Sunday, May 25, 2014

सिमला कुलू मनाली वीणा वर्ल्ड - भाग ५

 चौथ्या दिवशीचा बर्फखेळ आणि हिमाचलीन नृत्य हा नक्कीच ह्या सहलीचा परमबिंदू होता. ह्या क्षणापर्यंत अनुभवलेल्या सर्व क्षणांना मागे टाकणारा! ह्या पुढील भेट दिल्या जाणाऱ्या प्रत्येक स्थळाला ह्या दोन अनुभवांनी दिलेल्या समाधानाच्या पातळीला मागे टाकावे लागणार होते.
पाचव्या दिवसाच्या सकाळचे आकर्षण होते ते सोलंग व्हॅलीची भेट आणि पॅराग्लायडिंग! पॅराग्लायडिंगविषयी आम्हांला एकंदरीत सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. हे करणार असाल तर स्वतःच्या जबादारीवर असे आम्हांला कोणताही आडपडदा न ठेवता सांगण्यात आलं होतं. क्रिया करताना जखमी झालेल्या आणि अतिदक्षता विभागात दाखल केल्या गेलेल्या लोकांची उदाहरणे सुद्धा देण्यात आली होती. त्यामुळे आमच्यातील कोणी मंडळी त्या प्रकाराकडे वळली नाहीत.


सकाळी नेहमीप्रमाणे उदरभरण करून आम्ही तवेरा किंवा तत्सम वर्गातील गाड्यांमध्ये स्थानापन्न झालो. पहिला थांबा होता तो हिडींबा मंदिर! हे मंदिर अगदी निसर्गरम्य परिसरात आहे. हिमाचल प्रदेशाला देवभूमी म्हटले जाते. आपल्याला इथे फिरताना अधूनमधून अशी ठिकाणे दिसतात की नक्कीच इतक्या स्वर्गीय सौंदर्याला देवाच्या अस्तित्वाचं वरदान लाभलं असलं पाहिजे असं मानायला मन (मनापासून!!) तयार होतं. हिडींबा मंदिराचा परिसर हा एक अशाच परिसरांपैकी एक! ह्या देवळाभोवती असलेली अगदी उंच (आता इथे गगनाशी स्पर्धा करणारी किंवा ज्यांच्या शिखरापर्यंत दृष्टी पोहोचवायची झाली तर डोक्यावरील टोपी खाली पडेल असे नाट्यमय शब्दप्रयोग आपण करू शकतो!) देवदार झाडांची गर्दी अगदी प्रेक्षणीय आहे. अगदी थोडीच सुदैवी सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकतात.
आमच्या सहलीचे "three musketeers"


मंदिराच्या आवारात आदित्याने आम्हांला एकत्र केले. ह्या मंदिराच्या एक पौराणिक आणि एक ऐतिहासिक अशा दोन्ही गोष्टी मी तुम्हांला  सांगतो असे प्रास्ताविक त्याने केलं. पौराणिक आणि ऐतिहासिक ह्या दोन शब्दाच्या भिन्न अर्थाविषयी आपण ह्या पूर्वी कधी विचार केला होता काय हे आठविण्याचा मी प्रयत्न करू लागलो.
पौराणिक कथा अशी की ह्या परिसरात हिडींब आणि हिडींबा असे दोन भाऊ बहिण राहत. हिडींब आपल्या प्रजेवर खूप अन्याय करी आणि त्यामुळे नाखूष असलेल्या हिडींबा हिने जो कोणी ह्या भावाचा वध करेल त्याच्याशी मी लग्न करीन अशी प्रतिज्ञा केली होती. "अरे वा! तुझी इच्छा असली म्हणून काय झालं, समोरच्याची इच्छा असायला हवी की नको" हा मनात डोकावणारा विचार आणि तोंडावर येऊ पाहणार हसू महत्प्रयासाने दूर सारलं. पुढे भीमाने हिडींबचा वध केला आणि हिडींबाने त्याच्याशी विवाह केला. (बघा इथे मी भीमाने हिडींबाशी विवाह केला हा शब्दप्रयोग टाळला की नाही!) ह्या दोघांचा पुत्र घटोत्कच ह्याने कौरवांबरोबर झालेल्या लढाईत मोठा पराक्रम करून मग प्राण सोडले. प्रत्येक गोष्ट घडायला विधात्याची काहीतरी योजना असते असं म्हणतात ते ही खरंच!
ऐतिहासिक कथा पंधराव्या शतकातील कोण्या एका राजाची! त्याने हे मंदिर उभारलं. मंदिर उभारणीनंतर ह्या मंदिराच्या सौंदर्यावर तो इतका खुश झाला की त्याने त्याच्या शिल्पकाराला बरेच द्रव्य देऊन त्याला गौरविले. परंतु  ह्या कारागिराने इतर कोठे जाऊन अजून असेच मंदिर उभारू नये म्हणून त्याचे हात तोडून टाकले. ताजमहालाबाबतीत सुद्धा आपल्याला अशीच कथा ऐकायला मिळते. परंतु हा कारागीर इतका हिमतीचा की त्याने अशा स्थितीत सुद्धा ह्यापेक्षा सुंदर मंदिर दुसऱ्या भागात जाऊन उभारलं. तिथेही त्याचा मोठा सत्कार करण्यात आला. परंतु त्या राजाने मात्र त्याला जीवानिशी मारून टाकले. खरी असल्यास किती दुर्दैवी कथा ही!
उद्या इतका सुंदर ब्लॉग लिहिणाऱ्याची  इंटरनेट जोडणी कोणी काढून टाकली तर किती दुर्दैवी!
आता ह्या मंदिराची बॉलीवूड कथा! रोजा चित्रपटात आपल्या नवऱ्याच्या शोधात काश्मिरात आलेली मधु एका मंदिरात येऊन देवाकडे आपल्या नवऱ्याच्या जीवनासाठी साकडं मागते. तिने एक नारळ फोडताच आजूबाजूचे सर्व सैनिक धावत येतात. तर ते हेच हिडींबा मंदीर! आता काश्मिरातले मंदिर हिमाचल प्रदेशात कसे आले असा विचार कोणी करू नये. ह्या मंदिराचे छत उतरते असून ह्या भागात होणाऱ्या बर्फवृष्टीवर हा उपाय! बाकी मंदिराच्या चौथ्या पायरीवर उभे राहून फोटो काढल्यास व्यवस्थित सर्व मंदिर कॅमेरात सामावता येईल हा सल्लासुद्धा आदित्य आणि मंडळींचाच!



