जसजसं चंदीगड जवळ येऊ लागलं तसतसं शालेय जीवनात शिकलेल्या 'चंदीगड हे एक सुनियोजित शहर आहे' ह्या विधानाची आठवण देणारी दृश्य खिडकीतून दिसू लागली.
प्राजक्ताला वीणा वर्ल्डने सांगितल्याप्रमाणे विमान पावणेअकरा वाजता म्हणजेच सव्वादोन तासाच्या प्रवासानंतर चंदीगडला उतरलं. विमानतळावर उतरल्यावर आमच्या बॅगा मिळवण्यात फारशी अडचण आली नाही. ह्या विमानतळावरील वातावरण सोनियाच्या अपेक्षित आगमनाने भारून गेलेलं होते. एका वैमानिक कप्तानाच्या आगमनासाठी इतकी सुरक्षा व्यवस्था का असा प्रश्न मला पडण्याआधीच ही सोनिया म्हणजे बाळ राहुल ह्यांची माताश्री असल्याचं आम्हांला सांगण्यात आले. वीणा वर्ल्डचे जितेश हे ह्या सुरक्षाव्यवस्थेमुळे आत येऊ शकले नाहीत. आम्ही वीणा वर्ल्डच्या सदस्यांनी जमेल तितका एक गट करून बाह्यविभागात प्रवेश केला. तिथे पिवळ्या रंगाच्या टी शर्ट मध्ये जितेश हे वीणा वर्ल्डचा झेंडा घेऊन हजर होते.
पुढे आठ दिवस हा टी शर्ट आणि झेंडा ह्यांनी आम्हांला 'ये पिला रंग अब मुझे छोडे ना!' ह्या गाण्याची (लाल ऐवजी पिवळा रंग वापरण्याची मुभा आम्हाला असावी!) आठवण करून दिली.
सोनियाप्रभावामुळे बस पार्किंग लॉटमध्ये असल्याने आम्हांला तिथपर्यंत बॅगा न्याव्या लागल्या. ह्या क्षणापासून ते पुढील रविवारी ह्याच विमानतळावर प्रवेश करेपर्यंत आम्हांला एकदाही ह्या जड बॅगा परत उचलाव्या लागल्या नाहीत. वीणा वर्ल्डचे ह्या बाबत आभार मानावे तितके थोडे!
बसमध्ये सर्व मंडळी स्थानापन्न झाल्यावर जितेश ह्यांनी सर्वांचे स्वागत करून त्या दिवसाच्या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती करून दिली. प्रत्येकाला दिलेले आसनक्रमांक आठ दिवसाच्या प्रवासात कायम राहणार होते. दररोज प्रत्येक सदस्याला एक बिसलेरीची पाण्याची बाटली सकाळी देण्यात येणार होती. बाहेरील पाणी प्यायचं टाळा असा प्रेमळ सल्ला द्यायला जितेश विसरला नाही. बसमध्ये पडदे नव्हते. दिल्लीतील १६ डिसेंबरच्या निर्भया प्रकरणानंतर दिल्ली, पंजाब, हरयाणा ह्या राज्यांत सर्व सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसमध्ये पडदे लावण्यास बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती जितेशने दिली. ह्या भागात सार्वजनिक ठिकाणी मद्यपानास बंदी आहे अशी काहीशी आश्चर्यकारक माहिती आम्हांला मिळाली.
दहा मिनिटातच आमची बस जेवणासाठी एका चांगल्या हॉटेलात थांबली. तिथे थोड्या वेळातच आमच्यासाठी एका स्वतंत्र विभागात बुफे पद्धतीचे जेवण मांडण्यात आले. पदार्थांमध्ये विविधता होती आणि मांसाहारी जेवण एका कोपऱ्यात ठेवण्यात आले होते. पुढील आठ दिवसात मांसाहारी जेवण एका कोपऱ्यात ठेवण्याची पद्धत कायम राखण्यात आली. अमेरिकेत असताना बुफे पद्धतीत आपण जेव्हा पुन्हा पदार्थ वाढून घ्यायला जातो त्यावेळी नवीन प्लेट घेण्याची एक उत्तम पद्धत आहे. उष्टं घेवून परत जाऊ नये हा हेतू! भारतात सुद्धा काही ठिकाणी ही पद्धत अवलंबितात. ही पद्धत सर्वत्र अंमलात आणावयास हवी. म्हणजे पहा ना, ज्यात मांसाहारी पदार्थ खाल्ले गेले तीच प्लेट घेऊन एखादा भाजी घेण्यास परत गेला, तर ते नक्कीच कट्टर शाकाहारी माणसास आवडणार नाही!
