आम्ही दहावी ८८ साली उत्तीर्ण झालो. जीवनभर साथ देणाऱ्या शालेय जीवनातील आठवणी घेऊन आम्ही सर्व वेगवेगळ्या दिशेने बाह्य जगतात विखुरलो. पुढील काही वर्षे आम्ही जगाला आणि जगाने आम्हाला आजमावण्यात गेली. ह्या वयात आयुष्यात पुढे काय करायच ह्याविषयी जसे सर्वजण अनिश्चितता अनुभवतात तशी आम्ही सुद्धा अनुभवली. अनिश्चितता अनेक बाबतीत होती, आपल्या शैक्षणिक क्षमतेचा व्यावहारिक यशाशी असलेला अनोन्यसंबंध कसा असेल, जीवनसाथी कसा असेल आणि आयुष्याच्या वाटेवर त्याची / तिची कधी भेट होईल, पालकांच्या सुरक्षित कवचाखाली आयुष्य जगण्यापासून ते आयुष्यातील अधिकाधिक जबाबदाऱ्या अंगावर येवून पडण्यापर्यंतची अनेक स्थित्यंतरे ह्या काळात घडली.
रंगीला मधला मुन्ना आठवा! आवडणारी मुलगी भेटल्यावर 'लाईफ में सेटल होने का' हे ध्येय त्याने समोर ठेवले होते. आता लाईफ मध्ये स्थिरावण्याच्या होण्याच्या प्रत्येकाच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. आणि नोकरी व्यवसायात स्थिरावून होऊन लग्न करायचे की लग्न करून नोकरी व्यवसायात स्थिरावयाचे हा अजून एक प्रश्न!
असो शालेय जीवनानंतर साधारणतः पंधरा वर्षाचा काळ ओसरला. प्रत्येकजण स्थिरावण्याच्या विविध पातळीवर होते. आमच्यातील विशाल पाटीलला साधारणतः १९९८ सालापासून स्नेहसंमेलन भरविण्याचे वेध लागले होते. एक मधल्या काळात प्रयत्न झालाही परंतु त्या वेळी सोशल मीडिया इतकी प्रभावी नव्हती आणि मुलांनी चांगला प्रतिसाद दिला नाही. मधली काही वर्षे गेली. माझ्यासह बरेच जण परदेशी जाऊन आले. २००७ साल उजाडलं. मी दोन वर्षाच्या अमेरिकेच्या वास्तव्यानंतर परतलो होतो. आपली वसई काहीशी अनोळखी वाटू लागली होती. इमारती उभ्या राहू लागल्या होत्या आणि बरीच नवीन माणसे दिसू लागली होती. अशा वेळी शाळेचे मित्र भेटल्यावर खूप बरे वाटायचे, मग एकदा मी राकेशला आपण विशालच्या मानसाला सर्वांनी साथ देवूयात असे सुचविले. राकेशने ते मनावर घेतले. विशालला ही बातमी कळताच दुसऱ्या दिवशी सकाळी गडी माझ्या घरी दाखल झाला. त्याने अ आणि ब वर्गातील जवळजवळ शंभर जणांची नावे लिहून आणली होती. त्याच्याबरोबर राकेशही आला. साधारणतः ०७ च्या नोव्हेंबर महिन्यातील गोष्ट. स्नेहसंमेलन करायचे हे तर नक्की झाले होते परंतु तारखेच्या बाबतीत थोडा गोंधळ होत होता म्हणजे एकमत होत नव्हते. नाताळचा आठवड्यातील तारीख घ्यावी असा विचार सुरुवातीला मांडला गेला परंतु वसईत त्या आठवड्यात कला क्रीडा महोत्सवाचा माहोल असतो, शाळा एकत्र भेटण्यासाठी उपलब्ध नसते आणि काहीजण फिरायला बाहेर गेलेले असतात. त्यामुळे हा विचार मागे पडला. आणि मग पुढे आली ती २६ जानेवारीची तारीख. दरवर्षी सर्वांना ह्या दिवशी सुट्टी असणार तर मग हीच तारीख पक्की करावी हा विचार पुढे आला आणि पक्का झालाही.