मंदिराचा गाभारा अगदी शांत!  पंधराव्या शतकात देखील इथं कोणी वावरून गेलं असेल ह्या विचाराने आपल्याला अंतर्मुख करणारा! पुजाऱ्याने दिलेला प्रसाद ग्रहण करून आम्ही असेच बाहेर फिरत असताना "वीणा वर्ल्ड, वीणा वर्ल्ड" ह्या सादेने आपापल्या गाड्यांकडे खेचले गेलो.
गाडीत बसण्याआधी काही जणांनी याकवर बसून फोटो काढून घेतले!


आता पुढचा टप्पा होता केबलकार आणि पॅराग्लायडिंगचा! आमच्यासाठी फक्त केबलकारच उपलब्ध पर्यायात मोडत होते. हा परिसर अगदी विस्तृत होता.




 पॅराग्लायडिंग करून जमिनीवर परतणारे इथेच उतरत होते. केबलकार इथूनच वर जात होती. केबलच्या वर जाण्याच्या प्रवासात खालचा भूभाग तसा चांगला दिसत होता. खाली दिसलेला एक श्वानसदृश्य प्राणी हा कोल्हा असावा ह्या माझ्या तर्काला पुण्याचे सहप्रवासी सोहम आफळे ह्यांनी अनुमोदन दिले. वरती आकाशात मोठी छत्री घेतलेले साहसवीर मुक्त गगनविहार करीत होते.






वरती पोहोचल्यावर आम्ही समोर दिसणाऱ्या मोकळ्या भूभागाकडे प्रस्थान केले. इथेसुद्धा अजून रेंगाळणारा बर्फ होताच की! कालच्या अनुभवाने कौशल्यपातळी उंचावलेली बच्चेमंडळी तत्काळ तिथे धावली. हातात मावतील इतके बर्फाचे गोळा करून त्यांनी एकमेकांवर फेकण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी आपल्या मातांवर आक्रमणाचा रोख वळविला. इथे एक सोनेरी विग १० रुपये भाड्याने काही काळ वापरू देणारी बाई फिरत होती. अर्थात समस्त महिला वर्गाला हा मोह आवरला नाही. आपल्याच बायकांनी घातलेले  पाहून क्षणभर आम्हांला सुद्धा ह्या आपल्याच बायका ह्यावर विश्वास बसला नाही. तात्काळ मी प्राजक्तासोबत फोटो काढून घेतला!

आपापल्या वयोगटातील हिरो नंबर १!!!





थोड्या वेळाने केबल कारने आम्ही पुन्हा खाली उतरलो.  ह्या हवेतील मैगीला आम्ही सरावलो होतो. त्याचा आस्वाद घेताना पॅराग्लायडिंग करणाऱ्यांच्या अनेक लीला दिसत होत्या. एकाला त्याचा मार्गदर्शक समोर दिसणाऱ्या हिमशिखरापाशी घेऊन गेला असे रणमारे म्हणाले. आम्हांला दिसणारा एक साहसवीर ढगांमध्ये बराच वेळ विहार करीत होता आणि तो जमिनीवर कधी आणि कसा उतरेल ह्याची आम्ही चिंता करीत होतो. चिंतातुर जंतु!

पुन्हा एकदा हॉटेलचा परतीचा प्रवास! हो सांगायचं राहून गेलं. आमच्यातील काही जण रिवर राफ्टींगसाठी दुपारच्या भोजनानंतर जाणार होते. ह्या रिवर राफ्टींगचा आरंभबिंदू हॉटेलपासून ४५ किमीवर होता. दुपारच्या जेवणानंतर इतका प्रवास करणे आमच्या जीवावर आल्याने हा पर्याय आम्ही स्वीकारला नाही. परंतु मनालीला आल्यावर नक्कीच सर्वांनी रिवर राफ्टींग करावे. आणि खरेतर वीणावाल्यांनी रिवर राफ्टींगची वेळ सकाळची ठेवायला हवी होती असेच मलाच नव्हे तर सर्वांना वाटून गेले. 
दुपारच्या जेवणानंतर पुन्हा एकदा नभ मेघांनी आक्रमिले. ढगांचा मोठासा गडगडात झाला. वारेही सुटले आणि जडावलेल्या देहाला कधी निद्रेने आपल्या कब्जात घेतलं हे आम्हांला समजलंच नाही. अचानक साडेपाचला जाग आली. पुन्हा एकदा सायंकाळचा चहा आणि नास्ता! ह्यानंतर हॉटेलच्या परिसरात एक फेरफटका मारला. 
त्यानंतर होता तो सर्व तरुण मंडळी उत्कंठेने वाट पाहत असलेला डिस्को डेकचा प्रोग्रॅम. अंधाऱ्या वातावरणात सर्व नृत्यकुशल मंडळी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करीत होती. अशा गाण्यात सुद्धा स्टेप्स असतात हे हल्ली हल्ली कंपनीच्या कार्यक्रमात लोकांचे निरीक्षण करून शिकलो आहे. त्यातील 'तेरा प्यार प्यार हुक्काबार' हा ओळींच्या वेळी वरती हात करून धूर सोडण्याची कृती करावी हे बऱ्यापैकी माझ्या लक्षात राहिले आहे. त्यामुळे मी ती ओळ येण्याची बराच वेळ वाट पाहत होतो. बाकी माझ्या नृत्यकौशल्याविषयी मी मागच्या भागात लिहिलेच आहे. परंतु हल्ली आपल्याला जमेल तशा काही वेड्यावाकड्या स्टेप्स एका कोपऱ्यात करण्यास मला काही संकोच वाटत नाही. उगाच एका कोपऱ्यात बसून राहिले की लोकांचे लक्ष आपणाकडे जाते आणि मग ते उगाचच आपल्याला आत खेचतात त्यापेक्षा हा भाग परवडला. 
इथे नमूद करण्याची गोष्ट एकच! असं सर्वांसमोर वेडेवाकडी नृत्य करणे आपल्या संस्कृतीचा खरा भाग नव्हता. पण कोणास ठाऊक का पण आपण आज हे स्वीकारत आहोत. आणि ह्या अनाडी नृत्यावर नाच हा शहरी संस्कृतीच भाग बनत चाललं आहे. तेलकट, मसालेदार पदार्थ खावेत आणि मग ते पचविण्यासाठी अशा लीला कराव्यात. येणारा काळ आपणास अजून काय काय दाखविणार आहे कोणास ठाऊक! शेवटी जोडीनृत्याची वेळ आली. मंद पाश्चात्य संगीत सुरु झालं. प्राजक्ताने मला ह्या संगीतावर पदलालित्य करून दाखविण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण एकदा तिचा हात जवळजवळ पिरगळल्यानंतर आणि नंतर तिच्या पायावर बुटांनी जोरात पाय दिल्यावर तिने हा नाद सोडला! आणि आमचे नृत्य एकदाचे संपले आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. 
पुन्हा एकदा कमी जेवण्याचा केलेला मोडलेला संकल्प! एव्हाना निशादची आणि माझी चांगली दोस्ती बनली होती. अधूनमधून माझी तो खेचत असे. असाच रात्रीच्या जेवणाच्या वेळी तो माझ्याजवळ आला. त्याच्या चेहऱ्यावरील मिश्किल भावांनी मी सावध होऊन बसलो. माझ्या जुन्यापुराण्या ब्लॅकबेरीकड़े  पाहत म्हणाला, "काका जुना झाला की फोन!" मी सुद्धा म्हणालो "हो रे! पण करायचं काय?" चेहऱ्यावर आधी गंभीर भाव आणत तो म्हणाला, "पाण्यात टाका की!" आणि खो खो हसत पळत गेला!
पाचवा दिवस संपला होता!