जेवणानंतर बस येण्यास पाच दहा मिनिटे उशीर झाला. तितक्या वेळात सोहम आणि बच्चेमंडळीनी फिश टँक मधील माशांचे परीक्षण / विश्लेषण करून मग त्यांच्यासोबत फोटो काढून वेळ सार्थकी लावला!
केसरी ग्रुपचा एक प्रवासी गट ह्याच हॉटेलात जेवण्यासाठी उतरला होता. बसची वाट पाहता पाहता नव्यानेच ओळख होत असलेल्या सह्प्रवाशांसोबत सिमला मनालीत तापमान किती असेल ह्याच्या गप्पा झोडण्यात मजा आली. बसमध्ये प्रवेश केल्यावर जितेशनं सिमल्याचा प्रवास एकंदरीत १२२ किमी असून मध्ये फक्त एकदा बस चहासाठी थांबेल अशी माहिती देईल. त्याआधी हिमाचलच्या हद्दीवर टोल भरण्यासाठी चालक उतरेल हे ही सांगण्यास तो विसरला नाही.
बसचा प्रवास सुरु झाला होता. आखीवरेखीव चंदीगड शहर आणि विविध सेक्टर नजरेआड होत होती. रस्त्यावर चालणारी माणसे अगदी अभावानेच दिसत होती. आम्ही आणि नाशिकचे कुलकर्णी कुटुंबीय ह्या दोघांचेही तीन तीन सदस्य. बसमध्ये दोन दोन सीटच बाजूबाजूला असल्याने आई-मुलगा अशा दोन जोड्या आणि मी व अमोल कुलकर्णी अशी बैठक व्यवस्था सुरुवातीला करण्यात आली. बसमधून दिसणाऱ्या चंदीगड शहराच्या एकंदरीत दृश्यावरून ह्या शहरातील सर्वच लोकांची आर्थिक स्थिती म्हणावी तितकी चांगली नाही ह्यावर आम्हां दोघांचे एकमत झाले. बस आजूबाजूच्या एखाद्या महत्वाच्या ठिकाणाजवळून जात असेल तर जितेश तत्काळ सर्वांना माहिती देई. पिंजोर येथील कौशल्या धरण, HMT चा ट्रॅक्टर कारखाना आणि सुप्रसिद्ध गार्डन ह्यांची माहिती जितेशने आम्हांला दिली. आता माहितीमायाजाळावर ह्या स्थळांची गुगलदेवता तपासणी केल्यावर ही सुद्धा सुंदर ठिकाणे असल्याचे जाणवलं. पण वेळेअभावी त्यांना भेट देणे शक्य नव्हतं.
१:५० च्या सुमारास टोलनाका येऊन गेला आणि हळूहळू चढ सुरु झाला. सुरवातीला माझा उत्साह असल्याने ह्या सगळ्या स्थळांच्या नोंदी मी ठेवल्या आहेत हे सांगू इच्छितो!
आता चढ चांगलाच स्थिरावला होता. बस नागमोडी वळणे घेत होती आणि खिडकीतून दिसणारं खोल दरीच विहंगम दृश्य जसं मनाला सुखावत होत त्याचप्रमाणे हृदयाचा ठोकाही चुकवत होत.
समजा चुकून ड्रायव्हरकडून एक चूक झाली तर? हा प्रश्न सतत मनात उद्भवत होता. आमचा ड्रायव्हर मात्र जबरदस्त होता. त्याचे बसवर व्यवस्थित नियंत्रण होते. उगाच वेगाने बस चालवायची त्याची सवय नव्हती. आणि समोरून वेगाने येणाऱ्या चालकांमुळे आपली स्थितप्रज्ञता तो गमावून बसत नव्हता. मुंबईत रिक्षावाला आणि बेस्ट ड्रायव्हर ह्यांच्या सोबत कार चालविताना ह्या ड्रायव्हरचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची नोंद मी मनातल्या मनात केली.
मध्येच एकदा टिंबर ट्रेल हे हॉटेल उजव्या बाजूने गेलं. ह्या हॉटेलची जी रस्त्याबाजुला इमारत होती तिथून दरीवरून उंच शिखरात एक केबल कार गेली आहे. उंच शिखरात ह्या हॉटेलचा दुसरा भाग आहे. लोकांना ह्या उंच शिखरातील वास्तव्य खूप भावतं. बडे लोक बडी पसंद! बाकी काय?
हिमाचल प्रदेशात ह्या डोंगराळ भागात सलग असा सपाट भाग मिळत नाही. त्यामुळे थोडा थोडा सपाट भाग निर्माण करून पायऱ्यापायऱ्यांची शेती (Step Farming) केली जाते, ही माहिती जितेशने दिली.
मध्येच ड्रायव्हरने बसला प्रती लिटर ५४.४६ ह्या दराचे २५७. ४४ लिटर डीजेल पिऊ घातले. एकूण बिल १४०२० रुपये झाले. पुन्हा एकदा ही नोंद १०० वर्षानंतरच्या वाचकांसाठी!
