Monday, May 12, 2014

सिमला कुलू मनाली वीणा वर्ल्ड - भाग २


सकाळी जाग आल्यावर खिडकीबाहेर नजर गेली तर फटफटीत उजाडलं होतं. मी दचकून जागा झालो, निद्रामोड कॉल करायला मंडळी विसरली की काय अशी शंका मनात डोकावली. घड्याळात पाहिलं तर साडेपाचच वाजले होते. त्यामुळे थोड्या बिनधास्तपणे आम्ही आंघोळ वगैरे आटपून घेतली. नियोजित वेळी साडेसातला आम्ही नास्त्यासाठी हजर झालो. तिथे पोहे, प्रिय मित्र आलूची आमटी आणि भटुरे असा मोहविणारा बेत होता. आलुचा अतिरेक आता सर्वांना जरा खटकायला लागला होता. पोटभर नास्ता करून आम्ही बाहेर पडलो. बस निघायला अजून थोडा वेळ होता. बाहेरच आम्हांला पुण्याचे जतिन चुरमुरे कुटुंबीय भेटले. त्यांच्याशी गप्पा मारताना ते मुळचे वसईचे असल्याचे कळले. गावचा माणूस भेटल्याने मला खूप आनंद झाला.
सव्वा आठ वाजता आम्ही प्रयाण केले. आज सकाळी आमच्या बसमध्ये आदित्य भोईटे हे व्यवस्थापक म्हणून उपस्थित होते. त्यांनी दिल्लीहून येणारा ग्रुप बसने आणला होता. काही कारणामुळे त्यांच्या बसला उशीर झाल्याने तो गट रात्री बाराच्या सुमारास हॉटेलात पोहोचला होता. तरीसुद्धा तो ग्रुप सकाळी वेळेवर हजर होता. चंदीगडहून आणि दिल्लीहून आलेल्या अशा दोन गटाच्या बसेस बरोबरीने नाल्देहरा गोल्फ कोर्सच्या दिशेने सुटल्या.


प्रत्येक वेळी बस सुटताना बस व्यवस्थापकाच्या बरोबरीने आम्ही
गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया
उंदीर मामा की जय!
असा घोष करीत असू.


गोल्फ कोर्सचा प्रवास अगदी वळणावळणाचा होता. भरपेट न्याहारी केलेल्या बालकांना ह्या वळणावळणाच्या रस्त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे बालकांभोवतीचा भाग अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला. पूर्व दक्षता म्हणून घेतलेल्या गोळ्यांचा काहीजणांना फायदा झाला तर काहींना नाही.  व्यवस्थापकांनी सर्वांना प्लास्टिकच्या पिशव्यांचा पुरवठा करून ठेवला होता. इतक्या उंचीवर संतुलितपणे गाडी हाकण्याचे ड्रायव्हरचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते.








शेवटी एकदाचे आम्ही  नाल्देहराला पोहोचलो. तिथला इतिहास सांगणारा हा बोर्ड!


गोल्फ कोर्सचे सौंदर्य वाखाणण्याजोगे होते.
इतक्या उंचीवर १ वर्षापूर्वी  गोल्फ कोर्स निर्माण करणाऱ्या ब्रिटिशांचे कौतुक करावे की त्या काळात सामान्य जनतेवर अन्याय करीत असे श्रीमंती चोचले करणाऱ्या त्यांच्या वृत्तीचा निषेध करावा अशा मनःस्थितीत मी सापडलो होतो. गोल्फ कोर्सचा प्रत्यक्षातील वापर फक्त सभासदांपुरता मर्यादित असल्याने आम जनतेसाठी तिथे झीपिंगचा प्रकार आयोजित करण्यात आला होता. प्राजक्ता आणि सोहम ह्या दोघांनी ह्या साहसी क्रीडाप्रकारचा आनंद लुटला. ह्या प्रकारात एक हात वरच्या पुलीवर ठेवायचा होता आणि दुसरे टोक आल्यावर हा हात त्या झिप वायरवर आणून वेग नियंत्रित करायचा होता. परंतु काहीजणांना ह्या वायरवर हात आणायच्या भागाचे महत्व न कळल्याने दुसऱ्या टोकाशी त्यांना काही क्षणापुरता उलट्या स्थितीचा अनुभव करावा लागला.











ह्याच ठिकाणी हिमाचलीय पारंपारिक वेशात फोटो काढून घेण्याची सोय होती. हे फोटो रूमपोच केले जाणार होते. त्यामुळे तिथेही उत्साही लोकांची रांग लागली होती. तिथल्या एका हिमाचलीन युवतीच हे छायाचित्र!





