सिमल्यातील सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहताना दुसरा दिवस काहीसा दमवणूक करणारा ठरला होता. आणि तिसऱ्या दिवशी मनालीचा २७५ किमीचा पल्ला गाठायचा होता. दोन दिवसात हॉटेल डॉन मध्ये काही प्रमाणात संसार मांडला होता. हा संसार रात्रीच सावरून बॅगात भरायचा की सकाळी उठून भरायचा ह्यावर चर्चा करतानाच झोप लागल्याने आपसूकपणे दुसऱ्या पर्यायाचा विजय झाला होता.
६ मे! लग्नाचा १३ वाढदिवस! पाच सव्वापाचला उठून बॅगा भरतानाच घरच्यांनी अभिष्टचिंतनाचे फोन करण्यास सुरुवात केली. दरवर्षीप्रमाणे लग्नाला इतकी वर्षे झाली ह्यावर विश्वास बसत नव्हता. बॅगा पावणेसात वाजता खोलीबाहेर काढून ठेवायच्या होत्या. निद्रामोड कॉलमध्ये ह्याचीसुद्धा आठवण करूनदेण्यात आली होती. बॅगा भरण्याची जबाबदारी प्राजक्ताकडे असल्याने त्यात लुडबुड न करणे आणि तिने दिलेल्या सूचनांचे आज्ञाधारकपणे पालन करणे हे आम्ही दोघे व्यवस्थित पार पाडत होतो. शेवटी तिघांच्या आंघोळी आटपून बॅगा सहा पन्नासला खोलीबाहेर निघाल्या तेव्हा आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.
आदल्या दिवशी सकाळी वळणावळणाच्या रस्त्यांचा ज्यांना त्रास झाला होता त्या बालकांच्या मातांनी आपापसात सुसंवाद साधला होता आणि विविध सिद्धांत मांडले होते. सोहमने जास्त जड ब्रेकफास्ट करू नये, हलकेच खावे असा काहीसा निष्कर्ष निघाला होता. सोहमने सुद्धा ह्या प्रकाराचा इतका धसका घेतला होता की त्याने केवळ सुक्क्या कॉर्नफ्लेक्सवर आपला नास्ता आटोपला. त्याच्यासमोर पराठे, दही वगैरे वगैरे खाताना माझ्यात अपराधीपणाची भावना निर्माण होत होती. परंतु कर्तव्य पार पाडायचं म्हणून आम्ही हा नास्ता मनसोक्त भक्षण केला!! एक सांगायचं राहून गेलं, वीणा वर्ल्ड तर्फे सर्वांना फराळाची एक मोठी पिशवी आदल्या दिवशी देण्यात आली होती. त्यात बाकरवडी, डाळ, बिस्किटे, डिंक लाडू अशा मनाचा संयम ढळवू पाहणाऱ्या विविध पदार्थांचा समावेश होता. हे सर्व खायचं तरी कधी हा आम्हांला पडलेला प्रश्न! आणि हो डिंकाचा लाडू स्नो पॉइंटला गेल्यावरच मग खा असा अनुभवी सल्ला द्यायला आदित्य विसरला नाही.
सिमला सोडण्याची वेळ आली होती. गणपतीबाप्पा, उंदीरमामांचे स्मरण करून प्रवासास सुरुवात झाली. बिसलेरीच्या बाटल्यांसोबत गोळ्या, प्लास्टिक बॅगाचाही पुरवठा करण्यात आला होता.
सिमला शहर तसे सुरेख! थंड हवामान आणि उंच डोंगरात जमेल तशा एकमेकाला खेटून उभारलेल्या इमारती. पण ह्यात माणसानं निसर्गाला ओरबाडून खरं सौंदर्य नष्ट केल्याची भावना माझ्याच नाही तर सर्वांच्याच मनात निर्माण होत होती. सिमल्यात आदल्या दिवशी पाहिलेल्या ठिकाणात निसर्गाशी थेट नाते जोडणारे ठिकाण म्हणजे फक्त हिमालयीन झू हेच होतं. बाकी सर्व व्यापारीकरणाचे प्रकार! असे असलं तरी सिमला सोडताना काहीशी चुकचुकल्यासारखी भावना होत होती. ऋणानुबंध केवळ माणसांशीच जुळत नाहीत तर ते वास्तू, स्थळे ह्यांच्याशी सुद्धा जुळतात हे आपण अधूनमधून अनुभवत असतो, त्यातलाच हा एक प्रसंग!