(क्रमशः)

Tuesday, May 20, 2014

सिमला कुलू मनाली वीणा वर्ल्ड - भाग ४

मनालीतील पहिली सकाळ अगदी प्रसन्न वातावरणात उजाडली. आज खरं तर लोकसभा निवडणुकीचा दिवस. परंतु शांतपणे जीवन जगणाऱ्या मनालीवासीयांच्या जीवनात ह्याने सुद्धा फारसा फरक पडला नव्हता. आज वशिष्ठ कुंड आणि स्नो पॉइंट करायचे होते. रोहतांग पासला बर्फमय प्रदेश पाहायला जायची सर्वांचीच इच्छा
होती परंतु तिथं रविवारीच नव्याने बर्फवृष्टी झाली होती आणि त्यामुळे तिथं जाणं शक्य होणार नव्हतं.


एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर तिथले पेपर बघणे हा एक शिकण्याचा अनुभव असतो. नंतर एक दिवशी पेपर चाळताना जाहिरातीचं अगदी किमान प्रमाण मोठ्या प्रकर्षाने जाणवलं. अजून एक बातमी वाचनात आली. रोहतांग पासच्या पलीकडे जी हिमाचल प्रदेशातील गावे आहेत तिथले नागरिक अतिकडक हिवाळ्यापासून बचाव करण्यासाठी हिवाळ्यात मनालीला येऊन राहतात. आणि साधारणतः हिवाळा आटोक्यात आला की आपल्या गावी परततात. ७ मेला मतदान असल्याने त्यांना आपल्या मूळ गावी परतणे आवश्यक होते. परंतु नव्याने झालेल्या बर्फवृष्टीमुळे बिचारे मनालीतच अडकून बसले होते आणि मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. पुढे त्यांचे नक्की काय झालं हे वाचनात आलं नाही. अजून एक बातमी म्हणजे काही अतिदुर्गम भागातील ३ गावाच्या गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. गावापर्यंत दळणवळणाच्या मुलभूत सुविधा उभारण्यात राजकीय पक्षांना आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ हा निर्णय होता. आपल्या निवडणूक आयोगाचा मात्र मोठ्या कौतुकाने इथे उल्लेख करावासा वाटतो. ह्या दोन्ही ठिकाणी निवडणूक कर्मचारी आपली ड्युटी निभावण्यास आदल्या दिवशीच पोहोचले होते.


आमचे सहप्रवासी अमोल कुलकर्णी हे नाशिकचे रहिवाशी. वर्तमानपत्रातील जाहिरातींशी निगडीत असा त्यांचा व्यवसाय.  मोठ्या एकाग्रतेने पेपर चाळताना पाहून मी त्यांना विचारलं, "कुलकर्णी साहेब, काय खास बातमी?" "नाही, इथले लोक कशा प्रकारे जाहिरात करतात ते जरा बघतोय!" त्यांचं हे उत्तर आपल्याला आवडलं!


आजच्या प्रवासातील ठिकाणांपर्यंत बस जाऊ शकत नसल्याने तवेरा, इनोवा वगैरे SUV प्रकारातील गाड्यांची सोय करण्यात आली होती.  वैयक्तिक प्रवास करताना हा प्रवास खूप महागडा ठरण्याची शक्यता असते कारण अशा गाड्यांचे मालक हे बऱ्याच वेळा पर्यटकांना फसवायला टपलेले असतात असा माझा केरळ प्रवासातील अनुभव. अशा अनेक गाड्या हॉटेलच्या समोर लागल्या होत्या. आज बसप्रवास नसल्याने सोहम आणि अन्य बालके मोठ्या आत्मविश्वासाने नास्त्यावर तुटून पडली होती. आपल्या इच्छेनुसार गाडी प्राप्त व्हावी हे सोहमची इच्छा केवळ इछाच राहिली. आम्ही गोविंद रणमारे कुटुंबीयांसोबत होतो. गाडीचा चालक हा सर्व गाड्यांचा मालक होता.
आदल्या दिवशी आदित्यने सूचनांचा भडीमार केला होता. आपल्या गाडीचा क्रमांक नीट ध्यानात ठेवा. आपल्या गाडीतील सहप्रवाशांबरोबरच शक्यतो राहा. ट्राफिक जाम वगैरे झाला तर तो सोडविण्याच्या भानगडीत पडू नका. ह्या गाड्यांचे स्थानिक ड्रायवर ज्या क्षणी मोकळा रस्ता मिळेल त्या क्षणी गाडी भरधाव वेगाने हॉटेलला घेऊन येतील आणि परतताना वेळीच परत न आल्यास स्वखर्चाने हॉटेलला परतण्याची तयारी ठेवा!वगैरे वगैरे!
पहिला थांबा होता वसिष्ठ कुंड.


लक्ष्मण ह्या भागात आला असता वशिष्ठ मुनींना स्नानासाठी दूरवर जावं लागतं हे पाहून त्याने बाण मारून ही गरम पाण्याची कुंड निर्माण केली आहेत अशी माहिती सर्वज्ञ आदित्य (भोईटे हो!) ह्यांनी दिली. वशिष्ठ मंदिरासोबत रामाचे आणि शंकराचे मंदिर सुद्धा आहे. ज्या वेळी ह्या मंदिरांचा  जीर्णोद्धार होतो त्यावेळी बाजूच्या जंगलातील सर्वात जुन्या वृक्षाचा बुंधा आणून मंदिराजवळ उभारला जातो. वशिष्ठ मंदिराजवळ असे दोन बुंधे आणि रामाच्या मंदिराजवळ एक आढळल्याने सुज्ञ लोकांनी योग्य तर्क काढावा. त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष गरम पाण्याच्या कुंडांना भेट दिली. पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र कुंड आहेत. तिथे आत गेल्यावर पाहिलेल्या दृश्याने स्वतंत्र कुंडांच्या निर्मितीची गरज लक्षात आली!!