वीणा वर्ल्डचा चहा, कॉफीचा आम्ही आस्वाद घेतला. त्यानंतर आम्हांला फ्रुट प्लेटचा (फळ थाळी) सुद्धा आनंद लुटता आला. ह्यात सुद्धा आमचा मित्र बटाटा आल्याचे पाहून आम्ही सर्द झालो. उत्साही गणांनी बटाटा हे फळ आहे काय यावर बौद्धिक चर्चेस सुरुवात केली. 


ह्यानंतर आम्ही पावसाळी वातावरणात आम्ही जंतरमंतर अर्थात Amusement पार्कच्या दिशेने कूच केले. पावसाने जोर पकडला होता. ह्या जंतरमंतर पार्कला जायचा मार्ग अगदीच अरुंद होता. आमच्या कुशल ड्रायव्हरने तो लीलया पार केला आणि आम्हांला तिथे पोहोचवले. पावसामुळे बाह्य विभागातील करण्यासारख्या लीला (Outdoor Activities) जशा की गो कार्टिंग बंद ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे जाणकार बालगोपाल मंडळी नाखूष झाली. ह्याच ठिकाणी दुपारच्या भोजनाची सोय करण्यात आली होती. इथले भोजनालय आकाराने काहीसे छोटेसे असल्याने आणि त्याचवेळी केसरीचा अजून एक गट तिथे आल्याने काहीशी गर्दी झाली होती.
आता काहीसं पर्यटकांच्या प्रकाराविषयी. पर्यटकांचे विविध प्रकार असू शकतात हे ह्या सहलीत आम्हांला जाणवलं. २०११ मधील केरळ सहल असो की गेल्या वर्षीची सापुतारा सहल असो, आम्ही एकट्यानेच प्रवास केला होता. ह्या प्रकारात आपण बहुदा उत्तमोत्तम हॉटेल्स बुक करतो, जेवणखाण्याची उत्तम सोय असते. परंतु समुहाचा भाग बनून एखाद्या स्थळाचा आनंद लुटण्याची संधी आपण गमावतो. समूहातील लोकांनी केलेल्या गंमतीजंमती, त्यांचे विनोदी संवाद, काही जणांच्या मजेशीर सवयी ह्यातदेखील धमाल असते हे ह्यावेळी आम्हांला  जाणवलं. त्याचप्रमाणे मुलांना खेळण्यासाठी सवंगडी मिळतात आणि त्यामुळे आपली जबाबदारी सुद्धा कमी होते. त्यामुळे लांब ठिकाणच्या सहलीत आता अशा गटाने प्रवास करण्याकडेच आमचा कल राहील. त्याचबरोबर आमच्या गटातसुद्धा विविध व्यवसायातील यशस्वी माणसे होती. थोडसं निरीक्षण केलं तर प्रत्येकाकडून शिकण्यासारखं असं बरंच काही होतं. केल्याने देशाटन अंगी येते शहाणपण असे म्हणतात त्यात हा भागही आलाच की! अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना सुद्धा असं काही शेयर करण्याची, काहीशी गैरसोय सहन करण्याची सवय असावयास हवी. नाहीतर अगदी लहानपणापासून त्यांच्यात स्वतःला सर्व काही उत्तमोत्तम मिळावयास हवं अशी जी भावना निर्माण  होते ती पुढे धोकादायक ठरू शकते.
असो पण काही लोक खरोखर एकलकोंडे ह्या प्रकारात मोडतात. त्यांना अनोळखी माणसांचा अगदी जवळचा सहवास फारसा खपत नाही. त्यांनी आपली एकट्याने प्रवास करण्याची सवय कायम ठेवणेच योग्य.
बाह्यलीला बंद असल्याने जंतरमंतर पार्कातील अंतर्गत लीलांकडे मंडळी वळली होती. तिथे ५D राइड, टक्करकार आणि भयमहाल असे तीन प्रकार होते. ह्या प्रत्येक प्रकाराचे वैयक्तिक भाडे २०० रुपये असले तरी वीणा वर्ल्डच्या पर्यटकांना सवलतीच्या दरात ह्या तिन्ही प्रकारांची एकत्रित फी ३०० रुपये होती. आता बालक जायचे म्हटले की पालकाला अजिबात इच्छा नसली तरी जावे लागणारच हे ओघाने आलेच की! आमचा प्राधान्यक्रम चुकला आणि आम्ही ५D राइडच्या रांगेत बराच वेळ तिष्ठत उभे राहिलो. ही राईड तशी ठीक होती. हलणाऱ्या खुर्चीवर आम्हाला बसविण्यात येऊन आमच्यासमोर गुरुत्वाकर्षणाचे सर्व नियम झुगारून देणारी आणि केव्हाही उंचावरून जमिनीवर आपटू शकण्याची शक्यता निर्माण करणारी दृश्ये दाखविण्यात येत होती. पायाजवळ पाण्याचा फवारा वगैरे मारण्यात येत होता. हल्लीच्या मुलांना ह्या प्रकारात काही भीती वाटत नसली तरी केवळ मजेपोटी ती किंचाळ्या वगैरे मारीत होती. अशा दोन वेगवेगळ्या राईड नंतर हा प्रकार संपला. एव्हाना वीणा वर्ल्डवाले आमच्या नावाने शंख करू लागले होते. त्यामुळे बाकीच्या दोन लीलांकडे दुर्लक्ष करून आम्ही बसमध्ये जाऊन बसलो.