आदित्य खिडकीतून दिसणाऱ्या ठिकाणांची अधूनमधून माहिती देत होता. असंच सिमल्याच्या विमानतळाविषयी सुद्धा त्याने माहिती दिली. ह्या विमानतळाचा कारभार हवामानामुळे कसा बेभरवशाचा आहे आणि विमानाची तिकिटे विना -परतावा (non-refundable) असतात हे सांगितलं.
प्रवास चालू होता. क्रमांक १ च्या बालकाची विकेट पडली होती. त्यामुळे बसच्या मागील भागात थोडी गडबड उडाली होती. सुदैवाने मागची मोठी सीट रिकामी होती आणि त्यामुळे काही प्रवाशांचे तिथे स्थलांतर होऊ शकले. प्लास्टिक पिशव्यांसोबत जुन्या पेपरची रद्दी सुद्धा बसमध्ये असायला हवी हा धडा आम्ही शिकलो.
रस्त्याला एका बाजूला ड्रायव्हरला मॅकेनिकचे दुकान दिसलं. बसच्या चाकांना ग्रीस लावायचं केव्हापासून त्याच्या मनात घोळत असावं. त्यामुळे तिथे बस थांबविण्यात आली.
काहीशा दहशतीच्या वातावरणात बसलेली बालके ह्या संधीचा फायदा घेऊन तत्काळ बसमधून बाहेर उतरली. माझं वाहनांविषयीच ज्ञान अगाध! त्यामुळे वाहनांच्या तांत्रिक गोष्टींची चर्चा सुरु झाली की मी एकतर त्यापासून चार हात दूर राहतो किंवा जी जाणकार मंडळी बोलत असतात त्यांच्या ज्ञानाची सतत मान डोलावून दाद देत राहतो. इथे डोंगरावरील रस्ता असल्याने पहिल्या पर्यायाला फारसा वाव नव्हता, म्हणून मी दुसऱ्या पर्यायासोबत मानेचे व्यायाम झाल्याचे समाधान करून घेत होतो. इतक्यात आमच्या चौकस सौंचे लक्ष बाजूला बांधकामासाठी आणून टाकलेल्या वीटाकडे गेले. तिच्यातील जाणकार जागा होऊन ह्या विटांच्या कणखरपणाविषयी तिने सहप्रवाशांना दोन शब्द सांगितले. बसच्या चाकांना लावण्यात येणाऱ्या ग्रीसच्या दीर्घ कार्यक्रमाला वैतागलेली मंडळी तत्काळ इथे आली. त्यामुळे जोशात येऊन मला आणि कुलकर्णी ह्यांना ह्या विटा उचलण्याची विनंती करण्यात आली. आम्हीसुद्धा ह्या विटा आपल्या महाराष्ट्रातील विटापेक्षा चांगल्याच जड आहेत असे बळेच सांगितले. आता महाराष्ट्रातील वीट मी शेवटी केंव्हा उचलली असेल हे देव जाणो!
असो ह्या वीट प्रकरणाचा पुरावा म्हणून केलेलं हे जबरदस्त छायाचित्र! ह्यालाच जबरदस्ती छायाचित्रण असेही म्हटले जाते. छायाचित्रातील व्यक्तींच्या चेहऱ्यावरील हावभावावरून जाणकारांनी निष्कर्ष काढावाच!
थोड्या वेळाने हे ग्रीस आणि विटा प्रकरण आटपून आम्ही पुन्हा बसमध्ये शिरलो. रस्त्याच्या कडेने स्थानिक लोकांची देवाची पालखी जात होती. पालखी घेवून जाणारे सेवेकरी आपल्या खांद्याच्या हालचालीने पालखीला एक विशिष्ट गती प्राप्त करून देत होते.