आता पुढचा टप्पा म्हणजे आदित्यच्या भाषेत ह्या सहलीचे मुख्य आकर्षण अर्थात हिमखेल बिंदू होता. ह्या ठिकाणी जाण्याआधी खास जॅकेट, लेदर शूज ह्या गोष्टी २०० रुपये भाड्याने आणि आवश्यकता भासल्यास १०० रुपयांचा  गॉगल विकत घ्यावं लागतं. ह्या गोष्टी इतर ठिकाणी थोड्या कमी दरात मिळण्याची जरी शक्यता असली तरी त्याच्या दर्जाविषयी आम्ही खात्री देवू शकत नाही असे आदित्य म्हणाला. आणि हो हे  जॅकेट आणि बूट आपल्या नेहमीच्या मापापेक्षा एक माप मोठी घ्यावीत हे सांगण्यास तो विसरला नाही. हे सर्व निकष पूर्ण करताना रंगसंगती वगैरे पाहायला जाल तर फसाल असा सल्ला द्यायला तो विसरला नाही.
 
भाड्याच्या दुकानाजवळ गाडी थांबली तर पूर्ण सावळागोंधळ होता. सर्व जॅकेट बाहेरून ओली लागत होती. परंतु तसेच मिळेल ते एक अंगावर ओढले. ते घालताना सुद्धा द्राविडी प्राणायाम करावा लागला. मग शूज कडे मोर्चा वळविला. ह्या क्षणी आदित्याचा सल्ला विसरलो आणि त्यामुळे पुढे थोडाफार त्रास सहन करावा लागला. माझ्या कपड्यांची निवड झाल्यावर सोहमची पाळी होती. त्याचा कोट, बूट वेगवेगळ्या ठिकाणी होते. हे सर्व निवडून आमचा मोर्चा गॉगलवाल्या सरदारजीकडे वळला. १०० रुपये किमतीचे ३ गॉगल खरेदी करण्यात आले. तोवर आम्हांला काहीसा उशीर झाल्याने आम्ही झटपट गाडीकडे धाव घेतली.


आता बर्फ रस्त्याच्या बाजूला दिसू लागला होता. आणि थोड्याच वेळात बर्फलीलेचे ठिकाण आले. इथे गाड्यांची खूप गर्दी झाली होती. वीणा वर्ल्ड असा पुकारा करीत आदित्य मंडळींनी आम्हांला एका बाजूला घेतलं.
तो सर्वांच्या नावाचा पुकारा करीत असतानाच आम्ही आमचा छंद सुरु ठेवला! 



वीणा वर्ल्डचा झेंडा मोठ्या दिमाखात फडकत होता!


सर्वांना एकत्र गोळा करण्यात यश आल्यावर पुन्हा एकदा आदित्यने सर्वांना आचारसंहिता समजावून सांगितली. वरती बर्फलीलेच्या ठिकाणापर्यंत चालत अथवा याकवर बसून जायचा पर्याय देण्यात आला होता. परंतु आम्ही चालत जाणेच पसंत केलं. वीस रुपये भाड्याची एक काठी मात्र आम्ही खरेदी केली. काही मंडळींनी मात्र याकवर बसून जाणे पसंत केले.


वरपर्यंत चालत जायची ही चढण पहा!




बाजूचा नजारा नेहमीप्रमाणे प्रेक्षणीय होता.


पर्वताचा चढ तसा तीव्र होता. ह्या एकंदरीत जय्यत तयारीने माझ्या हालचाली काहीशा मोकळेपणाने होत नव्हत्या. संपूर्ण चढणीचे तीन भाग करता येतील. प्राजक्ताला उन्हाचा त्रास होत असल्याने तिने छत्री घेणे पसंत केले. त्या पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या पार्श्वभूमीवर तिची गुलाबी छत्री मात्र शोभून दिसत होती.
विविध मंडळी आपल्या कुवतीनुसार वरती चढत होती.

मराठीतील गेले अनेक वर्षे 'होतकरू' असलेले लेखक आणि सोहम ह्यांचे हे छायाचित्र!





सोहम आणि मी एकमेकांवर बर्फ उडविण्याचा खेळ बराच वेळ खेळलो.

चांगला बर्फ कोठून गोळा करता येईल ह्यांची पाहणी करण्यात गर्क असलेला सोहम!



अचानक आलेल्या याकने सोहमची धावपळ केली आणि त्याच्या तयारीत खंड पडला. 

याकने जरावेळ इथे टाईमपास केला ही गोष्ट सोहमला अजिबात खपली नाही. 



एकदाचा याक पुढे गेला आणि सोहम कामाला लागला. 




बराच वेळ बर्फाची मारामारी केल्यानंतर बनविलेला हा बर्फगोळा!

तिथे रबरी टायरवरून खाली घसरत यायचा सुद्धा खेळ होता. काहींनी तो पर्याय स्वीकारला. दुसऱ्या चढणीवर असताना तिथे डाळवाला आला. त्याची पहिली चणाडाळ चविष्ट लागल्याने आम्ही अजून दोनदा त्या चणाडाळीचा आनंद घेतला. तिथे एक मुका काठीवाला होता. ह्या बिंदूपर्यंत आलेल्या काहीजणांना आता आपणास काठी पाहिजे असा साक्षात्कार झाल्याने ते ह्या काठीवाल्याकडून काठी घेत असत. काहीजण परतताना भाडे देऊ अशा समजुतीने काठी घेऊन तसेच पुढे चालू लागत. तेव्हा हा काठीवाला संतापाने तोंडाने जोराजोराने आवाज करीत अशा माणसांच्या मागे धावत जाई आणि त्यांना पैसे देण्यास भाग पाडी. बराच वेळ बर्फात खेळल्यावर आम्ही खाली उतरलो. एव्हाना उकडू लागलं होतं. तसं पाहिलं तर ह्या अंतराळवीराच्या वेषाची  गरज नव्हती असेच मला राहून राहून वाटत होते.


अशा वातावरणात समोर गरमागरम मैगी बनवून देणारा दिसल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष करायला आम्ही कोणी निर्मोही नव्हतो. त्यामुळे ५० रुपये दराच्या तीन मैगीच्या ऑर्डरी देऊन आम्ही बर्फात खेळणाऱ्या लोकांची मजा पाहत राहिलो. मैगीवाल्याने ह्या तीन मैगी बनवायला बराच वेळ घेतला. त्यामुळे नापसंती व्यक्त करणाऱ्या सोहमची प्राजक्ताने "दोन मिनिटातील मैगी फक्त टीव्हीवरच बनते" अशी समजूत काढली. हा एकंदरीत भाव जास्त आहे हे तत्वतः मैगीवाल्याने मान्य करीत मला एक फुकट चहा पाजला.