आता आमची बस हिमालयन झूच्या मार्गी लागली होती. ह्या झूच्या अगदी शेवटापर्यंत जाण्याचा रस्ता नसल्याने एका विशिष्ट बिंदूपाशी आम्हांला सोडून तिथून सुमो, तवेरा इत्यादी वर्गातील गाड्यांमधून झू मध्ये जाण्याची सोय करण्यात आली होती. भ्रमणध्वनीच्या कॅमेरावर निशुल्क फोटोग्राफीची मुभा असली तरी खऱ्या  कॅमेरावर छायाचित्रणासाठी पंचवीस रुपये शुल्क होते. ते आम्ही भरले. वातावरण अगदी कुंद झालं होते. छत्री घेऊन नैसर्गिक वातावरणात राहणाऱ्या ह्या प्राण्यांना पाहणे हा एक नक्कीच आनंददायी अनुभव होता. तिथल्या विविध प्राण्यांची ही छायाचित्रे!












हे मात्र प्राणी नव्हेत! :)




अशा प्रकारे जवळपास अर्ध्या तासाचा झूचा प्रवास आटपून आम्ही जवळच असलेल्या इंदिरा गांधी स्मारकाला भेट दिली. हा सिमलामधील सर्वात उंच बिंदू असून (समुद्रसपाटीपासूनची उंची अंदाजे २६०० मीटर) सिमल्यात सर्वात पहिली हिमवर्षाव ह्या भागात होतो अशी माहिती आदित्य भोईटे ह्यांनी दिली. ह्याच ठिकाणी इथेच इंदिरा गांधी आणि झुल्फिकार (बहुदा) भुत्तो ह्यांची भेट झाली होती. त्यावेळी सिमलावासियांची ह्या ठिकाणी गर्दी उसळली होती. ही गर्दी ह्या मातबर राजकारण्यांना पाहण्यासाठी नसून भुत्तो ह्यांच्यासमवेत आलेल्या त्यांच्या अतिसुंदर कन्येला पाहण्यासाठी होती असा खुलासा ज्यावेळी आदित्याने केला तेव्हा आमच्या गटात हास्याची खसखस पिकली. चहा, कॉफीपानाचा कार्यक्रम आटपून आम्ही पुन्हा छोट्या गाड्यांत बसून बसच्या दिशेने निघालो. छोट्या गाड्यांत बसण्याआधी याकचे दर्शन झाले.


आता आम्ही सुप्रसिद्ध सिमला मॉल रोडवर जाणार होतो. काही बालके भिजल्याने त्यांच्या मातांनी हॉटेलवर परतण्याचा निर्णय घेतला. सिमला मॉल तीन पातळ्यांवर विभागला गेला आहे आणि प्रत्येक पातळीची स्वतःची अशी खासियत आहे. आदित्य आम्हांला हे अत्यंत विस्तृतपणे समजावून देत होता. परंतु माझे त्याच्याकडे फारसं लक्ष नव्हतं. आम्हांला सोडून बस हॉटेलकडे रवाना झाली. दोन उद्वाहकांचा वापर करून आम्ही मॉलरोडवर आलो. तिथे आम्हां सर्वांना वीणावर्ल्ड तर्फे पॅटीस, बर्गर अशा पदार्थांची छोटेखानी ट्रीट देण्यात आली. वातावरण अगदी थंड झाले होते. त्यामुळे तिथल्या चहा, कॉफीने बरे वाटले. इथे उतरण्याआधी खरेदी करण्यासाठी कुलू शाल  फॅक्टरी आणि मनाली मार्केट उत्तम असा प्रेमळ सल्ला आम्हांला देण्यात आला होता. वीणा वर्ल्डचे हे अनुभवी बोल नवरेलोकांनी मोठ्या खुशीने मानले.


