावीत असताना कोणत्या बाकावर कोण बसायचे ह्याची चर्चाही झाली. छायाचित्र काढली गेली. एकमेकांचा निरोप घेताना एका नव्या उत्साहाचे वारे कंपूच्या अंगात शिरले!