पुढे मग कालका सिमला टॉय ट्रेनचा ट्रॅक बाजूने गेला. १९०३ साली कोण्या ब्रिटीश अधिकाऱ्याने दोन वर्षात मनुष्यबळाच्या मदतीने ह्या ट्रॅकचे काम केले आहे. अजून एकदाही ह्यावर मोठा अपघात झाला नाहीय! अधिक माहितीसाठी http://en.wikipedia.org/wiki/Kalka%E2%80%93Shimla_Railway
आम्ही सोलन जिल्हा, थाना धर्मपुर इथे प्रवेश केला आहे असे रस्त्यावरील पाटी सांगत होती. हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२ होता.
आजूबाजूचा मार्ग आमच्यासमोर नयनरम्य दृश्यांचा नजराणा सातत्याने पेश करीत होता. धावत्या बसमुळे हा नजराणा कॅमेरात पकडायला कठीण जात होते.
परंतु बसमधील जिद्दी मंडळी आपले प्रयत्न चालूच ठेवत होती.
अशाच एका नयनरम्य ठिकाणी जितेशने गाडी दुपारच्या चहासाठी थांबविली. पावसाळी ढग आकाशात जमा झाले होते आणि थंडीचा प्रभाव जाणवू लागला होता. बसमधून उतरलेली मंडळी आपल्याजवळील गरम कपड्याचा हिशोब लावण्यात गर्क होती आणि हे कपडे कोठे मिळतील ह्याची चौकशी सुरु होती.
जितेशने एव्हाना गल्ल्याजवळील सीट पटकावली होती आणि बच्चेमंडळीच्या चॉकलेट , बिस्कीटच्या मागण्या पूर्ण करण्यात तो गुंग झाला होता. आपलाच माणूस गल्ल्यावर पाहून बच्चेमंडळींचा आत्मविश्वास दुणावला होता.
रस्त्याच्या कडेला मधूनच माकडं दिसत होती. त्यांच्या दर्शनाने कुलकर्णी ह्यांचा पहिलीतील मुलगा निशाद ह्याला खूप आनंद होत होता. न राहवून तो म्हणाला, "माकडांचा बाजार भरला की!"
चहापानानंतर बस सिमल्याच्या दिशेने धावू लागली. पाऊस अधूनमधून हजेरी लावत होता. सिमला जवळ येत चाललं होतं आणि बाजूच्या दरीची खोली अजूनच वाढत चालली होती. अशा वातावरणात जेव्हा ढगांशी लपाछपी खेळणारा सूर्य मधूनच आपल्या पिवळ्याजर्द किरणांसहित आपल्याला दर्शन देतो त्यावेळी मन कसं प्रसन्न होते. मध्येच डोंगरात सपाटी निर्माण करून बनविलेला सिमला विमानतळ सुद्धा आम्हांला दुरून दाखविण्यात आला. हॉटेल जवळ येत चाललं होतं, जितेशने प्रत्येकाच्या खोल्या घोषित केल्या आणि बॅगा रूमवर पोहोचविल्या जातील हे सांगितले.सिमला इथे आम्ही 'हॉटेल आशिया द डॉन (Dawn)' ह्या हॉटेलात उतरलो होतो. त्याच्या बाह्यदर्शनाने आम्ही काहीसे खट्टू झालो. आत वेलकम ड्रिंकने आमचे स्वागत करण्यात आले. खोलीमध्ये प्रवेश केल्यावर थंडावा खूप जाणवत होता. स्वच्छतेला काहीसा वाव होता. बऱ्याच कुटुंबियांच्या गृहमंत्र्यांनी स्वागतकक्षाला फोन लावण्याची नवरोबांना आज्ञा केली किंवा स्वतः फोन लावले. थोड्याच वेळात स्थिती काहीशी सुधारली. रूममधून दिसणारे हे विहंगम (?) दृश्य!
रात्रीचे जेवण व्यवस्थित होते. आमचा मित्र बटाटा विविध डिशमध्ये वेगवेगळी अनपेक्षित रूपे घेऊन हजर होता. जितेश प्रत्येक टेबलवर येऊन दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची माहिती देत होता आणि कोणाला काही अडचणी असल्यास त्यांचे निवारण करीत होता. दुसरा दिवशीचा कार्यक्रम अगदी गच्च भरलेला असणार असे त्याने आधीच आम्हांला बजावलं. सकाळी साडेसहा वाजता निद्रामोड कॉल करण्याचे आश्वासन देऊन त्याने आमचा निरोप घेतला.
सिमल्याच्या त्या थंडीत थकलीभागली शरीरे केव्हा निद्राधीन झाली ते कळलेच नाही!
(क्रमशः)
No comments:
Post a Comment