आपल्याला स्वतःची बरेच रूपे पहावयास मिळतात. ही रूपे कधी कधी स्वतःला चकित सुद्धा करतात. अशीच काही उदाहरणे माझ्या बाबतीतली.
१> रविवार संध्याकाळी मी एक दुःखी आत्मा असतो. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पाच दिवसांचा आठवडा समोर उभा असतो. शुक्रवारी रात्री पुढील आठवड्यासाठी ढकललेली कामे आठवत असतात. अशा वेळी झी मराठीवर कोणतातरी सिनेमा अथवा पुरस्कार कार्यक्रम पाहत असलेल्या बायको मुलाबरोबर क्रिकेट सामना न बघायला मिळाल्यामुळे वाद होण्याची शक्यता जास्त असते. ह्याच्या उलट शुक्रवारी संध्याकाळी दुनिया मेरी मुठ्ठी में याची प्रचीती घेत मी उत्साही बनलेला असतो.
२> बोरीवलीला राहताना मी एकदम जबाबदार गृहस्थ असतो. घराच्या सर्व जबाबदार्या पार पाडत, मुलाच्या अभ्यासाला हातभार लावत मी माझी सर्व कर्तव्य पार पाडत असतो. मुलासमोर वागताना आपण बर्यापैकी जबाबदारीने वागले पाहिजे असे माझे मत! त्यामुळे एकंदरीत शांत राहण्याचा माझा प्रयत्न असतो. पण हेच वसईला आल्यावर घरात माझे वागणे वेगळे असते. आई वडील, काका काकी यांच्या सहवासात मी लगेचच थेट १९८० च्या दशकाशी जोडला जातो. तेच घर, तीच माणसे यामुळे मला एकदम शालेय जीवनाशी जोडल्याची अनुभूती मिळते. त्यानंतर ज्या रविवारी सकाळी शालेय मित्र क्रिकेट खेळतो तो तर थेट बालपणात नेऊन ठेवल्याचा क्षण!
३> हल्ली एखादे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एखाद्या पुस्तकी विषयावरील १ तासापेक्षा अधिक चालणारे प्रवचन एकाग्रतेने ऐकण्याची माझी क्षमता कमी होत चालली आहे. अशा प्रवचनात मी एकदम असुरक्षिततेची जाणीव महसूस करीत असतो. 'So Aditya what are your thoughts on this?' असा प्रश्न कोणत्याही क्षणी माझ्यावर चाल करून येईल हा विचार मला तासभर छळत असतो. त्यामुळे अशा प्रवचनात एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्याची मी नोंद करून ठेवतो आणि असा प्रश्न माझ्या दिशेने आल्यास 'To an extend, I agree with what you just mentioned, but I have one question on' अशी प्रस्तावना करून मी हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करतो. आता वक्त्याला आपल्या प्रवचनावर कोणीतरी प्रश्न विचारतो आहे ही भावनाच इतकी सुखावह असते की पुढचा विचारलेला खरा प्रश्न कितपत चांगला आहे हा मुद्दा बर्याच वेळा गौण ठरतो. या उलट Excel मध्ये कोणास formula लिहून हवा असेल, एखाद्या आज्ञावलीत काही मदत हवी असेल तर मात्र मी उत्साहाने त्यात सहभागी होतो.
४> मला सर्व गोष्टी नियंत्रणात असलेल्या आवडतात / आवडायच्या. ७:४३ ची गाडी पकडण्यासाठी मी ७:३० वाजता स्थानकावर हजर असतो आणि ५ मिनटे उशिरा आलेली ७:२५ ची गाडी पकडतो. (या उलट माझी बायको, ७:४३ ची गाडी ७:५० लाच येणार असा हिशोब करून घरातून निघणारी) . शालेय जीवनापर्यंत हे 'सर्व गोष्टी नियंत्रणात असणे' वगैरे विचार ठीक होते. त्यावेळी परीक्षेच्या आदल्या दिवशी वर्षभराच्या अभ्यासाची उजळणी करणे जमायचे. बारावीत ते कसेबसे जमले. अभियांत्रिकीच्या परीक्षेच्या वेळी हा विचार पूर्णपणे अशक्य होती. तिथे बराचसा अभ्यासक्रम आदल्या दिवशी प्रथमच वाचला जायचा. हे तंत्र मला फारच थोड्या प्रमाणात झेपले. त्यामुळे आदल्या दिवशी रात्री १० वाजताची मर्यादा आखून तिथे अभ्यास थांबविण्याचे धोरण मी स्वीकारले. हे काहीसे भारतीय क्रिकेट संघासारखे झाले. आपण जिंकणाऱ्या बर्याच सामन्यात आपण सुरुवातीपासून वर्चस्व प्रस्थापित करतो आणि सामना जिंकतो. परंतु अवघड परिस्थितीतून बाजी मारण्याचे प्रसंग फार थोडे.
५> आयुष्यात मला काय बनायला आवडले असते? आजही हा प्रश्नाचे उत्तर आहे क्रिकेट खेळाडू, त्यातही फलंदाज. माझा कसोटी सामन्यातील पदार्पणाचा सामना, पहिल्या डावात माझी आणि संघाची कामगिरी बेताची, भारताला फोलोऑन मिळालेला. २०० हून अधिक धावांनी पिछाडलेल्या भारतीय संघाची दुसर्या डावात स्थिती ७ बाद १५० आणि मी तळाच्या खेळाडूंना घेवून सामना भारतास जिंकून देतो अशी स्वप्ने बघण्यात कित्येक मे महिन्याच्या सुट्ट्या गेल्या.
६> मध्यंतरी मी राजकारणाचा फार विचार करीत होतो. देशातील सुशिक्षित लोकांची एक चळवळ उभारून १० वर्षांनी तिचे राजकीय पक्षात रुपांतर करण्याचा माझा मानस होता. विचार उत्तम, पण आजूबाजूच्या परिस्थितीविषयी माझे ज्ञानाविषयी नसलेली खात्री, आजूबाजूच्या लोकांशी सामावून घेण्याची माझी क्षमता या मुद्द्यांचा विचार करून हा विचार मागे पडला. आयुष्याची होळी करण्याची तयारी असेल तरच माणसाने ह्या गोष्टी कराव्यात या निदानापर्यंत मी पोहोचलो.
७> मला मान्य करायला कठीण गेले, पण मला ego (आत्मसन्मानाची खरी खोटी भावना) फार. पण ज्या क्षणी मी हे मान्य केले त्या क्षणापासून जीवन काहीसे सोपे झाले. Ego वर मत करणे शक्य नाही, पण आपणास ego आहे हे मान्य करणे हे उत्तम.
मी असे बरेच लिहू शकतो , परंतु कुठे तरी थांबावयास हवे. मुद्दा असा आहे की आपण स्वतःला ओळखले आहे काय? आपल्यात अनेक रूपे दडलेली आहेत , ती जर आपणासच माहित नसतील तर आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींचे काय ? प्रयत्न करा स्वतःला ओळखायचा आणि त्यानंतर आपल्या जवळच्या लोकांना ओळखायचा . आयुष्य सुखदायक होण्याची शक्यता बरीच वाढेल !
No comments:
Post a Comment