एकदा तारीख पक्की झाल्यावर मात्र सर्वांनी कंबर कसली! प्रथम शाळेत जाऊन २० वर्षे पूर्वीचा हजेरीपट काढण्यात आला आणि त्यातील सर्वांची नावे घेण्यात आली. विशालच्या यादीशी ती बऱ्याच प्रमाणात मिळतीजुळती निघाली. एव्हाना ह्या उत्साहात हेमंत राजगोर, योगेश कोठावळे, दीपक कदम, अनिल जाधव, राकेश, वैभव आणि अजून काही मंडळी सामील झाली. मग सुरु झालं ते सर्वांना संपर्क करण्याचे अभियान! मुलांना शोधणे तसे सोपे होते. आम्ही बरेचजण पूर्वापार वसईत वास्तव्य करीत असलेल्या कुटुंबातील ! त्यामुळे मुले जरी नोकरीधंद्यानिमित्त बाहेर जाऊन राहिली तरी त्यांचे पालक वसईतच होते. विशाल आणि कंपूने ह्या सर्वांच्या घरी जाऊन २६ जानेवारीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. मुलींच्या बाबतीत थोडी वेगळी गोष्ट होती. लग्न होवून त्या बाहेरगावी, परदेशी गेल्या होत्या. त्यांच्या पालकाकडे जावून हे पत्ते गोळा करायचे आणि मग त्यांच्या सासरी संपर्क करायचा ही कामगिरी सुद्धा कंपूने पार पाडली.
शाळेचा वाचनालयाचा हॉल वापरण्याची आम्ही परवानगी वायंगणकर सरांकडून घेतली. एव्हाना मुलीसुद्धा ह्या तयारीत सामील झाल्या होत्या. मग कार्यक्रमाची रूपरेषा, अल्पोपहाराचा मेनू ह्याची आखणी करण्यात आली. स्वागत समिती सुद्धा नेमण्यात आली. बघता बघता २६ जानेवारीचा दिवस उजाडला. दुपारी ३ वाजताचे सर्वांना आमंत्रण होते. संयोजक समिती आदल्या दिवसापासूनच तयारीत होती. हॉलमध्ये खुर्च्यांची मांडणी करण्यात आली. ध्वनीयोजनेची व्यवस्था करण्यात आली. राकेशने आपल्या कलात्मक हस्ताक्षरात स्वागतफलक सजविला. संयोजक समिती २ वाजल्यापासूनच शाळेत हजर होती. प्रतिसाद कसा मिळेल ह्याविषयी मनात धाकधूक होतीच. हळूहळू मुले जमा होवू लागली. काही चेहरे बदलले होते तर काही बऱ्यापैकी जसेच्या तसे! सर्वांनाच बाकीच्या शालेय साथीदारांना ओळखता येत नव्हते. साडेतीनच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली. बघता बघता सुमारे ६५ जण जमले होते. विशाल आणि साथीदारांचा हा मोठा विजय होता. स्वागतकक्षात प्रत्येकाचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहून घेतले जात होते. कार्यक्रमाची सुरुवात थोडी भावूक झाली. गेल्या काही वर्षात आमच्या काही साथीदारांनी ह्या जगाचा अकाली निरोप घेतला होता. आमच्यासाठी हा मोठा धक्का होता. आमच्या त्या साथीदारांच्या आठवणी आमच्या डोळ्यासमोर तरळून गेल्या. त्यानंतर प्रत्येकाने आपला परिचय आणि गेल्या २० वर्षातील आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचा आढावा घेतला. श्रोतेवर्गातून मार्मिक टिपण्णी चालू होती. विशालचे आभार मानण्यात आले. तीन चार तास बघता बघता निघून गेले. अल्पोपहार, समूह फोटो घेण्यात आले. शाळेतून पाय निघता निघत नव्हता. सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला तो संपर्कात राहण्याचे आश्वासन देवूनच!