आम्ही आणि कुलकर्णी कुटुंब ह्यांनी आपला मोर्चा वरच्या पातळीवर असणाऱ्या चर्चकडे वळविला. ह्या चर्चच्या मार्गावरून सिमल्याचे दिसणारे हे विहंगम दृश्य.











हे चर्च उत्तर भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वात जुने चर्च आहे. त्याची ही काही छायाचित्रे!









इथेच इंदिरा गांधीचा एक सुंदर पुतळा आहे! पुन्हा काही वेळ कौटुंबिक छायाचित्रणासाठी!
















खाली उतरल्यावर चेरी खरेदी करण्यात आली.


ह्या रस्त्यावर स्थानिक खाद्यपर्दाथांची रेलचेल होती. पण बर्गर, पॅटीसने पोट भरली असल्याने त्याचा आस्वाद घेण्याची आमची फारशी इच्छा झाली नाही. साडेसात वाजेस्तोवर आदित्य, जितेश ह्यांनी सर्व कुटुंबियांची हजेरी (चांगल्या अर्थाने!) घेत सर्वजण परत आल्याची खातरजमा करून घेतली. एव्हाना ह्या हजेरी प्रकरणामुळे आम्ही सर्वजण एकमेकांना चांगले ओळखू लागलो होतो. वेळा सकर आणि राठी कुटुंबियातील फक्त यजमान ह्या ठिकाणी आले  होते. त्यांनी वैविध्यपूर्ण फळांची (अप्रीकोट वगैरे) खरेदी करून आपल्या गृहकृत्यदक्षतेचा आम्हाला अनुभव आणून दिला!
आमची बस हॉटेलवर गेल्याने आता आमची सोय हिमाचल प्रदेश परिवहन निगमच्या बसमध्ये करण्यात आली. त्यात आम्ही सर्व बसल्यावर त्या बसच्या ड्रायव्हरने मुक्तपणे बस चालवीत आम्हांला हॉटेलवर आणून सोडले. ह्यात वीणा वर्ल्डच्या आयोजन कौशल्याची दाद द्यावी इतकी थोडी! त्यांनी हिमाचल प्रदेश परिवहन निगमच्या बस उपलब्ध करून देण्याची दक्षता घेतली होती.


हा दिवस जितेशने म्हटल्याप्रमाणे बराच लांबला होता. अजून स्वपरिचयाचा  (introduction) कार्यक्रम बाकी होता. ठीक साडेआठ - पावणेनऊच्या सुमारास हा कार्यक्रम सुरु झाला. दोन्ही बसचा मिळून एक मोठासा गट बनला होता. ह्यात डॉक्टर, पी. एच. डी धारक, ज्येष्ठ पोलिस अधिकारी, भ्रष्टाचारविरुद्ध काम करणारे, आयकर विभागात  काम करणारे अशा विविध लोकांचा समावेश होता. भ्रष्टाचारविरुद्ध काम करणाऱ्या महिलेचा दूरध्वनी क्रमांक जाणून घेण्यात सर्वांनी रस दाखविला, तर आयकर विभागात काम करणाऱ्या गृहस्थांना आम्ही आमचा नंबर देणार नाही असे मजेत सांगितलं!


मग वीणा वर्ल्डच्या टीमने आपली ओळख करून दिली. आदित्य गेली दहावर्षे ह्या क्षेत्रात आहे तर जितेश गेली पाच वर्षे! आदित्याची ही हिमाचल प्रदेशाची एकशेएकतिसावी सहल तर जितेशची पस्तिसावी! अशा अनुभवी लोकांसोबत आपण प्रवास करतो आहोत ही भावना सुखदायक होती! शेवटी त्यांनी पुढील दिवसाचा कार्यक्रम समजावून सांगितला. दुसऱ्या दिवशी आम्ही मनालीला कूच करणार होतो. हा प्रवास २७५ किमी इतका होता. त्यामुळे काहीसे लवकर निघावे लागणार होते. सकाळी पाच वाजताच गरम पाणी सोडण्याचे आश्वासन देऊन आदित्यने आम्हांला जेवणासाठी मोकळे केले. आता थोडंच खाल्लं पाहिजे असा केलेला निर्धार समोरील सुग्रास जेवण पाहून पुन्हा एकदा मोडून पडला!!!




No comments:

Post a Comment