आता उतरणीचा मार्ग तसा सोपा होता. हा कोट आणि बूट कधी एकदाचे काढतो असे झालं होतं. शेवटी एकदाचे खाली उतरलो. तिथे असंख्य / अगणित गाड्या होत्या. त्यात आपली गाडी कशी शोधायची हा प्रश्न होता. नशिबाने आदित्य आणि जितेश तिथे होते आणि मग आम्हांला आमची गाडी लगेच मिळाली. गाडीच्या चालकाने आम्हांला सर्व वेष खाली काढून ठेवण्यास सांगितलं आणि व्यवस्थितपणे घडी करून हा सर्व प्रकार गाडीच्या टपावर ठेवून दिला.


परतीच्या प्रवासात एका राजबिंड्या ईगलचे आम्हांला दर्शन झाले. त्यानंतर निवडणुकीचा प्रभाव म्हणून एका पोलिसवाल्याने सुद्धा आमची गाडी अडवली. वीणा वर्ल्ड ऐकून त्याने आम्हांला जाऊ दिले. हॉटेलात पोहोचेस्तोवर अडीच झाले होते. झटपट ताजेतवाने होऊन आम्ही जेवणावर ताव मारला. इतके भरपेट जेवण आणि बऱ्याच दिवसांनी मिळालेली मोकळी दुपार ह्यामुळे बिछान्यावर आडवे होण्याचा मोह आम्हांला आवरला नाही. सोहमची IPL बरोबरची गहिरी दोस्ती इथेही सुरूच होती. मॅक्सवेलच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे आता त्याने सोहमच्या मनातील विराट कोहलीची जागा घेतली होती. पण ह्या IPL प्रकरणाने आमच्या झोपेत व्यत्यय येत होता. अचानक आकाशात ढग भरून आले आणि जोरदार गडगडाट झाला. होती नव्हती पांघरुणे'घेऊन मी झोपण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. साडेपाचच्या सुमारास अमोलचा सायंकालीन चहापानाचा कॉल आला आणि आम्ही सज्ज होऊन खाली गेलो. पाहिलं तर गरमागरम चहासोबत प्रिय बटाटवडे होते. तमाम मराठी वर्ग अगदी खुश होऊन गेला. सार्थकच्या जेवण आणि अल्पोपहाराच्या पदार्थांविषयी एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते. त्यांनी चारही दिवस अगदी आरोग्यपूर्ण आहार दिला. पदार्थ भलेही चमचमीत नसतील पण तब्येतीसाठी अगदी उत्तम होते आणि भरपेट खाऊन सुद्धा कोणालाही पोटाच्या कोणत्याच तक्रारी झाल्या नाहीत.


चहापान आणि बटाटेवडे भक्षणानंतर आम्ही हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या बागेत जाऊन आसनस्थ झालो. तिथे हिमाचलीन नर्तकांच्या तीन जोड्या त्यांच्या पारंपारिक वेशात हजर होत्या. आपल्या सवयीप्रमाणे प्रथम आदित्यने संध्याकाळचा आणि उद्या सकाळचा कार्यक्रम सांगितला. शिस्त म्हणजे शिस्त! इतकी मंडळी समोर शांतपणे बसल्यावर पुढील कार्यक्रम नाही सांगायचा म्हणजे काय? आदित्य दिसायला तसा साधाभोळा असला तरी अधूनमधून जनतेला टेन्शन देण्यात माहीर होता. आता हे नृत्य पाहण्याच्या आधीच तुम्हांला सुद्धा नंतर हाच नाच करावा लागेल हे सांगायची त्याला काय गरज होती? माझे नृत्यकौशल्य वाखाणण्याजोगे आहे. ज्या लोकांनी पूर्वी कधी त्याचा अनुभव घेतला नसतो ते बिचारे मला खूप आग्रह करतात आणि मग नाईलाजाने मी एक दोन स्टेप्स केल्या ते आपण ह्याला आग्रह करून किती भली मोठी चूक केली असा भाव तोंडावर आणतात.


ह्या नृत्याची ही काही चित्रे आणि चित्रफीत!





सुरुवातीला मंदगतीत सुरु झालेल्या ह्या नृत्याविष्काराने नंतर हळूहळू गती पकडली. सोबतीला सुमधुर संगीत होतेच.  जनता आता मनातल्या मनात ह्या स्टेप्सचा सराव करीत होती. आदित्याने नुसता इशारा करण्याचीच खोटी होती, सर्वजण तत्परतेने नृत्यात सहभागी झाले. प्राजक्ता चांगली नाच करीत असल्याने ती एकंदरीत खुशीत होती.


आदित्य, जितेश, अमेय आणि अमोल ह्यांनी ह्या नृत्यावर पूर्णपणे प्रभुत्व मिळविले आहे. समजा एखाद्या दिवशी ही नर्तक मंडळी येऊ शकली नाहीत तर हे लोक आरामात वेळ निभावू शकतील. फक्त त्यांना महिला कलाकारांची उणीव भासेल इतकेच! एकंदरीत हा नाच आम्ही अगदी आनंदाने अनुभवला. अगदी माझ्या नृत्यकौशल्यासहित!



त्यानंतर आदित्य आणि मंडळीनी दोन मजेशीर खेळ खेळून अजून धमाल आणली. ह्या दोन्ही प्रकारात महिला वर्गाने बक्षिसे पटकावली. हे खेळ कोणते हे इथे सांगून मी आदित्याची नाराजी ओढवू इच्छित नाही. ह्या खेळानंतर IPL च्या साथीने रात्रीचे मस्त जेवण पार पडले. बहुदा चायनीज मेनू होता. 

चार दिवस संपले होते. ही सहल कशी अगदी संपूच नये असे वाटत होते!


(क्रमशः)