कंपूचा उत्साह कायम होता. कार्यक्रमाची सीडी बनविण्यात आली. सर्वांच्या पत्त्यांची आणि भ्रमणध्वनीची एक्सेलशिट बनविण्यात आली. त्यात वाढदिवससुद्धा सामील करण्यात आले. ही यादी सर्वाबरोबर शेयर करण्यात आली. कंपूने पुढाकार घेवून SMS सेवा नोंदवली. वाढदिवसाला सर्वांना संदेश पाठविले जावू लागले. मार्चच्या सुमारास कंपूच्या डोक्यात अजून एक किडा वळवळला. रविवार सकाळ क्रिकेट क्लबची स्थापना करण्यात आली. वसईच्या सुरुच्या बागेतील समुद्रकिनाऱ्यावर रविवारी सकाळी क्रिकेट खेळले जावू लागले. १२ - १५ जणांची उपस्थिती होवू लागली. मग अजून एक उपक्रम निघाला. शाळेसाठी मदत निधी गोळा करण्याचे ठरले. कंपू सक्रीय होताच. पुन्हा सर्वांशी संपर्क साधण्यात आला. बर्यापैकी चांगला निधी गोळा करण्यात यश मिळाले.
हल्ली आठवडा, महिने ज्या वेगाने निघून जातात त्याचा काही ताळमेळच नसतो. बघता बघता नोवेंबर उजाडला. कंपूचा उत्साह कायमच होता. आता ज्यांनी आपल्याला घडविले त्या शिक्षकांची भेट घ्यावी असा विचार पुढे आला. आदल्या वर्षी जी मेहनत कंपूने सहाध्यायीशी संपर्क गोळा करण्यात घेतली होती तितकीच ह्यावर्षी शिक्षकांशी संपर्क साधण्यासाठी घेतली. हा कार्यक्रम एकदम दृष्ट लागण्याजोगा झाला. सर्व जण एकदम खुशीत होते. अनुपने एक योग्य निरीक्षण नोंदवले. आता आपण साध्य करण्यासारखे काहीच ठेवले नाही.
आता उत्साह ओसरला आहे. २०१० - १३ ही पुढील चार वर्षे नित्यनेमाने २६ तारखेला आम्ही भेटलो. येणाऱ्यांची संख्या काही प्रमाणत घटली. ह्यात एक नियम आहे. कोणालाही फोन केला जात नाही, फक्त एक स्मरणाचे ई मेल पाठविले जाते. तरीही ह्या वर्षी २६ जानेवारीला १६ जण जमले. आता कंपूने क्रिकेटवेड शाळेच्या इतर बँचपर्यंत पोहचविले. गेली दोन वर्षे शाळेच्या माजी बँचची बॉक्स क्रिकेटची स्पर्धा भरविली जाते.
गेल्याच आठवड्यात अमेरिकेतून सुट्टीवर आलेली नंदा आणि फ्रान्सवरून सुट्टीवर आलेला सुनील भेटले. आम्ही सुट्टीवर असताना आपण भेटत नाहीत अशी तक्रार त्यांनी केली. कंपू जागा झाला. चार दिवसात थोडीफार फोनाफोनी झाली. संपर्कयादीतील बरेचसे नंबर बदलले गेले होते. तरीही काल शनिवारी संध्याकाळी पाच वाजता शाळेच्या दहावीच्या वर्गात आम्ही जमलो तेव्हा वीस बावीस जण आले. अमेरिकेची नंदा, दुबईचा आदित्य महाडिक, फ्रान्सचा सुनील, ठाण्याहून अनघा, वैशाली, सुहास, पुण्याहून अनुप, बोरिवलीहून वैशाली, पार्ल्याहून तेजस्विनी, जुहूवरून प्रतीक्षा आले. गावातील मी, राकेश, रुपेश, राजेश, अरुण, वैभव बाबरेकर, दीपक, योगेश, संजय पाटील, सुजित, शिल्पा, पल्लवी, समिधा आले. हेमंत राजगोर, मेधा, अनिल, विशाल हे काही कामानिम्मित येऊ शकले नाहीत. योगेशने झटपट अल्पोपहाराची सोय केली. पाच ते आठ गप्पा रंगल्या. फ्रान्स, अमेरिका, दुबईतील जीवन ते आपल्या देशातील बदलत्या जीवनशैलीची चर्चा झाली. एकीकडे बोलणे चालू होते आणि दुसरीकडे मनाच्या एका कोपऱ्यात दडल्या गेलेल्या आयुष्यातील अविस्मरणीय कालावधीच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या होत्या. दहावीत असताना कोणत्या बाकावर कोण बसायचे ह्याची चर्चाही झाली. छायाचित्र काढली गेली. एकमेकांचा निरोप घेताना एका नव्या उत्साहाचे वारे कंपूच्या अंगात शिरले!
No comments:
Post a Comment