त्यानंतर थोड्याच वेळात चहापानाचा ब्रेक आला. आतापर्यंत जाणवलेली एक गोष्ट म्हणजे, केवळ वॉश बेसिन ह्या प्रकाराचा अभाव. जे काही वॉश बेसिन असायचं ते टॉयलेटच्या बाहेर असायचं. हा मला काहीसा खटकणारा प्रकार. परंतु इलाज नव्हता. आदित्य, जितेश, अमेय आणि अमोल मंडळी बसमधून उतरायच्या आतच किती चहा, कॉफी आणि शीतपेय ह्याची मोजणी करून घेत आणि त्यानुसार झटपट व्यवस्था करीत. त्यांचे कौतुक करावे तितकं थोडं!
चहापानानंतर आदित्य आणि अमोल ह्यांनी बसला दोन गटात विभागलं. आणि अंताक्षरीचा खेळ सुरु झाला. पुढील अर्धा भाग 'अ' गट आणि मागचा अर्धा भाग 'ब' गट. सोहम आणि प्राजक्ता 'अ' गटात आणि मी 'ब' गटात अशी काहीशी धर्मसंकट निर्माण करणारी परिस्थिती उद्भवली. 'अ' गटात श्री. चुरमुरे, त्यांचा मुलगा अद्वैत ह्यांच्याकडे अनुक्रमे जुन्या आणि नवीन गाण्यांचा चांगलाच खजाना होता. प्राजक्ताने सुद्धा गेल्या काही वर्षात विकसित केलेल्या आपल्या जुन्या गाण्यांच्या जाणकारितेचा प्रत्यय आणून दिला. आमच्या गटात सौ. कुलकर्णी ह्यांनी आपल्या सुमधुर सुरात पूर्ण गाणी गाऊन प्रवाशांना मंत्रमुग्ध केले. सौ. वेळासकर, मोरे मॅडम ह्यांनी सुद्धा गाण्यांचा चांगला पुरवठा केला. 'ब' गटाने अगदी ६० - ७० च्या काळापासूनची सुंदर गाणी गायली. परंतु 'अ' गट त्याबाजूला काहीतरी गुणगुणे आणि 'ल' हे अक्षर 'ब' गटाला आणून देई. मी दोन वेळा 'लाजून हासणे' आणि 'लुंगी डान्स' (इथे थोडी फसवेगिरी करीत) भेंडी वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु 'ल' ह्या अक्षराच्या सततच्या माऱ्यापुढे आम्ही हतबल झालो. आणि हा हा म्हणता आमच्यावर तीन भेंड्या चढल्या. परंतु पूर्ण गाणी म्हणणे, गाण्याचा दर्जा पाहता आमच्या संघांची कामगिरीच श्रेष्ठ होती असे म्हणावं लागेल. आणि आदित्य 'अ' गटात असल्याने अमोल त्याला 'दादा' 'दादा' म्हणत त्याचेच ऐके. ह्याचासुद्धा अंतिम निकालावर परिणाम झाला.
दहा ते एक असे तीन तास भेंड्या खेळल्यावर दुपारच्या भोजनाचे ठिकाण आले. ह्या भेंड्यामुळे सहप्रवाशी एकत्र येण्यास खूप मदत झाली. औपचारिकतेची उरलीसुरली बंधनं गळून पडली. आणि हो बालकांचे लक्ष उलटीच्या प्रकारापासून विचलित होण्यास बराच फायदा झाला.
दुपारच्या जेवणाचे ठिकाण बरेच प्रशस्त होते. इथे केवळ शाकाहारी जेवण होते. परंतु आजूबाजूच्या भव्य परिसरामुळे मस्त वाटलं. भेट दिलेल्या प्रत्येक ठिकाणी फोटो काढला पाहिजे ह्या शिरस्त्यानुसार इथेही थोडीफार फोटोग्राफी झालीच. हल्ली ब्लॉगला उपयोगी पडेल म्हणून मीसुद्धा फारसा विरोध करीत नाही.