Saturday, May 17, 2014

सिमला कुलू मनाली वीणा वर्ल्ड - भाग ३


सिमल्यातील सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहताना दुसरा दिवस काहीसा दमवणूक करणारा ठरला होता. आणि तिसऱ्या दिवशी मनालीचा २७५ किमीचा पल्ला गाठायचा होता. दोन दिवसात हॉटेल डॉन मध्ये काही प्रमाणात संसार मांडला होता. हा संसार रात्रीच सावरून बॅगात भरायचा की सकाळी उठून भरायचा ह्यावर चर्चा करतानाच झोप लागल्याने आपसूकपणे दुसऱ्या पर्यायाचा विजय झाला होता.
६ मे! लग्नाचा १३ वाढदिवस! पाच सव्वापाचला उठून बॅगा भरतानाच घरच्यांनी अभिष्टचिंतनाचे फोन करण्यास सुरुवात केली. दरवर्षीप्रमाणे लग्नाला इतकी वर्षे झाली ह्यावर विश्वास बसत नव्हता. बॅगा पावणेसात वाजता खोलीबाहेर काढून ठेवायच्या होत्या. निद्रामोड कॉलमध्ये ह्याचीसुद्धा आठवण करूनदेण्यात आली होती. बॅगा भरण्याची जबाबदारी प्राजक्ताकडे असल्याने त्यात लुडबुड न करणे आणि तिने दिलेल्या सूचनांचे आज्ञाधारकपणे पालन करणे हे आम्ही दोघे व्यवस्थित पार पाडत होतो. शेवटी तिघांच्या आंघोळी आटपून बॅगा सहा पन्नासला खोलीबाहेर निघाल्या तेव्हा आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.
आदल्या दिवशी सकाळी वळणावळणाच्या रस्त्यांचा ज्यांना त्रास झाला होता त्या बालकांच्या मातांनी आपापसात सुसंवाद साधला होता आणि विविध सिद्धांत मांडले होते. सोहमने जास्त जड ब्रेकफास्ट करू नये, हलकेच खावे असा काहीसा निष्कर्ष निघाला होता. सोहमने सुद्धा ह्या प्रकाराचा इतका धसका घेतला होता की त्याने केवळ सुक्क्या कॉर्नफ्लेक्सवर आपला नास्ता आटोपला. त्याच्यासमोर पराठे, दही वगैरे वगैरे खाताना माझ्यात अपराधीपणाची भावना निर्माण होत होती. परंतु कर्तव्य पार पाडायचं म्हणून आम्ही हा नास्ता मनसोक्त भक्षण केला!! एक सांगायचं राहून गेलं, वीणा वर्ल्ड तर्फे सर्वांना फराळाची एक मोठी पिशवी आदल्या दिवशी देण्यात आली होती. त्यात बाकरवडी, डाळ, बिस्किटे, डिंक लाडू अशा मनाचा संयम ढळवू पाहणाऱ्या विविध पदार्थांचा समावेश होता. हे सर्व खायचं तरी कधी हा आम्हांला पडलेला प्रश्न! आणि हो डिंकाचा लाडू स्नो पॉइंटला गेल्यावरच मग खा असा अनुभवी सल्ला द्यायला आदित्य विसरला नाही.
सिमला सोडण्याची वेळ आली होती. गणपतीबाप्पा, उंदीरमामांचे स्मरण करून प्रवासास सुरुवात झाली. बिसलेरीच्या बाटल्यांसोबत गोळ्या, प्लास्टिक बॅगाचाही पुरवठा करण्यात आला होता.
सिमला शहर तसे सुरेख! थंड हवामान आणि उंच डोंगरात जमेल तशा एकमेकाला खेटून उभारलेल्या इमारती. पण ह्यात माणसानं निसर्गाला ओरबाडून खरं सौंदर्य नष्ट केल्याची भावना माझ्याच नाही तर सर्वांच्याच मनात निर्माण होत होती. सिमल्यात आदल्या दिवशी पाहिलेल्या ठिकाणात निसर्गाशी थेट नाते जोडणारे ठिकाण म्हणजे फक्त हिमालयीन झू हेच होतं. बाकी सर्व व्यापारीकरणाचे प्रकार! असे असलं तरी सिमला सोडताना काहीशी चुकचुकल्यासारखी भावना होत होती. ऋणानुबंध केवळ माणसांशीच जुळत नाहीत तर ते वास्तू, स्थळे ह्यांच्याशी सुद्धा जुळतात हे आपण अधूनमधून अनुभवत असतो, त्यातलाच हा एक प्रसंग!
आदित्य खिडकीतून दिसणाऱ्या ठिकाणांची अधूनमधून माहिती देत होता. असंच सिमल्याच्या विमानतळाविषयी सुद्धा त्याने माहिती दिली. ह्या विमानतळाचा कारभार हवामानामुळे कसा बेभरवशाचा आहे आणि विमानाची तिकिटे विना -परतावा (non-refundable) असतात हे सांगितलं.
प्रवास चालू होता. क्रमांक १ च्या बालकाची विकेट पडली होती. त्यामुळे बसच्या मागील भागात थोडी गडबड उडाली होती. सुदैवाने मागची मोठी सीट रिकामी होती आणि त्यामुळे काही प्रवाशांचे तिथे स्थलांतर होऊ शकले. प्लास्टिक पिशव्यांसोबत जुन्या पेपरची रद्दी सुद्धा बसमध्ये असायला हवी हा धडा आम्ही शिकलो.
रस्त्याला एका बाजूला ड्रायव्हरला मॅकेनिकचे दुकान दिसलं. बसच्या चाकांना ग्रीस लावायचं केव्हापासून त्याच्या मनात घोळत असावं. त्यामुळे तिथे बस थांबविण्यात आली.
काहीशा दहशतीच्या वातावरणात बसलेली बालके ह्या संधीचा फायदा घेऊन तत्काळ बसमधून बाहेर उतरली. माझं वाहनांविषयीच ज्ञान अगाध! त्यामुळे वाहनांच्या तांत्रिक गोष्टींची चर्चा सुरु झाली की मी एकतर त्यापासून चार हात दूर राहतो किंवा जी जाणकार मंडळी बोलत असतात त्यांच्या ज्ञानाची सतत मान डोलावून दाद देत राहतो. इथे डोंगरावरील रस्ता असल्याने पहिल्या पर्यायाला फारसा वाव नव्हता, म्हणून मी दुसऱ्या पर्यायासोबत मानेचे व्यायाम झाल्याचे समाधान करून घेत होतो. इतक्यात आमच्या चौकस सौंचे लक्ष बाजूला बांधकामासाठी आणून टाकलेल्या वीटाकडे गेले. तिच्यातील जाणकार जागा होऊन ह्या विटांच्या कणखरपणाविषयी तिने सहप्रवाशांना दोन शब्द सांगितले. बसच्या चाकांना लावण्यात येणाऱ्या ग्रीसच्या दीर्घ कार्यक्रमाला वैतागलेली मंडळी  तत्काळ इथे आली. त्यामुळे जोशात येऊन मला आणि कुलकर्णी ह्यांना ह्या विटा उचलण्याची विनंती करण्यात आली. आम्हीसुद्धा ह्या विटा आपल्या महाराष्ट्रातील विटापेक्षा चांगल्याच जड आहेत असे बळेच सांगितले. आता महाराष्ट्रातील वीट मी शेवटी केंव्हा उचलली असेल हे देव जाणो!
असो ह्या वीट प्रकरणाचा पुरावा म्हणून केलेलं हे जबरदस्त छायाचित्र! ह्यालाच जबरदस्ती छायाचित्रण असेही म्हटले जाते. छायाचित्रातील व्यक्तींच्या चेहऱ्यावरील हावभावावरून जाणकारांनी निष्कर्ष काढावाच!







