माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र बाहेरून फार आकर्षक वाटते किंबहुना वाटायचं. परंतु त्यातही बऱ्याच वेळा घी देखा लेकीन बडगा न देखा अशी स्थिती असते. रात्री उशिरापर्यंत थांबणे, किंवा बिकट परिस्थिती उदभवल्याने पूर्ण रात्र कार्यालयात घालविण्यास भाग पडणे असले प्रसंग वारंवार येतात. हल्ली काही सुदैवी लोकांना घरून कार्यालयाचे काम करण्याची सुविधा (?) मिळाल्याने, रात्री बेरात्री घरच्या सकट सर्वांना उठवून मग कार्यालयाचे काम करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होते.
रात्रपाळीची माझी गाठ प्रथम ९८ साली सीप्झ मध्ये Y२K प्रोजेक्टवर काम करताना पडली. सुरुवातीला कंपनीने एकदम १०० लोकांना त्या प्रोजेक्टवर घेतले खरे परंतु सर्वांसाठी संगणक नव्हते, त्यामुळे आमच्यासारख्या सुदैवी लोकांची निवड रात्रपाळीसाठी झाली. पहिल्या काही दिवसात मेनफ्रेमची लिंक नव्हती आणि त्यामुळे आम्ही आज्ञावली मायक्रोसोफ्ट वर्ड मध्ये बदलून ठेवत असू. ह्यात काय साध्य होतंय हे फक्त आमच्या व्यवस्थापकालाच कळत असावे. परंतु त्याला आव्हान करण्याचे धारिष्ट्य आम्ही दाखविले नाही.
दुसऱ्या आठवड्यापर्यंत लिंक आली. प्रत्यक्ष मेनफ्रेमवर काम करण्याची संधी मिळतेय ह्याचा आम्हा पामरांना कोण आनंद झाला. तो काळ वेगळा होता. लोक मेनफ्रेमचा थोडाफार अभ्यास करीत, जमल्यास एखाद्या कंपनीत तीन चार महिने काम करीत आणि मग काहीसा अनुभव फुगवून दाखवून अमेरिकेला पळ काढीत. त्यामुळे आपल्या सोबत काम करणारा आपला सहकारी किती दिवस आपली सोबत करणार आहे हे समजावयास वाव नसे. लिंक आल्यावर मला मेनफ्रेममध्ये असलेल्या काही JCL / PROC चे पृथ्थकरण करून त्याची नोंद एक्सेल मध्ये करण्यास सांगण्यात आली. अशाच एका अशुभ शुक्रवारच्या रात्री (ज्या वेळी बाकी दुनिया FRIDAY NIGHT चा आनंद उपभोगत होती) मी आणि माझा सहकारी किरण, अजून पाच दहा सहकाऱ्यांसोबत दुःखी अंतकरणाने, मनात आमच्या व्यवस्थापकाचे गुणगान करीत हे पृथ्थकरण करीत होतो. त्यावेळी बहुधा एक्सेलमध्ये ऑटोसेव पर्याय (जो तुम्ही एक्सेल मध्ये उतरविलेली माहिती थोड्या थोड्या वेळाने कायमस्वरूपात उतरवितो) उपलब्ध नव्हता. रात्रीचे जेवण दहा वाजेपर्यंत आटोपले. मी माझ्या अननुभवी स्थितीमुळे अजून एकदाही उतरविलेली माहिती सेव केली नव्हती. गप्पाटप्पा आणि अधूनमधून काम असला प्रकार चालला होता. तीनच्या आसपास डोळे पेंगुळाय़ला लागले. आणि मग तो दुर्भाग्यपूर्ण क्षण आला. मी चुकून एक्सेल बंद करण्याच्या कळीवर क्लिक केले. 'पामरा तुला तुझी गेल्या सहा तासातील धडपड कायमस्वरूपी करायची आहे का?' एक्सेलने मला विचारलं. आयुष्यात काही क्षण किंवा काळ असे येतात की ज्यावेळी आपल्या कृतीवर आपले नियंत्रण नसतं, कोणती तरी बाह्य शक्ती आपले नियंत्रण घेते. माझेही असेच झाले, किंवा सोप्या शब्दात झोपेने माझ्यावर अंमल बजावला होता त्यामुळे मी नाही म्हणून मोकळा झालो. एक्सेलने ते वर्कबुक बंद करताच माझी झोप खाडकन उतरली, आपल्या हातून काय चूक घडली हे ध्यानात आले. आता पश्चात्ताप करण्यात काही अर्थ नव्हता. बाकी आपल्या हातून मोठी चूक झाल्यास आपण पेटून उठतो आणि ती चूक निस्तरायचा प्रयत्न करतो. माझेही तसेच झाले. मी झोपेचा विचार सोडून देवून गेल्या सहा तासातील काम पुढील तीन तासात पुन्हा आटोपले.