भरपेट जेवण करून सुस्तावलेल्या देहांना 'वीणा वर्ल्ड, वीणा वर्ल्ड' ह्या घोषाने जड पावलानी बसकडे येण्यास भाग पाडलं. ह्यापुढील रस्ता खरतर अगदी निसर्गरम्य होता आणि त्याचप्रमाणे अगदी धोकादायक वळणावळणाचा सुद्धा. राठी आणि वेळासकर ह्यांच्या छोट्या मुली एकमेकींच्या खास मैत्रिणी. त्यांच्या मजेशीर बोलण्याने बस जागी रहात असे. परंतु इतक्या दीर्घ प्रवासात त्यांनी झोपावं म्हणून त्यांच्या मातांनी त्यांना बळेच झोपवलं. ह्या प्रवासात सतलज, बियास ह्या दोन मोठ्या नद्या आपल्या भव्य दर्शनाने आमचे मन मोहवून टाकत होत्या. त्यांची ही काही छायाचित्रे!
मग एका अरुंद ठिकाणी मेंढ्यांच्या समूहाने आमचा रस्ता अडवला. धावत्या बसमधून काढल्याने फोटोच्या दर्जात थोडी घसरण जाणवेल परंतु ह्या फोटोवरून आमच्या छायाचित्रणाच्या कौशल्याविषयी निष्कर्ष काढण्याची घाई करू नये!!
मध्येच एक अंदाजे तीन मिनिटांचा एक बोगदा येवून गेला. अंधाऱ्या बोगद्यातून प्रवास करताना सर्वांनी अपेक्षेप्रमाणे आरडओरडा केला. आता ह्या ठिकाणी आम्ही छायाचित्रे का काढली नाहीत अशी शंका सुज्ञ लोकांच्या मनात आली असल्यास ती रास्त आहे इतकेच मी म्हणू इच्छितो. बाकी आदित्याच्या म्हणण्यानुसार हा उत्तर भारतातील / भारतातील / आशियातील (ह्यातील योग्य पर्याय निवडा) किमान क्ष मीटर उंचीवर असलेला सर्वात लांब बोगदा होता.
बाकी आमचे छायाचित्रण सुरूच होते. काही चित्रात (जसे की ह्या) निसर्गासमवेत एखादी पांढरी आकृती दिसल्यास तो कोणी परग्रहवासी वगैरे असल्याचा संशय मनात येऊन देऊ नये. आमच्या समोरच्या सीटवर घातलेलं कव्हर असंच अधूनमधून फोटोत दिसत राहणार!
एव्हाना आम्ही कुलूच्या आसपास येऊन पोहोचलो होतो. आजूबाजूच्या प्रदेशाच्या सौंदर्याने मी भारावून गेलो होतो. हिमालयाची आकाशाशी स्पर्धा करणारी शिखरे, त्यातून आपला मार्ग शोधणारा वळणावळणाचा रस्ता. रस्त्याच्या कडेला असणारी जीवनरसाने मुसमुसलेले हिरवेगार उंच डेरेदार वृक्ष आणि मधूनच दिसणारी इवली इवली घरे! ह्या गावांतून राहणाऱ्या लोकांकडे नुसतं बसमधून जरी पाहिलं तरी त्यांच्या मनातील जीवनाविषयी संतृप्तता कशी जाणवते! जीवन जगावं तर ते आपल्या आणि निसर्गाच्या मर्जीनुसार! उगाचच आर्थिक प्रगतीच्या भ्रामक संकल्पना निर्माण करून त्याच्या मागे धावत धावत आपली शांतता गमावून बसण त्यांना मंजूर नसावं.
पार्वती आणि बियास ह्या दोन नद्यांच्या संगमाचे हे छायाचित्र!
आता आम्ही कुलू शाल फॅक्टरीत येवून पोहोचलो होतो. अगदी उंच पर्वतांनी वेढलेल्या अशा विभागात असणाऱ्या सपाट भागात ही शाल फॅक्टरी आहे.