थोड्या वेळाने हे ग्रीस आणि विटा प्रकरण आटपून आम्ही पुन्हा बसमध्ये शिरलो. रस्त्याच्या कडेने स्थानिक लोकांची देवाची पालखी जात होती. पालखी घेवून जाणारे सेवेकरी आपल्या खांद्याच्या हालचालीने पालखीला एक विशिष्ट गती प्राप्त करून देत होते.




 

त्यानंतर थोड्याच वेळात चहापानाचा ब्रेक आला. आतापर्यंत जाणवलेली एक गोष्ट म्हणजे, केवळ वॉश बेसिन ह्या प्रकाराचा अभाव. जे काही वॉश बेसिन असायचं ते टॉयलेटच्या बाहेर असायचं. हा मला काहीसा खटकणारा प्रकार. परंतु इलाज नव्हता. आदित्य, जितेश, अमेय आणि अमोल मंडळी बसमधून उतरायच्या आतच किती चहा, कॉफी आणि शीतपेय ह्याची मोजणी करून घेत आणि त्यानुसार झटपट व्यवस्था करीत. त्यांचे कौतुक करावे तितकं थोडं!


चहापानानंतर आदित्य आणि अमोल ह्यांनी बसला दोन गटात विभागलं. आणि अंताक्षरीचा खेळ सुरु झाला. पुढील अर्धा भाग 'अ' गट आणि मागचा अर्धा भाग 'ब' गट. सोहम आणि प्राजक्ता 'अ' गटात आणि मी 'ब' गटात अशी काहीशी धर्मसंकट निर्माण करणारी परिस्थिती उद्भवली. 'अ' गटात श्री. चुरमुरे, त्यांचा मुलगा अद्वैत ह्यांच्याकडे अनुक्रमे जुन्या आणि नवीन गाण्यांचा चांगलाच खजाना होता. प्राजक्ताने सुद्धा गेल्या काही वर्षात  विकसित केलेल्या आपल्या जुन्या गाण्यांच्या जाणकारितेचा प्रत्यय आणून दिला. आमच्या गटात सौ. कुलकर्णी ह्यांनी आपल्या सुमधुर सुरात पूर्ण गाणी गाऊन प्रवाशांना मंत्रमुग्ध केले. सौ. वेळासकर, मोरे मॅडम ह्यांनी सुद्धा गाण्यांचा चांगला पुरवठा केला. 'ब' गटाने अगदी ६० - ७० च्या काळापासूनची सुंदर गाणी गायली. परंतु 'अ' गट त्याबाजूला काहीतरी गुणगुणे आणि 'ल' हे अक्षर 'ब' गटाला आणून देई. मी दोन वेळा 'लाजून हासणे' आणि 'लुंगी डान्स' (इथे थोडी फसवेगिरी करीत) भेंडी वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु 'ल' ह्या अक्षराच्या सततच्या माऱ्यापुढे आम्ही हतबल झालो. आणि हा हा म्हणता आमच्यावर तीन भेंड्या चढल्या. परंतु पूर्ण गाणी म्हणणे, गाण्याचा दर्जा पाहता आमच्या संघांची कामगिरीच श्रेष्ठ होती असे म्हणावं लागेल. आणि आदित्य 'अ' गटात असल्याने अमोल त्याला 'दादा' 'दादा' म्हणत त्याचेच ऐके. ह्याचासुद्धा अंतिम निकालावर परिणाम झाला. 

दहा ते एक असे तीन तास भेंड्या खेळल्यावर दुपारच्या भोजनाचे ठिकाण आले. ह्या भेंड्यामुळे सहप्रवाशी एकत्र येण्यास खूप मदत झाली. औपचारिकतेची उरलीसुरली बंधनं गळून पडली. आणि हो बालकांचे लक्ष उलटीच्या प्रकारापासून विचलित होण्यास बराच फायदा झाला. 

दुपारच्या जेवणाचे ठिकाण बरेच प्रशस्त होते. इथे केवळ शाकाहारी जेवण होते. परंतु आजूबाजूच्या भव्य परिसरामुळे मस्त वाटलं. भेट दिलेल्या प्रत्येक ठिकाणी फोटो काढला पाहिजे ह्या शिरस्त्यानुसार इथेही थोडीफार फोटोग्राफी झालीच. हल्ली ब्लॉगला उपयोगी पडेल म्हणून मीसुद्धा फारसा विरोध करीत नाही. 







भरपेट जेवण करून सुस्तावलेल्या देहांना 'वीणा वर्ल्ड, वीणा वर्ल्ड' ह्या घोषाने जड पावलानी बसकडे येण्यास भाग पाडलं.  ह्यापुढील रस्ता खरतर अगदी निसर्गरम्य होता आणि त्याचप्रमाणे अगदी धोकादायक वळणावळणाचा सुद्धा. राठी आणि  वेळासकर ह्यांच्या छोट्या मुली एकमेकींच्या खास मैत्रिणी. त्यांच्या मजेशीर बोलण्याने बस जागी रहात असे. परंतु इतक्या दीर्घ प्रवासात त्यांनी झोपावं म्हणून त्यांच्या मातांनी त्यांना बळेच झोपवलं. ह्या प्रवासात सतलज, बियास ह्या दोन मोठ्या नद्या आपल्या भव्य दर्शनाने आमचे मन मोहवून टाकत होत्या. त्यांची ही काही छायाचित्रे!



 

मग एका अरुंद ठिकाणी मेंढ्यांच्या समूहाने आमचा रस्ता अडवला. धावत्या बसमधून काढल्याने फोटोच्या दर्जात थोडी घसरण जाणवेल परंतु ह्या फोटोवरून आमच्या छायाचित्रणाच्या कौशल्याविषयी निष्कर्ष काढण्याची घाई करू नये!!









मध्येच एक अंदाजे तीन मिनिटांचा एक बोगदा येवून गेला.  अंधाऱ्या बोगद्यातून प्रवास करताना सर्वांनी अपेक्षेप्रमाणे आरडओरडा केला. आता ह्या ठिकाणी आम्ही छायाचित्रे का काढली नाहीत अशी शंका सुज्ञ लोकांच्या मनात आली असल्यास ती रास्त आहे इतकेच मी म्हणू इच्छितो. बाकी आदित्याच्या म्हणण्यानुसार हा उत्तर भारतातील / भारतातील / आशियातील (ह्यातील योग्य पर्याय निवडा) किमान क्ष मीटर उंचीवर असलेला सर्वात लांब बोगदा होता. 