हळूहळू काम वाढत चालले होते. आज्ञावली लिहायची, तिचे एकक परीक्षण (युनिट टेस्टिंग) करायचे हा प्रकार सुरु झाला. प्रियु आणि रमाकांत असे आमचे वरचे बॉस होते. त्यांचे १०० जणांच्या संघावर बारीक लक्ष असायचे. एखादी मूर्खपणाची चूक झाल्यास त्यातील एक अपराध्याला सर्वांसमोर ओरडे पण मग दुसरा काही वेळाने त्या चूककर्त्याची समजूत घाली. प्रियु सकाळी साडेनऊच्या सुमारास ऑफिसात येत . आणि रात्री बऱ्याच उशिरापर्यंत थांबे. सीप्झची दारे रात्री १२ वाजता बंद होत आणि सकाळी पावणे सहाच्या सुमारास उघडत. प्रियु पावणेबारा पर्यंत ऑफिसात थांबणे हे नित्याचे असे. परंतु त्यापलीकडे ते ऑफिसात थांबले की आम्ही बेचैन होत असू! न जाणो त्यांना सीप्झच्या गेटवरून घरी जाऊ नाही दिले तर? एकदा खरोखर तसे झालेही परंतु प्रीयुंनी मग एक दोघांना फोन करून आपली (आणि आमची सुद्धा) सुटका करून घेतली. प्रियु साधारणतः अकरा वाजता सर्व फ्लोअरवर चक्कर मारीत आणि सर्वांचे स्टेटस विचारीत. सुरुवातीला असेच एकदा त्यांनी मला आणि दहा पंधरा जणांना स्टेटस विचारलं. मग ते घरी निघून गेले. त्या दिवशी पोरे टाईमपासच्या मूड मध्ये होती आणि मी ही! बहुधा प्रीयुंना घरी झोप लागत नसावी. पहाटे चार वाजता माझा फोन खणखणला. प्रियु फोनवर होते. "आदित्य आपण कोठवर आलो आहोत?" ११ वाजल्यापासून काही केलेच नाही तर माझी काय प्रगती होणार? मी अकरा वाजताचेच स्टेटस ऐकवण्यास सुरुवात केली. दीड मिनिटातच समोरून आवाज आला, "बॉस, ये तो ग्यारा बजे का स्टेटस है, जावो अभी काम करो!" मी पूर्ण शरणागती पत्करली.
आमच्यात कलाकार लोक होतेच. त्यातील मनीषला प्रियुचा आवाज बऱ्यापैकी जमे. मग त्याने रात्री दीड दोनला पब्लिकला स्टेटस विचारणारे फोन करण्यास सुरुवात केली. अर्धेअधिक लोक त्यात फसले जात आणि मनीषला स्टेटस देत. मनीष सुद्धा त्यांना झाडून घेत असे. असेच एकदा त्याने रविकृष्णला फसविले. रवीचा संताप संताप झाला. रवीच्या दुर्दैवाने पुढील दोन तीन दिवसात खरोखर प्रियुचा फोन आला. रवीने त्यांना मनीष समजून आपला सर्व राग त्यांच्यावर काढण्यास सुरुवात केली. पुढील संभाषण आठवले की मला अजूनही जोरदार हसू येते. आधी सिंहाच्या आवेशाने संभाषण सुरु करणारा रविकृष्णा शेवटी अगदी गोगलगाय बनून गयावया करू लागला होता.
रात्री बारा वाजता चहावाला येई. त्याभोवती आम्ही एकत्र जमू आणि चहा, बिस्किटे अशा मेनूचा आनंद घेत असू. जनतेने मग गाणी संगणकावर आणून टाकली. R D बर्मनची 'पन्ना कि तमन्ना है' वगैरे गाणी वाजवली जात. ती गाणी ऐकताना मेनफ्रेमच्या हिरव्या - काळ्या स्क्रीन कडे पाहत काम करण्याचा आनंद काही औरच असे. तीन साडेतीन वाजता अमेरिकतील संघ घरी निघून जाई. मग आम्हीसुद्धा चार चार खुर्च्या एकत्र लावून साधारणतः अंधारातील जागा पाहून झोप काढीत असू. सकाळी सहा वाजले की मी सीप्झच्या गेटकडे धाव घेई आणि रिकाम्या विरार लोकल पकडून वसईला परतत असे. कधी कधी ह्यातही धमाल येई. काहीजण (पुन्हा रविकृष्णा आलाच!) SHORT PANT वर झोपित. असेच एकदा मंडळी SHORT PANT आणि गंजी अशा वेशात निद्राधीन झाली होती . त्यावेळी सकाळी काही मुली कामानिमित्त सात वाजताच ऑफिसात आल्या. त्यांना पाहून रविकृष्णा लज्जेने चुरचुर झाला! त्या मग बाजूला गेल्यावर "तुम लोगको मेरेको उठाने को नही होता क्या?" असे म्हणत त्याने आम्हाला फैलावर घेतले!
गेले ते दिन गेले! अशाच पुढील काही आठवणी पुढच्या भागात!
No comments:
Post a Comment