ह्या प्रात्यक्षिकानंतर प्रत्यक्ष खरेदीची वेळ होती. तिथे उत्तमोत्तम शाली, स्वेटर्स, जैकेट्स विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. ह्या खरेदीला विशिष्ट वेळ देण्यात आला होता आणि त्यानंतर चहा देण्यात येणार होता. वेळेच्या बाबतीतील ही शिस्त मला खूपच भावली. तुम्हांला एका विशिष्ट वेळेत खरेदीचा निर्णय घेत यायला हवा असे माझे स्पष्ट मत आहे. एखाद्या दुकानात असणाऱ्या वस्तू दर्जा, विविधता, किंमत ह्या बाबतीत एका विशिष्ट रेंज (पट्ट्यात) मध्ये असतात. पहिला निर्णय म्हणजे ह्या रेंज मधील गोष्ट खरेदी करायची आहे की नाही हा घ्यायचा असतो. नसेल घ्यायची तर आपला, दुकानदाराचा आणि आपल्या सोबतच्या लोकांचा उगाच वेळ घालवू नये. आणि समजा खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर एक लक्षात ठेवावे एक त्या रेंजमधील सर्वात उत्तम गोष्ट आणि सर्वात खराब गोष्ट ह्यात काही फारसा फरक नसतो. निर्णय घेण्यातील चोखंदळपणा आयुष्यातील महत्वाच्या निर्णयाच्या बाबतीत जमला तर दाखवावा!
असो वीस मिनिटात तीन शाली घेऊन आम्ही बाहेर पडलो. ह्यानंतरच्या प्रवासातील निसर्गसौंदर्याचे वर्णन करणे ही माझ्या पामराच्या आवाक्यातील गोष्ट नव्हे. एव्हाना हिमाच्छादित शिखरे काहीशी जवळून दर्शन देऊ लागली होती. सफरचंदाच्या झाडांचे जवळून दर्शन होऊ लागले होते. ह्या सफरचंदांचे दोन प्रकार, रॉयल आणि गोल्डन. ह्या दोन प्रकारातील एक निर्यात केला जातो. आता नक्की कोणता हे जरी आदित्य / जितेशने सांगितलं असलं तरी मला आठवत नाही. मध्येच गुलाबाची फुलांनी अगदी बहरून गेलेली झाडं डोळ्याला अगदी सुखावून जायची. एका झाडावर इतकी फुले असू शकतात हे पाहून मन थक्क होऊन जायचं.
असाच एक स्वर्गीय अनुभव देणारा प्रवास चालू असताना अचानक आमचं हॉटेल आलं. हे मनालीच्या बाहेरील भागातील हॉटेल होते. आजूबाजूला साधं गाव होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजे सात मेला हिमाचल मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या. तरीही गावातील शांतता अगदी वाखाणण्याजोगी होती. आमची आणि बऱ्याच जणांची खोली चवथ्या मजल्यावर होती. पुन्हा एकदा जड बॅगा थेट खोलीत पोहोचविणाऱ्या वीणा वर्ल्डचे आभार मानावे तितके थोडे!
चौथ्या मजल्यावरील खोलीतून समोर दिसणारा नजारा जबरदस्त होताच. पण त्याहून जबरदस्त होता तो मार्गिकेतून दिसणारा हा हिमाच्छादित शिखरांचा आणि त्यातून जमिनीकडे धाव घेणाऱ्या ह्या सरितेचा! त्यातच हे गाव वसलं होतं. नंतर संध्याकाळी ह्या गावातील घरांतील मिणमिणते दिवे आणि रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांचे दिवे ह्याचे दृश्य मनःपटलावर कायमचे राहील.
रात्रीचे जेवण देखील वैविध्यपूर्ण होते. हॉटेलचे नाव होते सार्थक रिसोर्ट! सहलीचा हा तिसराच दिवस होता पण ही सहल, हे वातावरण ह्यामुळे एकंदरीत खरोखर ही ट्रीप सार्थक वाटत होती. आयुष्यातील एक अविस्मरणीय सहल म्हणून ही लक्षात राहील ह्याचे आतापासूनच नक्की वाटायला लागलं होतं. आपल्या भारतमातेचा अभिमान द्विगुणित झाला होता. एकंदरीत एका प्रसन्न मनःस्थितीत मनालीच्या पहिल्या रात्री आम्ही निद्राधीन झालो. पुढील तीन दिवसाच्या कार्यक्रमाविषयी उत्सुकता मनात भरली होती. बऱ्याच दिवसांनी मनात खऱ्याखुऱ्या आनंदाचं भरत आलं होतं.
(क्रमशः)
No comments:
Post a Comment