बाकी आमचे छायाचित्रण सुरूच होते. काही चित्रात (जसे की ह्या) निसर्गासमवेत एखादी पांढरी आकृती दिसल्यास तो कोणी परग्रहवासी वगैरे असल्याचा संशय मनात येऊन देऊ नये. आमच्या समोरच्या सीटवर घातलेलं कव्हर असंच अधूनमधून फोटोत दिसत राहणार!  


एव्हाना आम्ही कुलूच्या आसपास येऊन पोहोचलो होतो. आजूबाजूच्या प्रदेशाच्या सौंदर्याने मी भारावून गेलो होतो. हिमालयाची आकाशाशी स्पर्धा करणारी शिखरे, त्यातून आपला मार्ग शोधणारा वळणावळणाचा रस्ता. रस्त्याच्या कडेला असणारी जीवनरसाने मुसमुसलेले हिरवेगार उंच डेरेदार वृक्ष आणि मधूनच दिसणारी इवली इवली घरे!  ह्या गावांतून राहणाऱ्या लोकांकडे नुसतं बसमधून जरी पाहिलं तरी त्यांच्या मनातील जीवनाविषयी संतृप्तता कशी जाणवते! जीवन जगावं तर ते आपल्या आणि निसर्गाच्या मर्जीनुसार! उगाचच आर्थिक प्रगतीच्या भ्रामक संकल्पना निर्माण करून त्याच्या मागे धावत धावत आपली शांतता गमावून बसण त्यांना मंजूर नसावं.  



पार्वती आणि बियास ह्या दोन नद्यांच्या संगमाचे हे छायाचित्र!






आता आम्ही कुलू शाल फॅक्टरीत येवून पोहोचलो होतो. अगदी उंच पर्वतांनी वेढलेल्या अशा विभागात असणाऱ्या सपाट भागात ही शाल फॅक्टरी आहे.


प्रथम तिथल्या एका महिलेने आम्हाला शाल विणण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्याची ही चित्रफीत. तिच्या पायाखाली चार पट्ट्या होत्या. डावा पाय एक आणि तीन क्रमांकाच्या पट्ट्यांवर आणि उजवा पाय दोन आणि चार क्रमांकाच्या पट्ट्यांवर ती आळीपाळीने दाबत होती.








ह्या प्रात्यक्षिकानंतर प्रत्यक्ष खरेदीची वेळ होती. तिथे उत्तमोत्तम शाली, स्वेटर्स, जैकेट्स विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. ह्या खरेदीला विशिष्ट वेळ देण्यात आला होता आणि त्यानंतर चहा देण्यात येणार होता. वेळेच्या बाबतीतील  ही शिस्त मला खूपच भावली. तुम्हांला एका विशिष्ट वेळेत खरेदीचा निर्णय घेत यायला हवा असे माझे स्पष्ट मत आहे. एखाद्या दुकानात असणाऱ्या वस्तू दर्जा, विविधता, किंमत ह्या बाबतीत एका विशिष्ट रेंज (पट्ट्यात) मध्ये असतात. पहिला निर्णय म्हणजे ह्या रेंज मधील गोष्ट खरेदी करायची आहे की नाही हा घ्यायचा असतो. नसेल घ्यायची तर आपला, दुकानदाराचा आणि आपल्या सोबतच्या लोकांचा उगाच वेळ घालवू नये. आणि समजा खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर एक लक्षात ठेवावे एक त्या रेंजमधील सर्वात उत्तम गोष्ट आणि सर्वात खराब गोष्ट ह्यात काही फारसा फरक नसतो. निर्णय घेण्यातील चोखंदळपणा आयुष्यातील महत्वाच्या निर्णयाच्या बाबतीत जमला तर दाखवावा!

असो वीस मिनिटात तीन शाली घेऊन आम्ही बाहेर पडलो. ह्यानंतरच्या प्रवासातील निसर्गसौंदर्याचे वर्णन करणे ही माझ्या पामराच्या आवाक्यातील गोष्ट नव्हे. एव्हाना हिमाच्छादित शिखरे काहीशी जवळून दर्शन देऊ लागली होती. सफरचंदाच्या झाडांचे जवळून दर्शन होऊ लागले होते. ह्या सफरचंदांचे दोन प्रकार, रॉयल आणि गोल्डन. ह्या दोन प्रकारातील एक निर्यात केला जातो. आता नक्की कोणता हे जरी आदित्य / जितेशने सांगितलं असलं तरी मला आठवत नाही. मध्येच गुलाबाची फुलांनी अगदी बहरून गेलेली झाडं डोळ्याला अगदी सुखावून जायची. एका झाडावर इतकी फुले असू शकतात हे पाहून मन थक्क होऊन जायचं. 











असाच एक स्वर्गीय अनुभव देणारा प्रवास चालू असताना अचानक आमचं हॉटेल आलं. हे मनालीच्या बाहेरील भागातील हॉटेल होते. आजूबाजूला साधं गाव होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजे सात मेला हिमाचल मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या. तरीही गावातील शांतता अगदी वाखाणण्याजोगी होती. आमची आणि बऱ्याच जणांची खोली चवथ्या मजल्यावर होती. पुन्हा एकदा जड बॅगा थेट खोलीत पोहोचविणाऱ्या वीणा वर्ल्डचे आभार मानावे तितके थोडे!

चौथ्या मजल्यावरील खोलीतून समोर दिसणारा नजारा जबरदस्त होताच. पण त्याहून जबरदस्त होता तो मार्गिकेतून दिसणारा हा हिमाच्छादित शिखरांचा आणि त्यातून जमिनीकडे धाव घेणाऱ्या ह्या सरितेचा! त्यातच हे गाव वसलं होतं. नंतर संध्याकाळी ह्या गावातील घरांतील मिणमिणते दिवे आणि रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांचे दिवे ह्याचे दृश्य मनःपटलावर कायमचे राहील. 

रात्रीचे जेवण देखील वैविध्यपूर्ण होते. हॉटेलचे नाव होते सार्थक रिसोर्ट! सहलीचा हा तिसराच दिवस होता पण ही सहल, हे वातावरण ह्यामुळे एकंदरीत खरोखर ही ट्रीप सार्थक वाटत होती. आयुष्यातील एक अविस्मरणीय सहल म्हणून ही लक्षात राहील ह्याचे आतापासूनच नक्की वाटायला लागलं होतं. आपल्या भारतमातेचा अभिमान द्विगुणित झाला होता. एकंदरीत एका प्रसन्न मनःस्थितीत मनालीच्या पहिल्या रात्री आम्ही निद्राधीन झालो. पुढील तीन दिवसाच्या कार्यक्रमाविषयी उत्सुकता मनात भरली होती. बऱ्याच दिवसांनी मनात खऱ्याखुऱ्या आनंदाचं भरत आलं होतं. 

(क्रमशः)