दुनियादारी चित्रपट न बघता चेन्नई एक्स्प्रेस बघण्याचा निर्णय माझा! बायको शाहरुकची चाहती असताना त्याचा चित्रपट रिलीज झाल्याच्या पहिल्या साप्ताहिक सुट्टीत बघण्याची संधी तिला मिळावी असा समजूतदारपणा मी दाखवला. काही काळ समजूतदारपणाचा असतो. त्यात असे काही निर्णय घेणे चांगले असते!
असो काही मुद्दे!
१> 'सकस कथेचा चित्रपट' असे आपल्याला हल्ली फार क्वचित बोलण्याची संधी मिळते. चेन्नई एक्स्प्रेसने सुद्धा ही संधी दिली नाही. बहुतांशी प्रेक्षकांना गंभीर कथानक झेपत नाही. त्यामुळे 'खपते ते विकते' ह्या न्यायाने असेच चित्रपट बनतात. बाकी कथानकाच्या बाबतीत पूर्ण आनंदी आनंद असणार ही अपेक्षा ठेवून गेलो होतो त्यामुळे अपेक्षापूर्ती झाली.
२> चेन्नईच्या बाजूला इतका हिरवागार प्रदेश आहे हे पाहून मला खूप बरे वाटले. ह्या आधी केवळ केरळच इतका हिरवागार आहे असे मला वाटे. बाकी मग सर्व रंगांना समान संधी मिळाली. लाल पिवळ्या रंगांनी तर कमालच केली. मी पाचवीत प्रथम रंग हाती आल्यावर असेच बेसुमार रंग वापरीत असे त्याची आठवण झाली. सामनावीर पुरस्कार द्यावा तर तो ह्या रंगांना किंवा दिपिकेच्या अभिनयाला! सुंदर निसर्गदृश्य दाखवावीत आणि प्रेक्षकाचे लक्ष अधून मधून विचलित करावे!
३> आधीच्या यशस्वी चित्रपटातील गाण्याचे ध्रुवपद / संवाद कधीही कोणीही कुठेही वापरावे आणि वेळ भरावा ही प्रथा आता राजमान्य झाली आहे. आपल्या कल्पनादारिद्र्याचे हे धिंडवडे आहेत. मध्यंतरानंतर एक बुटका माणूस शाहरुकला जंगलात भेटतो. आणि पाच मिनटे वेळ काढतो. त्या पाच मिनिटाचा कथानकाशी असणारा संबंध शोधण्यासाठी मी पुढील काही वर्षे खर्ची घालणार आहे.
४> दीपिका पदुकोण अगदी सुंदर दिसते आणि ह्या चित्रपटात सुद्धा एकदम मस्त दिसली आहे. दिसण्यापेक्षा तिचा अभिनय अगदी सहजसुंदर आणि पडद्यावर आपले अस्तित्व कसे प्रभावी बनवावे ह्याची तिला असलेली नैसर्गिक जाण अगदी वाखाणण्याजोगी! संवादफेक सुंदरच
५> आता वळूयात ते नायकाकडे! चित्रपटात वास्तववादी होण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शाहरुख सुरुवातीलाच आपण चाळीशीचे असल्याचे स्पष्ट करतो आणि पन्नासीचे वाटत असू असा संशयही व्यक्त करतो. पूर्वीच्या जमान्यात राजेंद्रकुमार अथवा भारतभूषण वगैरे पन्नासीचे झाले तरी नायकाच्या भूमिका करीत. आपण त्या काळाकडे परत चाललो आहोत. जुने ते सोने हेच खरे!
६> शाहरुख हल्ली खूप तब्येतीने हटला आहे आणि त्याला अनुसरून तो चित्रपटातील बराचसा भाग खलनायक आणि त्यांच्या तथाकथित विनोदी टोळीला घाबरून राहतो. परंतु चित्रपटाच्या शेवटी हा वास्तववादी होण्याचा प्रयत्न सोडून दिला जातो आणि शाहरुख अवास्तव मारामारी करतो. परंतु शाहरुखला एक अनाहूत सल्ला! तुझी ती हटलेली तब्येत बघवत नाही रे बाबा!
७ > चाळीशीचा नायक आणि विशीतील नायिका हा प्रकार तसा चित्रपटात नवा नाही. परंतु हल्लीचा प्रेक्षक ह्या प्रकारात त्या प्रेमी युगुलाशी कनेक्ट होत नाही त्या युगुलाच्या अडचणीशी आणि भावनांशी समरूप होत नाही आणि मग चित्रपटाच्या यशाला मर्यादा येतात आणि हा नायिकेवर अन्याय आहे. परंतु आपण हल्ली brand ह्या संकल्पनेच्या सरसकट मागे लागलो आहोत आणि खेळ म्हणा की चित्रपट म्हणा आपल्याकडे वेळीच निवृत्त होण्याचे मनाचे मोठेपण मात्तबर लोकांकडे नाही.
मी हल्ली ब्लॉगच्या static hit count कडे (dynamic views नाही) लक्ष ठेवून असतो. एका ब्लॉगला सव्वाशेच्या आसपास हिट्स मिळतात. हिट्सकडे लक्ष ठेवून ब्लॉग लिहिणे जसे चुकीचे तसे शंभर कोटीचा गल्ला गोळा करण्याचे लक्ष समोर ठेवून चित्रपट बनविणे हे ही चुकीचे! सृजनशीलता संपून काहीसे यांत्रिकीकरण येते!
आयुष्यात काही दुःख दीर्घकाळ टिकतात! बायको शाहरुखची चाहती असणे हे असेच दुःख! बघूया शाहरुख निवृत्त व्हायचे कधी मनावर घेतो ते नाहीतर अजून २० वर्षानंतर सुद्धा मी असाच ब्लॉग लिहित असीन!
शारुकने जेष्ठ नेत्यांचा आदर्श घेतला आहे. त्यांच्या प्रमाणे तो कधीच निवृत्त होणार नाही त्यामुळे तुमच्या ब्लॉग लेखनाला शुभेच्छा...
ReplyDeleteसिद्धार्थ - आपल्या मार्मिक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
ReplyDeleteप्रचंड विनोदी...
ReplyDeleteवाचून मजा आली. बाकी चित्रपटाच्या रसग्रहणाविषयी शंभर टक्के सहमत!!!
धन्यवाद पुष्कर!
Deleteशाहरुख खानवर इतके शब्द खर्ची घातले…… विषयांची टंचाई जाणवू लागली कि काय ;)
ReplyDelete